आश्वलायनगृह्यसूत्रातील विवाहाचे प्रकार आणि समाजाची स्त्रीविषयक धारणा - ३

Submitted by अतुल ठाकुर on 1 June, 2017 - 12:47

rukmini2.jpg

यानंतरच्या आसूर विवाहात कन्येच्या पित्याला धन देऊन संतुष्ट करून कन्येचे ग्रहण केले जाते. लाच देऊन काम करून घेण्याचा हा साळ्सूद प्रकार आहे. जेथे धन देऊन कन्या विकत घेतली जाते तेथे कन्येचे मन कोण विचारात घेणार? अशा तर्हेचे विवाह बहुधा गरीब घरातील तरुण आणि सुंदर मुलींचे होत असावेत. येथे कन्येचा पिता धनलोभी असेलच असे सांगता येणार नाही. मात्र परिस्थितीमुळे एखाद्या कन्येचा आसूर विवाह करून घराला बर्यापैकी सांपत्तिक स्थिती प्राप्त करून देण्याचा प्रकार होत असण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. आणि असे असले तरी हा प्रकार फारसा सभ्य आहे असे म्हणवत नाही. कारण विवाह होणार्या मुलिच्या वाटाला यामुळे कसले भोग येत असतील हे देखील सांगता येत नाही.

पुढचा पैशाच विवाह हा गुन्ह्यातच गणना केली जावी असा आहे. त्यात झोपलेल्या, सावध नसलेल्या, मनु मतानूसार आपल्या शीलाचे रक्षण करण्यास चुकलेल्या, मादक पदार्थाच्या अंमलाखाली असलेल्या कन्येचे अपहरण करून तिच्याशी विवाह केला जातो. येथे तर बळजबरीच आहे. असहाय असलेल्या मुलिशी बलात्काराने विवाह करण्याचा हा प्रकार आहे. तरीही या विवाहाला एक नाव देऊन, त्याला वर्गीकरणात स्थान देण्यात आलेले आहे हे नजरेआड करता येत नाही.

शेवटचा राक्षसविवाहात तर रडणार्या कन्येचे बलपूर्वक अपहरण केले जाते. आजच्या काळात अपहरण हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. मात्र या विवाहात फक्त रडणार्या कन्येचे बलात्काराने अपहरण नसून त्याच्या आड येणार्या तिच्या नातेवाईकांना ठार मारूनदेखील हे अपहरण केले जाते. येथेही अर्थातच कन्येच्या मनाविरुद्ध विवाह केला जातो. जे करताना कुणालातरी ठार मारावे लागते अशा प्रकाराला विवाहाच्या वर्गीकरणात येथेही स्थान देण्यात आले आहे.

विवाह आणि स्त्रीमन

विवाहाचे प्रकार अभ्यासताना येथे असे म्हणता येणार नाही की या सर्व विवाहांना धर्मशास्त्रांचा किंवा सूत्रकारांचा नि:संशय पाठिंबा होता. तरीही जेव्हा या सर्व प्रकारांना वर्गीकरणात स्थान दिले जाते आणि स्वच्छपणे त्यांचा निषेध केला जात नाही तेव्हा संदेह निर्माण होतो. यापैकी राक्षसविवाहाची उदाहरणे अनेक आहेत. भीष्माने काशीराजाच्या पळवलेल्या कन्या हे राक्षसविवाहाचे ठळक उदाहरण आहे. आणि त्यातही त्या स्वतःसाठी पळवलेल्या नसून आपल्या भावासाठी पळवल्या होत्या. भीष्माचा पराक्रम ठावूक असल्याने इतर राजांचे काही चालले नाही. एकटा शाल्व उभा राहीला ज्याचा भीष्माने पराभव केला. या कन्या स्वयंवरातून पळविल्या होत्या. याचा अर्थ त्यांना आपल्या मनाजोगा वर निवडण्यासाठी उभे केले होते. अशावेळी त्यांना मनाविरुद्ध पळविण्यात आले.

याबाबत निषेधाचा चकार शब्द पुढे कुणी काढलेला दिसत नाही. भीष्म तरीही जगाला पुजनीयच राहीला. शांतीपर्वात तर त्याच्या तोंडून तत्त्वज्ञानही वदवून घेण्यात आले. जणुकाही तीन कन्यांचे मनाविरुद्ध अपहरण ही एक किरकोळ घटना होती. पुढे त्या कन्यांचे काय झाले हे देखील सर्वश्रूत आहे. अंबा सुडाग्नीत जळून संपली तर उरलेल्या अंबिका आणि अंबालिकेला नियोगाला तोंड द्यावे लागले. अतिशय भयंकर दिसणार्या व्यासांना त्यांना नियोगासाठी सामोरे जावे लागले.

असे दिसते की कुल आणि त्यांच्या परंपरा सांभाळताना स्त्रीने बळी जावे ही रुढीच असावी. किंबहूना स्त्रीला मन असते, तिला आपल्या आवडीनिवडी असू शकतात, तिच्या आपल्या पतीबद्दल काही कल्पना, भावना असू शकतात याचा फारसा विचारही त्याकाळी केला जात नसावा. पैशाचविवाहात चुकल्या माकल्या, सावध नसलेल्या कन्येला पळवून नेले जाते. आसूर विवाह अयोग्य खराच पण तेथे निदान काहीतरी पराक्रम तरी दाखवला जातो. बाहुबलावर, स्वतःच्या हिमतीने कन्येचे हरण केले जाते. क्षात्रतेज आणि पराक्रम याचे अपार महत्त्व असलेल्या त्या काळात कदाचित याची प्रशंसादेखील होत असेल. मात्र पैशाच विवाहाचे कशानेच समर्थन करता येत नाही.

दोन गायी कन्येच्या पित्याला देऊन कन्या ग्रहण केली जाते तो आर्ष विवाह आणि धन देऊन पित्याला संतुष्ट केले जाते तो आसूर विवाह यात नक्की फरक काय आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. येथे सूत्रकारांनी फरक केलेला आहे हे यातील क्रमावरूनच दिसून येते. आर्ष विवाह हा क्रमाने चौथा तर आसूर विवाह हा सहावा आहे. दोघांमध्ये गांधर्व विवाह आहे ज्यात मुलिचे मन विचारात घेतले गेले आहे. आर्ष विवाहाने निर्माण झालेल्या संततीमुळे पुढच्या आणि मागच्या सात पिढ्यांच्या उद्धाराची हमी सूत्रकारांनी दिली आहे. तर आसूरविवाहात तशी कुठलिही हमी दिलेली नाही.

यातील फरक हा वधुमुल्याच्या प्रकारामुळे होत असावा. आर्षविवाहात गोधन दिले जाते त्यामुळे वधुच्या पित्याला दिले जाणारे दान हे पवित्र होऊन जाते. शिवाय या दानाला मर्यादाही सांगितली आहे. गोमिथुन असा स्पष्ट उल्लेख सूत्रकारांनी केला आहे. त्यामुळे फक्त दोन गायी घेणार्या वधुच्या पित्याकडून कुठल्याही लोभीपणाची शंका करता येत नाही. शिवाय आधीच म्हटल्याप्रमाणे ही योजना बहुधा शेतीमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी असावी. त्यामुळे हा विवाह समाजमान्य झाला आहे आणि त्यात सात पिढ्यांच्या उद्धाराची हमीदेखिल दिली गेली आहे.

प्राजापत्य विवाह हा अलिकडे ज्याला सर्वसाधारणपणे अरेंज मॅरेज म्हणतात तशा प्रकारचा विवाह असावा. कुलशील पाहून, मुलगा आणि मुलिच्या फारशा अपेक्षा नसताना, साधेपणाने लावलेला विवाह. यात वराकडून देखील फार मोठ्या अपेक्षा नाहीत. आणि कन्या देताना अलंकृत करण्याचा उल्लेख नाही. कदाचित बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्यांमध्ये हे विवाह होत असावेत. तरीही यात आठ पिढ्यांच्या उद्धाराची हमी दिलेली आहे. याचे कारण साधेपणाने, फारसा खर्च न करता, मध्यमवर्गियांमध्ये जे विवाह होत असतील त्यांना धर्माचा पाठिंबा आहे हे सांगण्याचा हा प्रकार आहे. मात्र यात देखिल मुलीच्या आवडीनिवडीचा कुठेही संबंध नाही.

किंबहूना परस्परांवर अनुरक्त झालेली दोघे जेव्हा आपला विवाह करतात त्यास गांधर्व विवाह म्हटले आहे. हा विवाहाचा एक वेगळाच प्रकार सांगून सूत्रकारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनुमानाने ही भुमिका अशी असावी की गांधर्व विवाह वगळता इतर विवाहांमध्ये जोडप्यांमधले स्त्रीपुरुष एकमेकांना आवडतात की नाही याचा फारसा विचार केला गेलेला नाही. गांधर्व विवाहाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या विवाहापासून निर्माण झालेल्या संततीने पुढच्या मागच्या पिढ्यांच्या उद्धाराची गोष्ट सूत्रकारांनी केलेलीच नाही. म्हणजेच जेव्हा तुम्ही, कुल, शील, समाजमान्य चालीरिती यांना डवलून फक्त स्वत:च्या आवडीला प्राधान्य देता तेव्हा धर्माकडून तुम्हाला कसलेही आश्वासन मिळत नाही. फक्त स्वतःची आवड लक्षात घेऊन केलेल्या कृत्याला कसलेही धार्मिक अधिष्ठान नसते आणि त्यामुळे कसलाही पुण्यसंचय होत नाही.

अशा तर्हेची दृढ विचारसरणी ज्या समाजात असेल तेथे स्त्री मनाची आवड निवड पाहण्याची शक्यता फारशी दिसत नाही.

ब्राह्म विवाह हा श्रीमंतांमध्ये थाटामाटात केला जाणारा विवाह असण्याची शक्यता आहे कारण तेथे वधु आणि वर दोघांना अलंकृत करण्याची सूचना आहे. त्याचप्रमाणे दैव विवाहात कन्येला अलंकृत केले जाते. ब्राह्म विवाहापेक्षा थोड्या कमी ऐपतीचा दैव विवाह असेल. दोन्ही ठिकाणी वर हा वेदपठण करणारा किंवा वेदाचा जाणकार असावा असे सांगितले आहे. वराच्या बाबतीत वेदाचा जाणकार असणे ही त्याकाळी सर्वोच्च पात्रता असावी. आणि वर्णाश्रम धर्मानूसार वेदांचे ज्ञान हे फक्त पहिल्या दोन वर्णांनाच घेण्याची मूभा असते. वैश्यवर्णाला द्विजांमध्ये स्थान असले आणि त्यांना मौजीबंधनाचा अधिकार असला तरी वेदाध्यायनाच्या बाबतीत वैश्यवर्णाचा उल्लेख फारसा उत्साहाने कुणी करताना दिसत नाही. त्यामुळे ब्राह्म आणि दैव हे विवाह फक्त क्षत्रिय आणि ब्राह्मणांमध्ये होणारे विवाह असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकंदरीत विवाहाचे प्रकार पाहता एक गांधर्व विवाह वगळता एकाही विवाहात स्त्रीला निवडीचे स्वातंत्र्य दिलेले दिसत नाही.

समारोप

भारतीय विवाहसंस्थेची पाळेमूळे शोधताना अतिशय महत्वाच्या ठरणार्या अशा गृह्यसूत्रांमध्ये विवाहसंदर्भात भारतीय समाजजीवनाचे आणि त्याबरोबरच भारतीय समाजमनाचे प्रतिबिंब पडलेले आढळते. असे दिसून येते की प्राचीन काळी सामाजिक नीतिनियम, रुढी याच बलवत्तर होत्या. त्यापाळताना स्त्रीमनाचा विचार केलेला आढळत नाही. तिला तिच्या आवडीनिवडीचे स्वातंत्र्य नाही. यामागे एक कारण हे दिसते की वर हा वेद जाणणारा असला म्हणजे तो सर्वगुणसंपन्नच असणार अशी ठाम समजूत असल्यासारखी वाटते. कारण वराच्या बाबतीत तीच सर्वोच्च पात्रता मानली गेली आहे. पित्याला योग्य वाटेल त्याने तेथे कन्येचे दान करावे. किंवा दोन गायी देऊन वराने कन्येचे ग्रहण करावे. पिता लोभी असेल किंवा गरीब असेल तर भरपूर धन देऊन कन्या मिळवावी. याला समाजाची मान्यता असेल असे वाटते.

