मका

फजिता

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मक्याचे दाणे बारीक वाटून --- २ कप,
दूध -------- १/२ कप,
दही (फेटुन) -------- १/२ कप,
हिरव्या मिरच्या --- २ किंवा ३
आले ------ १/२ इंच तुकडा,
मीठ, साखर ----- अंदाजे, चवीनुसार,
फोडणीचे साहित्य- १ टे. स्पून तेल, मोहरी, जीरे, हिंग,
कोथींबीर -- सजावटी साठी

क्रमवार पाककृती: 

ओले मक्याचे दाणे मिक्सर मधे वाटतांनाच त्यात हिरव्या मिरच्या, आले, थोडे जीरे घाला, सरबरीत वाटून घ्या.
कढईत तेल, मोहर्‍या, जीरे, हिंग यांची फोडणी करा, त्यात मक्याचे वाटण घाला, थोडे पाणी घालून शिजवून घ्या.
अर्धवट शिजले, की दही आणि दुध घाला, मीठ घालून पूर्ण शिजवून घ्या. आवडीनुसार कन्सिस्टन्सी अ‍ॅडजस्ट करा.
कोथींबीर घालून सूप बाउल मध्ये सर्व करा.

fajj.jpg

(दही + दूध यांच्यामुळे या पदार्थाला एक छान तलम, स्निग्ध पोत येतो, तो मला फार आवडतो.)

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

१)बाउल मध्ये सर्व करताना वरून थोडे फ्रेश क्रीम किंवा साजूक तूप घालावे.
२) फजिता म्हणजे दाटसर सूप सारखा प्रकार असतो.
३) व्हेरिएशनः फ्लॉवर चे तुकडे, गाजर, मटार वाफवून घालता येतील. ताजे मक्याचे दाणे उपलब्ध नसल्यास मक्याचा रवा वापरून सुद्धा फजीता करता येतो. मक्याचा रवा + कैरी किंवा मक्याचा रवा + आंब्याचा रस असं व्हेरिएशन सुद्धा करतात.

माहितीचा स्रोत: 
ही पाकृ माझ्या आईला तिच्या आजीने (माझी पणजी) शिकवली होती. म्हणुन माहितीचा स्त्रोत :- आई, पणजी

गिथेरी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आपल्या आवडीप्रमाणे कडधान्ये. पण कडधान्ये घेताना शिजल्यावर ज्यांच्या साली मऊ पडतात अशीच घ्यावीत.
राजमा, डबल बीन्स, बटर बीन्स, मका, काबुली चणे, लाल चवळी, पांढरी चवळी, बीन्सचे अनेक प्रकार परदेशात उपलब्ध असतात फावा बीन्स, कोको बीन्स त्यापैकी आपल्याला आवडतील ती घ्यावी.
चवीप्रमाणे मीठ आणि मिरपूड.
बेसिक कृतीत एवढेच घटक लागतात.
चव वाढवण्यासाठी, हिंग, जिरे, ओवा, लसूण, कापलेला लाल किंवा हिरवा कोबी, सेलरी, साजूक तूप
लोणी, आल्याचा किस, टोमॅटो सॉस, बीट, लिंबू रस वगैरे.
सोबत घेण्यासाठी टोष्ट

क्रमवार पाककृती: 

आपल्याला आवडतील ती सर्व कडधान्ये घ्यावीत. ती रात्रभर भिजत घालावीत. मग मीठ घालून उकडून घ्यावीत. गळतील एवढी उकडू नयेत. आकार राहिला पाहिजे.
पण त्यातले पाणी पूर्ण काढू नये. काबुली चणे आणि डबल बीन्स वापरले तर पाणी आपोआप दाट होते. मग सगळे मिश्रण परत गरम करावे व त्यात ताजी मिरपूड घालावी. शक्यतो तिखट नकोच.
हळद हिंग वापरायचे असेल तर यावेळी घालावे.
जिरे वा ओवा वापरायचा असेल तर तो कोरडा गरम करुन, जरा भरड पूड करुन वापरावा.
लसूण कच्चाच बारीक करून घ्यावा.
तूप वा लोणी वापरायचे असेल तर वरुन घ्यावे.
बीट वापरायचे असेल तर ते उकडून, किसून वापरावे.
कोबी बारीक कापून कच्चाच घ्यावा. सेलरी कापून घ्यावी.
लिंबू वरुन पिळावे, टोमॅटो सॉस वरुन घ्यावा.
यापैकी आपल्याला आवडतील ते पदार्थ घ्यावेत. (सगळेच नाहीत)
सोबत ब्रेड टोष्ट करुन घ्यावा.
सकाळच्या थंडीत हा प्रकार खाऊन बघाच. अगदी उत्साह संचारतो अंगात.
यात अंडे पण वापरत येईल, मिश्रण शिजत असतानाच वरुन अंडे फोडून टाकावे.

वाढणी/प्रमाण: 
घटक किती घ्याल त्यावर अवलंबून
अधिक टिपा: 

मायबोलीकर थंड च्या, खास फर्माईशीवरुन...

गिथेरी हा शब्द खास केनयाचा. मका आणि इथला खास राजमा, रात्रभर शिजवून हा करतात. त्यात मीठाशिवाय बाकी काहीच लागत नाही.
असाच एक प्रकार आपल्याकडे हिमाचल प्रदेशात करतात असे ऐकले आहे. त्याला रास, असा शब्द आहे असेही मित्राने सांगितल्यासारखे आठवतेय. पण त्यासाठी शिजलेली कडधान्य घोटून घेतात.
राजमा बरोबर बाकीचे कडधान्य शिजवले तर सगळ्याचाच रंग लाल होतो.लाल राजमा, पांढरा वा पिवळा मका, पांढरे बटर बीन्स वेगवेगळे शिजवले तर आणखी छान.
ज्यांची साल शिजल्यावरची कडकच राहते, असे साधे चणे, पावटे वगैरे घेऊ नयेत.

माहितीचा स्रोत: 
गिथेरीवर केलेले प्रयोग

पौष्टिक पोहे

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी पोहे, १ वाटी भिजवलेली हरबरा डाळ, २ वाट्या मक्याचे दाणे, अर्धी वाटी भरड दाण्याचा कुट (दाणे स्वच्छ सोलुन घ्यावेत), अर्धा मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरुन, अर्ध्या लिंबाचा रस, कडीलिंबाची ४-५ पाने, ४ हिरव्या मिरच्यांचे एक सेंमीचे तुकडे, फोडणीसाठी मोहोरी, हळद, हिंग, १ डाव तेल.

क्रमवार पाककृती: 

मक्याचे दाणे व हरबरा डाळ मिक्सरमधे वाटुन घ्यावी. पोहे भिजवुन घ्यावेत. मग पोह्याला करतो तशी हिंग-हळद-मोहोरी-कडीलिंब-हिरवी मिरची फोडणी करुन त्यात दाणे व कांदा परतुन घ्यावा. पोहे, डाळ व मका सर्व एकदमच घालावे व चांगले हलवुन घ्यावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. झाकण घालुन चांगली वाफ येऊ द्यावी. लिंबाचा रस घालुन परत एकदा चांगले हलवुन घ्यावे. हे झाले पोहे तयार. वरुन सढळ हाताने नारळ व कोथींबीर पेरावी.

वाढणी/प्रमाण: 
तीन मोठे
अधिक टिपा: 

भारतात मिरची कटर मिळते (इथे दिसले नाही कुठे) त्यात मिरच्या बारीक करुन घातल्या तर जास्त छान लागते. लिंबाऐवजी कच्ची कैरी किसुन घातली तरी चालते.

माहितीचा स्रोत: 
आई + मी

पालक मकई

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालकाची एक जूडी, एक टीन स्वीट कॉर्न किंवा ताजे स्विट कॉर्न दोन वाट्या, अर्धी वाटी काजू, अर्धी कप दुध पावडर, चार पाच ओल्या मिरच्या, एक मध्यम कांदा, एक मध्यम बटाटा, थोडी दालचिनीची पूड, मीठ व तूप

क्रमवार पाककृती: 

पालकाची पाने खूडून घ्यावीत. थोडे तूप गरम करुन त्यात हिरव्या मिरच्या टाकाव्यात व पालक घालावा. झाकण न ठेवता तो परतून घ्यावा. त्याचा रंग बदलला कि लगेच उतरुन घ्यावा.
कांदा उभा बारिक चिरावा. बटाटा सोलुन त्याचे छोटे चौकोनी तूकडे करावेत. थोडे तूप तापवून त्यावर कांदा परतावा, तो सोनेरी झाला कि बटाट्याच्या फोडी सोनेरी कराव्यात. मग मक्याचे दाणे घालावेत. टिन मधले पाणी किंवा साधे पाणी घालून ते शिजू द्यावेत.
तोवर पालक, काजू आणि दूधाची पावडर असे सगळे बारिक वाटून घ्यावे. लागलेच तर थोडे पाणी घालावे. ते मक्यामधे घालावे. मिठ घालुन झाकण न ठेवता मंद आचेवर शिजवावे. मग गॅस बंद करुन दालचिनीची पूड घालावी. मग वाटलीच तर तूपाची जिर्‍याची फोडणी द्यावी. हव्या तर फोडणीत थोड्या लाल मिरच्या घालाव्यात.
हा प्रकार हमखास जमतो. उत्तम चव येते. बाकि कुठलाही मसाला वापरु नये.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

या भाजीचा हिरवागार रंग छान दिसतो. हवे तर थोडे मक्याचे दाणे वेगळे ठेवून वरुन घालावेत.

माहितीचा स्रोत: 
आस्मादिक