एका धावकाचे (म्हणजे माझेच :P ) ‘मैत्री’ खातर आवाहन

Submitted by हर्पेन on 22 May, 2017 - 11:39

एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन

मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.

माझ्या धावण्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच्या प्रवासाला मायबोली साक्षी आहे. तसेच माझ्या मेळघाटातल्या अनुभव लिखाणाबरोबर ‘मैत्री’ ला मदत करा अशा केलेल्या आवाहनाला देखील अनेक मायबोलीकर कायमच प्रतिसाद देत आले आहेत. काही मायबोलीकरांनी तर मेळघाटात प्रत्यक्ष जावून स्वयंसेवक म्हणूनही काम केले.

आता ह्या दोन्हीचा इथे / परस्परांशी काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. तर तो संबंध असा.

मी आता यावर्षी ९ सप्टेंबर रोजी लदाख येथे होणाऱ्या खारदुंग ला चेलेंज मध्ये भाग घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची आहे.

अधिक माहीती http://ladakhmarathon.com/races/khardung-la-challenge/

तसे पाहता मी आजवर चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा अशा शर्यती पार पाडल्या आहेत. पण तरीही ही अल्ट्रा माझ्याकरता खरोखरच मोठे आव्हान आहे.

मी माझ्या परीने सगळ्याप्रकारची तयारी चालू केल्ये. रजा मिळवून झाल्ये, जाण्यायेण्याची तिकीटे काढून झालेली आहेत. वेळापत्रकानुसार धावणे सुरु केले आहे. ( मागच्या आठवड्या पर्यंत सरासरी ६० ते ७० किमी धावणे करत होतो ह्या आठवड्यातले ध्येय एकूण १०० किमी आहे)

इतक्यातच 'मैत्री' संस्थेला त्यांचे मेळघाटातील उपक्रम चालू ठेवण्याकरता निधी कमी पडतोय अशी बातमी कळली. त्यामुळे मी ही स्पर्धा मैत्री संस्थेच्या कार्याला समर्पित करायचे ठरवले आहे आणि माझी अशी आकांक्षा / संकल्प आहे की या तीन-चार महिन्यात ‘मैत्री’ च्या मेळघाटातील कामाकरता किमान १००० रुपये देणारे किमान ७२ दाते तयार करायचे.

मैत्री संस्थेचे मला भावलेले वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी असले ल्या नागरिकांचे एका चांगल्या कामाकरता एकत्र येणे आणि तब्बल वीस वर्षे ते काम चालू ठेवणे. फक्त अडीच माणसे सोडली तर बाकी सर्व जण मैत्रीकरता काम विनामुल्य / स्वयंसेवा म्हणून करतात. ओव्हरहेड जवळ जवळ नाहीच. मेळघाटातल्या लोकांना औषधे सोडली तर वैयक्तिक वापराच्या कुठल्याही वस्तू फुकट वाटत नाहीत. सामुहिक वापराकरता सोलर वर चालणारा पंप आणि पाण्याची टाकी बसवून दिली पण त्याची देखभाल स्थानिक रहिवाश्यांकडून वर्गणी काढून केली जाते. स्थानिक लोकांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. शाळा चालाव्यात म्हणून शैक्षणिक साहित्य दिले जाते. सध्या चालू असलेल्या योजनांचा ही सगळा भर कौशल्ये विकास (skill buildng/ development), व्यवसाय निर्मिती व उद्योजकता, सरकारी योजनांविषयी माहिती व पाठपुरावा, सेंद्रिय व पारंपारिक शेतीमधून उत्पादकता वाढवणे अशा कार्यक्रमांवर आहे.
अधिक माहीती करता - http://www.maitripune.net/Home.html

मी स्वतः काही वेळा काही दिवसांकरता मेळघाटात स्वयंसेवक म्हणून जाऊन आलो आहे.

तर अशा 'मैत्री' खातर ज्यांना जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे, यथाशक्ती यथामती जी काही रक्कम देउ करायची असेल ती मैत्रीच्या खात्यावर परस्पर जमा करावी अशी मी विनंती करतो.

देणगी: “मैत्री” या नावाने चेक / रोख देणगी म्हणून देता येईल.
“मैत्री”साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८०जी खाली करमुक्त आहेत.

ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

जे कोणी जी काही रक्कम जमा करेल त्यांनी इथे तसे कळवावे. जर कोणाला स्वत:चा नामोल्लेख नको असेल तर त्यांनी मला तसे संपर्कातून (९८८११५२८८४) कळवल्यास त्यांनी दिलेली रक्कम अनामिक देणगीदाराकडून म्हणून नमूद करण्यात येईल. रक्कम परस्परच जमा करायची आहे मात्र केली की इथे जरूर कळवा. तसेच मी 'खारदुंग ला' करता करत असलेल्या तयारीबद्दलही वेळोवेळी इकडे कळवत राहीनच पण असे (मनोरंजन मुल्य नसलेले) धागे लगेच मागे जातात म्हणून वेळोवेळी मला शुभेच्छा देत राहून ह्या धाग्याला वर आणत रहा. कृपया धन्यवाद Happy

आठवडा पहिला - देणगीदार ६ - जमा झालेली रक्कम रुपये ३२००१/-
आठवडा दुसरा - देणगीदार ७ - जमा झालेली रक्कम रुपये ११६१२/-
आठवडा तिसरा - देणगीदार ४ - जमा झालेली रक्कम रुपये ५०००/-
आठवडा चौथा - देणगीदार ६ जमा झालेली रक्कम रुपये १०००१/-
आठवडा पाचवा - देणगीदार ४ जमा झालेली रक्कम रुपये १००००/-
आठवडा सहावा - 'जैसे थे' परिस्थिती
आठवडा सातवा - देणगीदार १६ जमा झालेली रक्कम रुपये २२५००/- एकूण (४३/७२) (९२११४/- /७२०००/-)
आठवडा आठवा चालू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज २२ किमी धावलो. ऊन सकाळपासूनच मी म्हणत होतं.
उन्हाचा त्रास होत असतानाही निर्धारित अंतर पार केल्याचे समाधान औरच Happy

धन्यवाद शब्दाली.

तर मंडळी, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की मागच्या आठवड्यात एकूण सात जणांनी मिळून (मायबोलीकर व अमायबोलीकर) मैत्रीच्या खात्यावर रुपये ११६१२/- जमा केले आहेत.

५०००/- ची एक देणगी, १५०१ /- ची एक , ११११ ची एक आणि १०००च्या चार देणग्या अशा प्रकारे ही रक्कम जमा झालेली आहे.

सर्वांचेच मनापासून आभार. मैत्री करता तुमची देणगी अमुल्य आहे.
आपण जरूर ही खात्री बाळगू शकता की ह्या रकमेचा विनियोग सुयोग्य प्रकारेच होईल.

पुण्यातल्या हवेतले भारावलेपण काही औरच आहे सध्या...
सांगीतल्या शिवाय राहवतच नाहीये.

कालच्या रवीवारची सुरुवात झाली ४६व्या वाढदिवसाच्या दिवशी ४६ किमी धावणार्‍या प्रशांत जोगच्या दर्शनाने

मग भेटला अ‍ॅडव्हेंचर बियाँड बॅरियरचा दिव्यांशू गणात्रा ज्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही आणि सलग दुसर्‍या वर्षी मनाली ते खारदुंगला सायकलवर जातोय. http://adventuresbeyondbarriers.com/

मग भेटला प्रवीण झेले जो दररोज २१ किमी अंतर अनवाणी सलग १२१ दिवस धावून जागतिक विक्रम करण्याच्या प्रयत्नात आहे.

काल पुण्यातल्या १० -१५ जणांनी (ज्यातल्या काही जणांना मी स्वतः ओळखतो) द. आफ्रीकेतल्या कॉमरेड्स नावाची जगात अवघड मानली जाणारी अल्ट्रा मॅरॅथॉन स्प र्धा यशस्वी रित्या पार पाड्ली. http://www.comrades.com/

आज श्री जुगलकाका राठी यांचा वाढदिवस असतो. ते गेले काही वर्षे डेक्कन जिमखान्याच्या मैदानावर वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा वयाइतक्या फेर्‍या मारतात. आज त्यांचा ७०वा वाढदिवस होता. गेले ३ वर्षे तरी मी ही त्यांच्या बरोबर काही अंतर धावतो. आजही मी त्यांच्या बरोबर १०च फेर्‍या मारल्या. त्यांच्या बरोबर धावायला म्हणून अपर्णा प्रभुदेसाई आली होती. ती नुकतीच एव्हेरेस्त्ट शिखर सर करून परतली आहे.

अशा धनभारीत वातावरणात जी काही उर्जा मिळते त्याला तोडच नाही.

पुण्यातल्या हवेतले भारावलेपण काही औरच आहे सध्या...

खूप खूप शुभेच्छा हर्षद! ठरवलं आहेस ते मस्त पार पडेलच; त्याचबरोबर खूप आठवणीत रहातील असे अनुभव, क्षण वाट्याला यावेत अशा शुभेच्छा!

हर्पेनदा, रोजच्या रोज इथले अपडेट्स आवर्जुन वाचतो.. रोज प्रतिक्रिया द्यायला जमत नसलं तरी..
पुन्हा एकदा अनेक शुभेच्छा !

धन्यवाद मित पण आज लिहायला काही नाही. सलग दोन आठवडे १०० किमी धावल्या नंतर हा आठवडा रिकव्हरीचा आहे.
आज संपुर्ण आराम. आज बिन गजराचा दिवस. आणि चक्क जागही आली नाही. मस्त वाटत आहे.

ह्या शनिवार रविवारी चिपळूणला होतो. शुक्रवारी रात्री निघून शनिवारी पहाटे ४वा. चिपळूणला पोचलो. कोकणात पाऊस सुरु झालाय. मग पावसात आणि इतक्या पहाटे नको धावायला , थोडे झोपून घेऊ आणि मग जाऊ म्हणून झोपलो ते साडे आठ वाजताच उठलो. पण शनिवारी अंतर कितीही होऊ दे , दीड तास धावायचे होते मग रावतळ्यापासून धामणवणे गावच्या विठलाई देवीच्या देवळापर्यंत धावलो. टोट्ल हिल वर्कआऊट त्यामुले दीड तास धावूनही १२ किमीच धावणे झाले. पावसाळी वातावरणामुळे मजा आली.

रविवारी परशुरामाच्या मंदीरपर्यंत धावत गेलो. जाताना हमरस्त्याने ११ किमी तर येताना पाखाडी उतरून आल्याने ९ किमी असे एकूण २० किमी धावलो. पाऊस पहाटेपासून सतत चालूच होता. कोकण रेल्वे मुंबई गोवा हमरस्त्याच्या बाजूनेच जाते. कोणतीतरी आगगाडी दिसली तेव्हा आपल्या इथल्या रेल्वेवर लेख लिहिणार्‍या पराग यांची आठवण झाली. पाऊस, धुके, आगगाडीचा आवाज, आगगाडीची शिट्टी वळणावळणाचा घाटरस्ता वाशिष्ठी नदीचे धुक्यातून झालेले दर्शन यासगळ्यामुळे धावत वर कधी पोचलो ते कळलेच नाही. एरवी हाच रस्ता अंत पाहतो.

येताना सवत सडा या ठिकाणी असलेल्या धबधब्यापाशी गेलो लांबून पाणी फार दिसत नव्हते पण जवळ गेल्यावर मोठा पॉवर जेट वाला शॉवर चालू असल्यसारखे पाणी पडत होते. सकाळची वेळ असल्यामुळे इतर कोणीही नव्हते. जवळ जवळ अर्धातास तिकडेच घालवला. माईंड बॉडी सोल फुल रिकव्हरी

इति विकांत धाववृतांत

धन्यवाद अंबज्ञ

कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की
मागच्या आठवड्यात चार जणांनी मिळून (तीन जणांनी १००० आणि एक जणानी २००० अशा रितीने ) एकूण ५ हजार रुपये मैत्रीला देणगी म्हणून दिले.

वाह, कोकण धाववृतांत भारी आहे.

सवतसडा काय आठवण काढलीत, लहानपणी गावाला जाताना फार आकर्षण वाटायचं सवतसड्याचं. तो आला की दाखवा बाबांना सांगायचो. ती सवतस्टोरी पण इंटरेस्टींग वाटायची जाम.

बब्बन, मंजूताई मनापासून धन्यवाद.
बब्बन, मला तुमचे नाव पत्ता ईमेल पत्ता ई. तपशील माझ्या फोनवर कळवाल का?
मंजूताई तुमचे तपशील बहुतेक मैत्रीकडे असतीलच पण तरीही तुम्हीही परत एक्दा कळवाल का?

आज १५ किमी ज्यात अंदाजे १० किमी हिल रिपीटस होत्या.
आज बरोबरचे कोणीही आले नाहीत मात्र दोन जणांनी आज एकटाच असे विचारले. हे विचारणारे दोन जण रोज फिरायला येणार्‍यांपैकी तोंड-ओळखीतले आहेत. ही विचारपूस तसे पाहता काही सेकंदाची, मी धावत ते चालत त्यामुळे बोलणे म्हणजे तसे खाणाखूणाच जास्त पण त्यामुळे इतके बरे वाटले की सांगता सोय नाही.
पाऊस मात्र नव्हता घामाच्या धाराच केवळ

आज १५ किमी ज्यात अंदाजे १० किमी हिल रिपीटस होत्या.
>>>
भारीच रे. तू म्हणजे एकदम अल्ट्रा चँप होऊ घातला आहेस

कसलं काय घेऊन बसलात टवणे सर, एकट्याने धावायची अजीबात सवय नाही त्यामुळे हालत मेज्जर खराब झालेली, 'न' आलेल्या टांगारू मित्रांना समर्पित होती ही आजची रन . Proud

हर्पेन, माझ्याकडून छोटीशी भेट स्विकारलीत त्याबदल थँक्स Happy

मेळघाटातल्यांसाठी आणखी काही करायची खुप इच्छा आहे.. वेळ मिळेल तसं नक्की करेन Happy

रीया मनापासून आभार.
मेळघाटात जायला मिळाले तर संधी सोडू नको.

धन्यवाद मामी कळवल्यामुळे चांगले वाटतेय नाहीतर मला वाटायला लागले होते की कोणी वाचतंय की नाही किंवा मी बोअर करतोय की काय
अर्थात म्हणून काही मी थांबवणार नाहीये इथे अपडेट्स टाकण तो भाग वेगळा Wink

Pages