देव आनंद

Submitted by अदित्य श्रीपद on 13 May, 2017 - 09:01

देव आनंद हा आपला अत्यंत आवडता हिरो!( आपला म्हणजे माझा …हल्लीच्या पिढीमध्ये (म्हणजे सुद्धा माझ्याच पिढीमध्ये …मी काही ७० -८० वर्षांचा म्हातारा नाहीये) देव आनंद काही फारसा कुणाला आवडत नाही …एक तर तो चेष्टेचा विषय आहे किंवा अगदी त्याच्याबद्दल काही मत असावं इतका तो हल्लीच्या पिढीतल्या लोकांना महत्वाचा वाटत नाही … तो अगदी विस्मृतीत गेला नाही एवढंच …तर ते एक असो ) …म्हणजे मला त्याचा एकदम fan म्हणा हवं तर.आता देव आनंद काही फार ग्रेट अभिनेता वगैरे नव्हता. त्याच्या संपूर्ण करिअर मध्ये त्याने फार चांगला अभिनय केला आहे असं काही कुठे आपल्याला फारसं दिसलेलं नाही. तसा तो दिसायला एकदम देखणा पण त्याच सौन्दर्य काही फार मर्दानी वगैरे नव्हते, तसा तो बायल्या नव्हता हे हि खरच. ( तसे बायले हिरो विश्वजीत किंवा भारत भूषण होते…त्यांचे जे कोणी अल्पसंख्यांक पंखे असतील त्यांनी मला माफ करावे.) पण हिंदी सिनेमात त्याच्या पेक्षा देखणे आणि सरस अभिनय करू शकणारे धर्मेंद्र, राजेश खन्ना प्रभृती होतेच कि, पण याला एवढे यश कसे काय मिळाले, मला आणि माझ्यासारख्यांना देव आनंद याच्यात नक्की काय आवडायचे ? हा प्रश्न मला फार काळ पडला होता. अगदी फक्त अभिनय आवडणारे लोक देव आनंद कडे कशाला बघतील ? पण मग असं काय होतं कि या दगडाला … या सुंदर दगडाला लोकांनी नव्हे, एका संपूर्ण एका पिढीने अगदी डोक्यावर घेतले आणि दीर्घकाळ त्याने लोकांच्या हृदयावर अधिराज्य केले.
देव आनंद च्या सिनेकारकिर्दीकडे पाहताना २ टप्पे स्पष्ट पणे दिसतात, १) त्याने स्वतः काम केलेले पण दिग्दर्शित इतरांनी केलेले अन २) त्याने स्वतः काम केलेले आणि दिग्दर्शितही स्वतःच केलेले. या दुसऱ्या प्रकाराच्या सिनेमान्बद्दल फारसा उहापोह करण्याच्या लायकीचे काही ते नाहीत म्हणून पहिल्या category मधले सिनेमे हेच खरे तर देव आनंद चे देव आनंद पण ठसठशीत पणे मांडणारे आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी योग्य आहेत.
हि देव आनंद ची पहिली कारकीर्द १९४६ ते १९६९ अशी तब्बल २४ वर्षांची आहे ज्यात त्याने जवळपास ७५ चित्रपट केले. त्यापैकी शराबी, जाली नोट , हम दोनो, काला बाजार, जब प्यार किसीसे होता है’ असे अनेक सुपरहिट चित्रपट आहेत. १९७० नंतर हि त्याचे वारंट , हरे राम हरे कृष्ण असे काही चित्रपट गाजले पण लोकांच्या मनावर अधिराज्य त्याने ह्या २४ वर्षातच केले. अभिनय क्षमता सुमार असूनहि त्याचे नाव राज कपूर , दिलीप कुमार आणि देव आनंद ह्या त्रीकुटात सामील झाले. कशामुळे असे झाले असेल असा विचार करताना मला त्याची अनेक गाजलेली गाणी आठवतात . ती सुमधुर, सुश्राव्य होतीच पण ती पडद्यावर बघतान एक काहीतरी वेगळेपण जाणवायचे , काय होते हे वेगळे पण?
तर त्या गीतांमध्ये ( खरं तर अक्ख्या चित्रपटातच )तो फक्त स्वतःवर प्रेम करताना दिसतो. म्हणजे समोर मधुबाला( अच्छा जी मै हारी...काला पानी ) असो अथवा वहिदा( खोया खोया चांद … काला बाजार) वैजयंती माला(दिल पुकारे … आरे आरे…ज्वेल थीफ) असो किंवा कुणी हि नसो ( मेरा मन तेरा प्यासा …GAMBLER) त्याला काही फरकच पडत नाही. तो त्यापैकी कुणाच्या नाही तर स्वतःच्याच प्रेमात पडला आहे अस जाणवत राहतं. एवढी सुंदर वहिदा उभी आहे पण हा घोडा तिच्या कडे बघतो तरी का? हा गाव भर दुडक्या चालीत 'तारे चले सितारे चाले , संग संग मेरे ये सारे चले...' म्हणत फिरतो. अरे तारे- सितारे वगैरे ठीक आहे पण जरा वहिदाकडे बघ कि! असं आपल्याला वाटत राहत.( तो नाही बघत. पण आपण दोघांकडेही बघू..खाली लिंक दिली आहे)
https://www.youtube.com/watch?v=MDDVLE7HV10
इतक टोकाचं तरीही लोभसवाणं आत्मकेंद्रितपण क्वचितच बघायला मिळतं अन ते सुद्धा २४-२५ वर्ष सतत!
ह्याच चित्रपटातलं “अपनी तो हर आह ...” हे गाणं बघा. मला तर आधी हे भक्तीगीतच वाटलं होतं.पण ह्यात देव आनंद ने दाखवलेला खट्याळ भाव मस्त! बघा...
https://www.youtube.com/watch?v=VKlxTTjEQQY
काला पानी मध्ये तो नलिनी जयवंतवर( पात्र नाम किशोरी ) इम्प्रेशन मारण्यासाठी “हम बेखुदी मे तुमको पुकारे चले गये....” हे नितांत सुंदर गीत म्हणतो. त्यात सुरुवातीलाच 'हम…' म्हटल्यावर त्याने हात हवेत उडवत चेहऱ्याची जी काही अदा केलेली आहे ती केवळ लाजवाब! ती इथे शब्दात सांगता येण निव्वळ अशक्य आहे, तुम्ही ती प्रत्यक्ष पहाच, खाली लिंक दिलेली आहे

