दिवाळी फराळ

मुरुक्कु (फोटोसह)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदळाचे पिठ ३ वाट्या
फुटाणा डाळीचं पिठ १ वाटी
लोणी २ चमचे
तिळ २ मोठे चमचे
ओवा २ मोठे चमचे
तिखट मिठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

मुरुक्कु म्हणजे आपल्या चकलीची साउदींडीयन मावस बहिण.
महाराष्ट्रात जशी दिवाळीला चकली हवीच हवी. तसेच इथे कर्नाटकात कृष्णजन्माष्ठ्मीला आणि "बोंबे हब्बा" (म्हणजे बाहुल्यांचा उत्सव्-नवरात्रात दसर्‍या पर्यंत दहा दिवस घरात देविपुढे तर्‍हेतर्‍हेच्या बाहुल्या मांडून आरास करतात). साठी मुरुक्कु खास. ह्या खास वेळी घराघरांतुन ह्या मुरुक्कुचा खमंग दरवळ येत असतो.

योग्य ते प्रमाण घेउन भाजणी करा, ती गरम पाण्यात भिजवा, मग चकल्या करा हा सगळा कुटाणा नवशिक्यांना फार कठीण. म्हणून ही एक सोप्प्या प्रकारची चकली. नो कटकट, मुरुक्कु झटपट ! स्मित

सर्वप्रथम फुटाणा डाळीचे पिठ करून घ्यायचे. मग हे पिठ, तांदळाचे पिठ, लोणी, तिखट, मिठ, ओवा, तिळ हे सगळे व्यवस्थित एकत्र मरुन घ्यायचे. पाणी न घालताच लोणी सगळ्या पिठात निट एकसारखे एकत्र होईल असे मिसळून घ्यायचे. मग गरजे नुसार पाणी टाकुन चकलीला भिजवतो तसे पिठ भिजवून घ्यावे. कढईत तेल तापायला ठेउन एकसारख्या दोन किंवा तिन वेढ्याच्या चकल्या कराव्यात. कडकडीत तेल तापवुन मग मध्यम आचेवर कुरकुरीत मुरुक्कु तळाव्यात. हलका गोल्ड्न ब्राउन रंग आल्यावर काढुन पेपर टॉवेल वर जास्तिचे तेल निथळायला ठेवाव्या. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात. (ठेवायला उरतच नाहीत फिदीफिदी )

चकलीचा अजुन एक वेगळा प्रकार इथे आहे

वाढणी/प्रमाण: 
खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)
अधिक टिपा: 

चकल्या तळतानाच्या सगळ्या टिपा ह्याला लागू जसे
प्रखर आचेवर मुरुक्कु तळल्याने लवकर तळले जाउन थंड झाल्यावर मउ पडतात.
पिठ मळताना लोण्याचे प्रमाण जास्त झाल्याने तळताना चकल्या हसतात (तेलात विरघळतात)

माहितीचा स्रोत: 
साउदींडीयन मैत्रीण

चवडे (फोटोसह)

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या मैदा,
२ चमचे बारिक रवा,
४ चमचे कडकडीत तेलाचे मोहन
चिमुट्भर मिठ
अर्धी वाटी पिठीसाखर
अर्धी वाटी डाळं(फुटाणा डाळ्/पंढरपुरी डाळं) पिठ करुन.
चवीप्रमाणे आवडी नुसार जायफळ वेलची इत्यादी पूड
तळण्यासाठी तुप किंवा तेल

क्रमवार पाककृती: 

२ वाट्या मैदा, २ चमचे बारिक रवा, चविपुरते चिमुट्भर मिठ आणि चमचाभर पिठीसाखर व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे.

चार चमचे तेल कडकडित गरम करुन हे मोहन मैद्यात घालून जरुरीप्रमाणे थंड पाणी घालून घट्टसर पिठ मळावे. करंज्यांसाठी करतो तसा घट्ट गोळा करून तासभर झाकून ठेवावे.

वाटीभर डाळं मिक्सर मध्ये बारिक करून पिठीसाखरे सारखे बारिक पिठ करावे.
मग पिठी साखर आणि हे डाळ्यांचं पिठ एकत्र करून घ्यावे. त्यात चवीप्रमाणे आवडी नुसार जायफळ वेलची इत्यादी पूड मिसळावी.

