"स्वयंसेवक है" - अनिल माधव दवेंची एक आठवण.

Submitted by जीएस on 18 May, 2017 - 09:43

"स्वयंसेवक है" - अनिल माधव दवेंची एक आठवण.

दोन हजार सहा सालची गोष्ट आहे. माझा एका उद्योगसमूहाच्या बायोडिझेल प्रकल्पाशी संबंध आला. अखाद्यतेलावर प्रक्रिया करून बायोडिझेलची निर्मिती असे प्रकल्पाचे स्वरूप होते. साहजिकच असे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर करंज तेलासारख्या अखाद्य तेलांची खरेदी करू शकतात. यातूनच एक योजना सुचली होती की वनवासींना पडीक वनजमिनीवर जर करंज लागवड करायला मदत केली तर एका एकरात एका कुटुंबाला २४००० रुपये एवढे शाश्वत उत्पन्न मिळू शकेल.

सुरुवातीला पाच हजार एकर जमीन व पाच हजार वनवासी परिवार असा एक पथदर्शी प्रकल्प राबवता येईल अशी कल्पना होती. कुठल्यातरी राज्य सरकारच्या मदतीनेच हे होणे शक्य होते. मला श्री. अनिल दवेंची आठवण झाली. दर वर्षी थिंकर्स मीट मध्ये त्यांची भेट होत असे, रात्र रात्र चर्चा रंगत आणि त्यातूनच त्यांच्या अभ्यासू आणि प्रभावी व्यक्तीमत्वाची माझ्यावर चांगलीच छाप पडली होती. ते तेंव्हा मध्यप्रदेश भाजपचे संघटनमंत्री होते आणि शिवराजजी नुकतेच मुख्यमंत्री झाले होते.

अनिलजींना फोन केला, कामाचे स्वरूप सांगितले, "भोपाळला ये" मग बोलू म्हणाले. सरकारदरबारी कुठलेही काम घेऊन जाण्याची माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे थोडा साशंक होतोच. पण भोपाळला पोहोचलो.

अनिलजी स्वतः घ्यायला आले होते. आपल्या मिटिंगला थोडा वेळ आहे तोपर्यंत एक दोन भेटी करून घेऊ म्हणत आम्ही भोपाळमध्ये तीन चार ठिकाणी गेलो. त्यांच्या कामाचा आवाका व झपाटा बघून मी थक्कच झालो. नर्मदा संवर्धनापासून ते कुठेतरी बंद पडलेला मोठा कारखाना कामगारांच्या मालकीने पुन्हा सुरू करण्यापर्यंत असंख्य विषय ते हाताळत होते.

अखेर दुपारी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलो. मुख्यमंत्र्यांचे सचिव वगैरे होतेच. मी थोडक्यात प्रकल्प सादर केला. प्रकल्प समजावून घेण्याच्या दृष्टीने काही प्रश्नोत्तरे झाल्यावर सचिवांनी एकदम उलट्तपासणीच्या थाटात प्रश्नांही फैर झाडली.
सचिव: ही पाच हजार एकर जमीन तुम्हाला द्यायची आहे का ?
मी: नाही, वनवासींना.
सचिव: रोपांसाठी तुम्हाला अनुदान द्यायचे का ?
मी: नाही, वनवासी कुटुंबाला.
सचिव : पण मग रोपे तुमच्याकडून घ्यायची का ?
मी: नाही, त्यांनी स्वतःच तयार करायची, मोफत मार्गदर्शन पुरवू.
सचिव : मग बिया तुमच्याकडून घ्यायच्या का ?
मी: नाही, बाजारातून.
सचिव: त्यांचे उत्पादन तुम्ही आता म्हटलेल्या किमतीलाच तुम्हाला विकावे लागणर ?
मी: नाही, हा हमीभाव आहे, बाजारभाव जास्त असेल तर त्या भावाने.
सचिव: पण तुम्हालाच विकावे लागणार?
मी: नाही, आम्ही घेण्याची हमी देत आहोत. पण ते हवे तर विकू कोणालाही शकतात.

