मला जगू द्या

Submitted by निशिकांत on 25 May, 2017 - 22:49

आर्त हाक ना कुणी ऐकली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

माता, भागिनी, सून जगाला हवी हवीशी
पण कन्या का गर्भामधली नको नकोशी
जन्मायाच्या अधीच रडली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

एकच गाणे तिच्या नशीबी कारुण्याचे
जन्मच अवघड, स्वप्न कुठे मग तरुण्याचे?
करुणाष्टक ती गात राहिली "मल जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

देवदूत जे डॉक्टर, झाले अता कसाई
मुल्य पराजित, स्वार्थ जिंकतो, कशी लढाई?
श्वास घ्यावया ती तडफडली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

स्थान स्त्रियांचे विसर पडावा समाजास का?
गर्भाशय हे स्मशान बनले स्त्री भ्रुणास का?
समाज बहिरा, ती ओरडली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

नकोच मुलगी, कठोर काळीज. बाप रांगडा
गळा घोटला, श्वास थांबला दीन बापडा
शांत जाहली, हाक थांबली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users