तळणासाठी तेल किंवा तुप तापत ठेवावे.
मग मैद्याच्या पिठाचे पेढ्या एवढ्या आकाराचे एकसारखे गोळे करुन घ्यावे.

**फुलक्या एवढी किंवा जरा लहान एक पातळ पुरी लाटावी, मिडीयम हाय वर तळून ताटात काढावी, लगेच त्यावर चिमटीने साखर आणि डाळ्यांची पिठी भुरभुरावी, चमचा आणि झार्‍याच्या सहाय्याने पटकन अर्धी घडी करावी, पुन्हा साखर पिठी भुरभुरून पुन्हा पटकन घडी करावी. (आपण पोळी ज्याप्रकारे घडी करतो तश्या ह्या दोन घड्या कराव्यात).**

पुन्हा दुसरी पुरी... सगळी प्रोसेस पुन्हा .. असं करत सगळे चवडे बनवावेत.

हे बघा हे असे दिसतील चवडे..

वाढणी/प्रमाण: 
खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)
अधिक टिपा: 

** हे काम अत्यंत पटापट करायचे आहे.
पुरी ताटात काढली की गॅसची आच कमी करणे.
पुरीवर एका हाताने साखर + पिठी भुरभुरावी.
लगेच मग हात भाजू नये म्हणून एका हातात चमचा आणि दुसर्‍या हातात झारा घेउन पटकन फोल्ड करावी. (जरासा उशिर झाला तर पुरी मोडते.)
एकटीने करायला भरपूर मारामारी होईल.. मदतनिस असेल तर साखर पेरणी किंवा तळणी एकेकाने करता येईल.
थोडीशी तळणा नंतरची कृती किचकट आणि नाजूक असली तरी करंज्यां पेक्षा अगदी सोप्पी आहे.
ह्या चवड्यांची चव त्या साखर + डाळ्यां मुळे अप्रतिम येते.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई

चुर्मा लाडू (जुन्या मायबोलीवरून)

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ की. बेसन
१ की. साखर( कमी गोड हवे असल्यास जरा कमी घ्यायची)
वेलची ४-५
काजू, बदाम, बेदाणे आवडीनुसार
तळायला तूप

क्रमवार पाककृती: 

शक्य असेल तर हरभरा डाळ गिरणीतून दळून आणायची. अगदी बारीक न दळता जराशी जाडसर दळायला सांगायची.
पुर्‍या साठी मळतो साधारण तसेच घट्ट पिठ मळायचे. ह्यात मोहन घालायची गरज नसते.

ladu2.jpg

ह्या पिठाच्या जाडसर पुर्‍या लाटायच्या. पातळ केल्या तर तळताना कडक होतात.

ladu3.jpg

ह्या पुर्‍या तुपातच तळायच्या. तेलात तळल्या तर हवी ती चव येत नाही.

ladu4.jpg

गरम असतानाच चुरल्या म्हणजे लवकर आणि बारीक चुरल्या जातात . काय करायचे पहिल्या दोन तीन पुर्‍या हाताने तोडुन घ्यायच्या जराश्या गार झाल्या की मग दोन्ही हाताने चुरायच्या. पुढच्या पुर्‍या चुरायला घेताना पुरीसोबत हा चुरा पण हातात घ्यायचा म्हणजे हाताला भाजत नाही. एकीकडे तळायचे आणि एकीकडे चुरायचे काम सुरु असते. सगळे चुरुन झाले कि दळण साफ करायच्या चाळणीने चाळुन घ्यायचे. बारिक न चुरला गेलेला चुरा शिल्लक असतो, तो गार झाल्यामुळे हाताने चुरणे शक्य नसते तर पुर्वी तो खलबत्त्यात घालून कुटला जाई. आता मिक्सरमध्ये बारीक करु शकतो
वरच्या चुरण्याच्या कामाला शॉर्ट्कट म्हणजे सगळ्या पुर्‍या तळून झाल्या की मग त्यांचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करायचे.
हा सगळा चुरा एका परातीत घालुन ठेवायचा. वेलचीची पुड ह्यातच टाकायची.
पुर्‍या तळायला घेतानाच पाक करायला ठेवायचा. गोळीबंद पाक व्हायला हवा. पाक झाला की नाही हे पहाण्यासाठी एका छोट्या ताटलीत पाणी घेऊन ठेवायचे. पाक सतत ठवळत रहायचे आणि मधुनच थोडासा पाक पाण्यात टाकून पहायचा. बोटांनी गोळा करायचा प्रयत्न करायचा. आधी तो पाण्यात टाकता क्षणीच पसरतो. पाण्यात त्याची गोळी झाली म्हणजे पाक पक्का झाला असे म्हणतात.

