मंडळ - भाग १

Submitted by हायझेनबर्ग on 14 August, 2009 - 23:32

अंधाराच्या काजळ घातलेल्या डोळ्यातलं चतुर्थीचं बुबुळ खिडकीतून खोलीभर पसरतांना युगयुगांतरात दाटलेल्या तमाची चिरनिद्रा मोडून उठणार्‍या सिद्धार्थासारखे त्याने आपले डोळे उघडले. मनगटावरच्या घड्याळाच्या काट्याने रात्र वयात आल्याचा टाहो फोडला होता. चंद्रमौळी झोपडीत जबरदस्तीने घुसलेल्या किरणांनी जमीनही भेदू पहावी तश्या खिडकीतून किरमिजी प्रकाशाच्या लाटा खोलीच्या तिन्ही भिंतींना धडका देत होत्या.

हा खोलीभर कसला किरमिजी समुद्र आणि त्याला ही गाज कशी? आपले अस्तित्त्व लोलकाच्या कोणत्या कोनात अडकून पडलेय हेच त्याला उमजेनासे झाले. चिरनिद्रेत भेदलेले हे त्या परमात्म्याच्या मायामहालातले एखादे स्वप्नातीत रहस्य तर नाही? वाटून त्याने पुन्हा डोळे मिटले पण किरमिजी समुद्राची गाज त्याच्या कानांना आता असह्य होत होती.

बिछान्यावरून भारावल्यासारखा उठून तो खिडकीकडे गेला, मागचा महिनाभर बंद असलेली खिडकी त्याने जोर लावून उघडली. लख्खं प्रकाशाची एक गरम लाट त्याच्या शिडशिडीत शरीराला भेदून भिंतीवर धाडकन आदळली आणि पाठोपाठ आवाजाचा जो लोळ उठला त्याने त्याची तंद्री एकदमच भंगली. समोर 'नवभारत तरूण मंडळ' पिवळ्याधमक उष्ण प्रकाशाच्या ज्वाळांत धगधगत होतं. तेजाने न्हाऊन निघालेली श्रींची मूर्ती त्याच्या नजरेस पडली आणि तो भानावर आला.

मागचा महिनाभर आपण कुठल्या जगात संचारत होतो? कुठलं पवित्र की अपवित्र, अमृत की हलाहल प्यायलेले, शापित की उद्धारीत जीव आपल्या आजुबाजूला रेंगत होते? लोलकाचा कोन कोणी कसा बदलला आणि आपण अस्तित्त्व शोषून घेणार्‍या ह्या अंधारात पुन्हा कधी येऊन पडलो? त्याला सगळं स्पष्ट आठवलं. अंधारी असली तरी हीच दुनिया आपली आहे, वेदना जाणवण्यापुरते तरी इथे आपल्याला अस्तित्त्व आहे, दुखरा का होईना समाजिक प्रदर्शनासाठीचा अजून एक बेगडी चेहरा आपल्याला आहे ही जाणीव त्याला भलतीच सुखावून गेली. अचानक थोडा उत्साहही वाटला. आता आंघोळ आवरून, कपडे करून खाली जावे म्हणून तो मोरीत शिरला.

खोलीला कुलूप घालून दोन जिने सावकाशीनं उतरून मंद मंद पावलं टाकत तो मंडळाकडे निघाला. लाकडी फळ्या घालून निळसर कापड अंथरलेल्या स्टेजवर पाय सोडून बसलेले तिघेचौघे असावेत, हॅलोजन दिव्यांच्या तीव्र पिवळ्याधमक प्रकाशात त्यांचे चेहरेही त्याला पेटल्यासारखे दिसले, नकळतं नजर गणरायाच्या प्रचंड मूर्तीच्या प्रसन्न श्रीमुखावर स्थिरावली. जिचा पुसटसा चेहरा फक्त तिच्या पदरा आडून दूध पितांनाच पाहिला ती आईच समोर दिसतेय वाटून मूर्तीला पाहतांना त्याला जन्मोजन्मीचा ऋणानुबंध जुळून आल्यासारखं भरून आलं. मंडळाजवळ पोहोचला तसा कुणीतरी हाफचड्डी जीव खाऊन किंचाळला, देवा दादा आला....देवा दादा आला!

स्टेजवर वायरींची जोडणी करणार्‍या माणिकने आवाज ऐकून उत्साहात एकदम खाली उडीच मारली, पाठोपाठ अजय, विकी, रेणुकाही स्टेजवरून उतरते झाले.

माणिक म्हणाला, देवा साल्या कुठे गेला होतास रे महिनाभर? किती वाट पाहिली तुझी. वाटलं बाप्पाच्या आधी दोन दिवस तरी येशीलच तू. उशीर केलास साल्या यावेळी.

रेणुका म्हणाली, हो ना! वर्गणी मागायला गेलो तेव्हा आख्खी कॉलनी विचारत होती, देवा दिसत नाही हल्ली तुमच्यात? देवा नाही का हो यावेळी मंडळात? देवा ने कॉलनी सोडली का हो?

देवा म्हणाला, नागपूरजवळ तिरवडेला होतो मी, कापा आदिवासींच्या पाड्यांवर. डॉक्यूमेंट्री चालू होती.

विकी म्हणाला, इथं सगळे देवा,देवा करून राह्यले आणि हे तिकडं विदर्भात आदिवाशी पाड्यावर डोकूमेंट्री करत फिरत होतं, वर्गणीबी कमी आली ह्यो नव्हता तर! च्यायला, आंम्ही कामं धंदे सोडून इथं मंडळात बैलासारखं राबतोय पण आमच्यावर विश्वासच नाही कुणाला, त्यांना वाटत असल देवा नाहीतर हे वर्गणी दुसरीकडंच उधळतीन.

अजय म्हणाला, विकीशेठ तुम्ही दिवसभर बाईक उडवा, कट्ट्यावर सिग्रेटी फुका, जिममध्ये सलमानच्या फोटोसमोर बॉडी बनवा, मग बरे देतील लोक वर्गणी तुमच्या हातात? तुम्ही तर पुढार्‍यांच्यावर पब्लिकला येडे समजायला लागले!