https://www.youtube.com/watch?v=1nvahIDfbos
हा भाऊ नलिनी जयवंत कडे धड बघत सुद्धा नाही. अरे तू तिला आपल्या बाजूने करून घ्यायला आला आहेस ना, तिच्या कडून तुला बाप निर्दोष असल्याबद्दलचे काही पुरावे हवेत ना... मग जरा तिला डिमांड दे! पण त्याला स्वतःची बेखुदी इतकी प्रिय आहे कि त्यापुढे नलिनी जयवंत कीस झाड कि पत्ती … त्याची हि अतिरिक्त स्वपुजक वृत्ती दिसते मात्र इतकी लोभस वाणी कि त्यावर आपण ( म्हणजे मी तरी...आणि बहुधा त्या काळातले प्रेक्षक सुद्धा )फ़िदा…
देव आनंद च्या एकुण चित्रपटात जस संगीताला मोठच स्थान आहे तसच त्याच्या यशात त्याचा भाऊ विजय आनंद याचा मोठा वाट आहे. तो देवच्या पिक्चर्स चा दिग्दर्शक असताना केलेले सिनेमे तर सोडा पण गाणी सुद्धा अह्फालातून ढंगाने चित्रित केली आहेत. आठवा! कुतुब मिनार मध्ये चित्रित झालेले “दिल का भंवर करे पुकार...” हे गाणं...आठवता कशाला खाली लिंक दिलेली आहे पहाच...
https://www.youtube.com/watch?v=lEMMGb4xMQQ
ह्या गाण्याचं कुतुब मिनार उतरताना केलेले चित्रीकरण तर अफलातून आहेच पण हे महम्मद रफीचे सोलो गाणे असून हि नूतनने ह्या गाण्यात जो अभिनय, चेहऱ्याच्या, डोळ्यांच्या, ओठांच्या ज्या मोहक हालचाली केल्या आहेत त्यावरून तर ते द्वंद्व गीत आहे असेच वाटते...असेच ह्याच चित्रपटातले आणखी एक गीत “एक घर बनाउन्गा, तेरे घर के सामने..” अक्ख्या गाणभर दारूच्या ग्लासात नूतनाला उभे करण्याची आयडिया लय भारी! पण ग्लासात बर्फ टाकल्यावर लगेच तिला वाजणारी थंडी ...एक नंबर.... गाण्याचे चित्रीकरण अशा कल्पकतेने करणारे दिग्दर्शक फार म्हणजे फारच कमी...
https://www.youtube.com/watch?v=dg39NzgJZg4
गाईड मधलं पिया तोसे नैना लागे रे हे गाणं आठवा...नको पहाच लिंक देतो
https://www.youtube.com/watch?v=_i493uN6YHk
मला नक्की माहित नाही पण रूपक तालातलं हे बहुधा एकमेव सिने नृत्यगीत आहे. त्याबद्दल बर्मनदांना सलाम ...पण ह्या गीतामध्ये रंग आणि प्रकाश ह्याचा केलेला मुक्त पण कल्पक वापर पाहिलात.त्याबद्दल विजय आनंद ला सल्युट
अशी किती उदाहरण देऊ...ह्या गाण्यांनी, अशा अफलातून दिग्दर्शनामुळे(चित्रपटांच्या देखिल!) देवचा पडद्यावरचा वावर अधिक मोहक होत असे.

