शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट - डॉ. आनंद नाडकर्णी

Submitted by चिनूक्स on 29 October, 2010 - 02:58

आपल्याकडे मानसिक आजारांबद्दल प्रचंड पूर्वग्रह आहेत. मनोविकारग्रस्त म्हणजे 'वेडे' आणि मनोविकारांवर उपचार करणारे सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणजे 'वेड्यांचे डॉक्टर', ही समाजाची धारणा आजही टिकून आहे. शरीराचे जसे आजार असतात तसेच मनाचेही असतात आणि योग्य उपचारांनी ते बरे होऊ शकतात, हे लक्षात घेतलं जात नाही. आपल्या एवढ्या मोठ्या देशात आज केवळ सहा हजार मनोविकारतज्ज्ञ आहेत. तेही बहुतांशी शहरी भागांत. प्रचंड लोकसंख्या, डॉक्टरांची अपुरी संख्या यांमुळे फक्त अतितीव्र मानसिक आजारांच्या लक्षणांकडे गांभीर्यानं बघितलं जातं. त्यातही उपचारांसाठी उशिरा येणं, अगोदर अन्य उपाय करणं, या पायर्‍या घेतल्या जातात. मनोविकारांबद्दलचं अज्ञान दूर करणं, उपचारांची उपयुक्तता समजावून घेणं/सांगणं या गोष्टी कोणाच्या खिजगणतीतही नसतात.

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी १९८० साली एम.बी.बी.एस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी या पदव्या मिळवल्या. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध 'चळवळ' उभारण्यासाठी एक संस्था स्थापन करायची कल्पना डॉ. नाडकर्णी यांच्या मनात मनोविकारशास्त्राचं शिक्षण घेताना आली, आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवलीही. २३ मार्च १९९०मध्ये आयपीएच अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची औपचारिक स्थापना झाली. 'तीव्र मानसिक आजारांवर उपचार' एवढ्यापुरतं या संस्थेचं काम मर्यादित नाही. उपचारांसाठी येणारा मनोरुग्ण, त्याचे कुटुंबीय, दैनंदिन जीवनातील प्रश्नांमुळे गांजलेली व्यक्ती, कोणतीही समस्या नाही परंतु मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग स्व-विकासासाठी करू इच्छिणार्‍या व्यक्ती, अशा सर्वांसाठी ही संस्था आहे. क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा रूढ मार्गांबरोबरच साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, संवाद अशा आनंददायी साधनांचा कल्प्कतेने वापर केला जातो.

आज या संस्थेमध्ये साठ मनोविकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, पंचवीस आधार सदस्य आणि विविध सेवाभावी प्रकल्पांवर काम करणारे तीनशे प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत आहेत. संस्थेचा स्वतःचा मनोआरोग्य प्रशिक्षण विभाग आहे. स्वतंत्र माध्यम विभाग, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, क्रीडा मानसशास्त्र विभाग, संशोधन विभाग असे विविध गट कार्यरत आहेत. शिवाय एकाच वेळी अनेक वयोगटांसाठी अनेक सेवा, उपक्रम, प्रकल्प यांचं एक जाळं विणलेलं आहे. कोणत्याही सरकारी किंवा परदेशी मदतीशिवाय ही संस्था काम करते, आणि तरीही संस्थेचं सेवाशुल्क नाममात्र आहे. डॉ. शुभा थत्ते, डॉ. अनुराधा सोवनी या मानसशास्त्रज्ञांबरोबरच विविध क्षेत्रातल्या अनेकांनी या संस्थेच्या वाटचालीत मोलाची साथ दिली आहे.

मनाचे आजार झालेली माणसं मुळात 'शहाणी'च असतात, हे गृहितक मनाशी धरून मनोविकारांबद्दल समाजात जाणीव निर्माण करणं, मनोविकारग्रस्तांवर उपचार करून त्यांना पुन्हा उभं करणं आणि आजच्या धकाधकीच्या काळातल्या तणावांना झेलण्यास माणसांना समर्थ बनवणं, हे ध्येय घेऊन डॉ. आनंद नाडकर्णी कार्यरत आहेत. या अर्थाने ते शहाण्यांचे सायकिअ‍ॅट्रिस्टच आहेत. त्यांच्या व संस्थेच्या आयुष्याची कथा म्हणजे 'शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट' हे पुस्तक. कोणताही अभिनिवेश नसलेलं हे पुस्तक सामाजिक कार्य जिवंत आणि रसरशीत कसं ठेवावं, याचा उत्तम धडा देतं. माणसं जोडून किती मोठं काम उभं करता येतं, हे शिकवतं. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ध्येयानं भारलेला एक मनोविकारतज्ज्ञ कोलमडलेल्या माणसांना पुन्हा उभं करण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी किती झपाटलेपण अंगी बाणवतो, हे सांगतं.

आयपीएच ही संस्था अस्तित्वात कशी आली, कोणत्या खाचखळग्यांतून गेली, स्वतःच्या पायावर उभी कशी राहिली आणि समाजापर्यंत आज कशी पोहोचली आहे, याचा हा विस्मयचकित करणारा प्रवास. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या 'शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट' या पुस्तकातली ही काही पानं...

DrNadkarniBookCover.jpg

सायकिअ‍ॅट्रीबरोबर दोस्ती

एमबीबीएसची परीक्षा पार पडली की येणारं इंटर्नशिपचं वर्ष आमच्या काळात स्वातंत्र्याचे पंख लावून यायचं. पुढच्या एम.डी. किंवा एम.एस. अशा पदव्यांसाठी लागणार्‍या प्रवेशपरीक्षा अस्तित्वात यायच्या होत्या. एमबीबीएसच्याच गुणांवर पीजीची म्हणजे पोस्ट-ग्रॅज्युएशनची वाट खुली असायची. त्यामुळे ऐन तारुण्यात हे वर्ष कसं वाटत असेल हे सांगायला नकोच. शिवाय दर महिन्याला साडेतीनशे रुपये असा प्रचंड स्टायपेंड सुरु व्हायचा. घरून आणलेल्या पैशांवर होस्टेलवरचा संसार चालवणार्‍या आमच्यासारख्यांना हा पैसा अमूल्य वाटायचा... मात्र या काळात माझं मासिक उत्पन्न मी कधी हजार तर कधी बाराशेपर्यंत नेलं होतं. मी 'चित्रानंद' साप्ताहिकात सिनेमावर लिहायचो. 'लोकप्रभा'साठी मुंबईच्या होटेल्सवरती 'खवय्येगिरी' नावाचं सदर चालवायचो. साधना, मनोहरसाठी लिहायचो. वर्तमानपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्यांमधे लेख असायचे. एका लेखासाठी रुपये पन्नास ते दोनशे असं मानधन मिळायचं. शिवाय 'शिल्पी' नावाच्या जाहिरातसंस्थेसाठी मी कॉपीरायटिंगचं कामही अधूनमधून करायचो. नर्मदा सिमेंटसाठी गाणी आणि संवाद, इंग्रजीमध्ये लिहिलेल्या जाहिरातींची मराठी रुपांतरं असं काम मिळायचं. कधी 'उल्का' नावाची एजन्सीही काम द्यायची.

मी या सगळ्या ठिकाणी पोहोचलो कसा? 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये 'हवा कॉलेजची' या सदराबरोबर माझा छापील लेखनप्रवास एमबीबीएसच्या दुसर्‍या वर्षापासूनच सुरु झाला होता. विनायक पडवळच्या नेतृत्वाखाली आमचा एक तरुण गट 'भरतशास्त्र' हे नाट्यविषयक मासिक आणि 'स्पंदन' हा दिवाळी अंक काढायचा. मी त्यात सहसंपादक म्हणून काम करायचो. या अंकासाठी जाहिराती मिळवण्यासाठी मी या एजन्सीजमध्ये जायला लागलो. ओळखी वाढवल्या. काम मिळू लागलं. जेव्हा कधी प्रॅक्टिस चालू करु तेव्हा आपलं सेव्हिंग असायला हवं, हा विचार होता आणि एमबीबीएस झाल्यावर वडिलांच्या खिशाला त्रास द्यायचा नाही हे पक्कं ठरवलं होतं. माझे स्वतःचे खर्चही कमी नव्हते. पुस्तकं विकत घेणं, भरपूर सिनेमा पाहणं ('भरतशास्त्र'च्या ओळखींमुळे नाटकांना तिकीट लागायचं नाही), मुंबईभर भटकणं या सार्‍याला पैसे लागणारच. त्यात चवीने खाण्याची सवय.

माझी होस्टेलमधली खोली हासुद्धा एक सदा उपलब्ध अड्डाच होता. नाटकवाले, सामाजिक चळवळीवाले, पत्रकार, तरुण लेखक-कवी या सगळ्यांचं भेटण्याचं, गप्पांचं आणि कधी 'सेलिब्रेट' करण्याचं ठिकाण. म्हणून तर पोस्ट-ग्रॅज्युएशनचा विषय निघाल्यावर आमचे डॉ. रवी बापट सर म्हणाले, "तू सायकिअ‍ॅट्रीमध्येच एम.डी. कर. या ब्रँचमध्ये रात्रीचं जागरणं, ऑपरेशन्स, थकवणार्‍या इमर्जन्सी ड्यूटीज अशी काही भानगड नाही... तुझ्या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज चालू राहतील."

सरांचं म्हणणं खरं होतं. माझ्याही मनाचा कल सायकिअ‍ॅट्रीकडे झुकायला लागला होता. सेकंड एमबीबीएसला असताना आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी मी पार्टनर नावाची एकांकिका लिहिली होती, होमोसेक्शुअल व्यक्तीचं भावविश्व दाखवणारी. त्या निमित्ताने मी सायकिअ‍ॅट्री डिपार्टमेंटमधे गेलो. डॉ. कुमार ढवळे हा ज्येष्ठ मित्र त्यावेळी सायकिअ‍ॅट्रीमध्ये एम.डी. करत होता. समलिंगी आकर्षण असणार्‍या व्यक्तींच्या समस्यांवर त्यांचं संशोधन सुरु होतं. माझ्या एकांकिकेसाठीचा अभ्यास म्हणून मी या लोकांना भेटू लागलो, त्यांच्याशी बोलू लागलो. मानसिक प्रश्नांविषयीचं माझं ते पहिलं 'एक्स्पोजर'. याआधी मी लिहिलेली 'झडलेला मोहोर' ही एकांकिका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये प्रचंड गाजलेली होती. या एका़किकेचं सूत्रसुद्धा कुष्ठरोग्यांचं भावविश्व हेच होतं.

एमबीबीएसच्या शिक्षणामध्ये आम्हाला वेगवेगळ्या वैद्यकशाखांचं 'पोस्टिंग' असतं. माझी बालआरोग्यशास्त्राची 'क्लिनिकल टर्म' होती परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये. तिथे डॉ. एस. एक. मर्चंट हे ज्येष्ठ ऑनररी प्रोफेसर होते. ते आम्हाला शिकवायचे. हिस्ट्री घेण्यासाठी केसेस द्यायचे. त्यांनी मला दिलेल्या केसेस खास होत्या. अंथरुणात शूशू करण्याची सवय असलेली मुलगी, अभ्यासातल्या तक्रारी असलेला मुलगा... या मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी बोलून मी सरांना प्रेझेंट करायचो. "बॉय, डू यू नो व्हाय आय वॉज गिव्हिंग यू दीज केसेस?" आमची टर्म संपल्यावर आम्ही विद्यार्थ्यांनी दिलेल्या पार्टीमध्ये सर म्हणाले, "बिकॉज पीपल ओपन-अप ईझिली इन फ्रंट ऑफ यू." माझ्यामध्ये असलेली एक खुबी आरशासारखी माझ्यासमोर धरत सर म्हणाले.

या सार्‍यामध्ये भर पडली इंटर्नशिपमध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या 'वैद्यकसत्ता' या पुस्तकाची. महाराष्ट्र टाइम्ससाठी लिहिलेल्या लेखाची अंतिम प्रत द्यायला मी मटाच्या ऑफिसमध्ये स्वतःच जायचो. तिथे माझी दिनकर गांगलांशी ओळख झाली. ते तिथे रविवार आवृत्तीचं काम पाहायचे. गांगलांनी माझ्या हातात एकदा 'मेडिकल नेमेसिस' हे इव्हान एलिच या लेखकाचं पुस्तक ठेवलं. मानवी आयुष्याला आरोग्याभिमुख करण्याऐवजी आजारसंमुख करणारी वैद्यकयंत्रणा, असं या पुस्तकाचं सूत्र. वैद्यकशास्त्र स्वतःशी 'सत्ता' गाजवून समाजाला 'आरोग्यविकास' या पैलूपासून दूर नेते आहे, ही एलिच यांची भूमिका. व्यक्तीपेक्षा आजारावर लक्ष केंद्रित करणारी आणि मानवी वेदनेचा नव्हे तर फक्त लक्षणांचा उपचार करणारी वैद्यकसत्ता.

'ग्रंथालीसाठी या पुस्तकाचं मराठी भाषांतर करशील का?' गांगलांनी मला विचारलं. "त्यापेक्षा भारतीय संदर्भांसहित याचं रुपांतर केलं तर..." मी प्रस्ताव ठेवला. त्यांना तो आवडला. अर्थात त्यामुळे माझ्यावर जबाबदारी आली संदर्भ शोधण्याची, पुस्तकं वाचण्याची. त्या वेळी 'नेट' नावाचा जादूगार अस्तित्वात नव्हता. त्यामुळे चिकाटीने संदर्भ मिळवायला लागायचे. मला अशा 'अभ्यासा'ची आवड लागली. त्या निमित्ताने आरोग्यक्षेत्राविषयी खूप वाचलं. आरोग्याकडे पाहण्याचे दोन प्रमुख दृष्टिकोन कळायला लागले. बायोमेडिकल म्हणजे फक्त जीवशास्त्रीय, तर बायो-सायकोसोशल म्हणजे जीव-मनो-सामाजिक किंवा सर्वसमावेशक दृष्टिकोन अशी मांडणी आहे. वैद्यकशास्त्रातल्या कोणत्याही शाखेची प्रॅक्टिस करताना यापैकी कोणता दृष्टिकोन आपला म्हणायचा याचा चॉइस प्रत्येक डॉक्टरकडे असतो. मी सायकिअ‍ॅट्रीकडे जाण्याचं प्रमुख कारण म्हणजे या पुस्तकाच्या निमित्ताने झालेला अभ्यास.

'वैद्यकसत्ता' प्रसिद्ध झाल्यावर त्याच्यावर एक टीका अशी झाली की पुस्तकाचा सूर नकारात्मक आहे. 'काय वाईट आहे या सिस्टीममध्ये' ते सांगितलं आहे, पण काय करायला हवं ते सांगायला हवं. माझ्या अभ्यासात मला सर्वसमावेशक बायो-सायको-सोशल आकृतिबंधाचे सज्जड पुरावे मिळाले होते. माझ्या त्या वेळपर्यंतच्या अनुभवाची त्यात भर घालून या सर्वसमावेशक दृष्टिकोनाची मांडणी पुढे मी 'आरोग्याचा अर्थ' या पुस्तकामध्ये केली.

गेल्या शतकातल्या ऐंशीच्या दशकाची सुरुवात होती ती. मनोविकारशास्त्र अर्थात सायकिअ‍ॅट्रीला 'ग्लॅमर' नव्हतं. त्यामुळे पोस्ट-ग्रॅज्युएअशनला प्रवेश मिळणं खूपच सोपं होतं. माझ्या जी. एस. मेडिकलमधले अ‍ॅनाटॉमीचे प्राध्यापक डॉ. मनू कोठारी आणि डॉ. लोपा मेहता यांनी 'वैद्यकसत्ता'च्या अभ्यासाठी त्यांची समृद्ध खासगी लायब्ररी मला खुली करुन दिली होती. या दोघांबरोबर बोलताना कॅन्सरसारख्या आजाराची मनोसामाजिक बाजू मला नव्याने कळली. शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर (इम्युनॉलॉजी) होणारा मनाचा परिणाम कसा असतो याबद्दलचे संदर्भ मिळाले. नॉर्मन कझीन्ससारख्या या क्षेत्रातल्या संशोधक लेखकांची पुस्तकंही या दोन्ही गुरुजनांनी मला दिली.

नाट्यलेखन, चित्रपट रसास्वाद या क्षेत्रांतल्या उमेदवारीमध्ये 'मन' हा विषय सतत येतच होता. आता हा विषय वारंवार खुणावू लागला. इंटर्नशिपच्या वर्षामध्ये हौशी रंगमंचावरच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी दोन अंकी नाटक लिहायचा घाट मी घातला. त्यातून 'मयसभा' हे नाटक निर्माण झालं. प्रत्येक व्यक्तीला भावणारं वास्तव हे तिच्या स्वतःच्या दृष्टिकोनावर, विचारशक्तीवर अवलंबून असतं, ही या नाटकाची थीम होती. स्वतःला कळलेल्या वास्तवावर माणूस स्वतःचं तत्त्वज्ञान म्हणजे बिलीफ सिस्टीम बनवतो आणि मग त्या तत्त्वज्ञानाला स्वतःच्या वागण्यातून वारंवार सिद्ध करत राहतो. या नाटकात एक वाक्य होतं - 'म्हणून प्रत्येक सामान्य माणूस (आपापल्यापुरता) सॉक्रेटिस असतो.' या सगळ्या प्रवासात पूर्वग्रहांशिवायचं निर्मळ जगणं नष्ट होतं आणि माणूस स्वत:च्याच दृष्टिकोनाचा बंदिवान होतो, हे दाखविण्यासाठी तुरुंग-कैदी-तुरुंगाच्या भिंती अशी प्रतीकं वापरली होती. पुढे बारा-तेरा वर्षांनंतर भेटलेल्या डॉ. अल्बर्ट एलीस या मानसशास्त्रज्ञाच्या विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीमधली अनेक सूत्रं मला आज या संहितेमध्ये अचानकपणे, अद्भुतपणे आलेली जाणवतात. अद्भुतपणे हा शब्द यासाठी वापरला की, तेव्हा माझा मानसशास्त्राचा पाठ्यविषय म्हणूनचा अभ्यास सुरूही झाला नव्हता. मित्रवर्य चंदू पाटणकरने दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा प्रयोग खूप रंगायचा. तांत्रिक कारणांमुळे हे नाटक अंतिम फेरीत पोहोचू शकलं नाही, परंतु अंतिम फेरीतील नाट्यलेखनाचं एक पारितोषिक मला मिळालं. राज्य शासनाचा शिक्का असलेलं हे माझं पहिलं सर्टिफिकेट.

मागे वळून पाहताना मला जाणवतं की, ’मन’ या विषयाचा माझा विचार साहित्य, आरोग्यसंशोधन, तत्त्वज्ञान, नाट्य, जाहिरात अशा अनेक विषयांद्वारे होत गेला आणि शेवटी तो पोस्ट-ग्रॅज्युएशनच्या निर्णयाप्रत आला. ’व्यवसायाची निवड’ किंवा ’भविष्यातला आर्थिक प्राप्तीचा मार्ग’ हे भाग त्यात आलेच नाहीत. दिनकर गांगलांनी मला एलिचचं पुस्तक वाचायला देणं, हा या सार्‍या साखळीतला एक ’टर्निंग पॉइंट’ आहे. आणि मी खोलात शिरून ’वैद्यकसत्ता’ची प्रकरणं लिहू लागलो, त्याच्या वाचनाचे कार्यक्रम विविध प्रकारच्या वाचकांसमोर करू लागलो त्याचं श्रेय पुन्हा डॉ. रवी बापट सरांचं अहे. इंटर्नशिपच्या या दिवसांत एखाद्या संध्याकाळी सर मला त्यांच्या गाडीतून घेऊन जायचे. माझ्या लिखाणाची फाइल बरोबर असायची. माधव मनोहर, अरुण साधू, कुमार केतकर, अनंत भावे, पुष्पा भावे, उषा मेहता, शशी मेहता, अरुण मेहता, अशोक जैन अशा अनेकांसमोर मी हे पुस्तक वाचलं. त्यातून माझा आत्मविश्वास तयार होत होता. या सार्‍या मोठ्या माणसांसमोर स्वत:चा आब आणि त्यांचा मान रखून स्पष्टपणे कसं सादर व्हायचं याचं माझं शिक्षणच बापट सरांनी केलं.

माझ्या सर्व सर-मॅडमना म्हणूनच माझा सायकिअ‍ॅट्रीमध्ये एम.डी. करण्याचा चॉइस माझ्या वृत्तीला साजेसा वाटत होता. घोटाळा होता तो घरीच. माझ्या आईला माझा निर्णय अजिबात पसंत पडला नाही. माझ्या सख्ख्या मामाला स्किझोफ्रेनियाचा आजार होता. ऐन उमेदीच्या काळामध्ये त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षं घालवावी लागली. माझ्या आईने या सगळ्या प्रकाराचा धसका घेतला असावा. ’वेड्यांवर’ उपचार करणारे डॉक्टर कालांतराने त्या वातावरणात मुरतात आणि तसेच बनतात, हा समज त्या काळी आजच्यापेक्षा जास्तच रूढ होता. आईने आमच्या फॅमिली डॉक्टरांनाही ’फितवण्याचा’ यशस्वी प्रयत्न केला. "सायकिअ‍ॅट्री इज ओन्ली हाफ सायन्स", ते डॉक्टर म्हणाले. खरं होतं त्यांचं विधान. ’द अदर हाफ बीइंग आर्ट’, हे कळायला अर्थातच खूप वर्षं जावी लागली.