पुढे जाऊन बाहुबल असेल तर कन्या हरण करण्यालाही कुणाची हरकत नव्हती असे दिसते. तसे करताना त्या आड येईल त्याला मारावे. रडणार्या कन्येला घेऊन जावे असे प्रकार होत असावेत. हे सर्व घडत असताना स्त्री ही फक्त सहन करणारी व्यक्ती असावी असाच ग्रह होतो. पित्याच्या किंवा धन व बाहुबल असलेल्या माणसासमोर तिला मान तुकवावी लागत असावी. जणु हे सारे पुरे पडत नाही म्हणूनच की काय कन्यापरीक्षासुद्धा घेतली जात असे. आश्वलायनगृह्यसूत्रात त्याचे वर्णन आहे. ( बुद्धिमते कन्यां प्रयच्छेत् | ) बुद्धिमान वराला कन्या दिली गेली पाहिजे असा आदेश सूत्रकार देतात. वराकडून यापेक्षा जास्तीची अपेक्षा नाही. बुद्धिमान याचा बहुधा अर्थ वेद जाणणारा असा असावा. पण त्यापलिकडे काही सांगितलेले नाही.

कन्येच्या बाबतीत मात्र बुद्धि, रुप, शीलसंपन्न अशी निरोगी कन्या पत्नी म्हणून स्विकारावी असा आदेश आहे. वर फक्त बुद्धिमान आणि वधू मात्र देखणी, निरोगी आणि बुद्धिमानही हवी अशी मागणी आहे. मात्र बुद्धिची परीक्षा कशी करावी असा प्रश्न सूत्रकारांना पडलेला आहे. कारण कन्येच्या बुद्धिची परीक्षा होणे कठीण असते (दुर्विज्ञेयानि लक्षणानीति |). मुलाच्या बुद्धिची परीक्षा त्याच्या वेदज्ञानाने होत असावी. त्यामुळे मुलिसाठी निरनिराळ्या ठिकाणची माती आणून त्याचे पिंड बनवतात. ते अभिमंत्रून कन्येला उचलायला सांगतात. त्यावरून त्या कन्येचा स्वभाव, ती संपन्न असेल, दरिद्री असेल की स्वैरीणी असेल हे ठरवित असत.

कन्येच्या आंतरिक गुणांची परीक्षा व्हावी यासाठी शेत, गोशाला, वेदी, जलविहिन नदी, द्युतक्रिडास्थळ, चार रस्ते मिळतात ती जागा, नापिक जमिन आणि स्मशान येथील माती आणून त्याचे पिंड करून ते कन्येला उचलायला लावित असत. त्यावरुन काढलेले निष्कर्ष म्हणजे, शेतजमिनीच्या मातीचा पिंड उचलणार्या कन्येची मुले अन्नधान्याने संपन्न होतील. गोशाळेतील मातीचा पिंड उचलणारी पशूधनाने संपन्न होईल. वेदिच्या मातीने बनलेला पिंड जी उचलेल ती ब्राह्मतेजाने युक्त होईल. शुष्क नदीच्या मातीने घडलेला पिंड उचलेल ती सर्वसंपन्न होईल. द्युतस्थानाच्या मातीचा पिंड उचलणारी जुगारी होईल. चार रस्त्याच्या मातीचा पिंड उचलणारी स्वैरीणी होईल. नापिक जमिनीतील मातीचा पिंड उचलणारी दरिद्री होईल आणि स्मशानातील मातीचा पिंड उचलणारी पतिघातीनी होईल असे म्हटले आहे.

विवाहात स्त्रीच्या मनाचा विचार केलेला नाही. आणि कन्यापरीक्षेत निरनिराळ्या ठिकाणच्या मातीच्या पिडांवरून स्वभावाची परीक्षा करवून घेण्याचे नशीबी आले आहे. स्त्रीयांची अशी दुर्दैवी अवस्था प्राचिन काळी असावीशी वाटते. भारतीय विवाहसंस्थेत स्त्रीचे स्थान हे येथे दिसून येते. (समाप्त)

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहिलं आहे. Happy
पूर्ण वर्णाधारित समाजव्यवस्था कशी उच्चवर्णीय पुरुषप्रधानतेवर अगदी सुरुवातीच्या काळापासूनच केंद्रित झालेली होती याचे स्पष्ट संकेत तुमच्या वर्णनातून आणि उद्धरणातून दिसत आहेत....

सध्याच्या 'आपली संस्कृती' कशी वेदकाळापासून श्रेष्ठ हे उत्साहाने ठासून सांगायच्या काळात असे अभिनिवेशरहित, संतुलित आणि तथ्याधारित लेखन होणे अत्यावश्यक आहे. त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन.

पु ले शु