विजय आनंद हा एक ताकदीचा दिग्दर्शक आणि अभिनेताही होता. त्याने कोरा कागज मध्ये केलेलं काम आठवा. मोठ्या झाडाच्या सावलीत दुसरं झाड नीट वाढत नाही, तसं काहीसं याच झालं. पण विजयला मात्र आपल्या भावाच्या सामर्थ्याबद्दल तसेच एकूण क्षमतांबद्दल आणि मर्यादांबद्दल पक्की जाण होती त्यामुळे त्याने दिग्दर्शित केलेले सगळे चित्रपट यशस्वी तर होतेच पण ते आशयघन आणि विषयवैविध्य असणारे होते. या आपल्या सद्गुणी भावाची कास देवने सोडली आणि सगळ गाडं भरकटलं.
दिग्दर्शन हा आपला प्रांत नाही हे त्याला कधी उमगलच नाही, ( सुरुवातीला मिळालेलं यश ( हरे रामा हरे कृष्णा , वारंट ) फसवं होतं .गोल्डी(विजय आनंद) नाही तर दुसरे अनेक चांगले दिग्दर्शक होते. पण चूक मान्य करून ती सुधारेल तर तो देव कसला ! देव कधी चुकतो का! ….लोकांनी दिलेल्या हृदयातल्या स्थानातून हा हस्तिदंती मनोऱ्यात जाउन जो बसला तो कायमचाच …त्याची आमच्याशी जुळलेली तुटली… तुम्ही बघा त्याचे नंतरचे चित्रपट मी काय म्हणतोय ते लगेच कळेल …( actually नका बघू…कशाला डोक्याला ताप करून घेताय? )
असो!, देवला जाउन आता साडे चार वर्ष झालीयेत. तो आता हळू हळू पूर्ण विस्मृतीत जाइल कदाचित. कदाचित नाहीही जाणार. त्याच्यावर आम्ही केलेलं प्रेम कदाचित त्याला ह्या फिल्मी दुनियेत जिवंत ठेवेल. सांगता येत नाही पण या प्रेमाखातर काढलेलं हे एक स्मरणचित्र. या खोट्या, दिखावू, फसव्या रुपेरी दुनियेत फारच थोड्या गोष्टी निर्भेळ आणि अस्सल असतात, देव च्या प्रसन्न चेहऱ्यावरच्या निर्भेळ स्मितासारख्या … नाही का !
---आदित्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तो फक्त स्वतःवर प्रेम करताना दिसतो<<

थोडा असहमत, स्पष्टीकरणाकरता अभी ना जाओ छोड कर... हे गाणं देतोय. यांत "मै थोडी देर जी तो लुं, नशे के घुंट पी तो लुं..." या कडव्यात (आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर) त्याच्या डोळ्यातुन बदाम पडतायत...

बाकि, देवसाहेबांच्या आठवणींबद्दल धन्यवाद!