दाल

दाल तडका

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी वाटी तूर + अर्धी वाटी मूग डाळ
एखादी हीरवी मिरची
कोथिंबीर
कडिपत्ता
२ सुक्या लाल मिरच्या
हळद
लाल तिखट
४ पाकळ्या लसूण
२ मध्यम टोमॅटो
हवा असल्यास १ कांदा
जीरं
तेल
मीठ

क्रमवार पाककृती: 

तूर + मूग जरा कमी पाण्यात शिजवून घ्यावी. हळद घालावी वा राहू द्यावी. शिजलेली डाळ घोटू नये.
हीरवी मिरची, कोथिंबीर, टमाटो, घेतला असेल तर कांदा; बारीक चिरून घ्यावा.
सुक्या लाल मिरचीचे तुकडे करावेत.
लसूण सोलून ठेचावा. जरासं आलं सुद्धा किसावं चव आवडत असल्यास...

आता अगदी १ चमचा तेल तापवावं.
त्यात, फक्त २ जिर्‍याचे दाणे घालावेत.
आता क्रमानी हिरवी मीरची, लसूण, आलं घालावं. जरा परतून घ्यावं.
घेतला असेल तर आता कांदा घालून परतावं (जरा ब्राउन होवू द्यावा). शिजतांना हळद घातली नसेल तर ती आता घालावी.
टोमॅटो घालावेत. परतावं. हे सगळं नीट शिजलं की शिजलेली डाळ घालावी. पाणी घालावं. पळीवाढं असू द्यावं. मीठ घालून चांगली उकळी येऊ द्यावी. ही डाळ तयार आहे. ही हवी असल्यास सर्विग बाउलमध्ये काढावी. नाहीतर लगेच वाढायची असेल तर अगदी सिमर वर ठेवावी.

आता तडका करावा-
छोट्या कढईमध्ये ७/८ चमचे तेल तापत ठेवावं. गरम तेलात आता भरपूर जिरं घालावं. जिरं तडतडल्या बरोब्बर लाल मिरच्या घालाव्यात. तिखटपणा जसा हवा असेल तसं लाल तिखट घालावं. फोडणी जरासुद्धा जळता कामा नये!!! हा तडका तयार डाळीवर ओतावा.
दाल तडका तयार आहे. कोथीबीर घालून सजवावं.

वाढणी/प्रमाण: 
हवं तस!
अधिक टिपा: 

अगदी हॉटेल च्या चवीचा होतो पण घरच्या तेलामुळे त्रास होत नाही.
गरम फुलका, जिरा राईस बरोबर छान लागतो. भाताबरोबर खायचा असेल तर जरा पाणी जास्त असू द्यावं.
आज केला होता पण ऑफिस मध्ये आल्याबरोबर लोकांनी फडशा पाडलाय; त्यामुळे फोटो नाही काढता आला... अरेरे

माहितीचा स्रोत: 
एका ढाब्यावरचा आचारी!

आमार शोनार छोलार दाल

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप चण्याची डाळ,
१ हिरवी मिर्ची,
२ सुक्या लाल मिर्च्या,
१ चमचा किसलेलं आलं,
२ तमालपत्रं,
ओल्या खोब-याचे १०-१५ चौकोनी लहान तुकडे,
मीठ, साखर साधारण १ सपाट टीस्पून प्रत्येकी (खरं तर आपल्या चवीनुसार),
१ टीस्पून हळद,
१/२ टीस्पून तिखट,
फोडणी साठी २ चमचे तूप,
उकडलेला अर्धा बटाटा (ऐच्छिक)

पंच-फोरोन (पंच-फोडण) मसाला साहित्य:
जिरे, बडीशेप, मेथी, मोहरी (सालं काढलेली अख्खी पिवळी मोहरी) आणि कलौंजी.
(पंच-फोडण साहित्य प्रत्येकी एक चमचा घेऊन, कढईमध्ये परतून कोमट करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. आपल्याला एक चमचा कुटलेला मसाला वापरायचा आहे. उरलेला मसाला पुढील वापरासाठी बाटलीत भरून ठेवावा. मेथीचे दाणे खलबत्त्यात जरा कुटून घ्यावेत, म्हणजे मिक्सरमध्ये चांगले बारीक होतील. तसेच, सालं काढलेली अख्खी पिवळी मोहरी आणि कलौंजी घरात नसेल, तर वाण्याकडून ५०-५० ग्रॅम आणावी.)

