मराठी गझल

चाल दैवाची

Submitted by प्रतिक सोमवंशी on 16 May, 2020 - 02:52

चाल दैवाची कुणा कळली कधी
वाट ही दुःखाकडे वळली कधी

का दुरावा मागते मज रात्र ही
सांगना तृष्णा तिची शमली कधी

मी न झालो वृक्ष वाटे बाजूचा
तू न त्याखाली तरी रमली कधी

पापणी ओली कशी होते तुझी
चाल ही नाही मला जमली कधी

ही कहाणी आपुली नाही जरी
ती मला नाही कशी कळली कधी
©प्रतिक सोमवंशी

क्षणाक्षणाला

Submitted by उमा पाटील on 26 April, 2019 - 04:38

श्रृंगार रम्य करुनी सजते क्षणाक्षणाला
फसव्या जगामधे ती मरते क्षणाक्षणाला

बेरोजगार शिक्का खोडून टाकला मी
कामात राम आहे कळते क्षणाक्षणाला

कैदेत रावणाच्या सीता अशोक रानी
रामास नित्य स्मरुनी जगते क्षणाक्षणाला

लेकीस वेळ होतो जेव्हा घरी परतण्या
आई मनात चिंता करते क्षणाक्षणाला

सारे कळून चुकले शत्रू नि मित्र माझे
खंबीर होवुनी मी लढते क्षणाक्षणाला

विषय: 

तुझी आठवण पुन्हा दे ना..!!

Submitted by दुसरबीडकर on 16 June, 2017 - 13:10

मेंदीचाही रंग खुलेना..
तुझी आठवण पुन्हा दे ना..!!

धुर्या-धुर्याचे टिचभर अंतर..
पार कराया जन्म पुरेना..!!

असह्य होतो जिवास उष्मा..
उन्हासही सावली मिळेना..!!

सुटी उन्हाळी हरवून गेली..
जन्माची शाळा समजेना..!!

नकळताच फोफावत जाते ..
दुःख असावे बहुदा केना..!!

लहान होतो,मोठा झालो..
लहान व्हावे कसे कळेना..!!

तिच्याएेवढे सुरेख जगणे..
तिच्याविनाही जगून घे ना..!!

-गणेश शिंदे दुसरबीडकर

पळवाट

Submitted by प्रफुल्ल सुर्वे on 23 March, 2017 - 15:01

कर्जमुक्त श्वासांची जेंव्हा तयारी होते.
दुप्पट अलगद दु:खाची ही उधारी होते.

त्या गरुडांचे भाग्य किती निष्ठुर म्हणावे,
अखंड तडफड हीच जयांची भरारी होते.

आग्रह सहवासाचा मी ही केला नव्हता,
दु:खच रमले. सुख नेमके फरारी होते.

संवादाचे सूर समजले निघण्यापूर्वी,
शब्द रेशमी सारे, संदर्भ विषारी होते.

लाख तडाखे लाटांचे सोसूनी परतलो.
नेम साधुनी लपले मित्र किनारी होते.

पुन्हा कशाला नियतीशी तो वाद नकोसा?
विजय शेलका होतो, मात्र हार करारी होते.

शब्दखुणा: 

जगण्यासोबत समन्वयाची कला साधली नाही..

Submitted by दुसरबीडकर on 13 December, 2015 - 05:24


जगण्यासोबत समन्वयाची कला साधली नाही..
जगून घेतो तरी जिंदगी जरी चांगली नाही..!!

ह्रदयावरुनी किती मोसमी वारे आले-गेले
एक सुखाची सर मुक्कामी कधी थांबली नाही..!!

जिथे झाड आंब्याचे व्हावे तिथेच बाभुळ झालो..
नशिबामधल्या काट्यांची मग भिती वाटली नाही..!!

कुठल्याही कवितेच्या गावी जाणे जमले नाही..
आयुष्याची कविता शब्दांमधे मावली नाही..!!

एका श्वासापासुन सगळे जीवन उसने असते..
तरी सत्यता कधीच तू माणसा मानली नाही..!!

-गणेश शिंदे,दुसरबीडकर..

चुलीमध्ये घाल

Submitted by अभय आर्वीकर on 22 September, 2015 - 00:10

चुलीमध्ये घाल

मेघ भरजरी आठवणींचे, दाटून आले काल
नयनामधे आली त्सुनामी, वाहून गेले गाल

जाता जाता हळू घातली भुवई उचलून साद
या चिमणीच्या चोचीसाठी दाणा घेऊन याल?

बोल बोबडे मर्दुमकीचे बोलून झाले फार
असेल जर का तुझ्यात हिंमत, हाती घे तू मशाल

कर्ज काढुनी कशास शेती कसतोस मित्रा सांग
येडपटांचा येडा धंदा कुत्रं खाईना हाल

साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार
पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल

या मातीचा लोळ एकदा क्षितिजे भेदुनी मार
चिंब न्हाऊ दे दिगंताला रंग दे लालीलाल

'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू कशाला सांग?
तुझे प्रबंध तुपात घोळून चुलीमध्ये तू घाल

वारी

Submitted by मिल्या on 4 June, 2015 - 23:48

पावसाची सुरू पुन्हा वारी
त्यास विठ्ठल जणू धरा सारी

आरशाचे सदैव का ऐकू?
एवढीही नकोच लाचारी

ह्या सुखाच्या महाग वस्त्रांचा
पोत नसतो कधीच जरतारी

आंधळी न्यायदेवता इथली
आणि सारेच देव गांधारी

मांजरासारखे अती लुब्रे
दु:ख येते पुन्हा पुन्हा दारी

दूर गेलीस खेद ना त्याचा
गंध का धाडलास माघारी?

स्वप्न माझे जळून गेले तर
राख सुद्धा खपेल बाजारी

दु:ख आले निघूनही गेले
सांत्वने एकजात सरकारी

मिलिंद छत्रे

विषय: 

एक केवळ बाप तो

Submitted by अभय आर्वीकर on 27 May, 2015 - 12:30

एक केवळ बाप तो

तापणारा तापतो अन मजवरी संतापतो
मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो

तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी
ओढताना ओढणीला सूर्यही मग धापतो

अंतरात्म्याचा दुरावा वाढला जर फ़ार तर
अंतराला अंतराच्या अंतराने कापतो

वाचणारा वाचतो पण; का? कशाला? जाणतो?
वाढवाया आत्मगौरव छापणारा छापतो?

आसवांच्या आसवांना धीर द्याया धावतो
निर्भयाला अभय ज्याचे एक केवळ बाप तो

                            - गंगाधर मुटे 'अभय’
----------------------------------------------

पाहून घे महात्म्या

Submitted by अभय आर्वीकर on 21 April, 2015 - 06:28

पाहून घे महात्म्या

पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने

तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने

चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने

संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने

इतुकेच शोध उत्तर, मातीत राबणार्‍या
बदलेल भाग्य निव्वळ, तू घाम गाळल्याने?

मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही

वैश्विक खाज नाही

Submitted by अभय आर्वीकर on 19 April, 2015 - 03:37

वैश्विक खाज नाही

शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही

निष्णात सैन्य माझे; पण हारणार नक्की
मोफत लढ़ावयाचा, यांना रिवाज नाही

त्यांच्या कपटनितीला, चिरडून टाकतो मी
धर्मास जागणारा, मी धर्मराज नाही

खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही

गावे बकाल आणिक, शहरे सुजून आली
आम्हांस मात्र त्याची, अजिबात लाज नाही

शालेय पुस्तकांनी, मेंदू बधीर केला
बुद्धी भ्रमिष्टतेवर, उरला इलाज नाही

स्वातंत्र्य देवते तू, ये भारतात थोड़ी
जेथे 'अभय' कुणाला, कुठलेच आज़ नाही

- गंगाधर मुटे ’अभय’

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल