कोळेश्वर

Submitted by योगेश आहिरराव on 6 June, 2017 - 01:00

कोळेश्वर
कोळेश्वर.... रायरेश्वर आणि महाबळेश्वर यांच्या मधोमध असलेले भव्य डोंगरी पठार. महाबळेश्वरच्या साधारणपणे उत्तरेला असलेल्या मालवणी पॉईंट, केट्स पॉईंट, निडल पॉंईटहून याचे समोर होणारे दर्शन कायम खुणावत असे. रायरेश्वर भेटीच्या वेळी सुध्दा कमळगडापासून थेट नजर भिरभिरत याच कोळेश्वर पठारावर स्थिरावली होती.
महाबळेश्वरला उगम पावणार्या पाच प्रमुख कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या नद्यांपैकी कृष्णा नदी महाबळेश्वर आणि कोळेश्वर या मधोमध वसलेल्या जोर गावातून पुढच्या प्रवासाला सुरूवात करते. जवळच या नदीवर बळकवडी आणि मोठे धोम धरण बांधले आहे. या धोम धरणात रायरेश्वर आणि कोळेश्वर या मध्ये असलेल्या जांभळीतून तसेच बळकवडी धरणातून कृष्णा नदीचे पाणी एकत्र येऊन मोठा फुगवटा तयार झाला आहे.
ऐन उन्हाळ्यात मे अखेरीस याच कोळेश्वराचा ठराव पास झाला. साथीला होते ‘झेनोश पटेल’ आणि ‘पिरान ऐलावया’. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबईतून निघून द्रुतगती महामार्गावरील रहदारीमुळे पुणे पार करायलाच पहाटेचे चार वाजले. नंतर गाडी दामटवत वाई मार्गे धोम धरणाला उजवीकडे ठेवत मालतपुर, बोरगाव, वायगाव छोटी छोटी गावं मागे टाकत बळकवडी धरणाच्या भिंतीला वळसा घालून वळणावळणाच्या रस्त्याने सातच्या सुमारास जोर गावात दाखल झालो.
वाटेत उजाडण्याच्या वेळी धरणापलीकडे झालेले कमळगडाचे दर्शन तसेच महाबळेश्वरच्या केट्स पॉईंट आणि समोरच्या कोळेश्वराच्या माथ्यावर ढगांची येजा सुरू होती. आधी सांगितल्याप्रमाणे जोर गावाच्या दोन्हीबाजूला महाबळेश्वर आणि कोळेश्वरचे भव्य पहाड, त्यालगतचे जंगल आणि एका बाजूला धरण्याच्या पाण्याचा फुगवटा. एकदम निसर्गरम्य टुमदार गाव.
IMG_5310.JPG
जननी कुंभळजाई मंदिराच्या आवारात गाडी उभी केली, अगदी समोरच्या टप्प्यात महाबळेश्वरचा मालवणी पॉईंट, तिथुनच उतरणारी गणेशघाटाची वाट बहुतांश गावकरी याच वाटेने कामानिमित्त महाबळेश्वरला ये-जा करतात. सोबत आणलेला नाश्ता करून पश्चिमेला बहिरीच्या घुमटीकडे निघालो. वाटेतली पाच सहा घरांची वस्ती पार करून मुख्य ओढ्याला डावीकडे ठेवत वाट जंगलात शिरली पुन्हा बाहेर येत मोकळ्या जागेत दोन पाण्याची टाकी. वाटेत काही ठिकाणी पाणी अडवण्यासाठी छोटे बंधारे दिसले. जसे आत जाऊ लागलो तसे जंगल दाट होऊ लागले, आत विविध पक्ष्यांची किलबिल, भरपुर झाडोरा अतिशय सुंदर अशी ही अरण्यचाल. तासाभरात कोळेश्वरकडून येणारा ओढा आडवा आला तो पार करून पुन्हा जंगलात शिरून ओढ्याच्या अल्याड पल्याड वाटेने सौम्य चढाई करत शेवटच्या कारवीच्या टप्प्यातून बाहेर आलो. समोरचे छोटे टेपाड चढून बहिरीच्या घुमटीपाशी विसावलो. जुण्या पुरातन दगडी मुर्ती काही छोट्या घंटा बांधलेल्या आणि वार्याने फडफडणारा भगवा ध्वज प्राचीन ढवळे घाटातला हा बहिरी देव.
IMG_5346.JPG
जोर गावातून इथपर्यंत येण्यासाठी आम्हाला दोन तासाचा अवधी लागला.
कोकणातून ढवळे (जि.रायगड) गावातून निघून चंद्रगडाला वळसा घालून म्हसोबा खिंडीतून बहिरीची ट्रेव्हर्सी पार करून इथपर्यंत पोहचता येते पुढे याच वाटेने जोर गावात (आम्ही आलो ती वाट) किंवा गाढवाच्या माळ मार्गे आर्थरसीट ते क्षेत्र महाबळेश्वर गाठता येते. अट्टल भटक्यांचा कस पहाणारी हि एक मोठी घाटवाट. जानेवारी २०१५ साली याच वाटेने ढवळे गावातून चंद्रगड पाहून आर्थरसीट गाठले होते, त्या आठवणींना उजाळा मिळाला.
IMG_5354[1].JPG
डावीकडे प्रतापगड, दरीत उठावलेला चंद्रगड, ढवळे खोऱ, मागे महादेव मुर्हा पल्याड मंगळगड, उजवीकडे रायरेश्वर नाखिंदाची बाजू ते कोळेश्वरचा पश्चिम टोकाचा मुलुख हवा स्वच्छ असल्यामुळे नीट निरखून बघितल्यावर चंद्रगडावरचा भगवा ध्वज दिसला. बराच वेळ हे दृश्य पहात बसलो. घुमटीजवळच्या टाक्यातले पाणी बाटलीत भरून पुन्हा आल्यामार्गे जोर गावाकडे निघालो. मंदिराजवळ येऊन, सोबत आणलेल्या (मेथी ठेपले) दुपारच्या जेवणासाठी तयारी करताना तिथे बसलेल्या ‘विष्णू यादव’ यांनी आमची चौकशी सुरू केली, चक्क त्यांच्या घरी आम्हाला जेवणासाठी घेऊन गेले. मस्तपैकी आंबेमोहोर भात, चवळीची आमटी, लोणचे त्यात वहिणींनी गरम गरम चपात्या वाढल्यामुळे जरा जास्तच जेवलो. निघताना हळूच विष्णू काकांना दुसर्या दिवशीच्या दुपारच्या जेवणाबद्दल विचारले. हे थोडे अतीच होते पण दुपारी वाई किंवा हायवेवरच्या पंजाबी डिशपेक्षा हे गावातले घरगुती जेवण कधीही सरस आणि मुख्य म्हणजे त्या गडबडीपेक्षा आमचा वेळ वाचणार होता. काकांनी लगेच होकार दिला. जेवणानंतर मंदिरात तासभर ताणून दिली. साडेतीन वाजता उठलो सर्व सामान पाठीवर घेऊन समाजमंदिराच्या मागच्या वाटेने कोळेश्वराची चढाई सुरू केली.
सुरूवातीला गुरांच्या वाटेने चकवा दिला. जंगलात लाकडं तोडायला आलेल्या आजींनी योग्य वाट दाखवली अन्यथा मोठा फेरा आणि वेळ वाया गेला असता. वाट एकदम आस्ते कदम झाडीभरल्या सोंडेवरून चढू लागली. वरच्या पठारावरच्या झाडाची खुण त्या काकांनी दाखवली होतीच. त्या दिशेने मळलेल्या वाटेने चढाई सुरू ठेवली. वाटेत झाडोरा असल्यामुळे उन्हाचा आजिबात त्रास नव्हता. पुढे मोकळ्या दांडावर आलो मागे वळून पहाता महाबळेश्वरचा केट्स पॉईंट, काही बंगले खाली छोटेसे जोर गाव, दुरवर खोल गेलेले बळकवडी धरणाचे पाणी. माथ्याची चढाई अजूनही शिल्लक होती, पुन्हा वाट झाडीभरल्या जंगलात शिरली हळूहळु ऊंची गाठत माथ्यावर कधी आलो ते कळलेच नाही. अंदाजे १३०० मीटरच्या आसपास ऊंचीच्या या अवाढव्य पठाराला फारसा सलग सपाट असा माथा नाहीच, छोट्या टेकड्या टेपाडं, ऊंचवटे काही ठिकाणी खुपच दाट जंगल तर काही ठिकाणी जांभ्या दगडांचा सडा असे हे कोळेश्वर. साधारणपणे ईशान्य दिशेला जात वाट पुन्हा मोकळवनात आली, आता आम्ही आलो ती जोर महाबळेश्वरची बाजू मागे पडून पुर्वेकडे कमळगडाची बाजू आणि धोम धरणाचे पाणी चकाकताना दिसले. इथुन एक पायवाट त्याच दिशेने सरकत होती. मळलेली आहे कदाचित खालच्या अंगातून वळसा घेऊन डावीकडे वळेल हा अंदाज घेऊन त्या वाटेला लागलो पण वाट कुठेही न वळता विरूध्द दिशेला म्हणजेच कमळगडाकडे जात होती. अर्थात आम्हाला जांभळीच्या दिशेला जायचे होते, दिशा आणि नकाशा यावरून लगेच ध्यानात आले. फार वेळ न दडवता पुन्हा माघारी मोकळ्या जागेत आलो, डावीकडे कुठे वाट गेली आहे का ते शोधू लागलो. काही पावलं मागे जातो तेच डावीकडे जाणारी अस्पष्टशी पायवाट दिसली. सायंकाळ होऊ लागली होती, दिशेप्रमाणे योग्य म्हणून तीच वाट घेतली. पुढे काही ठिकाणी बर्याच अंतरावर बाणाच्या खुणा दिसल्या. मोठमोठ्या उंच झाडांच्या जंगलातून चढ उतार वळणवळणे घेत वाटेत ऐके ठिकाणी पाण्याचा पाईप दिसला. पाईपलाईनच्या बाजूच्या वाटेने थोडे अंतर जातो तर डावीकडे सौर ऊर्जेचा खांब दिसला आणि कोळेश्वराचे मंदिर.