विकी म्हणाला, पंत अजय जोशी फायनल इयर मेकॅनिकल इंजिनियरसाहेब, कॉलनीची कामं पण करतो का नाही आपण? बाकी कॉलन्यात दोन तास पाणी येतं आपल्या कॉलनीत पंधरा मिनिटं ज्यादा येतं की नाही? ह्यो तुमच्या घरासमोरचा स्ट्रीट लँप, कितीवेळा फोडला पोरांनी बॉल मारून? बसवून घेतला का नाही आपण लगेच? पालिकेत वट्ट है आपली. मी होतो म्हणून वर्गणी गोळा करणं तरी झालं!

माणिक म्हणाला, हे खरं आहे देवा! विकीनं चांगला पुढाकार घेतला यावेळी नाहीतर मला वाटलं तू नाहीस तर नवभारत तरूण मंडळाचा बोर्ड काही चढत नाही यावर्षी. बरं झालं वेळेत आलास, फार कामं खोळंबलीयेत तुझ्याशिवाय. आता तू आहेस तर काही फिकीर नाही. दरवर्षीसारखा यंदाही गाजणार बघ नवभारतचा गणपती!

रेणुका म्हणाली, देवा आला कळाल्यावर बापू, मंदाताई, सानेकाका, जाधवराव, मोहनशेठ सगळे लागलीच येतील. मजा येणार आता दहा दिवस!

अजय म्हणाला, शलाका... ती पण येईलच की देवा आला कळाल्यावर... आणि त्याने माणिकला डोळा मारला, तसे सगळे एकदमच हसले.

देवा मात्र भयंकर विरक्त चेहर्‍यानं हॅलोजनच्या दिव्यावर उडणार्‍या किड्यांकडे एकटक बघत होता.
त्याला वाटलं कुठं ती तिरवडेला पाहिलेली रापलेल्या कातडीची, फरशी आणि बरच्या घेऊन आदिम काळापासून खुरडत खुरडत जगत आलेली माणसं आणि कुठं ही पोलिओच्या लसीबरोबर सामाजिक जाणिवेचा आणि सुसंस्कृत जीवनाचा फुकट डोस मिळाल्यासारखी वागणारी मुक्त माणसं!

सूर्याशिवाय प्रकाशाचा एकही स्त्रोत ज्यांना माहित नाही, मुलभूत मुलभूत म्हणतो अशा कुठल्याही गरजा जिथे गरजा नाहीतंच, त्या मागास समाजातही ही देव संकल्पना कशी रुजली असेल? कितीही ओबडधोबड आणि विद्रुप असला तरी त्यांच्या त्या देवाला जन्माला घालण्याचे त्यांच्या पूर्वजांनी कशाला घाटले असेल? आपण जर ह्या सुधारित आणि अनेक कल्पोकल्पित परंपरा जपणार्‍या समाजात न जन्मता त्या वस्त्रहीन, निर्लज्य समाजात जन्मलो असतो तर आज त्यांच्यापैकीच एक रानटी असतो! रंगीबेरंगी कपडे घालून समोर आलेली माणसेही मग आपल्याला एखाद्या परग्रहावरून आलेल्या प्राण्यांसारखी वाटली असती. मूळ ही आपल्यासारखी माणसेच आहेत आणि आकाशात दूर कोठेतरी परग्रह आहेत हे तरी आपल्याला कळाले असते का? का असे कळणे म्हणजेच ज्ञान? मग सध्या आपल्याला हे कळते, तर आपण ज्ञानी आहोत का? आपण ज्ञानी आहोत तर मग बुद्ध कोण होता? असे काय आणि किती कळले म्हणजे एखादा सिद्धार्थ बुद्ध होतो?
ह्या अशा सगळ्या गूढ, अनाकलनीय प्रश्नांच्या सरी त्याच्या डोक्यात राहून राहून झडत होत्या. प्राचीन आणि अर्वाचीन जगांच्या वेशीवर उभं राहून दोन्हीकडे डोकावल्यासारखं काहीतरी विचित्र, गंभीर आणि अनाकलनीय.

तेवढ्यात बापू आणि मोहनशेठ आले. त्यांची जेवणं उरकलेली वाटत होती. सकाळी तीन वाजता स्टेशनवर खालेल्या वडापाव आणि कटिंगशिवाय काहीच खाल्ले नाही आणि दिवस नुसता झोपण्यात गेला. त्याला भयंकर भुकेची स्थिती झाली पण आत्ता अन्नापेक्षा ह्या सुसंस्कृत म्हणवणार्‍या प्राण्यांचा थोडा सहवास आपल्यासाठी अत्यावश्यक आहे असे त्याला वाटले. बापूंकडे पाहून तो उगीचच मंद आदरयुक्त वगैरे हसला.

बापू म्हणाले, वा वा! देवदत्त तुम्ही आलात, मला फार फार बरे वाटले. फार मोठ्या कामगिरीवर गेला होता दिसते... वा वा! फार फिरता बुवा तुम्ही. पण तुमच्यासाठी चांगलेच आहे. या वयात फार छान अनुभव मिळतोय तुम्हाला. व्यक्तीमत्वविकासही फार छान होतोय बघा तुमचा. तब्येतीकडे फार दुर्लक्ष करता पण तुम्ही. कुठे नागपूरला गेला होता का? वा वा! मी १९७० साली होतो बघा तिथे. आमचे परमस्नेही धोत्रे, ते अजूनही असतात तिथेच, बर्डीमध्ये की कायसे? पुढच्यावेळी जाणार असाल तर नक्की कळवा, धोत्रेंना सांगून ठेवतो. जरूर भेटा त्यांना. संघाचा माणूस, तुमच्यासारखेच फार छान बोलतात बघा धोत्रे!

मोहनशेठ म्हणाले, देवाभाई बेस झाला बघ तू आला ते! आता बेस प्लॅनिंग होणार मंडळाचा. हे समदे छोकरा, छोकरी लोग लई मिस केलं बघ तुला... आपण सांगायचो, येणार, येणार देवाभाई नक्की येणार, नाहीतर हा मोहनशेठ हायेच की! हजार तिथं बाराशे लागला तरी चालन पण देवाभाईसारखा गणपती झाला पाहिजे. ए माणिकभाई! ते आपला मोहन गारमेंट्सचा बोर्ड नाय लागला रे अजून? आपण स्पॉन्सरर हाय नि ये टाईमचा, सकाळीच बोर्ड पाठवून दिला होता दुकानातून!

माणिक म्हणाला, लावतो, लावतो माणिकशेठ... अजून बरीच कामं बाकी आहेत. आहेत, चांगले दहा दिवस आहेत की गणपती अजून... बक्कळ जाहिरात होईल तुमच्या गारमेंट्सची दहा दिवसात. असं करा पुढच्यावर्षीचेही प्रायोजक बना मग वर्षभरही ठेऊ तुमच्या जाहिरातीचा बोर्ड, तेवढीच यावर्षीच्या वर्गणीतली तूटही भरून निघेल.

आल्यापासनंच सुतक लागून कळाहीन झाल्यासारख्या आपल्या चेहर्‍याकडे सगळे विचित्र नजरेने बघतायेत वाटून बळेच काहीतरी बोलायचं म्हणून देवा बोलला, किती जमली वर्गणी यावर्षी ?

अजय म्हणाला, मागच्या वर्षीपेक्षा वीस टक्के कमी. सगळ्यांच्या घरी मागच्या वर्षीचं पावतीपुस्तक घेऊन गेलो होतो. म्हणालो, मागच्या दोन वर्षांपासून तोच आकडा आहे तर यावेळी किमान दहा टक्के तरी वाढवून द्या. रोषणाई, मंडप, टेम्पो सगळ्यांचीच भाडी वाढलीयेत.. सत्यनारायणाच्या भटजींनीसुद्धा दक्षिणा पंचवीस टक्क्यांनी वाढवली तर तुम्ही वर्गणी निदान दहाने तरी वाढवा!

तर ते सायली बंगल्यातले रेगे म्हणाले, अहो जोशी! बँकेतल्या कॅशियरचा पगार वर्षाकाठी चार टक्क्यानेही वाढत नाही, आणि तुम्ही कुठले दहा टक्के घेऊन बसलात? व्याजाचे आणि कर्जाचे टक्के काढण्यात आख्खी उमेद खर्ची पाडली आम्ही, तेव्हा ती टक्क्याची भाषा नका शिकवू आम्हाला. आमच्या परमपूज्यांनी आयूष्यभर भटगिरीच केली, आता ते जर पीडब्ल्यूडीत अधिकारी असते तर दहा काय चांगले सवादहा टक्के वाढवून दिली असती की हो आम्हीपण वर्गणी! च्यायला! हे बंगल्यांच्या लाईनीतले देशपांडे, चित्रे, रेगे, वर्षानुवर्षे देशावरचं मीठ खाऊनही ह्यांचं तोंड खारटंच. आता आमचा बाप पीडब्ल्यूडीत आहे आणि तो काही खात असेल तर वर्गणी देतांना ते काढायची काही गरज होती का?

विकी म्हणाला, त्या सूर्यप्रभा गॅस भांडारवाल्याकडं मी गेलतो वर्गणी मागायला, तर साला माझ्यासमोर पानाची पिचकारी टाकत म्हणाला, आत्ता नाहीत माह्याकडं, पोराबरोबर धाडून देईन उद्याला, आणि धाडले तर साल्यानं मागच्यापेक्षा दोनशे कमीच. ह्या लेवा पाटलाचा मार्चमध्ये पालिकेनं गोदामात लपवलेला साठ शिलिंडरचा ट्रक पकडला होताना, तेव्हा आपणच दिला होता सोडवून, नाहीतर काळाबाजार केला म्हणून आत गेला असता साला, पण विसरला गाढवीचा...

रेणुका म्हणाली, मी आणि माणिक गेलो होतोना नगरसेवक जाधवरावांकडे, तर चांगलं दोन तास बसवून ठेवलन् आम्हाला पक्षकार्यालयात आणि मग उखडलेल्या चेहर्‍यानं म्हणतात कसे, रेणुकाबाई, वर्गणी काय हो! मागल्यावर्षीपेक्षा चांगली पाच हजारानं जास्ती देतो की आम्ही, पण तुम्हाला आमची कदरंच न्हाई मंग आमचं बी मन आखडलं बघा. आता आम्ही पडलो आमच्या पक्षाशी लई निष्ठावान, आमच्या निष्ठेच्या आड येणार्‍या गोष्टी खपत न्हाई आम्हाला! आता बघा, तुमच्या ईभागासाठी नवनवीन योजना वरून संमती घेऊन रुजवात घालून आणतो का न्हाई आम्ही, कशी का आसनां फुल ना फुलाची पाकळी सुधारणा करतोच का न्हाई दरवर्षी, आन ते तुमचं देवा भाऊ? मागल्या गणपतीला सरळ संघाच्या माणसाचं भाषाण ठिवत्यात? बरं ठिवत्यात ते ठिवत्यात आन वरनं पेपरमध्ये छापून बी आणत्यात...मंग आमचं हाय कमांड आमच्या ह्याच्यात बांबू घालून आम्हाला इचारत न्हाई का भाषाण झालं तवा तुम्ही काय म्हशींची दुधं काढंत व्हता का म्हणून? हा आता काढंत व्हतोच, धंदाच हाये त्यो आपला! पण त्यो मामला वेगळा. तर मंग आम्ही आता कसं मन मोठं करायचं सांगा तुम्हीच? तव्हा ते काही जमायचं न्हाई, मागल्याबारीएवढी वर्गणी देतो, पाच हजार वर पाहिजे आसतीन तर आमचं भाषाण ठिवा आणि देवाभाऊला सांगून पेपरमध्ये छापूनबी आणा. कसं ?

विकी म्हणाला, अरे हे तर काहीच नाही! त्यो नीचे गल्ला वर डल्ला राजस्थान सुपरमार्केटवाला मारवाडी है ना, त्यो तर लईच गंमती करायचा. संध्याकाळ झाली की त्याला माहित असायचं हे पोरं वर्गणी मागायला येणार, मग त्यो द्यायचा त्याच्या बायकोला गल्ल्यावर बसवून आणि स्वतः वरती स्वैपाक करायचा. आता त्याची बायको तोंडावर हातभर पदर काढून दुकानदारी हाकणार, वर्गणी मागितली तर म्हणायची, 'सेठ ना है सकाळे आईजो' चार दिवस गेलो तरी मारवाड्याची सकाळ होईना मग वैतागून एका संध्याकाळी फ्यूजच उडवला त्याचा, दुकान गिर्‍हाईकांनी भरलेलं आन झाला अंधार, त्याला वाटलं आता अंधारात कोणीतरी गल्ला मारणार! मग आला गडी धावतपळत खाली, धरलाच मग आम्ही त्याला. तरी मागच्या एवढीच द्यायला पण लई जीव खाल्ला साल्यानं.

माणिक म्हणाला, तो हार्डवेअरवाला बोहरी, दरवर्षी आपण होऊन वर्गणी आणून द्यायचा, आपण काय त्याला मागायला जात नव्हतो, पण तो नोकराबरोबर पाठवायचा. भिती की आपलेपणा म्हणून काय की, पण पाठवायचाच दरवर्षी. यावेळी मात्र त्यानेही टांग दिली. आपल्याला काही त्याच्याकडून वर्गणीची अपेक्षा नाही पण कारण काही कळेना. खरंच महागाई वाढली म्हणावं तर वर्गणी न परवडण्याएवढा त्याचा धंदा काही किरकोळ नाही. बहूतेक मागच्या महिन्यात त्याची पोरगी कॉलेजातल्या हिंदू पोराबरोबर पळून गेली त्याचाच राग असावा त्याला. जाऊदे, आपण काही त्याला विचारायला जाणार नाही, का रे बाबा वर्गणी का पाठवली नाहीस म्हणून.

अजय म्हणाला, सगळ्यांच्या कडे अशीच घासाघीस, च्यायला शेवटी शेवटी तर भीक मागायला गेल्यासारखं वाटायला लागलं! सगळ्यांच्याच काहीनाकाही अडचणी. खरं खोटं त्यांनाच माहिती. त्या काळेंकडे तर वर्गणी कुणी द्यायची यावरून नवरा-बायकोतंच जुंपली!!
काळे काकू म्हणतात, मी वाण्याकडून किराणा सामान भरून आणलं, आता माझ्याकडे काही शिल्लक नाही! तर काळे काका म्हणाले, मी मुलांच्या फिया भरतो, सगळी बिलं भरतो, असा कसा तुझा पगार वाणसामानातंच संपला?
काळे काकू म्हणाल्या, संपला म्हणजे? नाहीतर मी काय तुम्हाला चोरून पैठणी आणि कांजीवरम घेते की काय? तरी बरं दोन वर्षापासून साधी हॉटेलचीही हौस केली नाही.
काळे काका म्हणाले, म्हणजे? मी हॉटेलात जाऊन जेवणावळी आणि पार्ट्या झोडतो की काय?
हे असं सगळं... शेवटी आम्हीच म्हणालो, राहूदेत काका तुम्हाला वाटतील तेवढे मंडळात आणून द्या.
आणि ह्याच काळ्यांनी मागच्याच आठवड्यात नव्याकोर्‍या एस्टीमची शोरुम डिलीव्हरी घेतली! पेढे मागितले तर नुसतं हॅ हॅ देऊ की देऊ की, करून टग्यासारखे हसतात!

रेणुका म्हणाली, ते नवीन रमणगंगा अपार्टमेंट झालं की नाही, डॉ. केसकरांचा मोठा वाडा पाडून, तिथं तर सगळे आयटी वाले लोकंच राहतात. त्यांची तर वेगळीच तर्‍हा. सकाळी, सकाळी दुधवाल्या आणि पेपरवाल्याचं बिल देतांना असतो तसा बद्धकोष्ठ झाल्यासारखा चेहरा करून विचारतात, कितीची फाडायचीये? आणि वर्गणी देऊन धाडकन् तोंडावर दरवाजा आपटतात. आपल्यालाच अगदी निर्लज्जासारखं वाटायला लागतं! मला तर शिसारीच आली त्या लोकांची, श्शीSS! मोहरीजिर्‍याएवढाही उत्साह नाही त्यांच्यात! त्यापेक्षा हे घासाघीस करणारे लोक तरी मजेशीर!

विकी म्हणाला, च्यायला! आपणबी त्या गांधी चौकातल्या मंडळासारखा महिनाभर आधीपासून जुगाराचा डावच लावू, मग आहे त्यापेक्षा चांगली दहापट तरी वर्गणी जमती की नाही बघा! नाही तर, नकोच च्यायला ही वर्गणीची खटखट, मागायचीच नाही कोणाला आणि घ्यायचीच नाही कोणाकडून! आपल्याच पैशातून बारकासा मंडप टाकू. काही रोषणाई नको आणि काही कार्यक्रम नको. मरा च्यायला, खिरापत खायला या म्हणावं फक्त...

माणिक म्हणाला, काहीही काय बोलतोस रे विक्या? एवढीही काही वाईट स्थिती नाहीये. कशाला त्रागा करतोयेस? जमतील तेवढ्या पैशात करतोच आहोत ना आपण रोषणाई आणि कार्यक्रम..? थोडेफार कमी पडले तर आपण टाकू! नाहीच जमलं तर एखाददुसरा कार्यक्रम रद्द करू. मोठ्या मनाने वर्गणी देणारेही बापू, देविकाताई, ते अजित कर्णिक, मुदगंटी, भावसार, तो वरूण इलेक्ट्रिकलवाला आहेतच की... परत मोहनशेठसारखे उत्साही प्रायोजकही आहेतच. ते साठे आजोबा आणि आजी, दोघंही फक्त पेंशनच्या आधारावरच दिवस काढतायेत, त्यात एकुलता एक मुलगा आठ वर्षांपासून अमेरिकेला जाऊन बसलाय, ते त्याच्याकडून फुटकी कवडीही घेत नाहीत. मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान पण करणारेत म्हणे दोघे. आता त्यांनी दिलीच की नाही समजून उमजून मागच्यापेक्षा जास्ती वर्गणी? तेही न मागता मंडळात आणून दिली. वर म्हणालेही, देवाला सांगा! छान झाले पाहिजेत कार्यक्रम, तुमच्या तरूणाईच्या नवीन गाण्यांचा, नवीन कवितांचा कार्यक्रम होऊन जाऊदे. दरवर्षीप्रमाणे ते फुटकळ शास्त्रीय संगीत आणि गायक काही आणू नका. रिटायर्ड होऊन वीस वर्षे झालीत पण काय जोश आहे त्यांच्यात!

बापू म्हणाले, वा वा! ही फार छान कल्पना दिली साठे आजोबांनी! देवदत्त, तुमच्या ओळखीचे असतील ना आजकाल फारच प्रसिद्ध असलेले ते तरूण कवी? तेच हो, मित्राच्या साथीने 'जीवनगाणे' नावाचा कार्यक्रम करतात ते? तुम्ही घेतलेली त्यांची मुलाखत वाचली होती मी 'वाङमय टाईम्समध्ये'. बघा त्यांना यायला जमत असेल तर, ते जर आपल्या इथे आले तर फारच रंगतदार होईल बघा आपला कार्यक्रम..

बापूंनी आपल्याच रोखाने केलेल्या प्रश्नाचे उत्तर टाळणे देवाला अशक्य झाले, पण उत्तर देणेही जीवावरच आले होते. तो म्हणाला, मी प्रयत्न करून बघतो...

रेणुका म्हणाली, अरे देवा! तो त्या मराठी चॅनेलवरच्या गाण्याची स्पर्धा जिंकलेला तो? तो तर तुझा कॉलेजातला मित्र ना रे? अरे कसला फेमस झालाय तो! चित्रपटातसुद्धा गाणार आहे म्हणे! त्या कार्यक्रमातले ते मोठे संगीतकारपण केवढी स्तुती करत होते त्याची, अरे आणि तो दिसतोही कसला छान! आणच तू देवा त्याला. तुला कोणी नाही म्हणत नाही... नक्की येईल बघ तो. प्रयत्न करच तू. शलाकालाही फार आवडतो म्हणे तो, आय मीन त्याचं गाणं!
रेणुकाच्या अचानक उल्हासित झालेल्या चेहर्‍याकडे तो अलिप्तपणे नुसता बघतंच राहिला.

मोहनशेठ म्हणाले, येणार रेणुकाबेन येणार, आपल्या देवाभाईनी मनावर घेतलंना तर समदे लोक येणार बघा! अरे विकीभाई, तू देवाभाईला आपल्या सकाळच्या मिरवणूकचा कायबी सांगितला नाहीस अजून? सांग नी देवाभाईला मोहन गारमेंटसच्या टेम्पोमंधी गणपतीबाप्पा काय छान दिसत होता ते. फोटो बी काढला हाये आपल्या छोकर्‍यानी...

विकी म्हणाला, लई झकास झाली मिरवणूक देवा, आपल्या मुक्याचा एक नंबर भारत बँड ढोलताशा होता! त्या नेहरू रोडवरच्या बालकमंदिरचं लेझीमपथकबी आलं होतं नेहमीसारखं... एकदम चार गोण्या गुलाल उधळला! मोहनशेठनीतर डेकोरेटरकडूनच टेम्पो एकदम झ्याक सजवून आणला होता. बाप्पा आल्याच्या खुषीत लई नाचलो सगळे, लई म्हणजे लईच!! आपलं भजनी मंडळ तर लईच जोरात होतं... देवदार चौकात त्यांनी अशा जोरदार फुगड्याबिगड्या घातल्या की काय विचारू नको.

मग पुढं पुतळा चौकात आलो आणि तिथल्या मशिदीसमोर ठाणच मांडलं! म्हंटलं आता बजाव. इथनं तर अर्धातास हलायचंच नाही... मोहरमच्या टाईमला, मारूती मंदिरासमोर त्या रसूलनं लई ढोलताशा वाजवून गोंधळ घातला होता... म्हंटलं, मग आज आपणबी करायचाच हिशोब चुकता! पार गुलाबी करून सोडला मशिदीचा चौक, तेव्हाच निघालो... च्यायला, मग कुठूनतरी दोन बेवडेच घुसले मिरवणूकीत.. मी आणखी दोघातिघांना घेऊन अशे रट्टे दिले साल्यांना, की काही भूकच नाही ठेवली, एक तर मार खाऊनबी तिथंच लोळत पडलं. पोलिसाची सेटींगबिटींग आपण आगोदरच करून ठेवली होती पण तरी सगळे तापलेच! उन बी लई होतं म्हणा.... मग मोहनशेठनी सरबत पाजून सगळ्यांना थंड केलं......

बरोबर दोन वाजता बाप्पांना घेऊन मंडपात आलो तर इथे मिरवणूकीच्याही दुप्पट पब्लिक!! बाप्पा यायची वाटच बघत होते सगळे. शे-सव्वाशे तरी माणूस आसनंच. मग आपल्या भिडे गुरूजींनी पूजाबिजा केली. आरती सुरू झाली तेव्हा ढोलताशा आणि नंतर गुलाल तर लईच जोरात होता! आभाळात नुसता आवाज आणि गुलाल!!! ही आपली रेणुका तर आजिबातच ओळखू येत नव्हती. बोले तो एकदम टेरर दिखती थी! शलाकाताईनी लई गोड गायली पहिलीच आरती...

