इतर प्रकार

रव्याचा केक- पारंपारिक पद्धतीने

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

दीड वाटी रवा. बारीक किंवा उपम्याचा- कोणताही.
एक वाटी दूध
एक वाटी गोड दही
एक ते दीड वाटी साखर
अर्धी वाटी तूप किंवा लोणी.
अर्धा टीस्पून खायचा सोडा
रंग, इसेन्स आवडीनुसार
सुकामेवा

क्रमवार पाककृती: 

-रवा हलका भाजून घ्या. उपम्याला लागतो तितका जास्त नाही, नीट गरम झाला, शेकला गेला की गॅस बंद करा.
-दह्यात साखर घालून फेटून घ्या. आधी एक वाटी साखर घालून थोडं चाखून मग हवी तर अजून साखर घाला. दही गोड असेल आणि केकचा गोडवा बेताचाच हवा असेल तर एक वाटी साखर पुरेल.
-दही नीट एकजीव झाल्यावर त्यात शेकलेला रवा, दूध, तूप, खायचा सोडा घालून नीट मिसळून अर्धा तास मिश्रण मुरवत ठेवा.
-अर्ध्या तासाने रंग आणि इसेन्स घालणार असाल तर घाला. सुकामेवा केकमधे हवा तर मिश्रणात घाला.
-नॉन स्टिक पॅनला तुपाचा हात लावून मिश्रण त्यात ओता आणि मंद आंचेवर पॅन ठेवा. झाकण ठेवा. मधे मधे झाकण काढून जमा झालेली वाफ जाऊ द्या.
-खरपूस छान वास आला की केकमधे सुरी घालून बघा. सुरी कोरडी आली की केक तयार!

IMG_4472.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तसा! :)
अधिक टिपा: 

-मी हार्ड अ‍ॅनोडईझ्ड पॅनमधे केला. तो पॅन एकदा तापला की सगळीकडूनच छान भाजला जातो केक आणि लवकरही होतो असा माझा अनुभव. त्यामुळे केकसाठी लागणारा वेळ पॅनवरही अवलंबून आहे (तरी २०-२५ मिनिटं अंदाजे). मी दिलेला वेळ तयारीसकट मला लागलेला वेळ आहे.
-सुकामेवा मला पॅनच्या तळाशी नीट सजवून वर मिश्रण घालायचं होतं, पण आयत्या वेळी विसरले. आणि सजावट नीट झाली तरी मिश्रण ओतल्यावर ती फिसकटली तर दुरुस्तीचा(!!!) व्याप होईल अशी भीती, म्हणून पुन्हा केला तेव्हा अस्साच केला! वरून काजू लावले फक्त. त्यामुळे इथे तुम्ही तुमची कल्पकता वगैरे वापरालच! फिदीफिदी त्याचे फोटो तुम्हीच टाका.
-ही अगदी बेसिक आणि तरीही खूप मस्त पाकृ आहे!

माहितीचा स्रोत: 
आई, रुचिरा हे पुस्तक, दिनेशदांची अधिक माहिती आणि मी केलेले थोडेफार बदल.

चटपटीत शेवग्याच्या शेंगा.

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चारपाच शेवग्याच्या शेंगा
फोडणी करीता राई, जिर, हिंग, हळद
१ चमचा मसाला अथवा अर्धा चमचा लाल तिखट
चवीनुसार मिठ
चिंच लिंबाएवढी
गुळ चिंचेपेक्षा थोडा जास्त
फोडणीपुरते तेल

क्रमवार पाककृती: 

१) शेवग्याच्या शेंगांचे साधारण २ इंचाचे तुकडे करुन घ्या. जर शेंगा मोहाच्या असतील तर जास्त साले काढण्याची गरज नसते पण नेहमीच्या असतील तर जरा सोलून घ्या.

(ह्या मोहाच्य आहेत म्हणजे ह्या लवकर शिजतात तसेच आतला गर मऊ लागतो)

२) ह्या शेंगा थोडे मिठ घालून उकडून घ्या.

२) चिंचेचा कोळ करून घ्यात त्यातच गुळ चिरुन खुळा.

३) भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यात राई, जिर, हिंग, हळद ची पटापट फोडणी देऊन लगेच त्यात उकडलेल्या शेंगांचे तुकडे व चिंच-गुळाचा कोळ घाला. आता मसाला आणि चिंच गुळाच्या कोळेला लागेल एवढेच मिठ घाला कारण आधी शेंगांमध्ये घातले आहे.

४) आता वरील मिश्रण पळीने हलक्या हाताने किंवा फडक्याने भांडे धरून खालीवर करुन एकजीव करा व ५-७ मिनीटे शिजू द्या.

५) ह्या आहेत चटपटीत शेवग्याच्या शेंगा तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी ५-६ तुकडे लहान मुले जास्त खातात.
अधिक टिपा: 

अजून चटपटीत बनवण्यासाठी त्यात थोडा गोडा मसाला घालू शकता. वरून थोडी कोथिंबीर पेरू शकता.
चिंच गुळाचा कोळ घट् बनवा,

ह्या शेंगा साईड डिश म्हणून वापरता येते.

माहितीचा स्रोत: 
सा.बा.

मँगो साल्सा

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ साधारण पिकलेला आंबा
१ मध्यम रोमा टोमॅटो
१ मोठा चमचा बारीक चिरलेली लाल सिमला मिरची
१/२ वाटी ताजे उकडलेले मक्याचे दाणे (ऐच्छीक)
२-३ मध्यम पातीचे फक्त कांदे
३/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१/२ बारीक चिरलेला पुदिना
२ हिरव्या मिरच्या (शक्यतो Jalapeño) बिया काढून बारीक चिरलेल्या
मीठ
मीरपूड

क्रमवार पाककृती: 

आंब्याची सालं काढून बारीक फोडी करून घ्या.
टोमॅटोच्या बिया काढून बारीक चिरून घ्या.
आवडत असल्यास लाल सिमला मिरची ग्रिल करून घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्या.
कांदा बारीक चिरून घ्या.
वरील आणि बाकी सर्व जिन्नस एकत्र करून फ्रीज मधे थंड करायला ठेवा.
कुठल्याही चिप्सबरोबर सर्व करा.

वाढणी/प्रमाण: 
एक मध्यम बाऊल भरून
माहितीचा स्रोत: 
एका रेस्टॉरंटमधे खाल्ला होता. त्यावरून घरी प्रयोग करून बघितला.

गुलाबी कोशिंबीर

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गाजर १ किंवा २
काकडी २
बिट अर्धे किंव १ छोटे
डाळींबाचे दाणे अर्धा वाटी
शेंगदाण्याचा कुट पाव वाटी
सैंधव (काळे) मिठ १ अर्धा चमच
मिठ अर्धा चमचा
साखर १ चचमा
अर्धा चमचा किसलेल आल
१ वाटी दही

क्रमवार पाककृती: 

गाजर, बिट, काकडी सोलून किसून घ्या. ह्यात डा़ळींबाचे दाणे, शेंगदाणा कुट, सैंधव मिठ, मिठ, साखरम आल्याचा किस घालून एक्जीव करा. मग त्यात आवश्यकतेनुसार दही घालूण पुन्हा ढवळा. झटपट, रंगीत आणि पौष्टीक कोशिंबीर तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
५ जणांसाठी
अधिक टिपा: 

तुम्ही ह्यात अजुन आवडीनुसार मुळा, कांदा, अननस, अ‍ॅप्पल वगैरे घालू शकता.

जास्त बिट घातला तर बिटाचा थोडा वास येऊन मुले खाण्यास कुरकुर करतात म्हणून अर्धा घालायचा. निदान तेवढातरी ते खातात.

शेंगदाणा कुट नाही घातला तरी छान लागते.
पहिल्या फोटोत आल्याचा किस टाकायचा राहून गेलाय.

माहितीचा स्रोत: 
आई

आंबोळ्या

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदुळ १० वाट्या
मुगडाळ, तुरडाळ, मसुरडाळ, चणाडाळ, उडीदडाळ प्रत्येकी १ वाटी, पाव वाटी मेथी दाणे.

मिठ
ताक
तेल

क्रमवार पाककृती: 

आंबोळ्यांचे पिठ बनवण्यासाठी तांदूळ व सगळ्या डाळी एकत्र धुवाव्यत व उन्हात वाळवाव्यात. वाळलेल्या डाळीत मेथीदाणे घालून पिठ दळून आणावे.

आंबोळ्या करायच्या ५-६ तास आधी पिठ पाण्याने जाडसर भिजवायचे. ५-६ तासांनंतर करताना त्यात थोडे ताक घालून सैलसर करायचे व चवीनुसार मिठ घालायचे.


नंतर तव्यात जरासे तेल पसरवून त्यावर आंबोळीचे पिठ पसरायचे.

आता तव्यावर लगेच झाकण द्यायचे.

२ मिनिटांत चर्रर्र आवाज होतो मग झाकण काढायचे आणि आंबोळी उलटी करुन १-२ मिनिटे ठेवायची.

नंतर गरमा गरम आंबोळी चटणी बरोबर सर्व्ह करायची.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ संपतातच.
अधिक टिपा: 

काही जण घावण, आंबोळी उलटत नाहीत. पण मी उलटते कारण त्यामुळे कुरकुरीत होतात.
पाककृती हवी आहे माहीत आहे का ह्या धाग्याच्या ८२ व्या पानावर अजुन वेगवेगळ्या टिप्स मुग्धा, मंजूडी आणि सुचारीता यांनी दिलेल्या आहेत. http://www.maayboli.com/node/24273?page=81

माहितीचा स्रोत: 
पाककृती हवी आहे माहीत आहे का ह्या धाग्यावर मुग्धा, मंजूडी, सुचारिता व जुन्या मायबोलीवरील सोनचाफा यांच्या मदतीने ही रेसिपी मिळाली

गवसणीतुन गवसलेले काही नवीन पदार्थ

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गवसणीला लागतात तेच, याशिवाय बटाटा, पनीर, मिरची, कोथिंबीर, तिखट, मिठ, तेल, मिश्र डाळीच पीठ.

क्रमवार पाककृती: 

गवसणी साठी करतो तसेच कणीक व उकडीचे गोळे बनवुन घ्यावेत. आता उकडलेले बटाटे किंवा पनीर घेउन किसुन घ्यावे. त्यात मिरची, तिखट, मिठ, कोथिंबीर व आवडी-प्रमाणे आंबट व चवीला साखर घालून मिसळुन घ्याव. व त्याचे गोळे[ उकडीच्या गोळ्या पेक्षा थोडे लहान] बनवुन घ्यावेत. हे गोळे उकडीच्या गोळ्यात पुरणासारखे भरुन गोळे तयार करुन ठेवावेत. यानंतर कणकेच्या गोळ्यात हा गोळा पुरणासारखाच भरुन हलक्या हाताने पुरीच्या आकाराचे थोडे जाडसर लाटुन घ्यावेत. व तव्यावर दोन्ही बाजुने भाजुन थोडे बटर घालून खरपुस भाजुन घ्यावेत. खायला तयार. फारच मस्त झालेत. नाव काय देता येइल ते बघा.
[२] उकडीत सारण भरुन [ बटाटे, पनीर, किंवा कुठलीही भाजी] गोळे बनवुन घ्यावेत. आता मिश्र दाळीच पिठ घेउन त्यात थोड तिखट,मिठ थोड तेल घालून भज्याच्या पिठापेक्षा थोड घट्ट भिजवुन घ्याव. व उकडीचे गोळॅ या पिठात भिजवुन [बटाटे वड्याप्रमाणे] तळून घ्यावेत. किंवा आप्पे पात्रात घालून आप्पे करावेत. मी हे आप्पे बाउल मधे घेउन यावर दही [ दही- वड्याचे] व खजुराची चटणी घालून त्यावर कांदा, टमाटा , कोथिंबीर [चिरुन] व बारीक शेव घालून सर्व्ह केल. अप्रतीम टेस्ट.
[३] याच प्रकाराने भगरीची उकड घेउन त्यात बटाटा व पनीर किसुन गोळे तयार केले व ते शिंगाड्याच्या पिठात बुडवुन तळले. दही, व चटणी बरोबर सर्व्ह केलेत.

वाढणी/प्रमाण: 
४-५ व्यक्ती.
अधिक टिपा: 

धन्यवाद. दिनेशदा. तुमच्या गवसणीं मुळेच सुचले हे पदार्थ. व आमची छोटीशी पार्टी छान झाली. या बरोबर कैरीची डाळ व पन्ह, शेवटी आइस्क्रीम..

माहितीचा स्रोत: 
गवसणी----

डाळ वडे

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चणा डाळ पाव किलो
२ मिडियम कांदे चिरुन
२ ते ३ मिरच्या चिरुन
मुठभर कोथिंबीर चिरून
१ चमचा धणेपुड (असल्यास)
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका. हाहा
माझ्या वहिनीकडे एक समारंभ होता तेंव्हा मी हे डाळवडे केले होते म्हणून फोटोतील प्रमाण जास्तीचे आहे. पण सोयीसाठी मी पावकिलोचे प्रमाण लिहीले आहे.