ladu5.jpg

थोडा चुरा वाटीत काढून ठेवायचा. हा पाक ताबडतोब परातीतल्या चुर्‍यावर पसरवून टाकायचा. काढून ठेवलेल्या चुर्‍याने कढई पुसुन घ्यायची आणि परातीत टाकायचा. उलथण्याने खालीवर करुन चांगला मिक्स करायचा. एकसारखा करुन कापड टाकुन झाकुन ठेवायचा.

ladu6.jpg

तासाभराने बघायचे की लाडू बांधायला जमतात की नाही. अजुनही जरासे ओलसर वाटले तर थोडावेळ राहू द्यायचा. लाडू हलक्या हाताने बांधायचे. काजू, बदाम, बेदाणे लाडू वळताना त्यात घालू शकता किंवा आधीच चुर्‍यात मिसळून घेवू शकता.

ladu_0.jpg

शुभ दिवापली!

वाढणी/प्रमाण: 
भरपूर होतात.
अधिक टिपा: 

हे लाडू थंड झाले की जरा कोरडे होतात. अगदीच कोरडे नको असतील तर पाक गोळीबंद होण्याआधीच काढून घ्यायचा.

दिवाळीच्या स्वयंपाकात आई सुगरण होती. तिच्या हाताखाली गिरवलेले हे धडे. आईकडून सगळ्या गोष्टींचे प्रमाण लिहुन घ्यायचेच राहून गेले.
नगर भागात हे लाडू लग्नात रुखवदात तसेच पाटीसोबत देण्याची प्रथा आहे. लेकीला सासरी जाताना तर सुनेला माहेरी जाताना दिवाळीची बुथ देतात, त्यात हि दिले जातात.

इथे अधिक चर्चा वाचायला मिळेल. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/115678.html

माहितीचा स्रोत: 
आई

रवा + रताळे लाडू (फोटोसह)

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१) उकडलेल्या रताळ्याचा गर, २ कप
२) २ कप अगदी बारिक रवा
३) अर्धा कप तूप (कमीजास्त लागू शकेल)
४) अर्धा कप मिल्क पावडर (किंवा पाऊण कप सायीसकट दूध)
५) आवडीप्रमाणे सुका मेवा अर्धा कप (मी बदामाचे काप आणि बेदाणे वापरलेत.)
६) वासाला वेलची पावडर
७) पाऊण कप पिठीसाखर (मी आयसिंग शुगर वापरलीय.)

क्रमवार पाककृती: 

१) रताळ्य़ाची दोन्ही टोके कापून ती उकडून घ्या.
२) पाण्यातून काढून ती पूर्णपणे निथळून घ्या. (हे काम आधीच करुन ठेवा)
३) रताळ्याची साले काढून जाड्या किसणीने किसून घ्या, (दोरे काढून टाका)
४) असा गर दोन वाट्या घ्या, (गर दाबून भरू नका)
५) एक टेबलस्पून तूप वापरून रवा भाजायला घ्या, त्यातच मिल्क पावडर मिसळा. (दूध वापरणार
असाल तर पुढची पायरी बघा.)
६) रवा गुलाबी रंगावरच भाजा, जास्त भाजू नका.
७) आता रवा काढून घ्या आणि त्याच भांड्यात रताळ्याचा गर भाजायला घ्या.
८) थोडे वगळून बाकीचे तूप टाका, (दूध वापरत असाल तर ते आता गरात घाला.)
९) रताळ्याचा गरही फार भाजायचा नाही, पण दूध वापरत असाल तर मिश्रण जरा आळू द्या.
१०) पण गर अगदी तूप सूटेपर्यंत भाजायचा नाही. (दूध वापरत असलात तरीही.)
११) आता रताळ्यात रवा मिसळा आणि मिश्रण मंद आचेवर नीट मिसळून घ्या.
१२) त्यातच सुका मेवा आणि वेलची पूड मिसळा आणि आच बंद करा.
१३) मिश्रण जरा थंड होऊ द्या आणि मग त्यात पिठीसाखर मिसळा पण सर्व एकदम मिसळू नका.
१४) रताळ्याच्या गोडीवर आणि तूमच्या चवीनुसारच साखर मिसळा.
१५) मग लाडू वळायला घ्या. सहसा लागणार नाहीच, पण लागलेच तर तूपाचा वापर करा.

वाढणी/प्रमाण: 
कपाच्या आणि लाडवाच्या आकारानुसार, १० ते १२ लाडू होतील.
अधिक टिपा: 

दिसायला सुंदर आणि चवीला अप्रतिम लागतात हे लाडू. बारिक रवा घेतल्याने तो रताळ्याच्या
ओलेपणात भिजतो व कचकच लागत नाही. आमच्याकडची रताळी जास्तच गोड असतात, त्यामूळे
मला साखर कमीच लागली. आयसिंग शुगर वापरायचे काही खास कारण नाही, हाताशी होती. एवढेच.

यात पाक वगैरे करायचा नसल्याने बिघडायची शक्यता नाहीच. गोडी पण आपल्याला ठरवता येते.
रताळी आधी उकडून ठेवली असतील तर अर्ध्या तासात हे लाडू होतात. वळायलाही सोपे आहेत.
फक्त त्रुटी एवढीच कि हे लाडू टिकणार नाहीत. बाहेर २ दिवस आणि फ्रीजमधे आठवडाभर टिकतील.
जास्त टिकवण्यासाठी रताळ्याचा गर रवाळ होईपर्यंत आणि रवा सोनेरी होईपर्यंत भाजावा लागेल.

रुचिरामधे रताळ्याचा गर व वरीच्या तांदळाचा रवा वापरुन उपवासाचे लाडू दिले आहेत. पण
ती कृति जरा वेगळी आहे.

मठरी..

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ वाटी बारीक रवा.
१ वाटी मैदा..
अर्धी वाटी गरम तेलाचे मोहन..
१/२ चमचा मीठ..
१ चमचा तीळ..
१चमचा ओवा..
१ चमचा खडबडीत वाटलेले मिरे..
१ चमचा मेथीदाणा रवाळ वाटुन घेणे..
पाणी लागेल तसे..
तेल तळणीसाठी..

क्रमवार पाककृती: 

रवा,मैदा,मीठ,ओवा,तीळ,मिरे पुड,मेथीदाणा पुड गरम तेलाचे मोहन घालुन सगळे मिश्रण छान एकत्र करुन घ्या..मोहन सगळी कडे छान मिक्स झाले पाहिजे..
आता पाणी घालुन हे पिठ पुरीसारखे घट्ट भिजवुन घ्यावे..२० मिनिटे तसेच झाकुन ठेवावे..
कढईत तेल मंद आचेवर तापायला ठेवावे..
भिजवलेले पिठ तेलाचा हात लावुन मळुन घ्यावे..
लहान लहान गोळे [पुरी सारखे]करुन ठेवावे..साधारण १५ तरी होतील..
पाणीपुरी च्या पुरीएवढी पण थोडी जाड पुरी लाटावी..
त्यावर सुरी किंवा काट्याने टोचे मारुन घ्यावे..
एकावेळी ५-६ मठरी किंवा त्यापेक्षा जास्त [कढई व तेलाच्या आकारमानाप्रमाणे] तापलेल्या तेलात सोडुन मंद आचेवर तळाव्या.अगदी .हलका गुलाबी रंग दिसु लागला कि बाहेर काढुन टिशु पेपर /पेपर वर काढुन पसराव्या..
थंड झाल्या कि डब्यात भरुन ठेवाव्या..

वाढणी/प्रमाण: 
एकावेळी ४ तरी हव्यातच..
अधिक टिपा: 

या मठरीत मेथीदाण्या ची रवाळपुड घातली आहे त्याची चव छान लागते..कडु लागत नाही..
मिर्‍याचा खडबडीत करुन घातले आहेत त्याचा सुरुर मस्त लागतो..
आवडत असल्यास प्रत्येक मठरीच्या मधे एक मिरा ठेवुन त्यावर लाटण्याने हलकेच मारायचे [मिरा चेपला जातो]
मेथीची पाने चिरुन ती पिठात भिजवताना टाकावी..
या मठरी तेल पीत नाही..खुट्खुटीत होतात व टिकतात..