च्यायला, पब्लिक वर्गणी द्यायला कांकू करतं, पण बाप्पा येणार म्हंटल्यावर लई उत्साह येतो सगळ्यांनाच! अरे काय ते बंगल्यावाले आणि अपार्टमेंटवाले लोक, त्यांच्या तोंडावरची माशी बी उठंत नाही पण काय नाचले आणि गुलाल खेळले म्हणून सांगतो! आपण आहोत की नाही आत्ता जशे, तशेच येड्यासारखे वय-बिय विसरून एकदम बिनधास्त, दिलखुलास नाचत होते! 'बाप्पा मोरया' च्या घोषानं तर पार कानठळ्या बसून कान बधीर झाले! पार जीव खाऊन आनंदानं ओरडत होतं पब्लिक! ही बाप्पाची जादू काही औरच असते यार!! एकदम घुमं आणि मिळमिळंबी उत्साहानी आनंदात येतं आन नाचायला लागतं!

ते आयटीवाले एक जण त्यांच्या कोकणातल्या कोणत्या गावच्या आठवणींनी रडायलाच लागले, तर त्या बँकवाल्या रेगेंनी एकदम मिठीच मारली त्यांना. भजनी मंडळानं तर लई स्वादिष्ट प्रसाद बनवला होता... मोदक, अनारसे, केळं आणि खिरापत.. च्यायला त्याच्यातंच पोट भरून गेलं.

बापू म्हणाले, वा वा! टिळकांनी मुळी त्यासाठीच सुरू केला सार्वजनिक गणेशोत्सोव! अठरापगड जातीच्या लोकांनी एकत्र यावे, समाजिक बांधिलकी जोम धरून तिची मुळं समाजजीवनात घट्ट, खोलवर रुजावीत, देशप्रेम, बंधुभाव वाढीस लागून संस्कृतीला नवी चालना मिळावी आणि मग त्यातूनच स्वातंत्र्यासारखी विलक्षण लोककल्याणकारी चळवळ तडीस न्यावी.... मध्यमवर्गीय कष्टकर्‍यांना जीवनात थोडा आनंद लाभावा...

अजय म्हणाला, हा सगळा इतिहास झाला बापू.. त्यांनी भले देशप्रेम, बंधुभाव वाढीस लागावा म्हणून केलं. लोककल्याण, स्वातंत्र्य त्याकाळी फार प्रेरणादायी गोष्ट असेल, पण आता? आता कशासाठी करतोय आपण गणेशोत्सोव? संस्कृतीच्या नावाखाली पडलेली रीत, डोळे मिटून जोजवलेली परंपरा, भलत्या आसुरी उत्साहाला दिलेलं वळण की नुसतंच एखादं बिनबुडाचं चार दिवसांच्या मजेचं आंदण. बंधुभाव आणि स्वातंत्र्याचा तर हा गणेशोत्सोव नक्कीच नाही? इथं मिरवणूकीत दंगली होतात, मारामार्‍या, दगडफेक, भोसकाभोसकी होते.... आख्ख्या महाराष्ट्राचं पोलिस डिपार्टमेंट मेंढरांवर नजर ठेवणार्‍या गुराख्यासारखं चौकाचौकात बसतं. झाली गडबड की झोडा मेंढरं! च्यायला, लोककल्याण म्हणाल तर इथं दारु आणि मेडिकल दुकानदारांशिवाय कुणाचं कल्याण दिसत नाही! दोनशे दोनशे टक्के खप वाढतो दारूचा आणि काँडोमचा गणपती नवरात्रात. पडदे लाऊन मांडवांत चाललेले जुगार, मटक्याचे धंदे तर वेगळेच, वरून ह्या सतराशे साठ पक्षांचे भलतेच शक्तिप्रदर्शनाचे कार्यक्रम! परत मूर्तीच्या सुरक्षेचं भूत मानगुटीवर आहेच, नाहीतर आहेच परत दंगल आणि जाळपोळ.... आणि मध्यमवर्गीय ? तो तर पारच वैतागलेला... हा विकी म्हणाला, तसा पहिले एक दोन दिवस असेल आनंदात, मग मांडवांमुळं चौकाचौकात ट्राफिक जाम झाला, ऑफिसला लेट मार्क मिळाले, स्पीकरच्या भिंतींनी कानांची मंडई केली की सटकतेच की नाही त्याची? बरं सटकूनही 'च्यायला हे गणपतीच येणं म्हणजे वैतागच आहे साला' म्हणतांना जीभ वळवण्यापलिकडे फार काही तो करू शकणार नाही. मग आता तुम्हीच सांगा कसलं लोककल्याण, कसली संस्कृती आणि कसली प्रेरणा? नुसता थिल्लर गोंधळ.. बस्स! त्यापलिकडे आता सार्वजनिक गणेशोत्सोव काही उरला नाही.

माणिक म्हणाला, हे तू नुसतं काकदृष्टीनं टिपल्यासारखं हिडीस आणि ओंगळावाणं शोकगीत गातोयेस... चांगल्या गोष्टी काही होतंच नाहीत का गणेशोत्सवात? भलेही तू म्हणतोस तसं आता त्यात स्वातंत्र्यप्रेरणा, चळवळ, एकतेचा संदेश वगैरे नसेल पण बदलत्या काळानुसार उत्सवांनीही आपली उद्दिष्ट बदलली असतील की नाही? जुन्या उद्दिष्टांचीच री आपण ओढली पाहिजे आणि त्यांचाच अट्टहास धरला पहिजे असं थोडीच आहे? गणपती म्हणजे नुसता आनंदोत्सोव, धांगडधिंगाच नाही, तर महाराष्ट्रासारख्या अवाढव्य राज्याच्या इकॉनॉमीतला एक लक्षणीय आणि महत्त्वाचा घटक आहे हे तर तुला मान्य करावंच लागेल!

आता हे मंडपवाल्याचं भाडं, ही रोषणाई, मोहनशेठसारख्यांना हजारो लोकांसमोर त्यांच्या कापडउद्योगाची जाहिरात करण्याची संधी, असं आर्थिक अंग आहेच की नाही त्याला. भारतासारख्या झपाट्यानं विकास साधणार्‍या देशात ह्या अशा गोष्टींनी लाखो करोडोंची उलढाल होतेच की नाही? चार-दोन वाईट गोष्टीही खपत असतील पण उडदामाजी काळे गोरे असणारंच की!