चणा डाळ ५ ते ६ तास भिजत ठेवा.

५-६ तासांनंतर ती स्वच्छ धुवुन मिक्सरमधुन थोडेसेच पाणी घालून जाडसर लगदा होईल अशी थोडी चरट वाटून घ्या. (बापरे किती शब्द टाकले? : हाहा: गोंधळ उडाला नाही ना?)

वाटलेल्या पिठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, हिंग, हळद, धणेपुड, मिठ घालून एकत्र करा.

आता लिंबाएवढा ह्या मिश्रणाचा गोळा घेउन त्याचे चपटे वडे करुन तेलावर मिडीयम गॅसवर शॅलोफ्राय करावेत. ६-७ मिनिटे एक बाजू शिजायला लागते.
हे आहेत तयार डाळवडे.

वाढणी/प्रमाण: 
कमीत कमी प्रत्येकी २
अधिक टिपा: 

घरात लहान मुले असतील तर मिरची सरळ डाळीसोबत वाटून घ्या म्हणजे खाताना मिरची तोंडात येणार नाही.

आल-लसुण पेस्ट तसेच गरम किंवा गोडा मसालाही घालू शकता.
हा वडा चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. वरुन गरम गरम चहा तर मस्तच.

माहितीचा स्रोत: 
आई

बिना साबुदाण्याची खिचडी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुरमुरे, दाण्याचा कुट, तिखट, मिठ, मिरची तुप, जिरे,

क्रमवार पाककृती: 

२-३ वाट्या मुरमुरे थोड पाणी लावुन घ्यावे. त्यात अर्धी वाटी दाण्याचा कुट, आवडीनुसार तिखट मिठ,साखरेची चव घालून मिसळून घ्याव. [साबुदाण्यात घालतो तसे] कढ-इत तुप, जिरे, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी व मुरमुरे मिक्स त्यात घालून छान वाफ आणावी.. खिचडी तयार.लिंबु किंवा दही यासोबत खाता येते.छान लागते चव.

वाढणी/प्रमाण: 
१-२
अधिक टिपा: 

मध्यंतरी साबुदाण्या बद्दल वाचल. म्हणून मुद्दाम क्यलरी कोंशस लोकासाठी रेसीपी देते आहे.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीणीची आइ

कडूनिंबाष्टक-- चुर्ण

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

'' सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा''
गुढीपाडव्याला कडूनिंब खातात. त्यानिमित्त कडूनिंबाचा एक प्रकार सुचवते. मी नेहमीच करते. पण हा प्रकार कुठल्या सदरात टाकावा- [आरोग्य कि पाककला] ते कळत नव्हत. म्हणून येथेच देते.
कडूनिंबाष्टक- चुर्ण
==============
हिंग, जिरे, मिरे, ओवा, सुंठ, आवळा चुर्ण,सैंधव मिठ, व कडूनिंब

क्रमवार पाककृती: 

साधारण अर्धी वाटी ओवा, पाव वाटी जिरे, अर्धा चमचा मिरे, अर्धा चमचा हिंग घेउन मिक्सर मधे बारीक करुन घ्याव. त्यात सुंठ पावडर अर्धा चमचा, आवळा पावडर अर्धा चमचा, सैंधव मिठ अर्धा चमचा व कडूनिंबाची पावडर एक चमचा घालुन मिक्सर मधे फिरवाव. चुर्ण तयार. प्रमाणात आवडीप्रमाणे बदल करता येइल. हे औषधी म्हणुनही उपयोगी आहे.
या दिवसात मी कडूनिंबाचा पाला वाळवुन [घरातच- उन्हात नाही] ठेवते. व त्याची पावडर करुन बरणीत भरुन ठेवते. जेव्हा लागेल तेव्हा यातील पावडर वापरते. आमच्या घरात आम्ही सगळेच हे चुर्ण खातो.
यामुळे पचनाचा ,उष्णतेचा त्रास होत नाही. रक्त शुद्ध होत. शरीर निरोगी रहात. कडू असल तरी चव
चांगली लागते . आवळा, सुंठ, जिरे , मिरे , हिग सैंधव ओवा, व कडूनिंब हे सगळेच औषधी गुणांनी परिपुर्ण आहेत. षड- रस ही मिळतात. मुखशुद्धी होते.
फोटोच तंत्र मला जमत नाही. कुणी सांगितल्यास प्रयत्न करेन.

