माया

Submitted by फूल on 19 June, 2017 - 22:02

दहा दिशांनी रंग उसळती
मिटेन म्हणता पळभर डोळे
त्या रंगांचा मोह अनावर
नको ईश्वरा भलते कोडे

बावरलेला जीव बापुडा
दहा मुखांतून निसटू पाहे
तुझीच सारी रूपे तरीही
बाह्यरूपातच गुंतून आहे

अंतर्यामी जर इप्सित तर
का ही माया लोभस सुंदर?
कसे घडावे पडद्यामागील
स्वस्वरूपाचे समक्ष दर्शन?

रहाटावरी घागर फिरते
तशीच मीही जन्मोजन्मी
या मायेचा मोह घडवतो
देणी-घेणी पुढल्या जन्मी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रहाटावरी घागर फिरते
तशीच मीही जन्मोजन्मी
या मायेचा मोह घडवतो
देणी-घेणी पुढल्या जन्मी

आहाहा.. खूप खूप सुंदर

अंतर्यामी जर इप्सित तर
का ही माया लोभस सुंदर?
कसे घडावे पडद्यामागील
स्वस्वरूपाचे समक्ष दर्शन? >>>> भारीच...

Mast

रामविजय ग्रंथात मूळमायेचे इतके सुरस वर्णन आहे. पुरुष आणि प्रकृती यांमधील पुरुष निद्रीस्त असतेवेळी मूळमायेने, त्याच्या नकळत सत्व-रज-तम गुणांचा पसारा मांडला आणि त्या धूर्त प्रकृतीने असे काही विश्व उत्पन्न केले की पुरुषापर्यंत जीवास पोचताच येउ नये. अफाट वर्णन आहे.
_________

जैसा कोणी पुरुष निद्रीस्त| पहुडला असे चिंतारहीत|तो स्वेच्छे होउन जागृत| कार्य काही आठवी||
की समुद्री उठे लहरी|तैसी ध्वनी उठे चिदंबरी|मी म्हणोनी निर्धारी| हाक थोर जाहली||
एक असता ब्रह्मानंद| नि:शब्दी उठीला शब्द|ते ध्वनी मायानाम प्रसिद्ध| वेदांतशास्त्र गर्जतसे||
जिचे नाव मूळप्रकृती| जी आदिपुरुषाची चित्शक्ती| तिने शेजे निजवोनी पती| सृष्टीकार्य आरंभिले||
एवढे ब्रह्मांड निर्माण केले| परंतु पतीस कळो नेदि वर्तमान ते परम कवटाळीण| नसतीच दैवते उभी केली||
विधी-विष्णू-उमाकांत| ही तीन्ही बाळे जिच्या आद्न्येत| नेत्र उघडोनी निश्चित| पाहो नेदी स्वरुपाकडे||
ब्रह्मसुखाच्या समुद्रात्| बुडाले हे जीव समस्त|परंतु तेथीची गोडी किंचित्|चाखो नेदी कोणाते||
चैतन्य इनेच झाकीले|इने अरुप रुपासी आणिले|अनंत ब्रह्मांडाचे पुतळे| एकेच सूत्रे नाचवी||
इने निर्गुणास गुण लाविले जाण|अनामासी ठेविले नामकारण|निराकारासी आकारुन्| जीवीत्वासी आणिले||
हे परम पतीव्रता साचार|पतीस न कळता जाहली गरोदर| ब्रह्मांड रचिले समग्र|नानाविकारे करोनिया||
नानायोनी विकारभाव|इने फासा पाडीले अवघे जीव|गाधीस* कैसे दाविले लाघव|मिथ्या कर्तूत्व नसतेची||
कोणी मुरडे स्वरुपाकडे| त्यासी नसतेची घाले साकडे|अथवा स्वर्गसुख रोकडे|पुढे दावुनी भलवी की||

* या काव्याआधी, गाधी ऋषींची कथा येते.

रहाटावरी घागर फिरते
तशीच मीही जन्मोजन्मी

>> कालिदासाच्या मेघदूतात ' नीचैर्गच्छत्युपरिच दशा चक्रनेमिक्रमेण' हा एक ह्याच अर्थाचा सुप्रसिद्ध आणि गाजलेला श्लोक आहे. रहाटचक्र जसं खाली जाऊन पुन्हा वरती येतं तसा नेमिक्रम आयुष्यातही असतो. कधी सुख कधी दुःख. ह्या उपमेचा पुढे अनेकांनी उपयोग केला आहे. पुलंचा अंतू बरवा देखील 'हे सगळं चक्रनेमिक्रमेण चालू असतं, काय समजलात?' असं म्हणून जातो. चिं वि जोश्यांनी त्यांच्या 'चार दिवस सासूचे' नावाच्या पुस्तकात त्यांच्या 'रहाटगाडगं' ह्या कादंबरीचा पुढचा भाग लिहिला आहे. त्यात ते म्हणतात की 'रहाटगाडगं कादंबरीची कथानायिका भीमा हिचे आयुष्य नीचैर्गच्छत्युपरिच दशा चक्रनेमिक्रमेण असेंच गेले'.

हीच उपमा इथे थोड्या समांतर पण वेगळ्या अर्थाने वाचायला मिळाली म्हणून हे सांगावंसं वाटलं, बाकी काही नाही.