रिमा - आठवणींतल्या भूमिका

Submitted by सनव on 21 May, 2017 - 15:51

रिमा लागू माझ्या अतिशय आवडत्या अभिनेत्री. ९० च्या दशकात हिंदी चित्रपटांतील मॉडर्न, ग्लॅमरस मॉम ही त्यांची इमेज आहेच. पण मराठी प्रेक्षकांना नाटकांतील, मालिकांतील रिमाताईही माहीत असल्यामुळे ओळखीची किंवा नात्यातली कोणी काकू, मावशी, मोठी बहिण असावी व तीच पडद्यावर काही सांगत असावी अशी सहजता त्यांच्या अभिनयात जाणवत असे. त्यांच्या मुलाखती मिळाल्या तर आवर्जून बघितल्या वा वाचल्या जात. त्यातून रिमाताईंच्या विचारांची प्रगल्भता, सखोल वाचन, अभ्यासूपणा, सामाजिक बांधिलकी व प्रामाणिक वृत्ती जाणवल्याशिवाय राहात नसे. त्यांचं छापा-काटा नाटक बघायचा योग मला कधीच आला नाही, ती खंत कायमच राहील. या गुणी अभिनेत्रीच्या मला आवडणार्‍या भूमिका, चित्रपटांबद्दल थोडंसं लिखाण करत आहे..हीच एक सर्वसामान्य फॅन म्हणून माझ्यातर्फे त्यांना अल्पशी श्रध्दांजली.

मैने प्यार किया- रिमांच्या हिंदीतील कारकिर्दीची सुरुवात कयामत से कयामत तक या चित्रपटाने झाली असली तरी सर्वाधिक लोकप्रियता त्यांना मैने प्यार किया मुळे मिळाली. होणार्‍या सुनेचं मुलीसारखं कौतुक करणारी, मुलाच्या प्रेमप्रकरणात त्याची साथ देणारी आणि नवरा मोठा बिझनेसमन असला तरी पाय जमिनीवर असणारी खरीखुरी, गोड चेहर्‍याची प्रेमळ आई रिमाने फार सुंदर उभी केली होती. त्यावेळी तिचं स्वतःचं वय २९-३० वर्षं होतं हे आता खरंच वाटत नाही. खर्‍या वयापेक्षा कितीतरी मोठी भूमिका किती सहज करुन गेली ती!

हम आपके है कौन- सूरज बडजात्यांच्या या माईलस्टोन चित्रपटात रिमांनी ३५-३६ व्या वर्षी आईच नव्हे तर आजीही साकार केली होती. यात 'आज हमारे दिल मे' हे गाणं रिमांवर चित्रित झालं होतं. आलोकनाथचं रिमावर कॉलेजमध्ये क्रश होतं पण आता इथे त्याच्या पुतण्याचं तिच्या लेकीशी लग्न ठरलंय. 'सुना दीजिए ना' म्हणून आलोकनाथला गाणं म्हणण्याची रिक्वेस्ट करणारी मैत्रिण ते 'राझ की बात बताए ये पूंजी जीवन की, शोभा आज से है आपके आंगन की' म्हणून व्याह्यांसमोर हात जोडणारी लग्न ठरलेल्या मुलीची आई- या भावनांच्या आंदोलनांत रिमांच्या चेहर्‍यावरील, डोळ्यांतील भाव कसे तरलपणे बदलत जातात ते बघत राहावं.

हम साथ साथ है- बडजात्यांच्या या तिसर्‍या चित्रपटात स्टार्सची व चरित्र कलाकारांची भाऊगर्दीच होती. इतक्या लोकांतही आपला ठसा उमटवण्यात रिमा यशस्वी ठरल्या. यातली आई प्रेमळ, भावनाशील पण मध्येच थोडी भरकटलेली, चुकीचे निर्णय घेणारी. पण ती खलनायिका नाही. हा फरक रिमांनी अचूक दाखवला. चित्रपटाच्या अखेरीस आई व मोठ्या मुलातील दुरावा संपलाय. त्याचवेळी त्याच्या बायकोची प्रसूती होऊन तिला मुलगा झालाय. तो सगळा सीन रिमांनी अतिशय अप्रतिम केलाय. 'आजी बनण्याचा आनंद सर्वात मोठा' असं म्हणत सुनेला 'थँक यू' म्हणणारी आई लक्षात राहाते. प्रचंड चीझी, फेक, ओटीटी चित्रपट म्हणून हम साथ साथ है वर टीका नेहमीच केली जाते व ती बहुतांशी खरीही आहे पण रिमांनी अशा चित्रपटातही आपल्या सहज वावरातून व नैसर्गिक अभिनयातून चित्रपटालाच एक खरेपण मिळवून दिलं.

