बोलायचं राहून गेलं

Submitted by विनोद मेस्त्री on 22 May, 2017 - 12:16

एकदा एक वृद्ध माणूस आपल्या २५ वर्षांच्या तरुण मुलाबरोबर अंगणातल्या बाकावर बसला होता. इतक्यात समोरच्या कुंपणावर एक कावळा येऊन बसला. वृद्धाने मुलाला विचारलं,
"बाळा ते काय आहे?"
मुलाच्या लक्षात आलं की वडील कावळ्याबद्दल विचारताहेत.
"कावळा आहे." कपाळाला आट्या पाडत त्याने उत्तर दिलं.
काही सेकंदांच्या अंतराने वडिलांनी पुन्हा कापऱ्या आवाजात विचारलं, "बाळा, ते काय आहे?'
"कावळा आहे." थोड्या चिडक्या स्वरात मुलाने उत्तर दिलं.
"बाळा, ते काय आहे?"
तिसऱ्यांदा विचारलेल्या या प्रश्नावर मुलगा भयंकर चिडला.
"तुम्हाला ना एकदा सांगून कळतच नाही. सांगितलं ना तो कावळा आहे म्हणून. कशाला छळताय उगाच."
वडिलांचा सुरकुतलेला चेहरा एका क्षणात पडला. ते काहीच न म्हणता उठले. लटपट चालत घराच्या आत शिरले. मजघरातल्या कपटातून एक जूनी धूळवटलेली डायरी काढली. ती चाळत एका पानावर येवून थांबले. बाहेर येवून मुलाच्या बाजूला बसले आणि त्या पानावर लिहिलेला मजकूर वाचायची त्याला विनंती केली.
वडिलांना डायरी लिहायची सवय होती आणि ती त्यांची २२ वर्षांपूर्वीची डायरी होती. त्या पानावर लिहिले होते...
"आज मी माझ्या ३ वर्षाच्या मुलासोबत अंगणात बसलो होतो. समोरच्या कुंपणावर एक कावळा आला. माझ्या मुलाने २५ वेळा विचारलं ते काय आहे आणि मी प्रत्येकवेळी त्याच उत्साहाने उत्तर दिलं की बाळा तो कावळा आहे."
डायरी बंद झाली. रडवेल्या स्वरात वडील म्हणाले,
"आणि बाळा मी तुला फ़क्त तीन वेळा विचारलं तर तू इतका चिडलास."
मुलाने वडिलांना घट्ट मीठी मारली. चुकी एका क्षणात लक्षात आली आणि अश्रु ओघळू लागले.
मित्रांनो, आपले आई वडील, वयाची साठी ओलंडली की पुन्हा बाल वयाकडे वळतात.
वडील ज्यांनी संपूर्ण कुटुंबचा भार अभिमानाने ज्या खांद्यांवर पेलावला होता ते खांदे आता कमजोर झालेले असतात. हे खांदे जरी कमजोर झाले असतील तरी त्यांचा अभिमान कमजोर होऊ देऊ नका.
ज्यांनी आपले बोट धरून एकेक पाऊल टाकायला शिकवलं , त्यांचे पाय आज उचलत नाहीत. चालताना लटपटतात. तुम्ही त्यांचे पाय बना, आधार बना.
आपली आई, जी इतकी वर्षे दररोज १५-२० लोकांचा स्वयंपाक सहजतेनं बनवायची, तिच्याकडून आज स्वयंपाक एक तर आळणी होईल किंवा खारट होईल. तरिसुद्धा "आई तुझ्या हाताची चव इतर कुठेच नाही." हा दिलासा तीला हवा असेल. तो तीला द्या. त्यांच्या बडबड़ीचा विट आला असं वाटत असेल तर तुम्ही लहान असताना केलेली अमर्याद बड़बड़ त्यांनी कशी सहन केली असेल ते आठवा.
आपण एकदा विचार करु या. आपल्या जन्मानंतर ते किती वेळा आपल्याला सोडून पिक्चरला, नाटकाला किंवा पिकनिकला गेले. नाही ना! का? तेदेखील कधीतरुण होते. त्यांना त्यांचं 'पर्सनल लाईफ' नव्हतं का? होतं ना! त्यांनादेखील 'पर्सनल लाईफ' होतं! परंतु आपण त्या 'लाईफ'चा एक अविभाज्य हिस्सा होतो. आणि आज आपल्या पर्सनल लाईफमध्ये त्यांना प्रवेश नाही. असं का?
इतकी वर्षे ते केवळ आपल्यासाठीच जगले. वडील त्यांना न आवडणारं काम करत राहिले. कशासाठी? तर १० तारखेला येणाऱ्या पगारावर घराच्या गरज अवलंबून आहेत. आणि आई! बिनपगारी, वर्षाचे बारा महीने, प्रत्येक दिवस, २४ तास राबत राहिली. तेदेखील पगार न घेता... फक्त आपल्यासाठी.
मित्रांनो, वेळ जाण्याआधी त्यांच्याविषयीचं तुमचं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करा. कारण वेळ निघून गेली तर उरेल तो फ़क्त पश्चाताप!
माझा एक मित्र परवा मला भेटला. खुप वर्षांनंतर अचानक भेट झाली. गप्पा झाल्या. त्याच्या आईचा विषय निघाल्यावर तो म्हणाला.
"विनोद, तुला माहितच आहे, माझ्या आईने माझ्यासाठी फार कष्ट घेतलेत. मी ४ वर्षांचा असताना माझे वडील वारले. तिने घरकाम केलं, काबाडकष्ट केले, राब राब राबली बिचारी पण मला कशाचीच कमी पडू दिली नाही. आणि मी थोडा बेपर्वाच राहिलोय. साधं तिच्याबद्दलचं प्रेमही व्यक्त करु शकलो नाही. मला खुप चुकल्यासारखं वाटतंय रे." तो खुप भाऊक झाला होता.
"अरे एवढा का विचार करतोस. आजच बोलून टाक आईला." मीआग्रहाने म्हणालो.
"ते आता शक्य नाही विन्या. गेल्या महिन्यातच माझी आई वारली."
मित्राने दिलेल्या या धक्क्यातून मी अजूनही सावरु शकलो नाही. मित्रांनो, मनापासून सांगतो. तुमच्या आई-वडिलांसमोर, तुमच्या आवडत्या व्यक्तिंसमोर मनातल्या भावना व्यक्त करा. आजच. कारण बोलायचं राहून गेलं ही खंत खरच अतिशय भयंकर असते.
धन्यवाद!

सदैव आपला,
विनोद अनंत मेस्त्री

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लेख! Happy
मी ते कावळा वाली स्टोरी वाचलिये आधी कुठेतरी..