सचिव : (शेवटी ते मनातले अखेर बोललेच) तो आपका इसमे फायदा क्या है ? व्हाय आर यू डुईंग धिस ?
मी काही बोलण्याआधीच अनिलजींनी मला हात करून थांबवले, आणि सचिवांना म्हणाले, "स्वयंसेवक है"
पुढच्या क्षणी मुख्यमंत्री सचिवांना म्हणाले, "कैसे करना है देखिये" आणि विषयच संपला.

एखादा माणूस संघ स्वयंसेवक असेल तर तो समाजासाठी स्वतःच्या फायद्याविनाही काही करायचे असेल तर करणारच त्यात काही विशेष नाही हे इतक्या सहज अधिकाराने अनिलजींनी त्या सरकारी कामांना सरावलेल्या सनदी अधिकार्याला ऐकवले की त्या विश्वासानेच मी अंतर्मुख झालो.

काम झाल्यावर अनिलजी म्हणाले,"गोविंदजी, चला, आमच्या कार्यालयातले पोहे खिलवतो, एकदम खास असतात". वाटेतही फोनवरच अनेक महत्वाची कामे त्यांनी लीलया मार्गी लावली. सकाळचा बंद पदलेल्या फॅक्टरीचा प्रश्नही सुटण्याच्या दिशेने जातांना दिसत होता.

कार्यालयात पोहोचलो. "माझ्या खोलीत बसू" म्हणाले, मला वाटले की त्यांना वेगळे ऑफिस असेल. आत जाउन बघतो तर काय ? एका चुटकीसरशी पाच हजार एकर जमीन मंजूर करू शकणारा हा मनुष्य त्या छोट्या कार्यालयातल्याच १२ बाय १२ च्या एका खोलीत , एक छोटा पलंग, टेबल खुर्ची, पुस्तकाची तीन कपाटे एवढ्या संपत्तीसह रहात होता. वीसहून जास्त वर्षे राजकारणात काढल्यावर एका राज्याच्या कारभाराच्या किल्ल्या हाती असतांनाही !!!

पण मला आश्चर्य मात्र वाटले नाही, कारण मलाही हे माहित होतेच की "अनिल माधव दवे... स्वयंसेवक है "

लायसन्स संपले म्हणून रेडिओ न ऐकणार्या दीनदयाळजींसारख्या नेत्याबद्दल आपण ऐकलेले असते. त्याच निष्टा आणि सचोटीने "स्वयंसेवक है" ही ओळख, हा परस्परांबद्दलचा विश्वास आणि या स्वत्वाची जाणीव ठेवून राजकारणासह विविध क्षेत्रात नेतृत्व करणारे हजारो स्वयंसेवक संघाने घडवले आहेत एवढेच या निमित्ताने पुन्हा आठवले.

महाविद्यालयीन जीवनात अनिलजी संघाच्या संपर्कात आले, आणि पुढे चाळीस वर्षे त्यांंनी प्रचारक म्हणून आपले जीवन संघकार्यालाच वाहून घेतले. विभाग प्रचारक म्हणून कार्यरत असतांनाच त्यांच्याकडे भाजपचे काम आले. २००९ मध्ये ते खासदार झाले तर २०१६ मध्ये केंद्रिय पर्यावरण मंत्री झाले. पण "स्वयंसेवक है" या निष्ठेनेच ते आज १८ मे रोजी शेवटचा श्वास घेईपर्यंत अविरत काम करत राहिले. त्यांच्याबद्दल तुम्हाला गुगलून देखील फार सापडणार नाही. कारण ना त्यांना स्वतःचे वैयक्तिक जीवन होते ना त्यांनी उभ्या केलेल्या कामाला त्यांनी कधी स्वतःच्या नावाचे लेबल लावले. पंतप्रधान मोदींपसून ते सरसंघचालक मोहनजींपर्यंत त्यांच्या सर्व सहकार्यांनी व्यक्त केलेली भावना हीच त्यांच्या कामाची पावती आहे. अनिल माधव दवेंना विनम्र श्रद्धांजली.

- गोविंद सोवळे

मराठी लेख ( मुंबई तरुण भारत )
http://mahamtb.com/Encyc/2017/5/18/article-on-Anil-Dave-.html

इंग्रजी लेख ( न्यूजभारती)
http://www.newsbharati.com/Encyc/2017/5/21/Anil-Dave-Swayamsevak

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages