तो जेथेही खणेल तेथे पेरत जाते ..

Submitted by सुप्रिया जाधव. on 25 May, 2017 - 13:56

मुळांप्रमाणे धाड स्वतःला खोल जराशी
मातीलाही सापडेल मग ओल जराशी

माणसाहुनी सच्ची असते भाषा त्यांची
ऱानामधल्या पाखरांसवे बोल जराशी

वादळात उन्मळून पडली काही घरटी
काही घरटी तगली राखत तोल जराशी

ते ऐकुन मी मलाच भेटायला निघाले
अफवा होती पृथ्वी असते गोल जराशी

त्याने कूस उजवल्यावर ती होत राहते
क्षणोक्षणी पहिल्यापेक्षा अनमोल जराशी

तो जेथेही खणेल तेथे पेरत जाते
साधत जाते ढळलेला समतोल जराशी

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान !!

<<क्षणोक्षणी पहिल्यापेक्षा अनमोल जराशी>>

'पहिल्यापेक्षा' ऐवजी 'पहिल्याहुनी' कसं वाटेल?