आंद्रिया

Submitted by उदे on 25 June, 2017 - 07:22

आंतरराष्ट्रीय घडामोडीतल्या बऱ्याच गोष्टी बऱ्याच वेळा आपल्याला माहिती असतात परंतु आठवणीत नसतात. त्यामुळे कधीकधी मनात क्षणिक गोंधळ उडतो!कधीकधी तो चक्क हास्यास्पद असतो! एवढंही कसं कळलं नाही आपल्याला? असं वाटायला लावणारा असतो. परदेशी प्रवास करताना काही काही गोष्टींचा उलगडा आपसूक होतो आणि साहजिकच क्षणिक मजा वाटून जाते.

'कॅनडा -अलास्का' टूर ला जाताना कॅनडाबरोबर अमेरिकेचा व्हिसा का काढायला सांगताहेत हेच कळत नव्हतं! कारण कुठेतरी माझ्या मनात कॅनडाजवळच अलास्का असणार आणि ते कॅनडातच असणार असा काहीसा घोळ असणार! जेंव्हा ग्यानबाची मेख कळली आणि अलास्का कॅनडात नाही आणि आपण त्या दौऱ्यात बऱ्याच वेळा अमेरिकेच्या सीमेला 'टच' करणार आहोत आणि नंतर तर तेथेच राहणार आहोत असं समजलं तेंव्हा "एवढं साधं कसं कळलं नाही आपल्याला?" असं वाटून गेलं.

हंगेरीच्या आंद्रिया या गाईडने जेंव्हा पूर्वीच्या झेकोस्लोवाकियातून स्लोवाकिया हा देश बाहेर फुटून आला आणि झेक रिपब्लिक आणि स्लोवाकिया असे दोन नवे देश निर्माण झाले असं सांगितलं तेंव्हाही 'कॅनडा-अलास्का' सारखाच माझा प्रकार झाला होता. यावेळीही क्षणात उलगडा होऊन सगळे संदर्भ नीट लागू लागले.

हा सर्व प्रकार मुळात एवढ्यासाठी सांगितला की आमची हंगेरीत घडणारी गोष्ट समजून घ्यायलाही खूप धमाल येत होती. आमच्या कोच चा सारथी होता यूरा स्लाव. तो होता स्लोवाकियन. आमची गाईड आंद्रिया होती हंगेरियन. ती ऑस्ट्रियन-रशियन वर्चस्वाच्या,जर्मन बॉम्बफेकीच्या, स्लाव्ह वंशीय लोकांच्या स्थलांतरित होण्याच्या कहाण्या सांगताना, आमच्याशी इंग्रजीत संवाद साधत असे. तर यूरास्लाव्हशी रशियन भाषेत बोलत असे.

बरीच राजघराणी,बऱ्याच देशांचं वर्चस्व मोडीत काढून १९९० ला जेंव्हा नावडत्या रशियन सैनिकांना हंगेरी सोडण्यास भाग पडून हंगेरियन लोकांची खदखद शांत झाली तेंव्हा कुठे हंगेरी, हंगेरीअन्स मोकळा श्वास घेऊ लागले. आंद्रियाने हे सर्व तपशील रंजक करून सांगितले.

IMG_8363.JPG
आंद्रिया बरोबर उभी स्वाती

एका पायाने किंचित अधू असलेली,हसरी,नम्र,आंद्रिया साधी दिसत असली तरी तिची भाषेची जाण उत्तम असावी. कारण हसण्यावारी नेणाऱ्या एखाद्या टपलीलाहि ती उत्तम आकार द्यायची. ते असं नाही. असं म्हणायचंय का तुम्हाला? त्याचा तर आणखी भयंकर अर्थ होतो! असं म्हणत इंग्रजी-हिंदी-स्लोवाकन-रशियन-हंगेरियन भाषेत सुंदर गोफ गुंफायची!

आणखीन एक विशेष म्हणजे ऑस्ट्रियाच्या बेट्रीस या टूर गाईडचा ताठा किंवा प्राग च्या इरिना या टूर गाईडचा जोरकसपणा,किंवा साल्झबर्ग ला स्थायिक झालेल्या जपानी जुंको या टूर गाईडचा साधेपणा या सर्व वैशिष्ट्यांच्यापार आंद्रिया होती!

आंद्रियाने तपशील रोचक करून नाही सांगितले. तिची जान हंगेरियन भूमीत असल्याप्रमाणे एकेक तुकड्याबद्दल पोटतिडकीने ती बोलत राहिली. परंतु वर म्हटल्याप्रमाणे, भाषेची आवड असल्यामुळे तिच्या बोलण्यात जान येत गेली आणि ती सगळ्यांना आपल्या बोलण्यात समाविष्ट करू शकली. जाताजाता आंद्रेई सहज बोलून गेली कि १७ नोव्हेंबर १८७३ ला बुडापेस्ट ही सिंगलसीटी म्हणून अस्तित्वात आली आणि तो तपशील सगळ्यांच्या लक्षात सहजी राहून गेला.

माहिती बरेच गाईड देतात. टूर गाइडचं ते कामच असतं . पण आंद्रेईसारखी मातीत भिजलेली एखादी टूर गाईड असली ना तर ती क्लिष्ट ऐतिहासिक सनावळ्यांचीही गुंफण एका सुंदर आख्यानात करते. आणि इतिहासाबरोबरच वर्तमानही हळूच छान जोडून जाते!

---उदय ठाकूरदेसाई
uthadesai.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults