कविता

प्रेमाचा जुगार

Submitted by अक्षय समेळ on 7 October, 2021 - 01:06

भिडताच नजरेला नजर आपली
प्रेमाचा सजला जुगार पटलावरी
फेकले फासे, पहिले दान पडले
पहिल्याच पणाला हृदय अर्पिले

हळूहळू स्वतःचा विसर पडला
जसा खेळ चांगलाच रंगात आला
हारता हारता कळलेच न मजला
प्राण माझा कधी पणाला लागला

उरले नव्हते आता मज जवळ काही
जिंकली होती ती शेवटचे दान ही
संपला होता प्रेमाचा जुगार पटलावरी
हाती माझ्या मात्र काहीच लागले नाही

- अक्षय समेळ.

मुखवटा

Submitted by अक्षय समेळ on 5 October, 2021 - 23:57

दडलेले मनोभाव मुखवट्यापाठी
नाटकी वागणे शोभे चेहऱ्यावरती
किती सोजवळ, किती निरागस
पाही त्याची होते हमखास फसगत

मनात कटुता बोलणे तरी मधुर किती
जवळचे होऊनी वार करी पाठीवरती
ओळखण्यास चुकतो, जीवास मुकतो
जेव्हा मैत्रीच्या पोशाखात वैरी निघतो

तोंडावर वर्षाव स्तुतीसुमनांचा होतो
पाठ वळताच निंदेचा बाझार भरतो
पत ढासळते, प्रतिष्ठा धुळीस मिळते
सामील असतात त्यात आदर करणारे

वाटते कधी टर टर फाडावे हे मुखवटे
झप झप वेशीवर टांगावे त्यांची लकत्तरे
पण आपण सुध्दा कुठे आहोत वेगळे
आरसा दाखवून मन शांतपणे विचारते

विना शर्त ते मान्य मला

Submitted by कविन on 5 October, 2021 - 04:34

'सोडून जाशील अर्ध्यावरती'
दिलास हा अभिशाप मला
जाता जाता विस्मरणाचा
दिलास तू उ:शाप मला

तुला, नशीबा..; बोल लावू मी (?)
कणखर केले तूच मला
चौकट व्यापक करण्याचेही
तूच दिले सामर्थ्य मला

तुझ्या नि माझ्या मधले अंतर
'मिटावेच', ना ध्यास मला
जसे नि जेव्हा, जे जे होईल
विना शर्त ते मान्य मला

(तशी जुनीच आहे ही कविता. इथे आणली नव्हती हेच लक्षात नव्हत, ते आज लक्षात आलं म्हणून इथे आणली)

शब्दखुणा: 

तो

Submitted by चिन्नु on 19 June, 2021 - 23:29

तो

तो धावत राहतो सतत, ऊन वारा पित..
आवळलेल्या मुठीत दडलेला असतो कुटुंबाचा भार..
त्याच्या करारी नजरेला ओढ असते जिंकण्याची..
बंद ओठांमध्ये लपवलेल्या कितीतरी वेदना घेऊन तो परततो घरट्याकडे..
पिलं झेपावतात त्याच्या कडे, आईचा चिरपरिचित पदर सोडून,
त्याच्या भळभळणार्या जखमांना नाकारत मिठीत शिरतात..
अन् त्या रेशीम मिठीत विरघळू लागतं बापाचं प्रेम!

Happy Father's Day! __//\\__

अवांछित

Submitted by shriramb on 16 June, 2021 - 22:06

अवांछित

पाउस कधीचा । पडत राहतो
नडत राहतो । जाणीवेसी

नभ काळेशार । काळोख मनात
हताशा जनांत । रुजलेली

नेत्री दाटतात । भयावह व्यथा
अगणित कथा । माणसांच्या

कधी मग येते । तिरीप जराशी
ऊन पावसाशी । बागडते

लख्ख उजळतो । रंग अंबराचा
भाव अंतरीचा । सावरतो

आकाश निळेले । भूतल हिरवा
मनाचा पारवा । झेप घेतो

नेतो तोच देतो । निरामय सृष्टी
आशामय दृष्टी । अवांछित

-श्रीराम

शब्दखुणा: 

पाऊस पडतोय

Submitted by चिन्नु on 16 June, 2021 - 07:50

पाऊस

पाऊस पडतोय
झिरपतोय हळूहळू
रांगत येईल हळूच वाणसामानात
तिथून मग उद्याच्या विवंचनेतही..

पाऊस पडतोय
ओल्या भिंतीवर
चिंब भिजलेल्या आठवणी
हिरव्या होतील पुन्हा..

पाऊस पडतोय
घामात मिसळतोय
रक्तात भिनतोय
स्वेदफुलांना सुगंध येईल आता मातीचा..

मौन

Submitted by कविन on 7 June, 2021 - 00:46

निशब्द सांजशा वेळी
छेडीता तनूची धून,
मौनाशी बोले माझ्या
हे तुझे बोलके मौन

अस्पर्श मनीचा डोह
तो उठला झंकारून,
अन् तरंगातुनी त्याच्या
ही तान घेतसे मौन

सुरावटींचा साज
लेवून येतसे तान
त्या निश्वासांचे अर्थ
बघ कसे सांगते मौन

मिलन गीत हे अपुले
शब्दांचे नुरले भान
श्वासांचा ताल समेवर
मौनात मिसळते मौन

प्रणय असे हा खास
मुक शब्द मिरविती खूण
मिलनोत्सुक दोघांमध्ये
मूक शब्द, बोलके मौन

शब्दखुणा: 

उनाड कविता

Submitted by मुक्ता.... on 2 May, 2021 - 05:09

कधी कधी मनात इतकं असतं, इतकं असतं की शब्द बद्ध करणं सोप्प नसतं! अशा वेळेला काय करायचं. आपलं कविपण विसरून जायचं. कवितेला मनमुक्त भटकू द्यायचं. कुठे? आयुष्याच्या वाटेवर. मुक्त मुशाफिरी करायला. म्हणजे होईल असं की कविता पुन्हा येईल आणि ती येईल अशी की बस्स!

कशी बशी सुचत नसते ना, आतून काही यावं लागतं,व्हावं लागतं तेव्हाच
मनातून , आत्म्यातून, ते लहरीपण स्वतःला जाणवतं . शरीराशी असलेली फारकत, फकिरपण कवितेलाच माहिती हो

संवेदना होती नवी... (गझल) (देवप्रिया/कालगंगा)

Submitted by गणक on 21 April, 2021 - 01:25

गझलेत काही कमतरता , चुका असल्यास
नक्की सांगा. त्यांचे स्वागतच असेल .
<
संवेदना होती नवी....

वृत्त : देवप्रिया / कालगंगा
गालगागा गालगागा गालगागा गालगा

याचकाची भंगलेली साधना होती नवी !
घाव तो होता जुना अन् वेदना होती नवी !

मी तुझी नाही सखी पण छान माझा मित्र हो,
त्याच दुःखाला भुलाया सांत्वना होती नवी !

ते विषारी बोलती मी मुंगुसासम धाडसी,
पण मनाला दंशण्याची कल्पना होती नवी !

सागराने त्या उन्हाशी सापळा रचला जरी,
श्रावणाला धाडण्याची प्रेरणा होती नवी !

Pages

Subscribe to RSS - कविता