कामधंद्यासाठी मुंबईपुण्यात आलेला बिहारी, मद्रासीही मिसळतोच की नाही आपल्यात? तिकडे अमेरिकेतही ह्या उत्सवाच्या निमित्ताने साताठ लोक जर एकत्र येत असतील तर तेच या उत्सवाच्या एकमेकांना बांधून ठेवण्याच्या प्रचंड ताकदीचं द्योतक नाही का? आता समजा, ते तरुण कवी आपल्या इथे त्यांच्या कविता सादर करण्यास आले किंवा तो नवा गायक मुलगा आपल्या इथे गायला, तर ते साहित्य आणि संगीताला पोषकंच होणार की नाही? आणि कुठलीही संस्कृती तिच्यातून निपजलेल्या साहित्य आणि संगीतातूनच तर आपली ओळख सांगते...

मागच्यावेळी आलेल्या संघाच्या परखड वक्त्याच्या भाषणानंतर धर्म, देशाबद्दल आतमध्ये काहीतरी जागं झाल्याचं तुच बोलला होतास ना? ही मोठी मंडळं आणि मोठ्या संघटना यानिमित्ताने मोठे सांस्कृतीक कार्यक्रम सामाजिक मेळावे तडीस नेतातच की, त्यांच्याबद्दल तर तुझ्या मनात काही किंतू नसेल?
आता तू म्हणशील चार दोन चांगली गाणी, नाटकं, स्पर्धा आणि भाषणं ऐकणं म्हणजे माझ्यासाठी गणेशोत्सोव का? तर तुझ्यामाझ्यासारख्याला अशा संघटनातून कामं करतांना काही चांगला अनुभव, चारदोन चांगल्या ओळखी, संघटन कौशल्याचे धडे मिळतातंच की नाही?

रेणुका म्हणाली, आणि भक्तीभाव? त्याचं काहीच नाही काय रे? तुम्ही दोघे तो कसा विसरलात? तो काय गौण घटक आहे की काय ह्या उत्सवात तुमच्यासाठी? मला तुमच्या त्या जुगार, शक्तीप्रदर्शनाशी काही देणघेणं नाही की त्या आर्थिक उलाढाली आणि साहित्य पोषणाचंही काही सोयरंसुतक नाही. मी आपली भक्तीभावाने येते. मला बाप्पा आला की मनात अगदी ऊतू जाईल इतका आनंद दाटून येतो! दरवर्षी आषाढात न चुकता धो-धो पावसात दर्‍याखोर्‍या पार करून भक्तीभावाने पंढरीची वारी करणार्‍या वारकर्‍याला पांडूरंगाच्या दर्शनाने होत असेलना तसाच. मला आवडतं हे सगळं. मला मुळात सगळे सणवारच खूप आवडतात. परंपरेने चालत आलेली गणपतीची पूजा, त्याचा साज, ही सजावट, महिरप, रांगोळी सगळंच आवडतं मला. आता तुम्ही त्याला स्त्रीसुलभ आवड म्हणा की रुढींचं जोखड, पण मला त्यातच आनंद वाटतो! आता तर गौरी पण येणार मग अजूनच धम्माल. मला तर सगळीकडे एकदम भक्तीमय वातावरण भासतं. मी काही सोवळे-ओवळे पाळणारी कर्मठ काकूबाई नाही, की पापपुण्याची चोपडीही ठेवत नाही. मोडीत निघणार्‍या आणि दरवर्षी कादंबरीच्या सुधारीत प्रतींसारख्या मॉडिफाय होणार्‍या प्रथांचंही मला काही वावडं नाही, पण जसं माझ्या आजीनं मला शिकवलं तेच मला आवडतं. त्यातंच मला उत्साह वाटतो. मला त्या सामाजिक बांधिलकी आणि सोशल लाईफच्या आनंदाचं काही अप्रूप नाही. मला स्वतःला आत होणारा आनंदाचा साक्षात्कार हवा असतो. त्यातल्या भक्तीरसाचा ओलावा मला तृप्त करतो. गणरायाच्या उत्सवाचा हाच भाव मला भावतो!

हा मंडळाचा गणपती तर आहेच पण घरीपण मी करतेच की नाही हे सगळं! मला ही ऑफिस असतं, मी ही जातेच की ट्राफिक जाम मधून, टोळभैर्‍यांचा आणि ढणाणा स्पीकरचा त्रास मलाही होतो पण म्हणून मला काही गणेशोत्सोवाचा उबग येत नाही! हे लवकर संपावं असं तर कधीच वाटंत नाही....

बापू म्हणाले, वा, वा!! छान बोललात तुम्ही सगळे, पण अजय म्हणतात तेही सत्य आहेच की.. आणि तेही कानाडोळा करता न करण्यासारख्या मोठ्या प्रमाणात घडतच आहे, फोफावत आहे. तुमच्या तिघांचंही म्हणणं बरोबर आहे, चूक असं कुणाचं नाही, म्हणूनच तर आपण आपल्या परीनं जमतील तेवढ्या समविचारी लोकांना बरोबर घेऊन भक्तीभाव, साहित्य, संगीताच्या मार्गाने सामाजिक जीवनात आनंद प्रसारित करावा इतकंच. आर्थिक प्रगती तर होत राहीलच.

विकी म्हणाला, च्यायला किती विचार करता राव तुम्ही लोक? मला हे असलं बोलणं काही कळत नाही. मुळात आपल्या रक्तातंच कार्यकर्ता आहे. गणपती काय? नवरात्र काय? नि निवडणुका काय? आपल्याला कायबी चांगलं काम करायला मिळालं म्हणजे झालं. चार लोकांनी म्हंटलं, हे पोरगं लई धडाडीचं आहे, तीच आपली मिळकत आणि त्योच आपला आनंद. नाही म्हणजे बाप्पा आल्याचा आनंद आहेच आपल्याला, त्याशिवाय का एवढं नाचलो बिचलो आपण, पण नेहमी काहीतरी वेगळं पाहिजे असतं आपल्याला! म्हणजे हे सणवार नसले लोकसभा, विधानसभा, कॉलेज, पालिका निवडणुका नसल्यातर लई अवघडल्यासारखं होतं, काय करावं तेबी कळंत नाही. तशे आपण कुठल्या पक्षाचे नाही, राजकारण आपल्याला पहिलवानांएवढंबी कळंत नसलंतरी तुमच्यासारख्या हुशार दोस्तमंडळींकडून चार चांगल्या गोष्टी ऐकल्यावर लई बरं वाटतं... पण च्यायला आत्ता या घडीला मला इथं हातातल्या पैशाची आणि मंडळाच्या खर्चाची तोंडमिळवणी करायचा घोर पडलाय आणि तुम्ही पार महाराष्ट्राच्या अन देशाच्या इकॉनॉमीच्या गप्पा मारून राह्यलेत!!!

