विचारांच्या धुक्याची रात्रपाळी

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 June, 2017 - 05:45

संपूर्ण गझल ...

विचारांच्या धुक्याची रात्रपाळी
हजेरी लावतो निर्णय सकाळी

युगांचा सोसल्यावरती उन्हाळा
हवा सुटलीय आत्ता पावसाळी

तडाखा वादळी पचवून झुलते
किती खंबीर आहे ही डहाळी !

जिच्यासाठी मनांचे चंद्र झुरती
तुझ्याभवती फिरे तीन्ही-त्रिकाळी

घराची राखरांगोळीच झाली
विजेशी अंगलट आली टवाळी

हळद चढली धरेवरती उन्हाची
झिरप ना पावसा तू दे नव्हाळी

नकोशी लपवते कृत्ये हजारो
म्हणुन झाली असावी रात्र काळी

नको लावूस परिमाणे तुझी तू
असे अनमोल वस्तू ती निराळी

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users