अंड्याचे प्रकार

कांदा-बटाटा भुर्जी

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कांदे
१ बटाटा
२-३ हिरव्या मिरच्या
१ चमचा आलं-लसूण पेस्ट
३ अंडी... साधी नेहेमीची
कोथिंबीर
लाल तिखट
हळद
अर्धा चमचा गरम मसाला
तेल
मीठ

क्रमवार पाककृती: 

- कांदे चौकोनी बारीक चिरून घ्यावेत
- बटाटा धूवून कांद्यासारखाच चिरून घ्यावा
- हिरव्या मिरच्या धूवून बारीक चिराव्यात
- कोथिंबीर धूवून बारीक चिरावी
- एका पॅनमध्ये तेल तापवावं
- गरम तेलात मिरच्या + कांदा घालावा, परतावा
- कांदा पारदर्शक झाल्यावर बटाटा घालावा
- परतावं. आलं-लसूणपेस्ट घालावी, नीट मिसळावं. झाकण ठेवून एक वाफ काढावी. त्यामुळे बटाटा शिजेल...
- आता हळद, तिखट घालावं. परतावं.
- अंडी फोडून घालावीत, नीट मिसळावं
- गरम मसाला, मीठ घालावं, छान परतावं
- भुर्जी जरा सुकली की, कोथिंबीर घालून गरम गरम वाढावी

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात दोन लोकांचं होतं
अधिक टिपा: 

- यात टोमॅटो नाही वापरला कारण बटाटयालापण शिजतांना पाणी सुटतं
- अगदी शेवटी, ग्लेज येण्याकरता चमचाभर तेल घालता येतं
- गरम पराठा, फुलक्याबरोबर छान लागते

माहितीचा स्रोत: 
प्रयोग! दुसरं काय!

रेण्वीय अंडे पोळा उर्फ मोलेक्युलर 'सनी साईड अप'

0

अजयने इथे लिहिलेल्या http://www.maayboli.com/node/23746 या लेखापासून प्रेरणा घेऊन मोलेक्युलर गॅस्ट्रॉनॉमीचे हे किट ऑर्डर केले - http://www.molecule-r.com/ ते शुक्रवारी आल्यावर या वीकेन्डला त्यातला प्रयोग करुन पाहिला.

किटसोबत एक डीव्हीडी येते. त्यात रेसिपीज आहेत. त्यातली सर्वानुमते 'मोलेक्युलर एग' ही करुन पहायची ठरवली.
दूध, दही, साखर, आंबा वापरुन 'एग फ्राय (सनी साईड अप)' सारखा दिसणारा गोड पदार्थ.

किटमधील लागणार्‍या बाकी गोष्टी-
Sodium Alginate - १ टीस्पून
Agar Agar - १/२ टीस्पून
calcium Lactate - १ टीस्पून

तिरामिसु (Tiramisu)

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ अंडी (पांढरा आणि पिवळा भाग वेगवेगळा करुन घेणे)
१/२ कप/११० ग्रॅम साखर.
८ औंस/२२५ ग्रॅम मस्करपोने चीज
१ मोठा मग तयार espresso coffee (साखर किंवा दूध न घालता).
२ टेबलस्पून Cognac किंवा Brandy (ऐच्छिक), काही जण रम वापरतात.
२०-२५ लेडीफिंगर बिस्कीटे किंवा १ पाकीट
२ टेबलस्पून कोको पावडर (वरुन सजवायला)

क्रमवार पाककृती: 

खर तर तिरामिसुची कृती फार सोपी आहे थोडक्यात सांगायचे तर कॉफीत बुडवलेली बिस्किटे आणि क्रीम यांचे एकावर एक आपल्याला हवे तेवढे थर दिले की झाले तिरामिसु तयार.. ह्याच्यापलीकडे का..ही नाही. पण असे सांगीतले तर लोकांना खर वाटत नाही, एवढा छान पदार्थ असा कसा पटकन होईल असे म्हटल्यावर काय करणार म्हणून ही घ्या कृती अगदी सविस्तर. स्मित

१. एका मोठ्या भांड्यात अंड्यांचा पिवळा भाग, सगळी साखर, Cognac आणि १/२ टेबलस्पून तयार कॉफी एकत्र करा. नंतर हँड मिक्सरने ते चांगले २-३ मिनीट फेटून घ्या.

२. आता वरच्या मिश्रणात सगळे मस्करपोने चीज टाकुन हँड मिक्सरने ३-५ मिनीटे फेटा. सगळे मिश्रण एकजीव व्हायला हवे (until consistency is smooth). हे भांडे बाजुला ठेवुन द्या.

३. आता दुसर्‍या एका मोठ्या भांड्यात अंड्यांचा पांढरा भाग आणि चिमुटभर साखर टाका आणि हँड मिक्सरने भरपुर फेटा. त्याचा मस्त पांढरा फेस (stiff peaks) व्हायला हवा. भांडे उलटे केले तरी हा फेस खाली पडणार नाही इतक्या वेळ फेटावे. माझा मिक्सर खूप पॉवरफुल नाहीये त्यामुळे मी १२-१४ मिनीटे फेटते. तुम्हाला कदाचित यापेक्षा जास्त किंवा कमी वेळ लागेल तुमच्या मिक्सरच्या क्षमतेप्रमाणे.

४. आता हा फेटलेला अंड्याचा पांढरा भाग हलक्या हाताने लाकडी चमचा वापरून दुसर्‍या (मस्करपोने असलेल्या भांड्यात) मिश्रणात मिसळा. मिसळतांना फोल्डींग मेथड वापरावी. हे अगदी हलक्या हाताने करावे.

५. आता एका पसरट भांड्यात/ताटलीत सगळी कॉफी ओतावी. कॉफी अगदी कडक गरम असू नये, कोमट किंवा त्यापेक्षा थोडी जास्त गरम असावी.

६. एक चौकोनी काचेचा कॅसरोल किंवा ज्या भांड्यात तिरामीसु करायचय ते भांडे घ्यावे. नंतर एक एक करुन लेडीफिंगर्स
आडवी धरुन कॉफीत बुडवावीत. बिस्कीट पूर्ण बुडायला हवे. ही बिस्कीटे फार नाजूक असतात त्यामुळे झटकन बाहेर काढावीत आणि लगेच कॅसरोलच्या तळाशी ठेवावीत. एका शेजारी एक असा बिस्किटांचा एक थर तयार झाला की त्यावर भांड्यातले अर्धे मिश्रण हलक्या हाताने ओतावे आणि ते लाकडी चमच्याने सगळीकडे सारखे पसरवावे (दुसरा थर).

७. आता परत त्या मिश्रणाच्या थरावर वर कॉफीत बुडवलेल्या बिस्किटांचा थर द्यावा (तिसरा थर). बिस्कीटे अगदी शेजारी शेजारी चिटकून ठेवावीत थर लावतांना आणि मग त्या थरावर उरलेले सगळे मिश्रण ओतावे (चौथा थर). काहीजण यावर बिस्कीटांचा अजून एक थर (पाचवा) पण देतात आणि त्यावर परत क्रीमचा (सहावा) पण माझ्याकडचे भांडे एवढे खोल नाही त्यामुळे मी एकुण चारच थर देते. तिरामिसु करतांना सगळ्यात खालचा थर नेहमी लेडीफिंगर बिस्कीटांचा तर सगळ्यात वरचा थर नेहमी क्रीमचा असावा

८. आता कॅसरोल किमान ४-५ तास तरी फ्रीजमध्ये ठेवावा. सर्व्ह करायच्या आधी चाळणीने त्यावर कोको पावडर टाकायची आणि मग सगळ्यांना तिरमिसु सर्व्ह करायचे. माझ्याकडे आत्ता फोटो नाहीये पुढच्यावेळी केले की काढेन आणि टाकेन.

वाढणी/प्रमाण: 
४-६ लोकांना किंवा खाल तसे.
अधिक टिपा: 

१. लेडीफिंगर्स आणि मस्करपोने चीज शक्य असेल तर इटालिअन ब्रँडचेच वापरावे. इटालीयन ग्रोसरीच्या दुकानात मिळते. लेडीफिंगर हे बिस्किटाच्या प्रकाराचे नाव आहे ब्रँडचे नाही. मी होल फुड्स मधून लेडीफिंगर्स आणले होते ३६५ की अश्याच कुठल्यातरी ब्रँडचे, अजिबात आवडले नाही.
२. एस्प्रेसो कॉफी करणे शक्य नसेल तर साधी काळी कॉफी वापरता येईल पण चवीत फरक पडतो.
३. काही जण लेडीफिंगर्स ऐवजी पाउंड केकच्या पातळ चौकोनी चकत्या वापरतात. चवीतला बदल मला फारसा आवडला नाही म्हणून मी लेडीफिंगर्सच वापरते.
४. मी वापरलेला कप मेजरींग कप होता.
५. पार्टीसाठी करतांना हा प्रकार मी आदल्या दिवशीच करुन फ्रीज मध्ये ठवते, जितका जास्त वेळ तो फ्रीज मध्ये रहातो तितकी चव चांगली येते.
६. अंड्याचा पांढरा भाग १२-१४ मिनीटे फेटणे हा भाग कधी कधी कंटाळवाणा होवू शकतो तो नवर्‍याला किंवा दुसर्‍या कोणालातरी करायला द्यावा स्मित. माझ्यामते तिरामिसु इतकी सोपी आणि हमखास यशस्वी होणारी कुठलीच कृती नाही.

माहितीचा स्रोत: 
इटालीयन रुममेट