IMG_5429[1].JPG
दोन तीन फुटी दगडी चिरांनी बांधकाम केलेले, मध्यभागी नैसर्गिक स्वयंभु शिवलिंगला मुखवटा चढवला आहे. दोन चार घंट्या, विझलेला दिवा, उदबत्ती, जुण्या पताका. भर रानातले हे अनगड़ शिवालय मनाला खुपच भावले, गर्द वनराईत नीरव शांततेत हरवून जावे असे हे रम्य ठिकाण. मंदिरापासुनच काही अंतरावर असलेल्या धनगरपाड्यात पोहचलो.
खुटेकर धनगर कुटुंबाची दोन मोठी घरे जोडीला त्यांची गुरं. जोर गावातून निघाल्यापासून तीन तासांचा कालावधी लोटला होता.
‘जानु खुटेकर’ यांच्या अंगणात आमचा मुक्कामाचा बाडबिस्तारा मांडला. समोरच्या पाईपलाईनच्या नळातून पाणी आणले. एव्हाना आकाशात काळ्या ढगांची गर्दी जमू लागली होती. कधीही पाऊस पडतो की काय अशी स्थिती, यात सुर्यास्त कधी झाला ते कळलेच नाही. स्थिरस्थावर झाल्यावर गरमागरम सुप, सोबत आणलेले मेथीचे ठेपले लोणचे आणि रेडी टू ईट भात आणि भाजी. कधी नव्हे तर रात्री साडेआठ वाजताच जेवण झाले. अधून मधून आकाशातून विजेचा लखलखाट, काही झाडांवर मिणमिणारे काजवे, अधून मधून वहाणारा गार वारा मस्त असा माहौल, हा मुक्काम कायम स्मरणात राहणार. रात्री नऊ वाजताच स्लिपिंग ब्यागमध्ये शिरलो. त्या शुध्द प्रदुषणमुक्त वातावरणात, दिवसभराचा थकवा आदल्या रात्रीचा प्रवास यामुळे पाठ टेकताच झोप लागली. थेट उजाडतानाच जाग आली बघतो तर स्लिपिंग ब्याग अर्ध्याहून अधिक दवांने ओली झाली.
IMG_5448[1].JPG
सकाळचा गारा वारा सोबत काळे ढग घेऊन वाहत होता, एकदम टिपिकल पावसाळी ट्रेकची सकाळ. धनगर वाड्यापासून सरळ वाट खाली जांभळी गावात उतरते. इथुनच त्यांची जांभळी, वाईला ये-जा असते. त्या तुलनेत जोर गावाची वाट दुरची सहाजिकच कमी वापराची पण महाबळेश्वरकडे जायचे असेल तरच या वाटेचा वापर होतो. हल्ली डोंगरपायथ्याच्या प्रत्येक गावात एसटी चे जाळे विस्तारले आहे, त्यामुळे आता या डोंगरवाटा क्वचितच वापरल्या जातात, अस्सल भटके मात्र हमखास या वाटा तुडवतात. सगळे सोपस्कार पार पाडून जानु खुटेकरांना सोबत घेऊन कोळेश्वराच्या पश्चिम कड्याकडे निघालो. धनगरवाडा मग मंदिर मागे टाकून एका छोट्या टेकडीला डावीकडे ठेवून चालू लागलो.
काल येताना याच टेकडीच्या पलीकडच्या बाजूने आलो होतो. वाटेतले सुखावणारे दाट जंगल, गर्द झाडीतला पालापाचोळा, दवामुळे भिजलेली झाडांची पाने, वार्यामुळे त्यांची होणारी सळसळ त्यात सकाळचा पक्ष्यांचा किलबिलाट असे भन्नाट वातावरण अनुभवत निघालो. पाण्याच्या पाईपाची अधेमधे सोबत होतीच, छोटे टेपाड डावीकडे चढून वाट एका पाणवठ्याजवळ आली. बारामाही असा हा पाणवठा.
इथेच कुंड बांधून पाईपाद्वारे हे पाणी धनगरवाडा आणि पुढे खाली किरूंडे गावात जाते. ते थंडगार पाणी तोंडावर मारून फ्रेश झालो. पुढे वाट मोकळ्या पठारावर आली याच रानात खुटेकरांची गुरे चराई करताना दिसली. खुटेकर म्हणाले, त्यांची हि गुरं आख्खे पठार बिऩधास्त भटकतात पण सायंकाळी न चुकता सर्व बरोब्बर धनगरवाड्यात परतात. खऱच काय कमाल असते ना या मुक्या जनावरांची, दिशा ज्ञान ही अफाट तसेच वेळ काळचे भान ही या जनावरांना असतेच. पुढील वाटचाल एकदम भिन्न स्वरूपाची कधी माळरांन तर कधी जंगल तर काही ठिकाणी मोठमोठ्या जांभ्या दगडांची रास.
पण सकाळच्या या धुंदमय वातावरणात ही दोन अडीच तासांची पायपीट काहीच वाटली नाही, रमत गमत, गप्पा टप्पा, फोटोग्राफी करत पश्चिमकड्यावर पोहचलो सुध्दा. पण दरीत धुक्याचे साम्राज्य असल्यामुळे काहीही दिसले नाही. जवळपास अर्धा तास बसून होतो तरी धुकें हटायला तयार नाही. हवेत चांगलाच गारवा जाणवत होता. स्वच्छ हवेच्या वातावरणात इथून चंद्रगड, मंगळगड, ढवळी आणि कामथा नदीचे खोऱ ते रायरेश्वर ते महाबळेश्वरचा पश्चिम भाग सहज दिसु शकतो. असे धुके कधी हटणार आणि कधी आम्ही बघणार, शेवटी वेळेअभावी परत फिरलो. वाटेत जानूंना विचारले याच भागातून परस्पर एखादी वाट जोरकडे उतरते का ? जेणे करून आल्या वाटेने पुन्हा फेरा घालून जाण्यापेक्षा कमीत कमी वेळात खाली उतरता येईल. मग थोडे अंतर आल्यावाटेने परतून उजवीकडे झाडीत शिरणारी वाट घेतली. छोटा जंगलाचा टप्पा पार करून वाट उघड्यावर आली. समोरच महाबळेश्वरचा पहाड आणि खाली जोर गाव दिसले.
IMG_5483[1].JPG जानु धनगरांनी वाट समजावून सांगितली, एका उघड्या बोडक्या अरूंद नाकड्यावरून वाट सरळ दरीत झेपावत होती. प्रथमदर्शनी थोडी अवघडच वाटली, इथून उतरायचे या विचाराने मनात थोडी चलबिचल झाली. जानुंना त्यांची बिदागी देऊन, झाडीभरला मधला टप्पा उतरून त्या नाकड्यावर आलो. अरूंद अशी चिंचोळी वाट वळणे घेत खाली उतरत होती. नजरेच्या एका रेषेत जोर गाव ते मालवणी पॉईंट. अत्यंत सावधगिरीने तो तीव्र उतरण आणि घसार्याचा टप्पा पार करून कारवीच्या रानात आलो तेव्हा बरे वाटले. खऱच अशा अवघड जागी ही कारवी किती प्रचंड मानसिक आधार देते. आता दृष्टीभय नव्हते, सोडेंच्या अल्याड पल्याड तिरकी उतराई घेत मधल्या टप्प्यात आलो.
Kolesh.JPG
मागे वळून आम्ही आलो तो मार्ग. घड्याळ पाहिले सर्व काही वेळेत होते एक मोठा ब्रेक घेऊन शेवटचा झाडीभरला टप्पा पार करून सरळ कुंभळजाई मंदिरासमोर उतरलो.
IMG_5511[1].JPG
गाडी काढून विष्णु यादवांच्या घरी जेवण उरकून त्यांचे आभार मानून दुपारी दिड वाजताच जोर सोडले. परतीच्या वाटेत कमळगड खुणावत होता न जाणो कोळेश्वराच्या पश्चिमकड्याच्या भेटी साठी पुन्हा येथे येणे होईलच तेव्हा कदाचित त्याच वाटेने कमळगडाची भेट ही होईलच..

फोटो साठी हे पहा : http://ahireyogesh.blogspot.com/2017/06/koleshwar.html

योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्जिन ट्रेक नाही हा ,आजुबाजुला गजबज असते.
आम्ही भैरवगड केला होता २००० साली ,अनेक ट्रेकपैकी स्मरणीय ट्रेक .तेव्हा तरी वर्जीन स्पॉट होता.

वर्जिन ट्रेक ? हे काही समजले नाही.

भैरवगड केला होता २००० साली >>> हा वेगळ्या भागात येतो, महाबळेश्वरमध्ये नाही.