भाकर तुकडा

भाकर तुकडा

मी दरवेळेला माहेरी गेले की दारात आई उभी असे..
एका हातात पोळीचा तुकडा आणि एका हातात गरम पाणी...

तशी मी डोंबिवलीहून ४-५ महिन्यातून एकदा तरी माहेरी जायचे...पण प्रत्येक वेळेला हा सोपस्कार व्हायलाच हवा...
आम्हाला दारात म्हणजे गेटमध्येच उभं करायचं मग ती पोळी आम्हासगळ्यांवरुन ओवाळून टाकायची उनऊन पणी पायांवर घालून काहीतरी पुटपुटायची, आणि मगच आम्हाला घरात प्रवेश मिळत....
मी नेहमीच तिची चेष्टा करणार "काय हे आई अग मी पन्नास वेळा येते आणि जाते तू हे काय दरवेळी.... "आणि ती पण नेहमीचंच उत्तर देणार......"तुला त्याचा काही त्रास होतोय का? ...तुला काही करायला सांगते का मी नाही ना? मग गप्प बसत जा.... "

२ वर्षापूर्वी मी इकडे यायला निघाले तेव्हा एअरपोर्टला सोडायला आली होती आणि डोळे अखंड वाहत होते तिचे सारखं म्हणत होती "आता कधी गं भेट होणार आपली?" तर तेव्हाही मी हसले म्हणाले"काय आई अग ३-४ तासांच तर अंतर तू हाक मारलीस की मी हजर.... आहे काय त्यात एवढं?"

मला इथे येऊन जेमतेम ६ महीनेच झाले होते आणि एके दिवशी संध्याकाळी यांचा फोन आला की औरंगाबादांहून फोन होता आणि आईला तुझ्याशी बोलायचंय.............पण त्या दिवशी मी जरा गडबडीत होते आणि नेमका फोन करायचा राहिला............

रात्रीच्या १०:३० वाजता फोन वाजला म्हणजे देशातला १ वाजलेला, नं भावाचा दिसत होता म्हणून हे मला फोन घे म्हणत होते.......मी फोन वर बोलतिये तर माझ्याशी कुणी बोलायलाच तयार नाही.....तू प्रमोदला दे फोन आधी मी......मला काही समजेचना....... हे फोनवर बोलत होते.... आणि ह्यांचं पाहिलं वाक्य होतं अरे बाप रे..........

त्यानंतर मला काहीही कळलं नाही......मी कोसळले होते......शेजार्‍यांनी येऊन निघायची तयारी केली.....मुलांनी बॅग भरली......एअरपोर्टला जाऊन बसलो....तर नुकतीच एक फ्लाईट गेली होती आणि आम्हाला सकाळच तिकीट मिळालं होतं.....

मला माझी वाक्य आठवली अग मी ३ तासात हजर होईन बघ......
.
.
.
.
मी नाही हो पोहोचू शकले......शेवटच्या दर्शनासाठी पण नाही....अरेरे:-(
आणि आता मी जाणारे देशात सुट्टीला
पण मला हातात भाकर तुकडा घेऊन उभी असलेली आई कधीच नाही दिसणार.....