भक्कम पाठिंबा आणि भावनाप्रधान विरोध अशा विरोधी पार्श्वभूमीवर माझा निर्णय पक्का झाला. एमबीबीएसला अ‍ॅडमिशन घेताना मी फारसा विचार केला नव्हता. मोठा भाऊ इंजिनीयर तर धाकटा डॉक्टर, असा हुशार मुलांच्या कुटुंबातला नियम मी विनातक्रार पाळला होता. त्याचं कारण होतं गणित या विषयाची नावड. इंटर सायन्सला ’बी’ ग्रूप घेतला तर गणितापासून सुटका मिळायची. हे आकर्षण जबरदस्त होतं. इंटरला बर्‍यापैकी गुण मिळाल्यामुळे जीएस मेडिकलची अ‍ॅडमिशनही सहजपणे झाली होती. ’माझा निर्णय’ हा या सार्‍या प्रवाहाचा फारसा भाग नव्हताच. घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी असते हे मला पहिल्यांदा जाणवलं. त्यामुळे मी घाबरलो नाही. अपार उत्सुकतेने सायकिअ‍ॅट्रीमधल्या रेसिडन्सीला सुरुवात केली.

महापालिकेच्या रुग्णालयातले बाह्यरुग्ण विभाग नेहमी ओसंडून वाहत असायचे. आम्ही ज्युनियर रेसिडेंट म्हणजे हाऊसमन, म्हणजे निवासी डॉक्टर. आम्ही सकाळी नऊपासून बाह्यरुग्ण विभाग सुरू करायचो. वर्षानुवर्षं येणारे जुने पेशंट्स असायचे. त्यांना फक्त औषधं पुढे चालू करून हवी असायची. त्यांच्या पेपरवर लिहायचं, ’ct all’ म्हणजे ’कंटिन्यू ऑल मेडिसिन्स फॉर अ वीक'. माझ्या लक्षात आलं की, ही ’ct all’ म्हणजे सायकिअ‍ॅट्री शिकण्याचं पुस्तक आहे. या पेशंट्सबरोबर चार शब्द बोलायला सहसा कुणाला वेळ नसतो. पण आपण बोलायला बसलो तर जुन्या म्हणजे क्रॉनिक आजारांचं एक दालन आपल्यापुढे खुलं होतं. स्किझोफ्रेनिया आजाराचे रुग्ण यायचे. काहीच नोकरी-व्यवसाय न करणारे. त्यांच्याबरोबर त्यांचे आईवडील असायचे. त्यांना थोडा दिलासा देता आला तर बरं वाटायचं. आमच्या ओपीडीचा जुना वोर्डबॉय होता प्रल्हादसिंग म्हणून. त्याचं प्रॅक्टिकल ज्ञान अफाट होतं. कुणाला कोणती इंजेक्शनं द्यायची याची त्याची गणितं होती, आणि ती बरोबर असायची. तो स्वत: खूप प्रेमळ होता. तीन-साडेतीन तास सतत पेशंट्स पाहिले की थंडगार लिंबू सरबताचा ग्लास तो समोर ठेवायचा आणि म्हणायचा, "बहोत थक गये साब...अब शरबत पीजिये।"

या ओपीडीमधून त्या त्या दिवसाच्या अ‍ॅडमिशन्स व्हायच्या. दुपारचं जेवून वॉर्डमध्ये जाऊन त्यांचे केसपेपर भरायचे. कधी व्हायोलंट रुग्ण असायचे तर कधी संपूर्णपणे कोशात गेलेले विथड्रॉन. संध्याकाळपासून दुसर्‍या दिवशी आठपर्यंत इमर्जन्सी केसेस पाहायच्या. इतर वॉर्डांमधले, इतर विभागांतले पेशंट्स सायकिअ‍ॅट्रीला रिफर व्हायचे. मी हे कॉल्स खूप काळजीपूर्वक, प्रेमाने पाहायचो. पुढल्या दोन-तीन वर्षांमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समधून माझ्या नावाने कॉल यायला लागले तेव्हा छान ’मोठं’ झाल्यासारखं वाटायला लागलं.

माझ्या शाखेची उपयुक्तता मला ’सिद्ध’ करायला हवी, हे समजायला लागलं. मी चार औषधं लिहून दिल्याने हे होत नव्हतं. समजा, सर्जरी, मेडिसिन, गायनॅक यांपैकी कुठूनही कॉल आला तर मी त्या पेशंटबद्दल त्या त्या डॉक्टरांशी बोलायचो. त्या रुग्णाचा पाठपुरावा करायचो. ’वैद्यकसत्ता’च्या निमित्ताने वाचलेल्या ’बायो-मेडिकल’ दृष्टिकोनाला सर्वसमावेशक बनवण्याच्या माझ्या प्रयत्नांची ती सुरुवात असावी.

मानसिक मार्गदर्शन म्हणजे काउन्सेलिंग शिकायला आणि शिकवायला डिपार्टमेंटमध्ये कुणालाच फारसा वेळ नसायचा. मला पेशंट्सशी बोलण्यात रस असायचा. म्हणून माझा मीच काही पेशंट्सना संध्याकाळी बोलवायचो. लैंगिक प्रश्नांशी संबंधित रुग्णांचा एक गट आठवड्यातून एकदा भरायचा. मी या विषयावर वाचन करून, स्वतःची उदाहरणं तयार करून हा गट अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करू लागलो. आता मोठमोठी पुस्तकं वाचताना कंटाळा यायचा नाही. मला या विषयातलं ज्ञान मिळवायचं आहे, हाच हेतू. 'ज्ञानलालसा' की काय म्हणतात त्याची जाणीव मला प्रथमच व्हायला लागली. एकेका आजारावरच्या स्वतःच्या नोट्स काढायला अनेक पुस्तकं वाचायची, जर्नल्स चाळायची, औषधोपचारांविषयीचं ज्ञान वाचायचं, ते रुग्णांसोबत पडताळून पाहायचं.

माझी सायकिअ‍ॅट्री डिपार्टमेंटमधली रेसिडेन्सी चालू झाली तेव्हा मुंबईतला गिरणी संप होऊन काही महिने लोटले होते. केईएम हॉस्पिटल आहे मध्य मुंबईच्या परळ भागामध्ये, म्हणजे गिरणगावामध्ये. आमच्या मनोविकारशास्त्राच्या ओपीडीमध्ये येणार्‍या केसेसमध्ये गिरणी संपाचा परिणाम झालेले पेशंट्स आहेत का?... माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले. त्याला कारणीभूत झाली एक घटना... इमर्जन्सी ड्यूटीवर असताना सर्जरी युनिटमधून एक कॉल आला, 'Oesophgeal Burns' ची (म्हणजे अन्ननलिकेला भाजल्यामुळे झालेली जखम) एक केस पाहायला येऊन जा.' सर्जरीवाल्यानी सायकिअ‍ॅट्रीच्या रेसिडेंटला का बोलवावं कळेना. या मध्यमवयीन स्त्रीचं छोटं कुटुंब होतं शिवडीला, नवरा गिरणीत कामाला. तीन कुमारवयीन मुलं. गरिबीतला, पण नीटनेटका संसार. संप सुरू झाला. नवरा घरी बसला. महिने जात राहिले. आर्थिक परिस्थिती बिकट झाली. या बाईंनी संसार उभारताना ना कुणाचं कर्ज घेतलं होतं, ना कुणाचे उपकार. बाईंचा नवरा एके ठिकाणी रोजंदारीवर कामाला जायला लागला होता. मुलांची शिक्षणं बंद होण्याची भीती दाटून येत होती. बाथरूम साफ करण्यासाठी आणलेल्या अ‍ॅसिडच्या बाटलीतलं अ‍ॅसिड त्या बाईंनी घशात ओतलं.. आत्महत्येचा प्रयत्न म्हणून, ही परवड असह्य झाली म्हणून. एका क्षणाचा खेळ...

या बाईंशी बोलून मी बाहेर पडलो आणि डोक्यात प्रश्न फिरू लागले. डिपार्टमेंटमधल्या सिनियर्सबरोबर चर्चा करून मी मुलाखतींचा नमुना तयार केला. पुढच्या चार महिन्यांमध्ये मी सुमारे ३० केसेसचा एक पाहणी प्रकल्प केला. त्यात कामगार आणि त्यांचे निकटचे कुटुंबीय होते. यात आत्महत्येचे प्रयत्न होते तशी वाढलेली व्यसनाधीनताही होती. खोटं बोलणार्‍या, मारामारी करणार्‍या मुलांच्या केसेस होत्या. या 'बिघडलेल्या' मुलांमधूनच नव्वदच्या दशकांतलं मुंबईचं 'अंडरवर्ल्ड' तयार होणर होतं. प्रदीप दीक्षित या लघुपटनिर्मात्याच्या गिरणी संपावरच्या चित्रपटामध्ये मी ही माहिती सादर केली. सायकिअ‍ॅट्रिस्ट लोकांची एक कॉन्फरन्स पुण्यामध्ये होती. तिथे मी 'सायकॉलिजिकल इम्पॅक्ट ऑफ टेक्सटाईल मिल स्ट्राईक' या शीर्षकाचा माझा पहिला पेपर वाचला. तिथे चर्चा झाली माझं रिसर्च डिझाईन कसं 'फॉल्टी' आहे यावर. सायकिअ‍ॅट्रित प्रवेश केल्यावर वर्षभरात स्वतःचा स्वतः अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, यावर कुणीच बोललं नाही. मी हिरमुसलो. ते सत्र संपल्यावर हसर्‍या चेहर्‍याच्या एक सायकिअ‍ॅट्रिस्ट मॅडम पुढे आल्या. "खूप छान पेपर होता तुझा.. तुला हा विषय जाणवला हेच किती महत्त्वाचं! छान! चल माझ्याबरोबर घरी जेवायला." या मॅडमचं नाव होतं डॉ. अनिता (सुनंदा) अवचट. त्या दुपारी तिच्या घरी जेवायला जाताना आम्हा दोघांनाही ठाऊक नव्हतं की आमचं नातं यापुढे किती घट्ट होणार आहे ते.

आमच्या सायकिअ‍ॅट्री डिपार्टमेंटमध्ये दोन मोठे गुरू होते. माझे प्रोफेसर डॉ. एल. पी. शहा आणि विभागप्रमुख डॉ. दिनशॉ डुंगाजी. दोघांच्या शैली अतिशय वेगळ्या. किती वेगळ्या?... 'कट्यार काळजात घुसली' मध्ये दोन गायकांच्या असतात तशा. डुंगाजी सरांमध्ये वसंतराव देशपांड्यांची थक्क करणारी भरारी, तर शहा सर म्हणजे शांत नदी. पण दोघंही भरभरून शिकवणारे. या जुन्या ऑनररी डॉक्टरांमध्ये विद्यार्थ्यांबद्दल, हॉस्पिटलबद्दल खूप प्रेम असायचं. अशा व्रतस्थ ऑनररीजमुळे खूप वैद्यकसंस्था नावारूपाला आल्या. एलपी शहा सरांना दृष्टिदोष होता. त्यांची दृष्टी उत्तरोत्तर कमी होत जाणार, असं त्या आजाराचं स्वरूप होतं. पण त्यांचं शास्त्रीय वाचन प्रचंड आणि स्मरण तल्लख. वॉर्डामध्ये पेशंट्सबरोबर आम्हाला शिकवताना ते दोन दोन तास घालवायचे. आमचं ज्ञान घासून लख्ख करायचे.

डॉ. डुंगाजींना प्रेमाने आम्ही 'बावाजी' म्हणायचो. एखाद्या पेशंटच्या डायग्नॉसिसबद्दल वादविवाद घडवून आणणे त्यांना आवडायचं. आमच्याबरोबर ते चक्क 'पैजा' लावायचे. दोन-तीन आठवड्यांच्या उपचारानंतर एखादं निदान 'सिद्ध' व्हायचं. मग सर सगळ्यांना कोल्ड्रिंक द्यायचे. आमच्यातला कुणी हरला तर ते ५५५ नावाच्या सिगरेटचं पाकिट वसूल करायचे. ही (त्या वेळची) उंची सिगरेट ते सतत ओढायचे.

आमच्या डिपार्टमेंटमधली ज्येष्ठ मंडळी विलक्षण उपक्रमशील होती. उत्साहमूर्ती सायकॉलॉजिस्ट डॉ. शुभा थत्ते, ईईजी टेक्निशियन मिस्त्री, वॉर्ड इनचार्ज सिस्टर रेगे... कधी भेळ, कधी मिसळ, कधी वाटली डाळ-पन्हे. माझ्याबरोबर रेसिडेंट मित्र डॉ. हरीश शेट्टी आणि आमच्यानंतर डिपार्टमेंटमध्ये आलेले डॉ. मनोज भाटवडेकर, डॉ. संजय कुमावत, डॉ. प्रसाद नायक, डॉ. अरविंद भावे असा आमचा ग्रूप जमला. भरपूर काम, भरपूर अभ्यास, मजेदार वातावरण आणि सर्व अवांतर हालचालीही सुरूच.

रेसिडेन्सी सुरू झाल्यावर आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी मी 'युद्धस्य कथा' ही एकांकिका लिहिली. जॉर्ज ऑरवेलच्या कादंबर्‍या वाचल्यावर झालेल्या परिणामामधून हे लेखन झालं. अपेक्षेप्रमणे ती गाजली. जीएस मेडिकलच्या एकांकिका म्हणजे काहीतरी वेगळं आणि विचार करायला लावणारं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. एका बाजूला सायकिअ‍ॅट्रीशी ओळख, तर दुसरीकडे नाटक. त्याच सुमारास मी 'दिनांक' या नव्याने प्रकाशित होणार्‍या साप्ताहिकासाठी 'किंचित' हे नियमित सदरही लिहित होतो. चांगलं पुस्तक, चित्रपट, व्यक्ती किंवा एखादी घटना यावर चटपटीत मांडणी करणारं सदर होतं ते. पुढे त्याचं पुस्तक झालं.

