संध्याराणी

Submitted by शार्दुल हातोळकर on 7 May, 2017 - 01:27

निष्पाप कळी तुटताना गहिवरली संध्याराणी
हलक्याच प्रकाशामध्ये डोळ्यांतुन झरले पाणी

पानांची सळसळ नाही थिजलेली अवघी सृष्टी
अन् उनाड वेडा वारा निमिषातच झाला कष्टी

थरथरल्या दुःखी फांद्या भ्रमरांची खंडीत गाणी
संध्येच्या ह्रदयामधली अगतिकता पानोपानी

अनिवार बुडाल्या शोके लतिकाही लेकुरवाळ्या
कोमेजुन झुकल्या खाली सुंदरशा उंच डहाळ्या

फुललेली हजार पुष्पे आक्रंदती मुक बिचारी
नटलेल्या वनराईच्या ही कशी अवकळा दारी

विणलेली अपार स्वप्ने संध्येने कळीच्याभवती
दुष्टांच्या पुरवित मोहा नियतीला पर्वा नव्हती

गतिमान परि काळाची अविरत धावती चाके
सारुन पुन्हा तिमिराला तेजोमय प्रकाश फाके

संध्येची बनली रजनी उधळीत तमाच्या लाटा
क्षितिजाला येता किरणे उजळुन निघाल्या वाटा

हळुवार पुन्हा वेलीला कलिकांची कोंबे फुटली
रुसलेली अवघी सृष्टी जोमात नव्याने नटली

मावळत्या सूर्यप्रकाशी कोंबाचीच कलिका झाली
फुलवित पुन्हा पुष्पांना क्षितिजावर संध्या आली

संध्येच्या नयनांमधली कलिका ती लोभसवाणी
दिसल्यावर पानांमध्ये मग हसली संध्याराणी

शोधुन नव्यात स्मृतींना ही दुनिया चालत राही
ही रित खरी सावरते गहिवरल्या संध्येलाही

ही ऐसी करुण कहाणी कित्येक नशीबी असते
रुसवुन मनांना साऱ्या ही नियती पुन्हा हसते

- शार्दुल हातोळकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

speechless!