ब्राह्मण -एक मुक्त(क्ता) चिंतन ...

Submitted by अदित्य श्रीपद on 7 May, 2017 - 00:57

पुण्याच्या विद्यमान महापौर मुक्ता टिळक ह्यांनी आरक्षण आणि ब्राह्मण तरुण ह्यासाम्बंधाने मध्यंतरी जे विधान केले त्यामुळे मी मागे म्हणजे २०१२-१३ साली लिहिलेला लेख आठवला. ह्या लेखात शेवटी शेवटी वर्णन केलेला माझा नातेवाईक तरुण आता परदेशी-जर्मनीत चांगला स्थिरावलाय. त्याला मागे दीड वर्षापूर्वी भारतात आलेला असताना मी परत छेडले,विचारले कि तु मागे म्हटला तसे खरच इथे ब्राह्मण म्हणून तुला त्रास होतो म्हणून परदेशी गेलास कि आणखी काही कारण होते तर तो म्हणाला आता तुम्ही त्यागाची आणि निस्पृह सेवेची ब्राह्मणांची फार मोठी परंपरा, हा देश घडवण्यात ब्राह्मणांचा वाटा, असले काहीतरी बोलू लागलात तर मी हि तसेच बोललो नाहीतर इकडे जास्त पैसा, सुखसोयी, ऐषोआराम आहे म्हणून इथे आलो हेच खरे-मुख्य कारण, बाकी आपल्या अशाच बोलायच्या गोष्टी. घरी आलं कि आईला म्हणतो तुझ्या हाताच्या जेवणाची सर कश्शा कश्शाला म्हणून नाही. पण तिकडे जाऊन वजन चांगल ५० किलोचं ७२ किलो झालाय ते का लपून राहत! पण आईला हि बर वाटत. तसच आहे हे... आता बोला. मुद्दाम जुनाच लेख परत टाकतोय पण आता त्यात कालानुरूप आणि मुख्य म्हणजे माझ्या नवीन अनुभावानुरूप महत्वाचे बदल करायला हवेत असे प्रकर्षाने वाटतेय...आणि काय असते कि आपण उगाच लई भारी प्रश्न विचारले ना कि लोक ही मानभावी पणे उत्तर देतात, म्हणजे कदाचित खर बोलत असतील पण बरोबर नसते किंवा बरोबर असेल ते बोलतात पण मग ते खरे नसते...

मी एक ब्राह्मण.
माझा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. म्हणून मी जन्माने ब्राह्मण आहे पण तसं ते अर्धसत्य आहे. म्हणजे असं कि माझी आई जातीने ब्राह्मण नव्हती. आम्ही मामाकडून पठारे प्रभू या जातीचे ( आज काल बऱ्याच जणांना हि जात आहे हेच माहित नसेल पण ..हि एक बऱ्यापैकी प्रसिद्ध जमात होती आणि आजकाल मुंबई- पुण्यामध्येच पाठारे प्रभू काय ते शिल्लक उरले आहेत – पठारे प्रभून्बद्दल नंतर लिहीन.)आपल्या कडे बापाची जात हीच मुलांची जात मानली जाते अगदी कायद्याने सुद्धा, का? ते नक्की सागता येत नाही.असो, तर म्हणून मी जातीने ब्राह्मण. खरंतर माझं ब्राह्मण्य एवढ्यावरच संपते. म्हणजे बघाना, मी सर्वसाधारणपणे ब्राह्मण्याचे किंवा ब्राह्मणाचे कोणतेही गुणधर्म अंगी बाळगून नाहीये. म्हणजे जानवं, संध्या वगैरे सोडा मी साधे गुरुवार, शनिवार,चतुर्थ्या,एकादश्या, श्रावण वगैरे पाळत नाही.(आम्ही कुत्रे पाळतो). पूजा सांगत नाही. मांसाशन(चिकन, मटण, मासे ते अगदी बीफ, पोर्क काहीही- जे आवडेल आणि पचेल असं काहीही ) करतो. कधी मधी दारू हि पितो.बाकीच्या सर्वसाधारण धार्मिक रूढी-रीतीही पाळत नाही, फार कशाला मी माझ्या आई वडिलांचे आणि बहिणीचे त्यांच्या मृत्युनंतर अग्नी संस्कार हि केले नाहीत त्यांचे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांना अभ्यासासाठी दिले(देहदान)आणि डोळे दान केले. नंतरचे दहावे, बारावे श्राद्धादी संस्कार केले नाही हे वेगळे सांगायला नकोच. एव्हढच कशाला मी आणि माझ्या पत्नीने आमच्या मुलीचे बारसे सुद्धा केलेलं नाहीये (म्हणजे मुलीला नाव ठेवलय पण बारसं नाही केलेलं).माझे शाळेपासून ते कामाच्या ठिकाणचे बहुसंख्य मित्र ब्राह्मणेतर आहेत आणि जुने, शाळेतले जे मित्र आज सुद्धा संपर्कात आहेत त्यात तर एक सुद्धा ब्राह्मण नाहीये.त्यामुळे एक जन्मतःच चिकटलेली जात म्हणून फक्त मी ब्राह्मण आहे असे म्हटले तर ते फारसे वावगे होणार नाही. मग मी आज या विषयावर काही का बोलत आहे?.well त्याला काही विशिष्ट कारणं आहेत. म्हणजे बघा, सहज जातायेता किंवा कामाच्या ठिकाणी, जेवणाच्या वेळी, चहाच्या वेळी अवांतर गोष्टींवर गप्पा मारताना मी जे काही बोलतो किंवा गप्पांच्या ओघामध्ये ज्या आसपास घडणाऱ्या गोष्टीवर चर्चा होते त्यात मी आणि माझे विचार यांना माझ्या जन्मजात ब्राह्मण्याशी जोडूनच पहिले जातं, जणू मी सर्व ब्राह्मणांचा एक प्रतिनिधी आहे, आणि मग मला गोंधळल्यासारख होतं ( म्हणजे व्हायचं, आता सवय झालीये).उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी झालेला दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु होते का? हा वाद, जेम्स लेन- भांडारकर संस्था वाद किंवा बाबासाहेब पुरंदरे आणि शिवचरित्राचा वाद. खरतर तेव्हा माझा ह्याप्रकरणांशी, ह्या लोकांशी काहीही संबंध नव्हता –आजही नाही. या प्रकरणाबद्दल काही माहितीहि मला तेव्हा नव्हती आणि मला खात्री आहे कि यावर शिळोप्याच्या गप्पा मारणारे लोक हि माझ्या इतकेच अनभिज्ञ होते. तरी पण त्यांचा एकूण सूर हा मला एका प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारा असे. तुम्ही सगळे ब्राह्मण लोक असेच, ब्राह्मणांनी आपली कायमच वाट लावली...अशा तुकड्यांनी सुरु होणाऱ्या वाक्यांनी मी गोंधळून जात असे. अचानक मी ह्यांच्या मध्ये इतकी वर्ष काढलेला न राहता कुणी तरी बाहेरचा होऊन जात असे. यावर मग मी वाचायला आणि माहिती गोळा करायला सुरुवात केली. आता मी गोळा केलेली माहिती आणि मला झालेले ह्या एकंदर गोष्टीच हे आकलन हे अपूर्ण, चूक किंवा फारच वरवरचं असू शकत किंवा बरोबर आणि अगदी मूलगामीहि असू शकत. ते कसं आहे हे तुम्ही ठरवायचं.