रेसिडेन्सीच्या पहिल्या वर्षभरातच डॉ. शहांनी माझ्यावर मद्यपाश उपक्रमाची जबाबदारी टाकली. डॉ. शहांच्या पत्नी हेमा शहा या काउन्सेलर. त्या आणि मी मिळून दर आठवड्याला पेशंट्सचे उपचारगट घेऊ लागलो. व्यसनाधीनता आणि व्यसनमुक्ती या विषयांवरचा माझा अभ्यास सुरू झाला. उपचारांसाठी आलेल्या काही रुग्णांबरोबर मीसुद्धा 'अल्कोहोलिक अ‍ॅनानिमस'च्या सभांना जाऊ लागलो. 'एए'ची सर्व पुस्तके वाचून काढली. हा उपचारगट हळूहळू रुग्णप्रिय होऊ लागला. आठवड्याला दोनदा सुरू झाला. केईएमच्या बाजूला ईएसआयएसचं मोठं रुग्णालय होतं, तिथे काम करणार्‍या काउन्सेलर विनीता चितळे त्यांचे पेशंट घेऊन आमच्या गटाला यायच्या. आज अठ्ठावीस वर्षांनंतर त्या आयपीएच संस्थेमधल्या माझ्या ज्येष्ठ सहकारी आहेत.

या दिनक्रमामध्ये कधी कधी विचार यायचा, यापुढे आपण काय करणार आहोत? आपण कोणत्या प्रकारची प्रॅक्टिस करणार आहोत? नेमकं कसं काम करायचं आहे आपल्याला? मनाच्या मुळाशी त्या विचारांचा एक ट्रॅक सतत सुरू राहायला लागला. जी सायकिअ‍ॅट्री मी शिकत होतो, ती होती 'हार्ड सायकिअ‍ॅट्री', म्हणजे तीव्र मानसिक आजार आणि त्यांच्यावरचे औषधोपचार, विद्युत उपचार इत्यादी. केईएममध्ये आमच्या विभागाची इमारतही शवागाराच्या लगत. इतर विभाग मात्र प्रमुख इमारतींमध्ये. कार्डिअ‍ॅक सर्जन, न्यूरॉलॉजिस्ट अशा वैद्यकशाखांसारखी प्रतिष्ठा माझ्या शाखेला का नाही? कारण ही शाखा ज्यांच्यावर उपचार करते त्यांना समाजाने आधीच प्रवाहाबाहेर टाकलेलं. म्हणजे समाजाची या रुग्णांबद्दलची दृष्टी बदलायची असेल तर लोकशिक्षणाची, प्रबोधनाची एक चळवळच उभारायला हवी. ज्यांना तीव्र मानसिक आजार नाहीत परंतु मानसिक समस्या आहेत अशा अनेकांसाठी माझं डिपार्टमेंट आता काय सेवा देतं आहे? तर काहीच नाही. आणि ज्यांना आपलं जीवन अधिक समृद्ध बनवायचं आहे अशा अनेकांना माझी शाखा मानसिक विकासाचं प्रशिक्षण देतेय का? इथेही उत्तर 'नाही' असंच.

आरएमओ होस्टेलमधल्या माझ्या खोलीत बसून एका रात्री मी एका मोठ्या संस्थेचं स्वप्न लिहून काढलं... समाज आणि मानसिक आरोग्य यांतली दरी कमी करणारी संस्था.. मानसिक आजार, रुग्ण यांच्याभोवतीचा कलंक म्हणजे स्टिग्मा कमी करणारी चळवळ... नाटकाचा अंक लिहावा तसं मी लिहीत गेलो... न खोडता, नितळ उजेडामध्ये. भविष्याचं क्षितिज स्पष्ट दिसणारा क्षण होता तो... तोपर्यंत अनुभवलेल्या, अभ्यासलेल्या अनेक गोष्टींचा परिपाक असणार तो. मध्यरात्री कधी तरी मी थांबलो.

आय.पी.एच.- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकली हॅन्डिकॅप्ड, असं मी या संस्थेला नाव दिलं. त्या वेळी हॅन्डिकॅप्ड हा शब्द प्रचारात होता (काळाच्या ओघामध्ये पुढे ’हॅन्डिकॅप्ड’चं जाणीवपूर्वक ’हेल्थ’ झालं). माझ्याकडे त्या वेळी मनोविकारशास्त्राची डिग्रीदेखील नव्हती आणि योजना होती एक संस्था बनवण्याची.

शनिवार-रविवारी घरी ठाण्याला जायचो. तेव्हा माझ्या वडिलांना मी माझं टिपण वाचायला दिलं. "छान! मी तुला व्यवस्थित टाइप करून देतो," ते म्हणाले. त्यांच्याकडे रेमिंग्टन रँडचा सुबक टाइपरायटर होता. माझ्या मोठ्या भावाने अमेरिकेहून आणलेला. त्यावर त्यांनी माझा प्रोजेक्ट टाइप केला.

एव्हाना माझ्या आईच्या मतांमधली ताठरता जरा मऊ व्हायला लागली होती. विविध वयोगटांमधल्या माझ्या रुग्णांचे अनुभव मी त्या दोघांना घरी गेल्यावर सांगायचो, माझ्या शाखेचं महत्त्व जाणीवपूर्वक पटवण्याचा प्रयत्न करायचो. त्याचं फळ मला मिळायला लागलं होतं. माझ्या स्वप्नाला आईवडिलांचा आशीर्वाद मिळाल्याने मी खूष होतो.

दरम्यान, सायकिअ‍ॅट्रीच्या अभ्यासक्रमात वर्षाला एक परीक्षा असायची. पहिल्या वर्षी डिप्लोमाचा भाग एक. हा पहिला अंक झोकात पार पडला. त्या परीक्षेमध्ये मी पहिला आलो. दुसर्‍या वर्षाच्या परीक्षेआधी काही महिने आम्हा रेसिडेंट डॉक्टरांचं इवलंसं जग ढवळून काढणारी एक घटना घडली. त्या वर्षापासून महाराष्ट्रात प्रथमच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना कॅपिटेशन फी आकारण्याच्या परवानगीसकट मान्यता मिळणार होती. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) या आमच्या महाराष्ट्रव्यापी संघटनेने या निर्णयाविरोधात बेमुदत संप पुकारला. आमचे संप बहुतेक वेळा पगारवाढीसाठी व्हायचे. या वेळी प्रश्न तत्त्वाचा होता. मी अर्थातच या संपाच्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांचा गटात आणि गोटात होतो. पुढचे तीन आठवडे आम्ही मुरारबाजीसारखा संप लढलो. मी संपूर्ण ’प्रेस’ सांभाळत होतो. रोजचं ’प्रेस रिलीज’ देणं, फोटोग्राफ्स पाठवणं, सर्व पेपरांमधून वेगवेगळ्या ’थीम्स’वर लेख लिहून आणणं हे माझं काम होतं. मी एक धमाल ’स्ट्रीट प्ले’ लिहिला. जब्बार पटेलांच्या हस्ते त्याचा मुहूर्त केला. पुढचे पंधरा दिवस या ’स्ट्रीट प्ले’चे प्रयोग मुंबईत ठिकठिकाणी लावले. बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये आमच्या संपाच्या पाठिंब्यासाठी जाहीर सभा घेतली आणि त्यात मोरारजी देसाई, श्याम बेनेगल, विजय तेंडुलकर अशी विविध तर्‍हांची माणसं एका व्यासपीठावर आणली. त्या वेळी टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या एस.एम. जोशी यांना भेटून संपाच्या पाठिंब्याचं पत्रकही मिळवलं. मार्डच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्यासाठी उच्च सनदी अधिकारी म्हणून राम प्रधान होते. आम्हा पोरापोरांकडे ते सहृदयतेने पाहायचे. वाटाघाटीच्या कसबामध्ये आम्ही अर्थातच त्यांच्यापुढे कस्पटासमान होतो. आता कळतोय मूर्ख आवेश आणि मुरब्बी हाताळणी यांतला फरक. असो. तत्त्वासाठी चाललेला हा संप अयशस्वी ठरला. पंचवीस दिवसांनंतर आम्ही सारे कामावर हजर झालो आणि दीड-दोन महिन्यांत आमची डिप्लोमाची दुसरी परीक्षा आली. तयारी मनासारखी नव्हती, तरी पास व्हायला अडचण आली नाही.

