बी. डी. डी. चाळ

Submitted by सुबोध अनंत मेस्त्री on 3 June, 2017 - 14:42

*बी. डी. डी. चाळ*
- सुबोध अनंत मेस्त्री

==========================================================

संजय दादा आणि अरुण सरांशी शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये मिटिंग संपवून दादा आणि मी टॅक्सी मिळेल या हिशोबात शिवाजी पार्क समोरच्या शिवसेनाभवनाच्या रस्त्याला लागलो. एक दोन टॅक्सीवाल्याना विचारलं पण नेहमीप्रमाणे नकारच मिळाला. पलीकडच्या रस्त्यावरून एक टॅक्सी शिवाजी पार्ककडे चालली होती त्यांनी आम्हाला हातवाऱ्यानेच कुठे अस विचारलं. मी लांबूनच "वडाळा स्टेशन" अस मोठ्याने ओरडून सांगितलं.

"थांबा, वळवून आणतो", त्याने हात फिरवून सांगितलं.

"काका थोडे सिरीयस दिसतात या धंद्यामध्ये", मी मस्करीत दादाला म्हटलं. टॅक्सी फिरून आमच्याकडे आली.

"बसा", त्यांनी मागचा दरवाजा उघडला. आम्ही बसलो.

"मघाशी एवढं आभाळ आलं होत वाटलं पाऊस येईल. आलाच नाही. ढग आले तसे गायब झाले", गाडी सुरू झाल्या झाल्याच टॅक्सी ड्रायव्हर काकांनी गप्पा मारायला सुरुवात केली.

"पनवेलला पडला पाऊस दीड तास तरी.", दादाने सांगितलं.

"अरे वा तिकडे पडला का? मग येईल इकडे पण हळू हळू. गर्मी वाढलीय हो भरपूर. चिडचिड होते", गाडी प्लाझा रस्त्याला लागली.

"काका रहायला कुठे तुम्ही", दादाने त्यांच्या वयाचा अंदाज घेऊन काका अशी हाक मारली असावी.

"आम्ही? बी डी डी चाळ", त्यांनी सांगितलं.

"अरे वा बी डी डी", या चाळीत बराचसा मित्र परिवार राहून आलेला असल्याने आणि चाळ या शब्दाशी जुनं नात असल्याने तोंडातून "वा" तर आपसूकच निघतो.

"आमचं त्यात काही नाही हो. आमच्या बाबानी घेतलेली. आम्ही फक्त सांभाळतोय आता", काकांनी सांगितलं.

"माझा कार्यक्रम झालेला तिकडे आणि जांभोरी मैदानात गुढीपाडव्याच्या एका कार्यक्रमात निवेदन केलं होतं मी. स्मिता तळवलकर आल्या होत्या ना त्या कार्यक्रमाच. मित्र पण आहेत तिकडे अजून आमचे.", दादाने बी डी डी चाळीच नात असल्याचे संदर्भ दिले.

"हो. कार्यक्रम तर होतच असतात तिकडे. संस्कृती जपून ठेवलीय चाळीने. आता शंभर वर्षे पूर्ण होतायत चाळीला. 2024, 25 आणि 26 ला तीन चाळीना 100 वर्ष पूर्ण होतील. ब्रिटिशांनी बांधल्या होत्या त्यावेळी. पण खिळा जात नाही सहज अजून. ड्रिल मशीन ने होल मारायचा म्हटल तरी 25 रुपये घेतात एका होलचे. पाना तुटला तर दीडशे", काका अभिमानाने सांगत होते.

"हो बघा ना. जुनी बांधकाम किती मजबूत होती. आताच्या बिल्डिंग कुठे अशा", मी त्यांना दुजोरा दिला.

"मग मस्त बांधकाम. त्यावेळी त्यांच्या सैनिकांना राहण्यासाठी बांधल्या होत्या. मस्त दोन बिल्डिंगच्या मध्ये जागा त्यामुळे मुलांना खेळायला पण मिळत. आम्ही पूर्वी पिक्चर लावायचो. सफेद पडदा शिवून आणायचो मोठा 70 एम एम स्क्रीन. हनुमान जयंती ला असायचाच.", काका नॉनस्टॉप चालू होते.

मी खूप लहान असताना मला आमच्या चाळीबाहेरच्या रस्त्यावर मोठ्या पडद्यावर लावलेला साईबाबांचा सिनेमा आठवला. रस्त्याच्या एका बाजूला अर्धी लोक आणि दुसऱ्या बाजूला अर्धी आणि मध्ये पडदा. ओपन थिएटर मध्ये मल्टिप्लेक्स ची मजा आम्ही तेव्हा घेतली होती.

"अजूनही असतात का चाळीत सण तसेच", मी काकांना कुतूहलाने विचारलं.

"हो मग. अजूनही सगळे सण होतात. साई भंडारा, हनुमान जयंती सगळे सण मिळून साजरे करतो आम्ही", काका एक्साइट झाले होते.

'आता पूर्वीसारखं कुठे राहिलय', या उत्तराची अपेक्षा असताना काकांच्या अनपेक्षित उत्तराने मला चाळीच कौतुक वाटलं.