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत..

बोरे (लोकसत्ता-चतुरंग मध्ये आज प्रकाशीत)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक मोठी वाटी भरून तांदळाचे पिठ
पाऊण मोठी वाटी गव्हाचे पिठ
१ मोठी वाटी गुळ
२ चमचे तिळ
२ चमचे गोड तेल
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

तांदळाचे पिठ, गव्हाचे पिठ व तिळ एकत्र मिसळून घ्यावे. २ चमचे कच्चे
गोडेतेल (गरम न केलेले) वरून टाकावे. गुळ बारीक चिरून किंवा किसुन
घ्यावा. एका भांड्यात पाणी कोमट करावे. हे कोमट पाणी हळू हळू त्या
मिश्रणात टाकुन पिठ घट्ट मळून घ्यावे. मग लगेच त्या पिठाचे बोरांच्या
आकारा एवढे गोळे वळायचे.

कढईत तेल चांगले कडकडीत तापवायचे आणि मंद आचेवर
मधून मधून हलवत ही बोरे तळायची.

चांगलालालसर रंग येईपर्यंत खरपूस तळायची.

वाढणी/प्रमाण: 
खाऊन तुम्हीच सांगा.
अधिक टिपा: 

दिवाळी जवळ आली की बायकांची फराळ बनवण्याची लगबग चालू होते. ह्या वर्षी
काहीतरी नविन बनवू असा संकल्प सुरुवातीला आपण करतो. काही वेळा नेहमीचे
प्रकार करण्यातच सगळा वेळ निघुन जातो तर कधी कधी एखादा नविन प्रकार केला
जातो. पण हे नविन प्रकार करण्याच्या उत्साहात आपण जुने पदार्थ मात्र
कालबाह्य करतो. अश्याच जुन्या प्रकारातून मला माहीत असलेला एक प्रकार
म्हणजे बोरं.

बोरं हा जुना व हटके प्रकार मी पहिल्यांदा सासरी पाहीला. ह्या बोरांच्या
रेसिपीच्या आमच्या घरातील स्पेशालिस्ट आहेत माझ्या सासूबाई सौ. शालिनी
दत्तात्रेय म्हात्रे. सासूबाईंनी केलेली ही बोरं ज्या घरात आमची दिवाळी
जाईल तिथे जुना व हटके प्रकार म्हणून कौतूकाचे स्थान मिळवतात. मला
पाकशास्त्राची पहिल्या पासूनच आवड आहे. माझी आई सौ. शामला शशिकांत घरत
हिच्या हाताखाली मी सगळे
दिवाळीचे फराळ शिकले. लग्नानंतर दुसर्‍या वर्षापासून मी दिवाळीच्या
फराळांची जबाबदारी स्वीकारली. सासूबाईंनी सगळे प्रकार माझ्या आवडीनुसार
करण्यास परवानगी दिली पण बोर मात्र मिच करणार हे त्यांनी आवर्जुन
सांगितले. अजुनही ही बोरे त्याच करतात. आम्ही फक्त बोरे वळायला मदत करतो.
सासूबाईंच्या मते बोर ही कडकच चांगली लागतात. नरम बोरांना तेवढी चव लागत
नाही. अगदी सासूबाईंनी
केलेली ही बोरे चावत चावत खाताना ह्यांची गोडी अधीक वाढते. तर आता पाहूया
ही बोर कशी करतात.

गुळ कमी वाटल्यास थोड्या कोमट पाण्यात विरघळवून ते पिठात कालवावे.

गॅस मोठा ठेऊ नका त्यामुळे आतून न शिजता बोरे करपतील.

ही बोरांची रेसिपी मी चतुरंग ह्या पुरवणीसाठी दिली होती ती आज प्रकाशीत झाली आहे.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई

रव्याचे लाडू ( जुन्या मायबोलीवरून)

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप रवा
1/4 कप तूप
1/2 कप carnation milk powder
१ ते सव्वा कप साखर (तुमच्या गोडाच्या आवडीप्रमाणे ठरवा)
1/4 कप ओल्या नारळाचा चव
बेदाणे
बदाम
केशर
वेलची पावडर
दूध

क्रमवार पाककृती: 

मंद आचेवर तुपात रवा छान खमंग भाजून घ्या. रवा भाजत आला की त्यात खोबर, बदामाचे काप घालून परत नीट भाजा.

आता रवा stove वरून काढून घ्या आणि गरम असतानाच त्यात साखर, milk powder , केशर, वेलची पूड आणि बेदाणे नीट मिसळून घ्या. मिश्रण अगदी एकजीव करा. नंतर त्याच्यात लाडू वळण्याची consistency येईल इतकच दूध शिंपडा जास्त नको. हळू हळू दूध घालत mix करत राहिल, तर दूध जास्त होत नाही. मग लाडू वळा.

वाढणी/प्रमाण: 
-
अधिक टिपा: 

२-४ दिवसात संपवणार असाल तर बाहेरपण छान रहातात. fridge मध्ये ठेवलेत तर खाण्याच्याआधी room temperature ला आणा किंवा १० second microwave मध्ये ठेवा.
रवा भाजेपर्यंतच stove च काम.
फ़ार छान लागतात. भरपूर केशर बदाम घातले की दिसतातपण छान.

ही मूळ रेसिपी आर्च ने जुन्या मायबोलीत लिहिली होती. माझ्यासारख्या "पाक"चॅलेंज्ड लोकांसाठी बेस्ट पाकृ आहे फिदीफिदी

माहितीचा स्रोत: 
जुन्या मायबोलीत आर्च ने २००७ मध्ये ही रेसिपी दिली होती. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/133646.html?1187457761

जुन्या मायबोलीवरच्या फेमस तांदळाच्या पिठाच्या चकल्या

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. १ छोटा कुठल्याही ब्रँडचा sour cream चा डबा.
२. तांदळाचे पीठ
३. अगदी बारीक किसलेलं आलं
४. चवीप्रमाणे तिखट, मीठ
५. खसखस
६. ओवा

क्रमवार पाककृती: 

sour cream मध्ये मावेल येवढचं तांदळाचं पीठ घालायचं. त्याची consistency भाजणीचं पीठं जसं भिजवल्यावर असतं तशी झाली पाहिजे.
त्यात ओवा, तिखट, खसखस, आलं, आणि मीठ घालायचं. आणि लगेच चकल्या करायच्या.

वाढणी/प्रमाण: 
खाऊ तश्या :)
अधिक टिपा: 

अगदी, नाजूक, खुसखुशीत चकल्या होतात. चकलीच्या पिठात हळद घालायची नाही. हळद deep fry करताना जळते आणि मग काळपट रंग येतो.

ही मूळ कृती आर्चची आहे. जुन्या माबोवर तिने २००५ मध्ये लिहीली होती. आजपर्यंत दरवर्षी मी ह्याच रेसिपीने चकल्या केल्या आहेत. कधीही बिघडल्या नाहीत. अतिशय मस्त चवीच्या चकल्या होतात.

फोटो नाही. तुम्हीच करा आणि फोटो डकवा इथे.

माहितीचा स्रोत: 
मूळ रेसिपी आर्च ची आहे. जुन्या माबोवर ती इथे आहे. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/91783.html?1130424502

बोलन्या(एक प्रकारची नानकटाई आंबवून केलेली)- फोटोसहित

लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

२ वाटी किसलेले ओले खोबरे,
पाव वाटी जाडा रवा,
अर्धा वाटी साखर(मी पावच घेते, गोड खूप आवडत नाही),
एकच मोठा चमचा शुद्ध तूप(टेबलस्पून घ्या),
३ टेबलस्पून कणीक(इथे खरे तर मैदा घेतात पण मी केलेला हेल्दी बदल),
१ टीस्पून बेकींग पॉवडर,
२ अंडी,
वेलची वाटून
चवीप्रमाणे मीठ

क्रमवार पाककृती: 