श्रीमान श्रीमती- कठीण, इमोशनल सीन्स लीलया करणारी ही चतुरस्त्र अभिनेत्री बाकी काही न करता केवळ विनोदी अभिनय करत राहिली असती तरी लक्षात राहिली असती इतकं जबरदस्त टायमिंग श्रीमान श्रीमती मध्ये रिमांचं आहे. यातल्या गृहिणीचा नवरा केशव कायम दुसर्‍या स्त्रियांच्या मागे. शेजारचा दिलरुबा नामक हाऊस हजबंड तिच्या मागे लागलाय पण तो तिचा चांगला मित्रही आहे. या दिलरुबाला दिलबुरा अंकल म्हणणारा तिचा चिंटू नावाचा आगाऊ ढोल्या कार्टा आहे. या सगळ्या रसायनातून अफलातून विनोदनिर्मिती होत जाते.

नितळ- या चित्रपटात चरित्र भूमिकांत मराठीतील अनेक नावाजलेले कलाकार आहेत. रिमांची भूमिका त्यामानाने छोटी. पण वाट्याला आलेले एक-दोन सीन्सच असले तरी त्यांचं सोनं कसं करावं याचा वस्तुपाठच रिमांचा अभिनय घालून देतो.

नातीगोती- रिमा, दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी आणि अतुल परचुरे असा दमदार संच असलेलं नातीगोती हे नाटक. मुलाच्या प्रॉब्लेममुळे चिंतेत असणारी आणि तरीही जगण्याची उर्मी , उत्साह जपायचा प्रयत्न करणारी पण प्रचंड तणावाखाली जगणारी आई रिमांनी अचूक उभी केली आहे. करायला अत्यंत कठीण अशी ही भूमिका. इतकं अवघड शिवधनुष्य एक रिमाच पेलू शकत होत्या.

याखेरीज तू तू मै मै मधली सासू, कुछ कुछ होता है मधली अंजलीची आई, झी च्या तुझं माझं जमेना मधली आई - अशा असंख्य भूमिका प्रेक्षकांना आठवत असतील.
प्रत्येक वेळी स्टोरी, दिग्दर्शन , सहकलाकार सर्वच परफेक्ट असलेला प्रोजेक्ट मिळेलच असं नाही. पण प्रोजेक्ट कुठलाही असला तरी रिमाताईंच्या अभिनयाचं नाणं प्रत्येक वेळीच खणखणीत वाजत राहिलं. RIP rima tai. You personified effortless perfection and ageless beauty.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय. लिस्टमध्ये अ‍ॅड करु का?

नवरा माझा नवसाचा - राजकारणातला ओ का ठो ठाउक नसलेली व्यक्तिरेखा (विनोदनिर्मिती मस्त केलेय रिमाने)
शुभमंगल सावधान - हाय सोसायटी, पॉलिश्ड स्त्री, कुल मॉम, मॉडर्न सासु. अशोक सराफ आणि तिचे सीन्स अफलातुन आहेत.
आसु आणि हसु - दोन विविध भुमिका. नाटकाच्या प्रयोगात, तिचा गार पाण्याची बाटली डोळ्याला लावायचा अभिनय पाहुन मिही तेच करायला लागले होते.
माझं घर माझा संसार - असंतुष्ट, जराशी खाष्ट सासु पण त्याचबरोबर प्रेमळही. तिचे आणि अजिंक्य देवचे सिन्स फार सुंदर आहेत. त्याची खरी आई वाटते.

मला रिमाताई आठवतात आणि आवडल्या होत्या सर्वात जास्त, जेव्हा मी शाळेत होते तेव्हा टीव्हीवर दर आठवड्याला वेगवेगळी नाटकं लागायची, छोटीशी अर्ध्या तासाची त्यात एक नाटक सतीश पुळेकर बरोबर होतं, अजूनही जसच्या तसं आठवतंय ते. रीमाताई खिडकीत बसलेल्या बाहेर बघत आणि लहान बहिण आणि तिचा मित्र येतो, तो सतीश पुळेकर.

नंतर आवडलेलं बेफाम नाटक विवेक लागू आणि त्यांचं, दोघेही जबरदस्त आवडलेले त्यात. विवेक लागू जरा जास्तच.

नंतर महाभारतावर एक कुंती- कर्ण भेट, त्यातला कुंतीचा रोल पण ते फार जुनं नाहीये.

नाती गोती हे नाटक सुरु झालं तेव्हा त्यात स्वाती चिटणीस होती असं आठवतंय कारण टीव्हीवर त्या नाटकाची ओळख आणि shots दाखवले तेव्हा ती काम करायची.

बाकी वेगवेगळ्या मुवीज मध्ये त्याचं काम आवडतंच गेलं. माझं घर माझं संसार तर स्टोरी आमच्या डोंबिवलीत घडलेली.

तू तू मै मै मध्ये तुफान आवडलं त्याचं काम, सुप्रिया आणि त्यांची जुगलबंदी अप्रतिम.

तरी माझ्या मनावर कोरली गेली आहेत ती पहिली दोन उल्लेख केलेली, दूरदर्शनवर बघितलेली नाटकं. अगदी जशीच्या तशी आठवतात एवढ्या वर्षानंतर.