आरशाला मी कधी कळलेच नाही

Submitted by निशिकांत on 12 May, 2017 - 01:44

आरशाला मी कधी कळलेच नाही
( एकाच विषयावर आणि एकाच यमकात पाच मुक्तके--वृत्तबध्द चारोळ्या--लिहिल्यामुळे ही एक वैशिष्ट्यपूर्ण कविता बनली आहे; जरा वेगळ्या बाजाची )

बंडखोरी हाच आहे पिंड माझा
चौकटीच्या आत मी जगलेच नाही
रूढवादी रूप स्त्रीचे पाहणार्‍या
आरशाला मी कधी कळलेच नाही

शाप भोगत वाट का बघते अहिल्या?
आत्मसन्मानी मना रुचलेच नाही
राम तो उध्दारकर्ता मानणार्‍या
आरशाला मी कधी कळलेच नाही

लागले माझी मला घडवायला मी
वाट खडतर चालता थकलेच नाही
रूप नवखे पाहुनी चक्रावलेल्या
आरशाला मी कधी कळलेच नाही

शार्दुलाच्या ताकदीने गर्जताना
आत्मविश्वासास मी त्यजिलेच नाही
नेहमी चित्कार स्त्रीचे ऐकणार्‍या
आरशाला मी कधी कळलेच नाही

वेग, प्रगती परवलीचे शब्द माझे
धावता रूढी प्रथांची ठेच नाही
आत्मनिर्भर पाहुनी चवताळणार्‍या
आरशाला मी कधी कळलेच नाही

आजची स्त्री मागते सन्मान आहे
जे कधी आधी असे घडलेच नाही
पाहुनी एल्गार थरथर कापणार्‍या
आरशाला मी कधी कळलेच नाही

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users