१) पावूण कप पाणी उकळवायचे , उकळले की त्यात साखर विरघळवायची.
२) साखर पुर्ण वितळली दिसले रे दिसले की मग त्यात खोबरे टाकायचे. स्मित
३) मग कच्चा रवा टाकायचा. मीठ टाकायचे.
४) मग तूप टाकून (गॅस एकदम मंद पाहिजे वरील सर्व करताना) मस्त ढवळत ते जरासे आळेल असे वाटले की गॅस बंद करायचा. खूप आळवू नका. मिश्रण तोवरच आळवा की सर्व जवळ आल्यासारखे दिसले पाहिजे.
५) आता हे मिश्रण आंबवा.( मी रात्रभर नाही आंबवत पण ६-८ तास ठेवते. म्हणून सकाळी १०-११ वाजता करून ठेवायचे अवन जरा गरम करून मग बंद करून झाकून ठेवून द्यायचे आणि रात्री १० वाजता बेक करायचे.)
६) ६-८ मिश्रण आंबले की दोन अंडी फोडायची, त्यातील फक्त पिवळे व पांढरे वेगळे करायचे, मग पिवळे वेगळे घेवून , वॅनीला ईसेन्स ३ लहान चमचेटाकूनच फेटून चमच्याने मस्त मिक्स करायचे.
७)आता त्यात कणीक व बेकिंग पॉवडर तीनदा चाळून मिक्स करायची. हे अलगद करायचे.
८) आता उरलेले पांढरे मस्त फेटून घ्या हँड ब्लेंडरने की अगदी हलके दिसले पाहिजे. सुरी नीट उभी राहिली पाहिजे. हे आता फक्त वरील मिश्रणात फोल्ड करा.खूप असे काहि वेळ लागत नाही करताना. गॅस पाशी उभे राहून मिश्रण टाकायचे मग आंबवायचे.
९)अंडे टाकल्यावर पीठ जरा ओलसर व सैल वाटेल, हात लावून करायचे नसेल तर कणीक एका पोळपाटावर पसरवून पीठ चमच्या ने घेवून ते चमच्याने थापायचे व बेकींगच्या आधी साखरेत घोळवा नाहीतर साखर भुरभुरायची. बेक केल्यावर मस्त चमकतात.
१०)२८५ फॅ वर २५ मिनीटे बेक करा. मध्येच बाजू बदला.

पदार्थाची माहिती: हा एक गोव्याचा खास असा कुकीज पदार्थ आहे. दिवाळीला अंड्याशिवाय करते आई. काही फरक असा नाही पडत फक्त चव वेगळी लागते. दोन्ही चवी मस्त असतात. तुलना करु शकत नाही.
बेक करताना साखर व नारळाचे आंबून एक मस्त वास येतो , खोबर्‍याचा असा वास खूप घमघमाट करतो.

तोंडात एकदम विरघळणारी कूकीज (नानकटाई) होते.
पुर्वी लहानपणी एक कोकोनट क्रंची बिस्किटे मिळत लहानपणी तशी चव पण हि ज्यास्त हलकी,खुसखुशीत होतात. आठवते गाणं, एक नारीयल पेडसे तूटा..... वगैरे.
हि दिवाळी अंकात देणार होते पण वेळच नाही झाला.

हे असे मिश्रण आळवायचे,
naanakatae1.jpg

मग गोळा बनवून आंबवायचे,

naanakatae2.jpg

अंडी फेटून, पीठ मिक्स करून साखरेत घोळून बेक करण्यापुर्वी,
naanakatae3.jpg
फायनल प्रॉडक्ट
naanakatae4.jpg

अधिक टिपा: 
  • ऑथेंटिक रेसीपीत मैदा घालतात.
  • अंडी चार घालतात. मला गरज नाही वाटते इतक्या अंड्याची, वीगन लोक अंड्याशिवाय करु शकता.
  • मी कणीक घातल्याने रंग खूप ब्रॉउन दिसतो.
  • दुसरे म्हण्जे मी ब्रॉउन शुगर घातली त्यामुळे कुकीज अश्या दिसतात. (फोटो नंतर टाकेन).
  • कप किंवा वाटी नेहमी सारखी ठेवा सर्व जिन्नस मोजताना जे घ्याल ते. हाच एक बेकींगचा रुल आहे.
  • माहितीचा स्रोत: 
    गोव्याच्या शेजारच्या काकी(आईची मैत्रीण) व माझे उगीच हेल्दी फेरबदल.

    .

    लागणारा वेळ: 
    ३० मिनिटे
    लागणारे जिन्नस: 

    .

    क्रमवार पाककृती: 

    .

    वाढणी/प्रमाण: 
    ८-१० लहान लाडू होतील