एम.डी.च्या परीक्षेला मात्र अत्यंत ’सिन्सिअरली’ अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. अभ्यास करवून घ्यायला एल.पी शहा सर होतेच मागे. एकेका विषयावरचे प्रश्न ते विचारायचे. आधी सोपे, नंतर कठीण. त्यांच्या अफाट वाचनाच्या पासंगाला तरी पुरता यावं म्हणून वाचावं लागायचं. पण त्याचा फायदाच व्हायचा. आंतरराष्ट्रीय जर्नल्सचा प्रती ते वाचायला द्यायचे. चार दिवसांनी त्यावर प्रश्न विचारायचे. त्यामुळे मी पुस्तकाच्या जशा नोट्स काढायचो तशा जर्नल्सच्याही काढायला लागलो. अभ्यासाचा टेम्पो वाढायला लागला तशी चक्क मजा यायला लागली. एम.डी.च्या परीक्षेआधी साठवून ठेवलेली रजा घ्यायची पद्धत असायची. डिपार्टमेंटमधले सहकारीसुद्धा अनधिकृत रजा घेण्यासाथी मदत करायचे. ते सारं काम पाहायचे आणि अभ्यासाला मोकळा वेळ करून द्यायचे.

परीक्षा होती एप्रिल-मेमध्ये. मी जानेवारीत रजेवर गेलो. या वेळी अभ्यासाचा उत्सव झाला होता. परीक्षेचं टेन्शन कमी आणि अभ्यासाची एक्साइटमेंट जास्त. याआधी कोणत्याही परीक्षेत मी असा प्रकार अनुभवलेला नव्हता. आठ-दहा तास अभ्यास करायला मजा येत होती. जागरणांचा त्रास होत नव्हता. पाठीशी स्वप्न जागतं असेल तर प्रयत्नांमध्ये कसा फरक पडतो पाहा.

मार्च महिन्यामध्ये होळीच्या सुमारास अचानक ताप भरला. माझे आईवडील माझ्या भावाकडे पुण्याला गेलेले. त्यामुळे मी होस्टेलच्या तिसर्‍या मजल्यावरच्या खोलीत पडून होतो. होळीची सुटी. होस्टेल सुनं सुनं होतं. दरवाजा वाजला. दार उघडलं तर डॉ. शरदिनी डहाणूकर - माझ्या डहाणूकर मॅडम. मलबार हिलमधल्या घरून निघून त्या मऊ वरणभाताचा डबा घेऊन आल्या होत्या. मॅडम म्हणजे माझ्या पालकच. त्यांच्या वरणभातानेच तापाला पळवलं असणार. आठवड्यात सावरलो आणि पुन्हा अभ्यासाला लागलो.

थिअरीच्या पेपरांसाठी माझी तयारी छान होती. माझा पेपर छान ’दिसावा’ अशीही काळजी मी घेत असे. व्यवस्थित अधोरेषा. रंगीत पेनांचा हलका वापर. माझं हस्ताक्षर अजिबात ’डॉक्टरी’ नाही, हा जमेचा मुद्दा. त्यामुळे पेपर लिहून संपला की त्याच्याकडे पाहताना, छान उतरलेल्या लेखाकडे पाहावं तसा मी प्रेमानं पाहायचो.

खरी महत्त्वाची ती प्रॅक्टीकल परीक्षा. मध्ये दहा दिवसांची गॅप. मी आणि माझा मित्र डॉ. रवींद्र कामत असे मिळून प्रॅक्टिकलचा अभ्यास सुरु केला. एकमेकांना प्रश्न विचारायचे. एकत्र पेशंट्स पाहायचे. एकमेकांचं परीक्षक व्हायचं. कामतकडे स्कूटर होती. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसायचो. वरळी सी फेस, फाईव्ह गार्डन्स, बॅन्ड्रा बॅन्ड स्टँड ही सारी प्रेमिकांची ठिकाणं. तिथे आम्ही (विचलित न होता) अभ्यास करायचो. दादरला खोदादाद सर्कलच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या दिव्याच्या खालीही बसायचो.

प्रॅक्टिकल परीक्षेसाठी एकूण चार परीक्षक. बातमी आली, की माझे सर डॉ. एल. पी. शहा त्यातले एक परीक्षक. वा! क्या बात है! मित्र म्हणाले, "सुटलास तू!" पण सरांनी आधीच स्पष्ट केलं, "तू माझा विद्यार्थी. मी तुला एकही प्रश्न विचारणार नाही संपूर्ण परीक्षेभर. विचारु दे इतर तिघांना. आय नो युवर केपॅबिलिटी."

द्रोणाचार्यांनी अर्जुनावर, रामकृष्णांनी नरेंद्रावर टाकावा, तसा विश्वास सरांनी माझ्यावर टाकला होता. नव्याने जबाबदारीची जाणीव झाली, पण खांदे वाकले नाहीत. परीक्षेच्या आदल्या दिवशी एक तासभर टेन्शन चढलं. मनोजला (भाटवडेकर) फोन केला. त्याने धीर दिला. आय.पी. एच.चं स्वप्न नजरेखालून घातलं. तीन वर्षांचा प्रवास नजरेसमोर आणत झोपलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी सातला बॉम्बे सेन्ट्रलच्या नायर रुग्णालयात पोचलो. मुख्य परीक्षक होते ज्येष्ठ सायकिअ‍ॅट्रिस्ट डॉ. ए. पी. पाटकर. मोठे पाटकर परीक्षक, छोटे पाटकर सुपरवायझर. प्रदीप म्हणाला, की मोठे सर त्यांच्या खाजगी प्रॅक्टिसमधून पेशंट्स आणणार, म्हणजे सुपरवायझर्सच्या 'मैत्री'चा फायदा कुणालाच व्हायला नको. पाटकर सर तसे कडक. मनातली माया सहसा चेहर्‍यावर न दाखवणारे. लखनौचे अगरवाल आणि सायन रुग्णालयाचे डॉ. के. पी. दवे हे उरलेले दोन परीक्षक.

दिवस सुरु झाला. पहिली फेरी 'शॉर्ट केसेस'. वीस मिनिटं पेशंट तपासायचा आणि पंधरा मिनिटांची परीक्षा. अशा तीन केसेस. त्यानंतर 'लाँग केस', म्हणजे पाऊणेक तास पेशंट आणि नातेवाइकांबरोबर. त्यानंतर वीस ते तीस मिनिटांचं प्रेझेंटेशन आणि प्रश्नोत्तरं. त्यानंतर स्पॉट्स. म्हणजे एखादं लक्षण पटकन दाखवण्याची परीक्षा. नंतर न्यूरॉलॉजीची लाँग केस. माझी बॅटिंग अत्यंत 'स्टेडी' चालली होती. एखाद्या प्रश्नाचं उत्तर उत्तम जमलं तर शेफारत नव्हतो. चुकलो तर हताश होत नव्हतो.परीक्षकही शांतपणे प्रश्न विचारत होते. डॉ. एल. पी. शहा अगदी गप्प. एखादा मुद्दा मी चांगला सांगितला की हसायचे. बस्स.

दुपारी दीडला जेवणाची सुट्टी. अडीचला उत्तरार्ध सुरु. आता 'टेबल्स' आणि 'व्हायव्हा'. म्हणजे तोंडी परीक्षेच्याच वेगवेगळ्या पाककृती. माझी मजल-दरमजल सुरु होती. माझ्या लक्षात आलं, उत्तीर्ण होण्याची पात्रता आपण पार केली आहे. आता 'क्रमांक' ठरवण्यासाठी प्रश्न विचारताहेत. नवी उमेद आली. अचानक डॉ. एल. पी. शहांनी विचारलं, "गेल्या काही महिन्यांमध्ये सायकिअ‍ॅट्री सोडून काय वाचलंस?"

"खरं सांगायचं तर रोजचा पेपर सोडून काही नाही", असं उत्तर देताना ट्यूब पेटली. डॉ. शहांनी एका ब्रिटिश सायकिअ‍ॅट्रीस्टचं आत्मचरित्र दिलं होतं वाचायला. त्याचं शीर्षक होतं ’द अनक्वाएट माइंड’. दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान सायकिअ‍ॅट्रीमध्ये कशी प्रगती झाली, याचं रोचक वर्णन त्यात होतं. पहिल्या महायुद्धानंतर मानसिक आघातांमुळे सैनिकांना आलेल्या मानसिक दुर्बलतेला म्हणायचे ’शेल शॉक’. असा प्रकार टाळण्यासाठी तत्कालीन डॉक्टरांनी तुटपुंज्या साधनांनिशी विविध उपाय कसे शोधले त्याचा उल्लेख या पुस्तकातून वाचून जवळजवळ पाठ झाला होता. मी लगेच या पुस्तकाचं नाव सांगितलं. तसे डॉ. ए. पी. पाटकर सरसावून बसले आणि मला म्हणाले, "नेमकं काय काय वाचलंस त्या पुस्तकात ते सांग". नेकी और पूछ पूछ? मी नियोजनपूर्वक, जाणीवपूर्वक पण टी-ट्वेंटीची बॅटिंग सुरू केली. सरांच्या चेहर्‍यावरचा कडकपणा विरघळत होता. मी थांबलो, तर पाटकर सर म्हणाले, "मी जेव्हा लंडनमध्ये डीपीएम ही डिप्लोमाची परीक्षा देत होतो तेव्हा माझे परीक्षक होते हे."
’आजोबा’ परीक्षक...झिंदाबाद!

परीक्षा संपली. अर्ध्या-पाऊण तासातच परीक्षक अनिधिकृत निकाल ’जाहीर’ करायचे. त्यांनी माझा पहिला क्रमांक आल्याचं घोषित करून अभिनंदन केलं.

मी घरी फोन केला. आईवडिलांना बातमी सांगितली. रिसीव्हर उचलताना आठवला चार वर्षांपूर्वीचा फोन. एमबीबीएसच्या परीक्षेत एका विषयात नापास झालो होतो तेव्हाचा. "माझं नाव नाहीये लिस्टमध्ये", मी म्हणालो होतो. ’मी नापास झालोय’, हे शब्द वापरायलाही मी धजत नव्हतो. आणि आता ’मी युनिव्हर्सिटीत पहिला आलोय’ हे सांगताना आनंद मनात मावत नव्हता.

शिक्षणाचं चक्र पूर्ण झालं होतं. रात्री झोपताना स्वत:ला विचारलं - आता पुढे? आमच्या सायकिअ‍ॅट्री ओपीडीमध्ये काम करणारा प्रल्हादसिंग त्याच्या पहाडी लहेजामध्ये मला म्हणायचा, "शाब, आप जरूर कुछ अलग कर के दिखाओगे आगे जाकर." त्याचं माझ्यावर काकणभर जास्त प्रेम असल्यामुळे म्हणत असणार तो... पण त्याचा म्हातारा, हसरा चेहरा डोळ्यांसमोर आला आणि म्हणालो, "हाँ प्रल्हादसिंगजी, जरूर..कुछ अलगही करेंगे ।"

***

शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट - आरसा मानसिक आरोग्याचा

डॉ. आनंद नाडकर्णी
समकालीन प्रकाशन
पृष्ठसंख्या - २८०
किंमत - रुपये २५०

***

टंकलेखन साहाय्य - अश्विनी के, आशूडी, साजिरा, नंद्या

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरद्स्त व्यक्तिमत्व...

"आकाश संपल आहे" (की आभाळ) अशी एक मालिका होती, त्यात ते बहुदा शेवटी ५ मिनिट काहीतरी सांगायचे. त्यावेळी खुप लहान होतो त्यामुळे नेमकं आठवत नाही. चुभुद्याघ्या.

दिनेशदा म्हणतात, तसं खरच हा माणुस वेड लावतो Wink

पुस्तकाची ओळख करूनदिल्या बद्दल चिनूक्स आणि टीम चे मनपुर्वक आभार

तासभरा पुर्वी लेख वाचला आणि तडक दादरला लाइब्ररीत गेलो. कधी एकदा समोर डेस्क वर ठेवलेल पुस्तक वाचतो आहे अस झालाय.

धन्यावाद!

मलापण डॉ. नाडकर्णींकडून आरइबीटी शिकायाचे आहे. मीपण वेधचे काही कार्यक्रम एकलेले आहेत.त्यांच्या आयपीएच ह्या संस्थेविषयी मला खुप आदर आहे.

हे पुस्तक वाचायला हवे. कालच पहील्यांदा युट्युबवरती डॉक्टर नाडकर्णींच्या गप्पागोष्टी ऐकल्या. फॅन झाले. आता तो चॅनलच सबस्क्राईब केलेला आहे.
https://www.youtube.com/watch?v=rKMWqQJsINk

पुस्तकं छान आहेत ... यांना भेटलो होतो आम्ही .. यांच्याच हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट - काऊन्सिलिंग घेतलं होतं मग रेग्युलर कौन्सिलिंग साठी त्यांनी आम्हाला जवळ पडेल असा कौन्सिलर सुचवला ... दोन्हीचा काही उपयोग झाला नाही , जायचं बंदच केलं ... असो , त्यांचा दोष नाही ... खूप जणांना नक्कीच फायदा झाला आहे ..... They are doing great work .

मनाचा पॉडकास्ट.

हा त्यांचा नवा पॉडकास्ट. अतिशय सोप्या भाषेत ताणतणाव नियोजन आणि REBT. पहिल्या भागापासून क्रमाने ऐका.

https://www.eplog.media/manachapodcast/all-episodes/page/2/

>>>हा धागा 2010 चा आहे. या दहा वर्शात डॉ आनंद नाडकर्णी यांच्या मानसशास्त्रीय भुमिकेत देखील काही फरक झाला आहे.
https://youtu.be/_1vJWYib3_k>>>> होय युट्युबवरच्या त्यांच्या व्हिडिओजमध्ये, अध्यात्माचा अंतर्भाव / अध्यात्म व मानसशास्त्राची सांगड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. जी की आधी नव्हती व नव्याने केलेली आहे अथवा काय याची मात्र माहीती नाही.

Pages