वाढणी/प्रमाण: 
८-१० दिवस पुरत.
अधिक टिपा: 

तोंडाला चव येते. अनुभव घेतल्यावरच याचे महत्व कळेल.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोगातुन

चायनीज वोक (चायनीज ग्रेव्ही)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चायनीज पदार्थ करताना लागणारे नेहमीचे यशस्वी कलाकार :
* फ्लॉवर, गाजर, मशरूम्स, फरसबी, पातीचा कांदा, सिमला मिर्ची. (हे हवेतच. हवेतच म्हणजे पाहिजेतच.)
* शिवाय हवं तर ब्रोकोली, झुकिनी, पालक (आधल्या रात्रीच पालकाची भाजी करून झाल्याने तो संपला. म्हणून माझ्या फोटो/रेसिपीत नाही. पण नक्कीच घालू शकता.).
*सिमला मिर्च्या रंगेबिरंगी मिळाल्या तर नक्कीच त्या घ्या. छान दिसतात ते रंग. मी चार रंगाच्या सिमला मिर्च्या वापरल्या आहेत - हिरवी, लाल, पिवळी आणि केशरी.
* भरपूर बारीक चिरलेला भरपूर लसूण, आवडी (आणि कुवती) नुसार हिरव्या मिरच्या.
* आवडत असेल तर कोथिंबीर - बारीक चिरून.
* अजिनोमोटो. हे असेल तर खूपच ऑथेंटिक चव येते. नको असेल तर साधं मीठ, कॉर्नफ्लावर, हिंग.

क्रमवार पाककृती: 

भाज्या स्वच्छ धुऊन, (लागू असेल तिथं) शिरा-बिरा काढून कापून (खूप बारीक बारीक नका कापू. अंमळ मोठ्याच फोडी करा) घ्या.

एका मोठ्या वोकमध्ये (शीर्षकात वोक आहे म्हणून रेसिपीत कढईला वोक म्हणण्यात येईल), तेल घाला. शेंगदाण्याचे, ऑलिवचे, सूर्यफुलाचे ... कोणतेही चालेल. तेलाची जास्त चिकित्सा करत बसू नका.

तेल जरा तापलं की त्यात चमचाभर हिंग घालून त्यावर लसूण, मिरची घाला. दोन मिनिटं परता आणि लगेच भाज्या घाला.

गॅस मोठा ठेऊन चमच्याने चार मिनिटं परतून घ्या आणि मग झाकण ठेऊन एक वाफ आणा. भाज्या अर्धकच्च्याच राहिल्या पाहिजेत याची काळजी घ्या.

एका बोलमध्ये चवीनुसार अजिनोमोटो, कॉर्नफ्लावर एकत्र करून पाण्यात कालवून घ्या. हे मिश्रण भाज्यांच्यात घाला आणि उकळी येईपर्यंत मोठ्या गॅसवर ठेवा. गॅसही मोठा ठेवा. हवं तर अजून पाणी घाला. भाताबरोबर वगैरे खाता येईल इतपत रसदार असलं पाहिजे.

उकळी आली की हे मिश्रण दाटसर होईल. मग त्यात हवं असल्यास साधं मीठ आणि कोथिंबीर घाला.

चायनीज वोक तयार. गरमागरम भाताबरोबर किंवा राईस नुडल्सबरोबर खा.

वाढणी/प्रमाण: 
काही कल्पना नाही बुवा!
अधिक टिपा: 

आवनफ्रेश*आणि आमचं घर शाकाहारी असल्याने रेसिपी शाकाहारी आहे. पण यात चिकनचे तुकडे, कोलंबी, इतर कोणत्याही माश्याचे तुकडे टाकायला हरकत नाही.

*माहितीचा स्त्रोत बघा.

माहितीचा स्रोत: 
दादर - शिवाजीपार्कचं आवनफ्रेश. इथे चायनीज वोक ऑर्डर केल्यावर एका छोट्याश्या शेगडीवर या ग्रेव्हीचा छोटा वोक समोर आणून ठेवतात. भात वा नुडल्सबरोबर ती ग्रेव्ही खायची. आवनफ्रेशमधला हा माझा आवडता प्रकार. एकदा करूनच पाहू म्हणून केला.