क्रमवार पाककृती: 

बंगाली आणि आपल्या मराठी संस्कृतीत विलक्षण साम्य, सांस्कृतिक एकात्मता आहे. दोन्ही संस्कृतींमध्ये काव्य-शास्त्र-विनोदात रस घेणारी प्रजा आहे. आबालवृद्ध संगीत, नाटक, सिनेमा इ. कलांचे भोक्ते आहेत. माणसं कुटुंबवत्सल, प्रेमळ आणि आध्यात्मिक प्रवृत्तीची आहेत. स्वत: रवींद्रनाथांना मराठी संस्कृतीविषयी अपार आदर होता. त्यांनी संत एकनाथ, तुकारामांच्या अभंगांचे बंगालीत भाषांतर केले होते. शिवाजी महाराजांवर शिवाजी उत्सव ही कवितादेखिल लिहिली होती.

शोकोल देशेर रानी शे जे आमार जोन्मोभूमि... असे जगाला अभिमानाने सांगणारे रवींद्रनाथ टागोर हे एक चिकित्सक, रसिक खवय्ये होते!

मिळकतीतला मोठा हिस्सा खाण्या-खिलवण्यात खर्च करणा-या भोजोन रोशिक संप्रदायाच्या बंगाल्यांना, खाण्यासाठी जगावं की जगण्यासाठी खावं असा भोटम्‌ प्रश्न विचारायला जाल, तर ऊहूं...चॉलबे ना! स्वत: आनंदाने खाऊन इतरांना खिलवण्यात आनंद मानणारे हे बंगाली, एकूणच जीबोनमिष्टीचा समां कसा बांधायचा ते उत्तम जाणतात. खावा - दावा...एई तो जीबोन! असे ब्रीद मिरवणारा मोठा वर्ग आहे बंगालमध्ये! पिण्यापेक्षा खाणं प्रिय! पाहुण्यांना साधं चहा पाणी हवे आहे का विचारताना म्हणतील," चाय खाबी? जॉल खाबी?" स्मित

ऑभिजीतबाबू पुढे असेही सांगतात, की खाद्यपदार्थांच्या (किंवा इतर कोणत्याही) नावांचे गोंडसीकरण हे वंगबोन्धु फार छान करतात. पोश्तो, शुक्तो, माच्छ, झोल, लोंका, घोंटो, मिष्टी, रोशोगुल्लो, शॉन्देश......नाजुक, लडिवाळ आघात ऐकत राहावे नुसते! रोजच्या साध्या खिचडीला खिचुरीऽऽ असं म्हटलं, की मैतर्णींबर्बर अंगणात ठिक-या खेळणा-या एखाद्या अल्लड किशोरीला हाक मारल्या सारखं वाटतं की नाही? गोंडसीकरण!!! स्मित

शाळेत असताना आपण प्रेत्येकाने रोज प्रतिज्ञा म्हटली होती. "माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।" याच प्रतिज्ञेला स्मरून आज एका पारंपारीक बंगाली पाककृती परंपरेचे पाईक होण्याचा प्रयत्न करूया! स्मित

...छोलार दाल!

कृती:
१ कप चण्याची डाळ (छोलार दाल) निवडून, स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवावी.

दुस-या दिवशी भिजवलेल्या, निथळून घेतलेल्या डाळीत अडीच कप पाणी टाकावे, त्यात १ टीस्पून मीठ घालून प्रे. कुकरमध्ये १० मिनिटं डाळ शिजवून घ्यावी. बटाटाही उकडून घ्यावा. (या रेसिपीत डाळ बोटचेपी शिजवावी की गाळ शिजवावी असा स्पष्ट उल्लेख कोणत्याही ऑनलाईन/पुस्तकी रेसिपीत आढळला नाही. किंवा, म्या होतकरू नवशिक्यास एवढाही "साधा-कॉमन-सेन्स" नसावा!)

कढईमध्ये २ चमचे तूप घेऊन गॅसवर गरम करावे.
त्यामध्ये २ सुक्या लाल मिरच्या, २ तमालपत्रं थोडे परतून १ टीस्पून जिरं घालावं.
जिरं तडतडल्यावर, गॅस बारीक करून, जि-यावर ओल्या खोब-याचे चौकोनी तुकडे घालून परतून घ्यावेत.
त्यामध्ये किसलेलं आलं, १ टीस्पून हळद, १/२ टीस्पून तिखट आणि १ चमचा पंच-फोडण कूट घालून त्यात शिजवलेली डाळ परतून घ्यावी. आवश्यकतेनुसार पाणी टाकावे.

हिरवी मिर्ची एक चीर देऊन घालावी. (मिर्च्या जरा लहान आकाराच्या वापरल्या तर फोटोत भेसूर दिसणार नाहीत)

मिश्रण फार सरसरीत वाटत असल्यास उकडलेला बटाटा कुस्करून घालावा.
१ टीस्पून साखर घालून आवश्यक वाटल्यास मीठ घालावे व गॅस मोठा करून एक चांगली वाफ आणावी.

वरील पाकृ प्रयोगात काही उणे-दुणे आढळल्यास जाणकारांनी सुधारणा जरूर कळवाव्यात!
धन्यवाद!

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी
अधिक टिपा: 

छोलार दाल करण्या आधी नेटावर गुगलले. दोन-चार प्रकार सापडले. कोणी तिखट वापरत नाही, तर कोणी पंच-फोरोन वापरत नाही, तर कोणी नुसत्या हळद-मिर्ची-जि-याची फोडणी वापरली! काहींनी लवंग, वेलच्या, बेदाणेपण वापरले आहेत. काहींनी चव, रंग वृद्धीसाठी हळदीऐवजी हळकुंड भिजवून, वाटून वापरले आहे.

हळद, तमालपत्र, लाल मिर्ची, साखर, खोब-याचे तुकडे आणि तूप हे कॉमन पदार्थ वापरून, परंपरेला शह न देता मी आपल्या चवीला पूरक दाल बनवली.

बहुतेक सर्व बंगाली पाकृ सरसों का तेल वापरून करतात. पण ही दाल तुपात करावी असे आवर्जून नमूद केले आहे. पंच-फोडणचा स्वाद लाजवाबच! कांदा-लसूण नसल्याची आठवणही येत नाही! पंच-फोडणाचे आरोग्यदृष्ट्या खूप फायदे आहेत असे ऐकतो! विशेषत: कलौंजी हृदयास फार चांगली!

छोलार दाल प. बंगालमध्ये रोजच्या जेवणात बनवत नाहीत. छोलार दाल सणावारी, किंवा लग्नसमारंभाच्या पंगतीत लुची (म्हणजे आपल्याकडील पु-या), किंवा घी-भाताबरोबर खातात. आपल्याकडील लग्नाच्या पंगतीत जशी अळूची पातळभाजी हमखास असतेच, तशी प. बंगालमध्ये छोलार दाल!

पारंपारीक छोलार दालमध्ये आलू घालत नाहीत. (पण मग आपल्यासाठी रस्सा पाणिदार होतो, म्हणून उकडलेला बटाटा कुस्करून, किंवा फोडणीत अर्धा-एक चमचा डाळीचे पीठ वापरता येईल.)

[प्रस्तुत फोटोतील पदार्थात नवशिकेगिरी ओतप्रोत भरली आहे, याची ऑभिजीतबाबूंना स्पष्ट जाणीव आहे. स्वत:बद्दल फुकाची गलतफ़हमी नाही!]

माहितीचा स्रोत: 
पंच-फोडण मसाला आणि बेसिक रेसिपी उषा पुरोहित लिखित मायक्रोवेव्ह खासियत पुस्तकामधून साभार! अवांतर माहिती इंटरनेटवरून साभार!

दाल पख़तूनी

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

अख्खे काळे उडीद - १ कप,
वाटलेले आले - २ टेबलस्पून,
वाटलेला लसूण - २ टेबलस्पून,
लोणी - १०० ग्रॅम,
टोमॅटोचा गर - दीड कप,
गरम मसाला पूड - २ टीस्पून,
लाल तिखट - १ टेबलस्पून,
फ्रेश क्रीम - १ कप,
मीठ - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

१. उडीद चार-पाच कप पाण्यात आठ ते दहा तास, किंवा रात्रभर भिजत ठेवावेत.
२. चार-पाच कप पाण्यात भिजवलेले उडीद, मीठ, लाल तिखट आणि वाटलेले आले टाकून शिजत ठेवावे. उकळी आल्यानंतर मंद आचेवर एक तास किंवा उडीद मऊ शिजेपर्यंत ठेवावे.
३. जाड बुडाच्या पातेल्यात लोणी गरम करावे. त्यात वाटलेला लसूण अर्धा कप पाण्यात मिसळून टाकावा. दोन मिनिटे परतावे.
४. टोमॅटोचा गर, लोणी, गरम मसाला पूड आणि शिजवलेली डाळ टाकून मंद आचेवर साधारण एक तास शिजू द्यावे. अधूनमधून ढवळावे. गरज वाटल्यास पाणी टाकावे.
५. फ्रेश क्रीम टाकून दहा मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. डाळ दाटसरच असावी.
६. पावाबरोबर गरम वाढावे.

वाढणी/प्रमाण: 
३ जणांसाठी
अधिक टिपा: 

दाल पख़तूनीसह पुदिना पराठा चांगला लागतो (संजीव कपूर यांची आवडती डिश!).

