एक, दोन वांगी, तळायला आणि फोडणीला तेल, मोहरी,कढीपत्ता, गुळ, चिंचेचा कोळ (साधारण १,२ टीस्पून), आलं-लसूण पेस्ट (एक टिस्पून प्रत्येकी), मसाल्याकरता: किसलेलं सुकं खोबरं, जिरं,सुक्या लाल मिरच्या (चवीप्रमाणे),धणे आणि तीळ-कोरडे भाजून, शेंगदाणे- भाजून,२ ,३ लसूण पाकळ्या (मसाल्याकरताचे सगळे जिन्न्स साधारण एक-एक टेबलस्पून घ्यावेत), फ्रेश क्रीम साधारण अर्धी,पाव वाटी.
वरुन कोथिंबीर.
वांग्याचे करंगळीएवढे लांब, उभे काप करुन तेलात तळून घ्यावेत. एकीकडे मसाल्याचे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यावेत. थोडं पाणी घालून पेस्ट केली तरी चालेल.
पातेल्यात तेल गरम करुन मोहरी आणि भरपूर कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यावर तळलेली वांगी घालावीत. त्यात आलं-लसूण पेस्ट घालून नीट ढवळून घ्यावं व झाकण घालून एक वाफ काढावी. त्यावर वाटलेला मसाला घालून पुन्हा नीट मिक्स करुन घ्यावं. ह्यात चिंचेचा कोळ /पल्प व गुळ घालावा. वरुन फ्रेश क्रिम व कोथिंबीर घालून पुन्हा झाकण घालून वाफ काढावी व गरम गरम खावं.
ह्यात टोमॅटो प्युरी घालूनही छान लागते. बाकी मसाला तोच.आमच्या इथल्या रेस्टॉरंटमध्ये ही भाजी 'बघारे बैंगन' ह्या नावाने मिळते म्हणून हेच नाव दिलंय.