"पण आता चाळ तोडण्याच चालू आहे. टॉवर होतायत तिकडे", काकांच्या बोलण्यात थोडी नरमाई आली. "मी म्हणतोय कशाला पाहिजेत टॉवर? आताच्या रूम तशा आहेत लहान पण एवढा नाही होत प्रॉब्लेम. चाळीबाहेरच्या ओट्यावर झोपलोय आम्ही किती वेळा. माझ्याकडे तर पाहुणे आले तर मी सरळ गच्चीवर झाडू मारतो, चटया गोधड्या टाकतो आणि तिकडे जाऊन झोपतो त्यांना घेऊन. वरळी चौपाटी बाजूलाच ना. असला सो सो वारा येतो. मस्त झोप लागते. पाहुणे विचारतात मग एवढा सो सो वारा येतो कसा काय तुमच्याकडे?", त्यांच्या सो सो या शब्दाला एक वेगळीच टोन होती.

"आता अजून पण काय गरज पडली ना तर पैसे नसतील तरी चालतात. दुकानात जाऊन सरळ सामान उचलून आणायचं. कोण विचारत बसत नाही पैशाच. काय पाहिजे नाही पाहिजे चाळीतले लोक काळजी घेतात. टॉवर आल्यावर कोण बघणार ते?", वडाळा स्टेशन येऊन आम्ही टॅक्सीतुन बाहेर आलो तरी काकाच्या गप्पा चालू होत्या. उतरल्यावर त्यांचा चेहरा व्यवस्थित दिसला. बारीक पण पांढरे केस, थोडा उतरलेला सावळा चेहरा. टॅक्सी ड्रायव्हरचा खाकी युनिफॉर्म आणि वरच एक बटन उघड. साधारण चाळीशी पन्नाशीतला माणूस. दादा आणि मी त्यांना हात मिळवून निघालो.

काकांनी पुन्हा एकदा त्यांच्या गप्पांमधून चाळ फिरवून आणली होती. लहानपणी उत्साहात साजरे केले जाणारे सण मग ती हनुमान जयंती असेल, दिवाळीतले कार्यक्रम असतील किंवा नवरात्रीचा गरबा असेल सगळे डोळ्यासमोरून गेले. चाळीतल्या माणसांची एकमेकांबद्दलची आत्मीयता आठवली. भांडण असून सणवार एकत्र साजरं करण आठवलं. चाळ कोणतीही असो पण चाळीतल ते मोकळं वातावरण आणि कुणाच्याही घरी केव्हाही बिनधास्त घुसता येण्याच स्वातंत्र्य फ्लॅटच्या बंद संस्कृतीत हरवून गेलंय.

==========================================================
*- सुबोध अनंत मेस्त्री*
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656

#sahajsaral

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हा लेखही आवडला...
दिसण्यात आला नव्हता.. प्रतिसादाविना पटकन खाली गेला वाटते.. माझ्या फालतू धाग्यांमुळे Wink

येनीवेज.. द.मु. च्या चाळीतील बालपणाबद्दल मलाही बरेचदा भरभरून लिहावेसे वाटते, पण उगाच सेंटी व्हायच्या भितीने हात आखडते घेतो.. ते ड्रिल मशीनने होल करायचे वगैरे अगदी अगदी.. आणि ईतरही काही बीम कॉलम होते ते बर्मा साग की काय कुठल्या भारी लाकडाचे होते म्हणतात.. मला एवढी सिविल ईंजिनीअरींग कळत नाही, पण मोकळी हवेशीर चाळ जिथे वरच्या मजल्यावरच आम्ही ओवर आर्म क्रिकेट खेळू शकायचो अश्या वास्तूला पाडून त्या जागी कशाला ब्लॉकसंस्कृतीचे गगनचुंबी टॉवर बांधले गेले हा प्रश्न मलाही बरेचदा पडतो.. पण याची मग दुसरी बाजूही आहे.. ती पुन्हा कधीतरी.. आज वाचलेल्या आपल्या दोन्ही लेखांनी जुन्या काळात नेले

माझं आजोळ बी.डी.डी मध्ये आहे. लहानपणीच्या सगळ्याचं सुट्ट्या तिकडेच घालवल्यात, गणपतीत तर जास्तच धम्माल असायची. मे महीन्यात आज्जीचे मसाल्या, पापडांचे वाळवण सांभाळायचो. खुप मज्जा केलीये तिकडे. पण आत्ता पार रया गेलीये त्यांची, माझी आज्जी, मामा वगैरे अजुनही राहतात तिकडे, पण आत्ता पुर्वीसारखी मज्जा येत नाही. मे बी आत्ता आम्ही मोठे झालो आहोत म्हणुन.

माझं बालपण सगळं त्या बाजुचंच स्प्रिंग मिल्स च्या चाळीमधलं.. बी.डी.डी चाळींच्या इथुनच यावं लागत. आता मी चेंबुरला आहे पण ते तिकडंच वातावरण अहाहा.. मस्त अगदि आपल्या माणसात आपण राहतो असं वाटत अजुन तिकडे गेलं कि.. सणांच्या दिवशी तर अगदि भारावलेलं वातावरण.. गणपती, दिवाळी, होळी, रंगपंचमी खरच मस्त तिकडचं वातावरण Happy