पराठा, किंवा पावाबरोबर खाण्यासाठी डाळ दाटसरच असावी. भाताबरोबर खायची हे आधीच ठरवल्यामुळे मी डाळ जराशी रस्सेदार केली. पराठे वगैरे (अवघड प्रकार) करायला मला जमणार नाही.

पुदिना पराठ्याची पाकृ कोणाला हवी असल्यास मी पुस्तकातील पाकृ लिहून देईन.

मूळ रेसिपीत दिलेले आले, लसूण, गरम मसाला आणि लाल तिखट यांचे प्रमाण मला जरा जास्त वाटले. म्हणून मी ते प्रत्येकी एक टीस्पून वापरले. लोणी सुद्धा दोनच मोठे चमचे वापरले. क्रीम संपूर्ण डाळीत न टाकता केवळ माझ्यापुरते बाऊलमध्ये वरून थोडेसे टाकले.

>>वाटलेला लसूण अर्धा कप पाण्यात मिसळून टाकावा>> अश्यापद्धतीने पाण्यात मिसळून लसूण का वापरतात? मला काही समजले नाही. माहिती असल्यास तुमच्यापैकी कोणी सांगेल का मला?

वरील फोटो/पाकृ पाहून माझे काही चुकले असेल तर जरूर सांगावे. माझा पुढील प्रयोग अधिक यशस्वी होईल! स्मित

धन्यवाद!

माहितीचा स्रोत: 
संजीव कपूर यांच्या 'भारतीय पाककृतींचा खजाना' पुस्तकातून साभार!

दाल माखनी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाउण वाटी आख्खे उडीद, पाव वाटी राजमा, पाव वाटीपेक्षा कमी हरबर्‍याची डाळ, २ चमचे बारीक चिरलेले अद्रक, ४-५ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून, १ हिरवी मिरची चिरुन, १ कांदा किसून, २ टॉमेटो किसून, १/२ वाटी ताजी साय, एक मोठा चमचा सायीचं दही
फोडणीसाठी थोडं तेल, जीरे, मेथ्या, हळद, १ चमचा धण्याची पावडर, १/२ चमचा गरम मसाला, १/२ चमचा देगी मिर्च पावडर, चवीप्रमाणे मीठ, चुटकीभर हिंग

क्रमवार पाककृती: 

राजमा व आख्खे उडीद ३-४ तास भिजत ठेवावेत. नंतर यामध्ये हरबर्‍याची डाळ व मीठ व हिंग घालून साधारण्तः तिपटीपेक्षा थोडं जास्त पाणी घेवून कुकरमध्ये ३-४ शिट्ट्याकाढून शिजवून घ्यावं. जर तिन तासापेक्षा जास्त वेळ डाळ / राजमा भिजला असेल तर ३ शिट्ट्यात शिजतं.
बाजूलाच कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करावे.. त्यात जीरे व मेथ्या घालून फोडणी करावी. यात आधी चिरलेलं आलं, लसूण व मिरची घालावी.१-२ मिनिटं मंद आचेवर परतावे. नंतर त्यात किसलेला कांदा टाकून कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतावे. हळद घालून घ्यावी. (हळद फोडणीत न टाकता डाळ शिजत असताना कुकरमध्येच टाकली तरी चालेल). कांदा परतल्यावर टॉमेटो घालून परत परतावे. त्यात धण्याची पूड व गरम मसाला घालून परतावे. ५-१० मिनिटं झाकून ठेवावं. यामध्ये आता शिजलेली डाळ घालावी. व एक उकळी येवू द्यावी. नंतर ताजी साय फेटून घालावी. व दाल माखनी मंद आचेवर ठेवावी. मधून अधून हलवत रहावे. किमान १०-१२ मिनिटं तरी नक्कीच उकळू द्यावी. त्यात फेटलेलं सायीचं दही घालून अजून एक उकळी येवू द्यावी.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणं
अधिक टिपा: 

मी शक्यतो मिक्सर वापरत नाही म्हणून कांदा, टॉमेटो किसून घेते. मिक्सर किंवा फुडप्रोसेसर मधून अगदी बारीक केले तरी चालते.
नवरात्रात किंवा सणासुदीला / करवा चौथ वैगरेला कांदा लसूण खात नाहीत. त्यावेळी आल्याचं प्रमाण थोडं वाढवून बाकीचे पदार्थ तसेच ठेवले तरी छान होते.

