कुछ याद आया?

Submitted by उदे on 21 July, 2017 - 01:13

"काही नाही. काही नाही. चला येतील ते."
असं साळवी हा आमचा मित्र बोलला मात्र, रायगडच्या पायथ्याशी उभ्या असलेल्या आम्हा ५ जणांच्या काळजाचं पाणी पाणी झालं.
मी मनाशी म्हटलं नक्कीच काहीतरी झालंय. तेवढ्यात पाठून ' सुमो' आली. त्या सुमो त माझा भाचा अभिषेक आणि त्याचे तरुण तडफदार मित्र सुखरूप पाहून काळजातली धडधड कमी झाली. अभिच्या एका मित्राच्या डोक्याला मार लागला होता आणि गाडीचं किरकोळ नुकसान झालं होतं. वरकरणी विशेष काही झालं नसलं तरी आमचं हास्य निमालं होतं. खोटं खोटं हसायचा प्रयत्न करूनदेखील. त्यामुळे 'त्या' वरील घटनेचा फील माझ्यापुरता म्हणायचं तर संपूर्ण ट्रेकभर राहिला.

त्यावेळी म्हणजे १५ वर्षांपूर्वी पावसात बहुतेक म्हंजे अगदी बहुतेक प्रत्येक शनिवार-रविवार हा अगदी ट्रेक साठीच ठरलेला वार असे. त्यात अनेक ग्रुप्सबरोबर कधी ना कधी जाण्याच्या कार्यक्रमात बँकेच्या मित्रमैत्रिणींबरोबर जाण्याचा कार्यक्रम असे. तो अगदी भरगच्च आनंदसोहोळा असे. हसी-मजाक एकदम टीपेवर असे. बसमधे अगदी हमखास रात्रभर गाणी गाण्याचा कार्यक्रम असल्याने बसमधून उतरेपर्यंत आवाज बसण्याचं नक्की झालेलं असे.

२००२ मध्ये आनंदाचा कडेलोट झाला. रायगड सारख्या सोप्या आणि सर्वजण येऊ शकणाऱ्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या किल्ल्यावर जायचं ठरल्यावर -खरं तर आणखी एकदा जायचं ठरल्यावर,या या म्हणता म्हणता ११५ ट्रेकर्सचा माहोल भरला! ५५ -५५ जणांसाठी २ एसटी आणि आयत्यावेळी येणाऱ्यांमुळे १५ जणांसाठी २ सुमो असा भरगच्च सरंजाम झाला. एवढ्या जणांच्या खाण्याचं प्रचंड सामान (हा..हा.. सामान म्हंजे प्रचंड प्रमाणात मेथीचे ठेपले,किसान सॉस च्या बाटल्या,होनाळ्यांच्या लसूण चटणीची भरपूर पाकिटं ) बरोबर घेऊन आम्ही भल्यापहाटे रायगड चढणार तेवढ्यात २ सुमो पाठी नसल्याची वार्ता कानी आली. आणि खरं सांगायचं तर आमची धाबीच दणाणली.
IMG-0125.JPEG
सर्व ट्रेकर्सना ट्रेक सुरु करायला सांगून आम्ही ५ जण 'त्या' सगळ्यांची वाट बघत बसलो. आणि नेमक्या त्याचवेळेला सुरुवातीला सांगितलेला प्रकार घडला.
सर्वात प्रथम भाच्याला विचारलं,म्हटलं काय झालं रे? त्यावर अभिषेक म्हणाला,"पहाटे २.३० वाजता ड्रायव्हर सुमो चालवता चालवता झोपला! गाडी सरळ बाजूच्या शेतात घुसली. बांधावरून उडत-अडखळत-ठेचकाळत जाऊ लागली. तरी आपला ड्रायव्हर झोपलेलाच. शेवटी एकाने त्या अवस्थेतसुद्धा त्या ड्रायव्हरला रट्टा दिला तशी तो खाडकन जागा झाला. एका मित्राच्या डोक्याला लागलं. परंतु मग कशीबशी विशेष डॅमेज न झालेली गाडी आम्ही रस्त्यावर आणली. आणि ईथवर कसेबसे आलॊ "

कुणाला कुठलीही दुखापत नाही हे समजल्यावर आम्ही सुटकेचा श्वास सोडला. काही झालं नाही या थाटात ट्रेक तर संपवला. ट्रेक संपल्यावर 'त्या ' ऍक्सिडेंटवाल्या सुमो त आम्ही मित्रमंडळी बसून मुंबईत परतलो.

फोटोत अगदी डावीकडे दिसणारा अभि त्यावेळी कॉलेजात शिकत होता. आज तो बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चाधिकारी आहे. गंभीर प्रसंगांना हास्याची डूब द्यायची त्याची खासियत आजही कायम आहे. फेसबुक च्या एका पोस्ट च्या निमित्ताने हे सारं डोळ्यापुढे तरळून गेलं. फोटोत सगळे हसताना दिसले तरी त्या हास्यामागे एक वेगळाच नाट्य दडलेलं होतं .

आज त्या ११५ ट्रेकर्सना वरील तपशील कसा आठवणार?
कदाचित साल, सहकारी असं काही काही आठवणार नाही. किंवा आठवेलही कदाचित.
फोटो बघून त्यांनाही सहज आनंद होणार.
त्यांना विचारायला हवं, फोटो पाहिलात हे ठीक आहे; लेकिन कुछ याद आया?

-------------उदय ठाकूरदेसाई.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults