तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी

Submitted by बेफ़िकीर on 17 November, 2010 - 02:32

आईसमोरी थांबुनी मी शेवटी अभ्यासली
मी पोरका होणार ही जाणीव हृदयापासली

तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी
आम्हा तिघांना स्पर्शुनी आई कशीशी हासली

याच्यापुढे पाठीवरी फिरणार नाही हात तो
मी काल त्या हातावरी ही पाठ माझी घासली

मी वेगळा माणूस हे मानून मी मिरवायचो
ही निर्मिती आई तुझी जी आजवर जोपासली

जी घ्यायची अंगावरी, हातास जेव्हा लागली
आश्चर्य की ती शालही आईप्रमाणे भासली

त्यांच्या कुशीमध्येच मी आक्रंदलो बिलगूनसा
ज्या माणसांना मी कधी समजायचो मागासली

वाटायचे की खूप काही साधले आहे इथे
चाळीस वर्षे राहिलो, चाळीस वर्षे नासली

अक्षर तुझ्याशी बोलण्यासाठी सदा जी धडपडे
का 'बेफिकिर' झाली, तुझी आई कशाने त्रासली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर,
जास्तीत जास्त वेळ आईसोबत रहा, परमेश्वर च शेवटी आपल्याला सगळ्यांना मदत करतो आणी शक्ती देतो .

काळजी घ्या. कितीही त्रास झाला तरी शेवटी त्या वरच्याने ठरवलेली तारीख त्या त्या माणसासाठी योग्य असते असे समजायचे. निदान तुम्हाला कल्पना तरी मिळालीये. आमच्यासारख्यांच्या नशीबी केवळ धक्काच असतो. त्या उरल्या क्षणांचं सोनं करून घ्या. आईसाठी आणि तुमच्यासाठी. बाकी दु:ख आपलं आपणच भोगावं लागतं आणि ते भोगूनच संपतं किंवा संपतच नाही. ते कुणीही, कसंही हलकं करू शकत नाही.

जितकं जमेल तितकं आणि त्या आहेत तितके दिवस त्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करा. मागे रहाणार्‍यांचं दु:ख त्या जाणार्‍या व्यक्तीला नंतरही कळत असतं तर या जगातून कदाचित पाय निघाला नसता.

सद्ध्यातरी पूर्णवेळ आईलाच द्या. बाकीचं लिखाण बिखाण आहेच नंतर, पण आई मात्र.....अजून काय बोलू? मला तर तुमच्या आईंच्या आजाराचा उल्लेख वाचला तर तुमच्या गटगमधे त्या खुर्चीवर बसलेल्या असतानाचा फोटोच आठवतो.

माझी तर आई आहे, पण आता ती माझ्या बाळासारखीच झाली आहे. तिच्यातली, माझी आई म्हणून माझ्यावर सतत मायेची पाखर घालणारी जी आहे तिला मी सतत शोधत असते... पण कदाचित ती परत कधीच मला सापडणार नाही. समाधान इतकंच की ती म्हटलं तर समोर मला रोज दिसते, तिचे रुसवे फुगवे, हट्ट मी पुरवायचा मी प्रयत्न करते, अगदी माझ्या लहानपणी ती माझे हट्ट पुरवायची तशीच !

बेफिकीर,
तुम्हाला काही सांगावे इतकी मी अनुभवी नाही. पण तरी काही बोलावे वाटतेय्..डॉक्टर कुणाचे आयुष्य किती असेल हे ठरवू शकत नाहीत. ते फक्त एक अंदाज देतात, त्यांच्या अनुभव व ज्ञानाच्या साह्याने. पण म्हणून तसेच होईल असे नाही ना? तुम्ही तुमच्या आई धडधाकट होऊन घरी परताहेत असे द्रूष्य डोळ्यासमोर आणत राहा. शक्य असल्यास इतरांना आणि आईंनाही तसे सांगा. positive visualisation चा बरेचदा आश्चर्यकारकरित्या फायदा होतो.
तुम्ही आताचपासून इतके निगेटीव विचार नका ठेवू प्लीज. सगळे ठीक होईल.

बेफिकीर,

खर सांगू. हा वेळ तुमच्या आईशी गप्पा मारण्यात घालवा. जुन्या मजेशीर, गंमतीशीर आठवणींना उजाळा द्या. छान शब्दात, लहान पोरागत तिला "थँक यू" म्हणा. तिला सांगा माये खूप केलस ग. आज मी आहे तो तुझ्या कष्टांमूळे. तिला केवळ कृतार्थ वाटेल असच बोला. हा जो वेळ तुम्हाला मिळाला आहे त्याच खरोखरच चीज करा. हे जग सोडून जाणार्‍या व्यक्तिशी संवाद साधायची संधी खूप कमी जणाना येते तेव्हा ती नैराश्यात दडवू नका.

माझ्या सा.बा. बायपास सर्जरीतून उठल्याच नाहीत. माझा नवरा त्यांच लाडावलेल शेंडेफळ. तेव्हा शिकत होतो म्हणून त्या म्हणाल्या "काही आभ्यास बाजूला ठेउन इथे येउ नका. केवढी मंडळी आहेत आजूबाजूला. जरा हिंडू-फिरू लागली की मीच येइन अमेरिकेत विश्रांतीला". २२ तासाची फ्लाईट घेऊन नवरा कोमात असलेल्या आईला भेटला आणि म्हणाला " आई नको घुटमळूस माझ्याकरता. मी आत्ता मोठा झलोय. खूप जबाबदार झालो आहे. जो आहे तो फक्त तुझ्यामुळे. तुझे संस्कार, तुझे विचार, तुझ प्रेम यानेच घडवल ग मला. मी कधीच विसरणार नाही तुला." ४ दिवस कोमात असलेल्या माझ्या सा.बा. ८ व्या मिनटाल्या गेल्या.
सॉरी तुम्हाला धीर देताना माझीच जखम उघडली. You Take care!