इंग्रजांनी मराठी राज्य बुडवून त्यांचा अंमल जेव्हा कायम केला तेव्हा पुण्यात तरी ब्राह्मण हेच सत्ताधारी होते.(तसं पाहू जाता ब्राह्मण हि काही राज्यकर्ती जात नव्हे.(अर्थात तरीही हि सत्तेशी आणि सत्ताधाऱ्याशी कायम जवळीक साधून राहणरी जात होती) इतिहासात ब्राह्मणांनी राज्य कमावल्याची उदाहरणं कमीच. ई.स. पूर्व १५० मध्य झालेला पुष्यमित्र श्रुंग सोडला तर मला तरी ब्राह्मण राजे काही आठवत नाहीत. महाराष्ट्रातले सातवाहन सम्राट हे ब्राह्मण होते असं मानलं जात पण यावर संशोधकांमध्ये मतभेद आहेत.)त्यामुळे त्याकाळात साहजिक पुण्यात वं त्याच्या आसपासच्या प्रांतात तरी ब्राह्मण हि साहजिकच प्रभावशाली आणि सत्तेशी हितसंबंध जुळवून असलेली जात होती हे निश्चित.आता सत्ताधारी म्हणून ब्राह्मण राज्यकर्ते हे फार न्यायी आणि समंजस होते अशातली बात नाही. त्यांनी स्वतःला वं स्वतःच्या जमातीलाच झुकत माप, अधिकार आणि सत्तेत वाटा दिला हेहि खरं पण सर्वसाधारणपणे सत्तेतली कुठलीही जमात किंवा वर्ग असाच वागतो. स्वकीयांचे हितसंबंध तो अधिक जपतो. (असे न वागणारे लोक कमी, अपवादात्मक आणि नक्कीच प्रशंसनीय).छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले मराठी राज्य १८१८ मध्ये इंग्रजांनी बुडवले आणि महाराष्ट्रात त्यांची सत्ता दृढ मूल केली त्या वेळी ब्राह्मण हेच सत्ताधारी होतेआणि दिल्लीचे नामधारी बादशाहच्या अआडून तेच देशाच्या राजकारणाची सूत्रे हाकीत होते. त्यामुळे राज्य घालवल्याचा राग त्यांच्या वर होताच.इंग्रज परकीय खरे पण त्यांनी राज्य व्यवस्थेत सुसूत्रता आणली, शिवाय त्यांच्या बरोबर आधुनिक विचार, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान हेही आले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी म्हणून का होईना पण त्यांनी नवीन शिक्षण पद्धती आणली तेव्हा गेल्या काही पिढ्या सत्तेला चिकटून असलेले ब्राह्मण पुन्हा जुनी लक्तर टाकून ह्या नव्या व्यवस्थेत सत्तेचे भागीदार बनले त्यांचे हितसंबंध फार बिघडले नाहीत. (जरी बऱ्याच ब्राह्मणांच्या- विशेषतः चित्पावनांच्या मनात इंग्रजांनी आपले राज्य बुडवल्याचा राग होता तरी या नव्या शिक्षणाचे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्व ओळखणारे हि बहुसंख्य ब्राह्मणच होते.त्यामुळे सुरुवातीला इंग्रजांविरुद्ध शस्त्र उपसणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, वगैरे जसे ब्राह्मण होते तसेच आधुनिक शिक्षण, सुधारणेचे पुरस्कार करणारे लोकहितवादी,न्या. रानडे, आगरकर, कर्वे वगैरे हि ब्राह्मणच होते) याचा राग इतर विशेषतः मराठा जातीच्या मनात फार होता.मराठा हि खरंतर गेल्या अनेक पिढ्या पासूनची राज्यकर्ती जमात. म्हणजे राज्य कुणाचेही असो, यादवांचे,छत्रपती शिवाजी महाराजांचे, आदिल्शाहाचे, किंवा मोंगलांचे, मराठा समाजाची सत्तेतली भागीदारी काही आटली नव्हती पण शाहू महाराजांच्या काळात बाळाजी विश्वनाथाने अन नंतर पहिल्या बाजीरावाने पद्धतशीर पणे हे परंपरागत मराठा वर्चस्व मोडून काढले , त्यांचा सत्तेतला वाटा नाममात्र केला आणि नवे होळकर, शिंदे यांसारखे सरदार उभे केले, ब्राह्मण सरदार उभे केले. इंग्रजांच्या काळात तर परिस्थिती अधिकच बिकट बनली. इंग्रजांनी वंशपरम्परेने कुणाला काही देणे बंदच केले. अशातच महात्मा ज्योतिबा फुलेंचा उदय झालं आणि त्यांनी बहुजन समाजाच्या ह्या हीनदिन परिस्थितीचे यथायोग्य मूल्यमापन करून त्यांच्या उत्थापनाचे प्रयत्न सुरु केले. त्यातून सत्यशोधक चळवळीची स्थापना झाली. दारिद्र्य, अज्ञान,भेदाभेद,विषमता हेच बहुजनांच्या मागासलेपणाचे कारण आहे हे ओळखून ह्या शोषक समाजव्यवस्थेचे संरक्षक जे ब्राह्मण, त्यांना फुल्यांनी आव्हान दिले. त्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक चळवळीला अभूतपूर्व यश मिळाले. म. फुल्यांच्या नंतर या चळवळीची सूत्रे मराठा समाजाच्या हाती गेली आणि लवकरच तिला ब्राह्मण- ब्राह्मणेतर चळवळीचे रूप येऊ लागले.