माहितीचा स्रोत: 
सायोची पनीर माखनी वाचल्यानंतर मी केलेले प्रयोग

मां चनेकी दाल

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मां की दाल अर्धी वाटी, चने की दाल अर्धी वाटी, दोन कांदे बारिक चिरुन, २ टोमॅटो बारिक चिरुन, आले चिरुन २ चमचे, ७-८ पाकळ्या लसुण बारिक चिरुन, १ चमचा धण्याची पुड, १ चमचा जीरेपुड, १ चमचा गरम मसाला, ३-४ हिरव्या मिरच्या बारिक चिरुन, हिंग, मेथ्या, जीरे, अर्धा चमचा मीर्‍याची पुड, १ चमचा हळ्द, चवीप्रमाणे मीठ, फोडणीसाठी तेल

क्रमवार पाककृती: 

दोन्ही डाळी धुवुन मीठ, हींग घालुन कुकरमध्ये शिजवुन घ्याव्यात. अंदाजे ४-५ शिट्ट्यांमध्ये शिजतात..
फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेवुन जीरे, मेथ्या घालावेत.. नंतर त्यात आले, लसुण व हिरवी मिरची घालुन परतावे... गॅस बारीक असु द्यावा. लसुण थोडा लालसर झाला आणि मिरचीचा ठसका यायला लागला की त्यात कांदा घालाव.. भरपुर परतावे.. नंतर हळ्द, टोमॅटो व उरलेला मसाला घालावा... सगळा मसाला तेल सुटेपर्यंत व मसाला छान शिजेपर्यंत बारीक गॅसवर परतावे... थोडावेळ झाकण ठेवुन मसाला शिजू द्यावा.. नंतर त्यात शिजलेली डाळ घालुन उकळावे.. गरज असल्यास थोडेसे पाणी घालावे..पण ही डाळ दाटसर चांगली लागते.

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जणांना
अधिक टिपा: 

गेल्या वेळी मी बाकी मसाल्याबरोबर आईनी केलेला पाव भाजी मसाला पण एक चमचा घातला....नवर्‍याने पहिल्यांदाच मला रेसेपी विचारली. नाहीतर पंजाबी पदार्थ त्याने करायचे व मी रेसेपी विचारायची असे आमचे रुटीन आहे.
अश्याच पद्धतीने मुंगी मसर की दाल किंवा मिक्स दाल पण करता येते... राजमा, छोले, काले चने किंवा इतर टोमॅटो बेस ग्रेव्हीच्या पंजाबी भाज्या पण ह्याच मसाल्यात थोडाफार बदल करुन करता येतात...

माहितीचा स्रोत: 
एकदा नवर्‍याच्या मित्राला मिक्स दाल बनवताना बघितले होते...त्यात फेरफार केले..

मिक्स दाल (पंजाबी पद्ध्तीने)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव वाटी मूगाची डाळ (छिलकेवाली), पाव वाटी (मून्ग धुली ) डाळ, पाव वाटी मसुर डाळ, तुरीची डाळ पाव वाटी पेक्षा थोडी कमी, हरबरा डाळ पाव वाटी, मां की दाल ( काळ्या उडदाची डाळ)पाव वाटी, असतिल तर थोडे आख्खे मसुर
एक कांदा उभा चिरुन, बारिक चिरलेले आले १-२ चमचे, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धण्याची पावडर, अर्धा चमचा जीररेपुड, १ चमचा हळ्द, दोन हिरव्या मिरच्या, मेथ्या, (एक बडी विलायची, दालचीनी, मीरे भरडुन), मीठ चवीप्रमाणे
जीरे, साजुक तुप, ८-१० लसणच्या पाकळ्या चिरुन

क्रमवार पाककृती: 

सगळ्या डाळी धुवुन कुकरमध्ये शिजायला ठेवाव्या. सगळ्या मिळुन अंदाजे दीड वाटी डाळी असतिल, त्यात ५-साडेपाच वाट्या पाणी घालावे. शिजतानाच कांदा, आले, हळ्द व बाकीचा मसाला टाकावा. माझ्या कुकरमध्ये ५ शिट्ट्यात ही डाळ शिजते.नंतर फोडणीच्या कढईमध्ये तुप घेवुन त्यात जीरे व लसुण घालुन फोडणी करावी व ती कुकरमधल्या डाळीत घालावी. एक शीट्टी झाल्यावर डाळ तयार....

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांना पुरेल..( आमच्या घरी ३ जण संपवतात)
अधिक टिपा: 

दाताखाली येणारे आले व लसणाचे तुकडे ह्याची चव वाढवतात. पंजाबात थंडीमध्ये हि डाळ नेहेमी केली जाते. त्यामुळेच ह्यात आले व लसुण मुबलक प्रमाणात घालतात...

माहितीचा स्रोत: 
नवरा