बेफिकीर , परमेश्वराच्या इच्छेसमोर आपलं काही चालत नाही , आईचा प्रत्येक क्षण होता होईल तितका आनंदी करण्याचा प्रयत्न करा, ईश्वर तुम्हास हे दु:ख सहन्याची ताकत देवो ! काळजी घ्या .

काळजी घ्या.
एक फूल यांचं म्हणणं खरं वाटतं.
पॉझिटीव्ह विचार करून त्यांच्याबरोबर आनंदात वेळ घालवा.
चांगलं होईल काहीतरी ..

..

काहींना आपण प्रत्यक्ष ओळखत असतो जसे जुने मित्र डॉ. ज्ञानेश, मिलिंद, नचिकेत, डॉ. कैलास, आनंदयात्री, शरद, हबा आणि माझे जुने मित्र अजय! त्यामुळे, ज्ञानेश यांनी प्रतिसादात लिहिलेल्या दोन डॉट्सचा अर्थ मला आणि त्यांना लगेच समजतो. पण ........

आभासी जगतातील वावर अनेकदा आपल्या मनाचा एक मोठा कोपरा व्यापून राहतो. लेखन, प्रतिसाद, चर्चा, वाद आणि कशातही सहभागी न होता केवळ वाचन! हे ई-व्यसन इतरांच्या, म्हणजे घरातल्यांच्या / मित्रांच्या वगैरे, टीकेचे लक्ष्य होत असतानाच या व अशा स्वरुपाच्या व्यासपीठांवर स्वतःची अशी एक स्वतंत्र दुनिया निर्माण होते. त्यात जवळचे मित्र, नुसतेच मित्र, टोचून बोलणारे, शांत बसणारे, मुद्दाम भांडणारे, काहीही लिहीले तरी प्रेमाने स्तुतीच करणारे, असे सर्व जण आपल्या वैयक्तीक वर्तुळात येतात. प्रत्येकाशी आपल्या असलेल्या आभासी नात्याची किंवा ई नात्याची एक व्याख्या असते, त्या नात्याला एक नांव असते. हा मित्र, तो फॅन, तो शत्रू, तो कुणीच नाही, वगैरे वगैरे!

पण माझ्या या समजुतीला (सध्याच्या परिस्थितीत सुखद म्हणता येत नसले तरीही सुखद रीतीनेच) पूर्णतः बदलवून दाखवण्यात आपल्या सर्वांचा सहभाग व योगदान आहे. माणुसकी, प्रेम व मैत्री या सर्वांनी ओथंबलेल्या या आधारांना 'धन्यवाद' असा औपचारिक प्रतिसाद देऊन त्यांचे महत्व घटवण्याइतका मी अपात्र माणूस नाही. उलट, हे ऋण असलेले बरे!

जेथे आपण दिवसातला एक महत्वाचा काळाचा भाग व्यतीत करतो तेथील माणसे किती चांगली, किती दिलदार आणि किती आधार देणारी असतात याचे प्रत्यंतर आपल्या सर्वांच्या व मायबोली प्रशासनाच्या माध्यमातून मला समजले हे मी माझे भाग्य मानतो.

-'बेफिकीर'!

....

अश्रु अश्रु आणि केवळ अश्रु.
हेच समर्पक वाटतेय मला प्रतिसाद देताना....................

Uhoh बेफिकीरजी शेवटी ती वेळ आलीच, पण त्याला इलाज नाही, हे निसर्गचक्र चालतच राहणार निसर्गाच्या अनेक नियमांपैकी ' लॉ ऑफ रीप्लेसमेंट' हा एक नियम.....जुने जाऊन त्या ठिकाणी नविन येणे हा नियम समजुन विचार केलात तर दु:खाची तिव्रता नक्कीच कमी होईल.

आपल्या या भावनेतून आपण समस्त माबोकरांचे नाते आईसोबत जोडलेत. जास्त बोलणे शक्य नाही आणि जमतही नाही. आमच्या आयुष्यातली आपण म्हणाल तेवढी वर्ष आईला मिळोत हीच देवाकडे प्रार्थना!

>>>तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी
आम्हा तिघांना स्पर्शुनी आई कशीशी हासली

>>>याच्यापुढे पाठीवरी फिरणार नाही हात तो
मी काल त्या हातावरी ही पाठ माझी घासली

अप्रतिम.. !

किती तुडूंब साठा असतो पाण्याचा आपल्या डोळ्यांमध्ये.. याची नव्याने जाणीव.

आईला खूप आनंदी ठेवा.. नामस्मरण तुम्ही चालू ठेवा.. आईलाही नामस्मरण करण्याची प्रेरणा द्या. आमची प्रार्थना आहेच परमेश्वराकडे.

>>जी घ्यायची अंगावरी, हातास जेव्हा लागली
आश्चर्य की ती शालही आईप्रमाणे भासली

रडवलंत आज खरंच. Sad मलासुध्दा एक फूल ह्यांचं म्हणणं पटतंय. माझी प्रार्थना तुमच्यासोबत आणि तुमच्या आईंसोबत.

Pages