बहुजन समाजाला सत्याशोधक चळवळ ब्राह्मणेतर आणि नंतर ब्राह्मणद्वेषी चळवळ कधी झाली हे कळलेच नाही. या चळवळीच्या यशाने ब्राह्मणांची सर्व क्षेत्रातून पीछेहाट सुरु झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रौढ मतदानाच्या युगात संख्येने ३.५ ते ४ % असणाऱ्या ब्राह्मणांना एक समाज म्हणून फारसे भवितव्य नव्हतेच आणि ते जात म्हणून एकही नव्हते.अशात गांधीजींचा खून झाला आणि तो एका ब्राह्मणाने केलेला असल्याने ब्राह्मणद्वेषाला आता एक नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले. नथुरामला न्यायालयात शिक्षा झाली तो फाशीही गेला पण समस्त ब्राह्मणसमाज या गुन्ह्याच्या अपराध भावनेचा शिकार झाला.आजही ब्राह्मणाना त्या बद्दल जबाबदार धरले जाते आणि त्या घटनेशी काहीही संबंध नसलेले आजचे ब्राह्मण त्या अपराधाचे ओझे आजही डोक्यावर वाहताना दिसतात. ह्या उलट नव्या लोकशाही समाजव्यवस्थेत संख्याने २७ – ३५% असलेला मराठा समाज पुन्हा एकदा सत्ताधारी झाला, त्यांच्याकडे सत्ता कमावण्याचा, चालवण्याचा. टिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव तर होताच त्या बरोबर संघटीत असे पुरेसे संख्याबळही आहे. खरतर ब्राह्मण आणि मराठा ह्या दोन सवर्ण जाती पिढ्यानुपिढ्या सत्तेतल्या भागीदार पण ब्राह्मणेतर चळवळीत त्या एकमेकांविरुद्ध आल्या.गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात ज्या दंगली उसळल्या ( आमचे आजोबा सुद्धा त्या दंगलीत घर जाळल्यामुळे नाशिकहून परागंदा होऊन पुण्यात आले.)त्यामुळे खेडोपाडी थोडीफार जमीनदारी धरून असणारा ब्राह्मण समाज तिथून मुळापासून उखडला गेला आणि तो शहरात आला. खेड्यातला भिक्षुकी करणारा ब्राह्मण तर आधीच शहराकडे जाऊ लागला होता.(आज खेडोपाडी ब्राह्मण समाज जवळपास नाहीच.)विपरीत परिस्थिती माणसाला पर्याय शोधायला भाग पाडते. ब्राह्मणांनी स्वतःला बदलत्या परीस्थितीशी जुळवुन घेतले. खरतर सत्तेतले पिढ्यानुपिढ्या भागीदार असलेले मराठा आणि ब्राह्मण हे दोन समाज. ब्राह्मण हे ही एकेकाळी अत्यंत कर्मठ, पण प्रबोधन आणि सुधारणेत आज ही जात अत्यंत अग्रेसर. इतिहास दृष्ट्या पहिल तर ब्राह्मण स्त्री हि जातीने ब्राह्मण असून देखिल इतर स्त्रियांप्रमाणेच शोषित, वंचित. ब्राह्मण विधवांची स्थिती तर अत्यंत दयनीय, पण आता हि गोष्ट जवळपास इतिहासजमाच झालि आहे आज ब्राह्मण स्त्रियामध्ये शिक्षण, स्वातंत्र्य आणि स्वावलंबी असण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. अशिक्षित/ निरक्षर ब्राह्मण स्त्री तर अपवादानेच आढळेल. आणि जात धर्म प्रांत वंश वगैरेचा विचार न करता, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, विचार, यांचा विचार करून जातीबाहेर विवाह करणाऱ्या तरुणींमध्य ब्राह्मण तरुणींचा टक्का लक्षणीय आहे. विशेष म्हणजे त्यांना घरून फारसा विरोध होत नाहीच उलट बऱ्याचदा पाठिंबाच मिळतो.एवढच कशाला आताशा ब्राह्मणाचे स्वतःल ब्राह्मण म्हणून वेगळे मानणे हि कमी कमी होत चालले आहे. नवीन पिढीतल्या ब्राह्मण तरुणांमध्ये तर हे प्रमाण अधिकच आहे. त्यांना स्वतःच्या ब्राह्मण असण्याबद्दल , त्यांच्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल फारसे काही माहित नसते आणि माहिती करून घ्यायची इच्छा आहे असेही मला वाटत नाही. परंपरागत भिक्षुकी सोडून आधुनिक शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय करणे आणि पैसा कमावणारे ब्राह्मण अधिक. शहरात स्थिरावलेला ब्राह्मण सममाज आज शहरेही सोडून परदेशी जाऊन स्थायिक होऊ लागला आहे. इतर हि जातीतले लोक जातात पण संख्याबळ पहिले तर ब्राह्मणात हे प्रमाण खूपच जास्त आहे.माझ्या माहितीतल्या एकुण एक ब्राह्मण कुटुंबातले कोणी न कोणी परदेशी स्थायिक झालेले असते आणि नवीन पिढी त्यांच्या पावलावर पूल टाकून तिकडे जायचे स्वप्न उराशी बाळगून असते. त्याच बरोबर ब्राह्मण तरुणांचा समाजकारणा आणि विशेषतः राजकारणातला सहभाग लक्षणीय रित्या घटत चालला आहे.
माझ्या एका नातेवाईकाच्या नुकत्याच इंजीनीयर झालेल्या आणि परदेश गमनाची तयारी करीत असलेल्या मुलाला मी या बाबत सहज छेडल, त्याला विचारला कि तु शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात परत येणार कि नाही तर तो म्हणाला , “इथे परत येऊन काय करणार? मी ब्राह्मण आहे मला चांगली नोकरी इथे मिळणार नाही. त्यापेक्षा अमेरिकेत जास्त पैसा आहे.” “पण तुला या देशाकरता काही करावसं वाटत नाहीका? त्यागाची आणि निस्पृह सेवेची फार मोठी परंपरा ब्राह्मण लोकांनी मागे ठेवली आहे. हा देश घडवण्यात ब्राह्मणांचा वाटाहि आहे.” मी त्याला म्हटले. तो माझ्या कडे जरा संशयाने पाहू लागला. त्याला वाटले मी त्याची चेष्टाच करतो आहे मग म्हणाला कसला त्याग, सेवाभाव? ह्या फालतू गोष्टी आहेत. माझा जन्म भारतात झाला म्हणून मी भारतीय, ब्राह्मणाच्या घरी झाला म्हणून ब्राह्मण, यापेक्षा ह्याला काय अर्थ आहे? इतिहास, परंपरा वगैरे म्हणाल तर तो प्रत्येक देशाला असतोच. या देशात जन्मल्या पासून आमच्याकडे संशयानेच पाहिले जाते. कुठे कोणी दलितांना मारहाण केली कि ब्राह्मणाना शिव्या देतात. २००-३००-१००० वर्षापूर्वीच्या गोष्टी काढून आम्हाला धारेवर धरतात. भ्रष्टाचार, विषमता, अन्याय यांनी बरबटलेले लोक आम्हाला त्यांच्या अवस्थे करता जबाबदार धरतात.हे म्हणजे स्वतः रस्त्यावर घाण करायची आणि अस्वच्छतेबद्दल बोम्बालायाचे तसे झाले. महाराष्ट्रात एव्हढ्या दलितांवर अत्याचाराच्या घटना घडल्या त्यात एक तरी ब्राह्मण सापडला का? पण येता जाता आम्हाला टोमणे मारले जातात.आरक्षणाचे फायदे दशकानुदशके घेऊन मागास राहणारे समाज ब्राह्मणांना त्यांच्या मागासलेपणा साठी जबाबदार धरतात. १०००- १२०० वर्षापूर्वी आलेले मुसलमान इथले पण ५००० कि १०००० वर्षापूर्वी आलेले ब्राह्मण मुळचे आर्य आणि म्हणून बाहेरचे, जरा कुठे खुट्ट झाले कि आम्हाल बाहेर फेकून द्यायची भाषा , तस कशाला? आम्हीच बाहेर जातो कि. दुसर्या देशात आम्ही उपरे असू कदाचित पण मग इथे कोण आम्हाला आपलं मानतय? इथे तरी आमची मूळ कुठे रुजली आहेत? ती उखडून फेकून दिलीच आहेत कि या समाजाने. आम्ही तर मूल नसलेले लोक आहोत. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही राहा इथे मला तर खर असं काही वाटत नाही.”
