काकडीचा कायरस

काकडीचा कायरस (फोटोसह)

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हा आपला एक पारंपारीक पण विसरला गेलेला पदार्थ आहे. उन्हाळ्यात भूक कमी लागते तेव्हा किंवा दिवाळीचे जड पदार्थ खाऊन पोट जड झाल्यावर, अवश्य प्यावा. करायला अगदी सोपा आणि तोंडाला चव आणणारा.
१) एक काकडी
२) दोन लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ
३) तेवढाच गूळ
४) अर्धा टिस्पून तेल
५) फोडणीसाठी एक टिस्पून जिरे, अर्धा टिस्पून मेथी, दोन चिमूट हिंग
६) एखाद दुसरी, हिरवी किंवा लाल मिरची
७) मुठभर बारिक चिरलेली कोथिंबीर
८) अर्धा कप दाण्याचे कुट
९) चवीपुरते मीठ
१० ) आणि एक अत्यावश्यक घटक, १ टेबलस्पून काळा / गोडा मसाला.

क्रमवार पाककृती: 

१) पातेल्यात तेल तापवून त्यात मेथी लाल करा, व त्यात जिरे, मिरची आणि हिंग टाका.
२) जिरे तडतडले कि त्यात ४/५ कप पाणी टाका
३) त्यात कोळ, गूळ, मीठ, मसाला टाका.
४) चांगली उकळी आली कि त्यात कुट टाका
५) परत उकळी आली की चव बघून आणखी कोळ किंवा गूळ जे हवे असेल ते टाका.
(या पायरीवर हे जरा जास्तच आंबट गोड लागले पाहिजे.)
६) नीट ढवळून गॅस बंद करा आणि हे पाणी थंड होऊ द्या.
७) अगदी पुर्ण थंड झाले कि, त्यात काकडी कोचून टाका आणि कोथिंबीर टाका.
८) नुसते प्यायला, वरणभात किंवा दहीभाताबरोबर चांगले लागते.

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा: 

हे तूम्ही आदल्या दिवशी करुन फ्रिजमधे ठेवू शकता. काकडी आणि कोथिंबीर मात्र आयत्यावेळीच घालायची. हे दोन पदार्थ घालायच्या आधी मिश्रण ब्लेंड केले तरी चालेल.
खरे तर हा कायरस पातळसरच असतो पण दाट करण्यासाठी कूट थोडे जास्त घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक पदार्थ