विकीचं वाक्य संपताच मंडळात मोठा हशा पिकला!!

रेणुका म्हणाली, चला निघूयात आता सगळे, फार रात्र झाली. विकी तू झोपणार असशील ना इथेच? मी येते तुला सकाळी उठवायला. पुजेचं आणि आरतीचं सामानही घेऊन येईनच. देवा, तू चल रे आज आमच्याकडे जेवायला..

देवा अजूनही पापण्यांना लोखंडी नांगर बांधून तो खोल पाताळात सोडल्यासारख्या थिजलेल्या डोळ्यांनी सगळ्यांच्या काळसर, लांबलेल्या सावल्यांकडे गुंगल्यासारखा बघत होता. त्याला वाटले, ह्या दिव्यांच्या झगमगाटात आणि माणसांच्या गर्दीत रहाणं आपल्याला नकोच. आपण पहाटे येऊन डोळे भरून गणरायाचं हे लोभस, आनंददायी रूप न्याहाळत बसू... क्षणभर का होईना आपली आई आपल्याला पुन्हा दिसेल.... ह्या उत्सवांत आणि कार्यक्रमात आता आपल्याला काही आनंद नाही. माणसाला सुखी करण्यासाठी हा सगळा उत्सवांचा आणि प्रगतीचा मायामहाल, पण ह्यात खरोखर सुख लाभेल अशी एकही दिव्य माया नाही. ह्या उत्सवांची उद्दिष्ट काही का असेनात, आपलं आयुष्य कायमच लोलकात अडकून राहणार हेच खरं! त्यात कधी आनंदाचा सप्तरंगी प्रकाश चमकेल, कधी एखादा ज्ञानाचा आरपार तेजस्वी किरण सळसळेल पण बाकी ह्या बोचर्‍या सत्याचा आणि भिजकट दु:खाचा दाटलेला थंड अंधार काही केल्या हटणार नाही....

त्या पाड्यांवरच्या रानटी लोकांत कुठे सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि स्वातंत्र्याची प्रेरणा? की कुठल्या अर्थकारणाचंही त्यांचं उद्दिष्ट नाही, पण आहेतच की नाही ते हसरे आणि आनंदी. आईसारख्या प्रेमळ आणि शलाका सारख्या तारुण्यानं मुसमुसलेल्या हिरव्याकंच निसर्गाच्या कुशीत, इथल्या गढूळलेल्या समाजप्रवाहात चिखलानं बरबटलेल्या ओंडक्यागत भरकटत ठेचकाळत वाहणार्‍या माणसापेक्षा तर ते नक्कीच सुखी आहेत! शरीराची लाज झाकण्यापासून सुरू होणारं दु:खही अद्याप त्यांना शिवलेलं नाही की इथे बहूधा धडपडतंच मिळवावं लागतं त्या शारीरीक सुखाचीही त्यांना कमतरता नाही....
तीच खरी सुखी माणसं आणि त्यांच्यातला प्रत्येक जणच हसरा बुद्ध!! आपण आता कधीच बुद्ध होऊ शकत नाही, कारण आपण त्या लोलकात आता सदासाठीच अडकून पडलो. ठार अज्ञानाचा दाट अंधारही आता आपला राहिला नाही आणि परिपूर्ण ज्ञानाचा तेजस्वी प्रकाशही आपल्याला कधी दिसणार नाही.... आपण आता मेलोच... फक्त लोलकातून एकदाचा कडेलोट होईपर्यंत हा देह वागवत रहायचा, बस्स...!!!

क्रमशः....

Group content visibility: 
Private - accessible only to group members

विशाल, एकदम जबरदस्त मांडणी. सगळं अगदी डोळ्यासमोर उभे राहते, ग्रेट.

वाचता, वाचता, आमच्या मंडळाची आठवण, पैसे उभे करायला केलेली भांडण, मस्जिदीपुढे केलेला १ १/२ तास नाच, ( मस्जिद न पोलीस स्टेशन एकदम समोरासमोर, पण वेळ काढता यावा म्हणून ट्रकच्या चाकातून काढलेली हवा, अन ट्रक पंक्चर झाली असा केलेला दावा, Proud ) तर त्या पुढच्या वर्षी एका मुसलमानालाच गणपती मंडळाचा अध्यक्ष केले हे सगळे डोळ्यासमोर येत आहे. झब्बू म्हणून माझ्या " गणेश मंडळाच्या अध्यक्षपदाची वर्षे " असा लेख लिहावा असे फार वाटत आहे. Happy एकदम जुन्या काळात नेलेस यार तू.

धन्यवाद !

धन्यवाद मंडळी.
केदार,
अरे इथे झब्बूंचा एवढा पूर लोटला आहे, संयोजकांचीच त्याला परवानगी आहे, मग वाट कसली बघतोयेस तू. मनावर घेऊन लिहूनच टाक आता. :). करच श्रीगणेशा.

विशाल, झकास सुरुवात. आता लेखमाला पूर्ण वाचूनच अभिप्राय लिहीन. Happy
रैनाने मुद्दाम लिंक देऊन वाचायला सांगितलं हे - त्यामुळे तिचेही आभार.

ंहे वाचायचं राहिलं होतं. भारी आहे.
अजून बर्याच जणांचं वाचायचं राहिलं असेल म्हणून वर काढतेय.