हे त्याचे विचार सर्वथैव बरोबर आहे असे नाही.(नव्हे मला तरी ते चुकीचेच वाटले पण तो प्रश्न नाही, तो आणि त्याच्या सारख्या बऱ्याच तरुणांना हे असाच काह्हीसे वाटतंय हि वस्तुस्थिती आहे.) ते प्रातिनिधिकही नाहीत पण अगदीच अपवादात्मक ही नाहीत. मला भेटलेले बहुसंख्य ब्राह्मण तरुण असेच काहीसे विचार करणारे भेटले. हे फार भयावह आहे. मन उद्विग्न करणारे आहे या देशात आमची पाळमूळ नाहीत हे त्याचे उद्गार मला जास्त अस्वस्थ करून गेले. पण आहे हे असे आहे. त्याला कोण काय करणार? समाजातला एखादा वर्ग स्वतःला असं इतरापासून, या देशाच्या संस्कृती, इतिहासापासून तुटल्यासारखा/ दुरावाल्यासारखा मानु लागला तर ते निश्चितच उद्वेगजनक आहे.
---आदित्य

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्राह्मण ही रूढार्थाने मानलेली म्हणून एक जात आहे.
बाकी खरे तर जातीवरून भेद करण्या पेक्षा गुणकर्मविभागशः जर माणसांची ओळख मानली नि सर्वांशी समान भावनेने वागले तर काही अडचणी येणार नाहीत.
त्याला योग्य शिक्षण लागते नि कुठल्याहि जातीच्या, धर्माला ते शक्य आहे - करण्याची इच्छा पाहिजे.
बाकी एक जात, धर्म यावरून माणसा माणसांत वैर येणे ही जुनीच मानवप्रवृत्ती आहे, जात नाही तर त्वचेचा वर्ण, भाषा कशावरूनहि भेद करता येतात.
सत्ता, संपत्ती यांची अमर्याद वासना यामुळे, जगातले ब्राह्मणच काय, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध इ. धर्माचे लोक, कुठलीहि जात धर्म नसणारे लोक, कोणतीहि भाषा असणारे लोक, कुठल्याहि वर्णाचे लोक भरडले जातात.
मग त्यातल्या त्यात सुख, स्थैर्य शोधण्यासाठी स्थलांतर, जुने विसरणे हे करणे प्राप्त होते.

>>वाचनीय आणि विचार करायला लावणारा लेख :-<<

अतिशय भावनेच्या भरात लिहिलेला वाटतोय तो लोकसत्तेतला लेख. आम्हिहि सॅम पिट्रोडा, राजीव गांधींच्या जमान्यात कॉलेजमध्ये होतो पण त्यात उल्लेख केलेलं मास एक्झोडस मुंबईत तरी पाहण्यात आलं नाहि...

लेख थोडा फार फेच्ड वाटला तरी
"माझा जन्म भारतात झाला म्हणून मी भारतीय, ब्राह्मणाच्या घरी झाला म्हणून ब्राह्मण, यापेक्षा ह्याला काय अर्थ आहे?" या वाक्याशी एकदम सहमत.

या जातींच्या टायटल्स चा एकमेकांना शिव्या घालणे, भडक व्हॉ अ‍ॅ आणी फेसबुक पोस्ट लिहीणे, आणि 'अमुक जात स्टाईल चा स्पेशालिटी पदार्थ' रेसिपी देवाण घेवाण यापलिकडे काहीही उपयोग होत नाही.प्रॅक्टिकल आयुष्यात(शहरातल्या तरी) त्याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणताच परीणाम नाही.

लेख संकुचित वाटला. ब्राम्हण या ग्रुपच्या ज्या समस्या आहेत त्याच थोड्याफार फरकाने ओपन गटातील, नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट गटातील सर्वांच्या आहेत. अगदी आडनाव दलित असलेल्या व्यक्तीलाही सुटका नाही उदा आपले राष्ट्रपती.
त्यामुळे ब्राम्हण ब्राम्हण करत न बसता सर्व समविचारी व समदुःखी लोकांनी एकत्र येणं महत्वाचं.
तसंही आंजा विवाह व जुन्या समाजव्यवस्था, रूढी मागे पडणं उदा. व्हेज ची सक्ती , हे झाल्यामुळे आता ब्राम्हण व इतर असा काय फरक उरलाय..त्यामुळे थोडं कालबाह्य वाटलं लेखन.