खांडववनदाह, महाभारतातील हत्याकांडाचे एक आकलन - ५ (अंतिम)

Submitted by अतुल ठाकुर on 7 May, 2017 - 00:24

1200px-Krishnarjunas_fight_with_Gods.jpg

कथनशास्त्राच्या दृष्टीने अनेक घटकांमधून खांडववन दाह कथेचा अर्थ लावण्याचा हा प्रयत्न आहे. त्यात अजूनही अनेक शक्यता दडलेल्या आहेत. अर्थ लावणार्‍यांचा भर नक्की कशावर असेल त्यावरदेखिल बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. यालाच Genette याने Focalisation म्हटले आहे. अर्थ लावणारा मार्क्सवादी असल्यास बहुधा हा अर्थ आर्थिक पाया लक्षात घेऊन लावला जाईल. जर अर्थ लावणार्‍याला सांस्कृतिक बाबी महत्त्वाच्या वाटल्या तर तो त्या दृष्टीने अर्थ लावेल. अशा तर्‍हेने अगणित शक्यतांच्या खुणा दर्शविणारे कथनशास्त्र हे अतिशय समृद्ध असे शास्त्र आहे.

खरं तर अगदी आजच्या काळातदेखिल एखादी जागा रिकामी करायची असेल तर तिला आग लावून देण्याचा घटना अगदीच दुर्मिळ नाहीत. त्यामुळे तीन हजार वर्षापूर्वी असा काही उपाय अंलात आणला गेला असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको. महाभारतात कित्येक शतके प्रक्षेप होत आला. अग्निला अपचन झाल्याची आणि ब्रह्माने त्याला खांडववन भस्मसात करण्याची अनुज्ञा देणे हे मागाहून जोडलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी अशी काही कारणमीमांसा जोडल्याशिवाय ते सहजपणे स्विकारलं जात नाही. मात्र उडणार्‍या पक्षांनादेखिल अर्जून हसत हसत बाणाने तुक्ड करून अग्नित टाकत होता हे वाचल्यावर ही तेथिल प्राणीमात्रांची, मनुष्यांसकट केली गेलेली शिकार होती असं वाटल्याशिवाय राहवत नाही. या शिकारीतून फारच थोडी माणसं वाचली. त्यात मयासूर होता. ज्याने पुढे मयसभा बांधली. कुणीही बांधू शकणार नाही आणि कुणाकडेही नसेल अशी मयसभा बांधू शकणारा मयासूरच नेमका वाचला हा मोठाच योगायोग वाटतो. तो शरण आला होता म्हणतात. शरण आलेल्याला जीवनदान देणे हे क्षत्रियांचे कर्तव्यच. म्हणजे बाकी सर्व मुकाट, गप्प राहून, हालहाल होऊन मेले असेच म्हणावे लागेल. कुणीच आपला जीव वाचावा म्हणून त्यांची करुणा भाकली नसेल?

श्रीकृष्णाची मानवी बाजु दाखवणारी खांडववनाची ही कथा म्हणजे मानवी व्यक्तीमत्वाला देवत्व प्राप्त झाल्यावर त्याच्या आयुष्यातील वादग्रस्त बाजु कशी सफाईदारपणे झाकली जाते याचे एक ठळक उदाहरण आहे. मूळात महाभारत कथेत यावर कसलेही भाष्य केलेले नाही. ज्या तर्‍हेने आतील सर्व प्राणीमात्रांना ठार करण्यात आलं त्याचे कुठल्याही तर्‍हेने समर्थन करता येत नाही. मात्र पुढे श्रीकृष्णाला भगवान म्हणण्यात आल्यावर या कथेची निरनिराळी स्पष्टीकरणे देण्यात आली. समाजात भागवत संप्रदाय उदयास आला. वैष्णव संप्रदाय तर होताच. श्रीकृष्णाला दशावतारात स्थान देण्यात आले. अशावेळी राज्यविस्तारासाठी जागा मोकळी करावी म्हणून खांडववन जाळण्यात आले आणि पुढे त्याचा राग मनात ठेवून कुणी सूड उगवू नये म्हणून असेल कदाचित पण त्यातील यच्चयावत प्राणीमात्रांना ठार मारण्यात आले. हे प्राणीमात्र म्हणजे फक्त पशू पक्षीच नसून तेथे राहणार्‍या मूळच्या जमातीदेखिल होत्या. असे स्पष्टपणे मान्य करणे हे भक्तीमार्गात शक्य नव्हते. भगवंताच्या आयुष्यावर डाग असणे हे समाजातील भाविकांना परवडणारे नसते. त्यामुळे या हत्याकांडाचे समर्थन करणारी निरनिराळी स्पष्टीकरणे देण्यात आली. हे जरी खरे असले तरी कथनशास्त्राच्या माध्यमातून त्यावेळी नक्की काय घडले असावे याचा एक अंदाज बांधता येतोच.

त्यानूसार कथेच्या वरवर दिसणार्‍या आवरणाच्या अंतरंगात खांडववन दहनामागे राज्यविस्तार आणि मिळालेले राज्य सुरक्षित करणे हाच उद्देश असावा असे वाटते. मात्र ही घटना घडून गेल्यावर त्याचे काय परिणाम होतील याची काळजी घेणे भाग असते. समाजमनाला समाजाच्या आरोग्याची काळजी असते. समाजात निरनिराळ्या प्रवृत्तीची मंडळी वावरत असतात. त्या सर्वांना बरोबर घेऊन चालणे हे अनेकदा ज्याला "सोशल ऑर्डर" म्हणतात ती राखण्यासाठी आवश्यक होऊन बसते. त्यामुळे स्पष्ट असलेल्या मूळ कथेतील कंगोरे आणि गैरसोयीचे मुद्दे गाळून पुढे ही कथा वेगळ्या आणि अनेकदा सौम्य स्वरुपात समोर ठेवली जाते. हे योग्य की अयोग्य याबाबत येथे भाष्य करता येणार नाही. मात्र कथनशास्त्र हे ही कथेमागची कथा शोधण्यासाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे शास्त्र आहे हे यात नक्की दिसून येते. निरनिराळे थर बाजूला काढून आपण जेव्हा याचे अंतरंग तपासतो तेव्हा जर गैरसोयीचे असे काही दिसले तरी त्याची स्पष्टीकरणे देणारी माणसे आहेतच. एक अतिशय प्रामाणिक स्पष्टीकरण इरावतीबाईंनी युगान्तमध्ये देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणजे धर्म युद्ध नीतिनियम हे फक्त आपल्या समाजाच्या आणि आपल्या लोकांच्या बाबतच पाळण्याची पद्धत असावी. बाहेरच्या बाबतीत दयामाया दाखवण्याची गरज भासत नसावी.

हे स्पष्टीकरण न पटण्याचं एक कारण म्हणजे पुढे खुद्द युद्धात दोन्ही पक्षांनी आपल्याच माणसांबद्दल दयामाया दाखवलेली दिसली नाही. "दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी" असं काही म्हणणारे संत बहुधा त्या काळात नसावेत. दुसरं अतिशय जबरदस्त स्पष्टीकरण हे त्या त्या वेळची संस्कृती, त्यावेळचे नीतिनियम, रुढी, यानूसार तो प्रसंग घडला. आताच्या नियमांच्या फूटपट्टीने ते मोजता येणार नाही. याला माझ्या समजूतीप्रमाणे "कल्चरल रिलेटिवीजम" म्हणतात. यात तथ्य आहेच. पण या सापेक्षतेमध्ये एक फसवेपणा आहे आणि त्याच्या आड या हत्याकांडाचे समर्थन केले जाते अशी माझी स्पष्ट समजूत आहे. महाभारतकाळी नियोग सामान्य होता. आता तसे नाही कारण मूल्ये बदलली आहेत वगैरे उदाहरणे मंडळी अशावेळी देऊ लागतात. जी पटत नाहीत. कुणाचातरी जीव घेणे ही घटना सर्वस्वी वेगळी मानण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचे समर्थन कुठल्याही सापेक्षतेच्या नियमाने करता येणे शक्य नाही असे मला वाटते. आमचं हक्काचं राज्य दिलं नाही म्हणून युद्ध करून पांडवांनी भाऊ, गुरु, आजा या सर्वांना कापून काढले. त्यांनी कापले नसते तर पांडव त्यांच्याकडून कापले गेले असते. मात्र या युद्धाची तुलना खांडववनातील दाहाशी करताच येत नाही.

आपल्या भागात सुखाने राहणारे, अगदी आतल्या भागात आनंदाने विहार करणारे, ज्यांचा कुणाला त्रास आहे, ज्यांनी कुणावर हल्ला केला आहे असा ज्यांचा स्वभाव नाही अशा पशू, पक्षी, माणसे यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मिळवून ठार मारण्यात आले आणि जमीन रिकामी करण्यात आली. हे करीत असताना जो पुढे उपयोगी ठरणार होता त्यास जीवदान देण्यात आले. तक्षकाच्या मुलाला दिले गेलेले जीवदान हा एक अपवादच म्हणावा लागेल. आम्हाला ही जमीन हवी आहे. ती कुठल्याही प्रकारे मिळविण्याचा आमचा हक्क आहे. त्यासाठी वाटेल ते उपाय आम्ही करु. अशा विचारसरणीनेच या कृतीचे समर्थन करता येते. महाभारताच्या तूलनेने अलिकडचा काळ म्हणता येईल त्या मौर्य, गुप्त काळात भारतात राज्ये जिंकण्याची प्रवृत्ति ही क्षत्रियांमध्ये अगदी "नॉर्मल" मानली जात असे. त्यासाठी दुसर्‍या राज्यात साम, दाम, दंड, भेद यांचा सर्रास वापर केला जात असे. दया हे काही त्या काळातलं सर्वमान्य मूल्य नसावच असं वाटतं. दया ही अपवादात्मक गोष्ट. बहुधा अशोकाच्या कलिंग युद्धानंतर दया, क्षमा, करुणा यांना महत्त्व येऊ लागलं असावं.

मानवी इतिहासात एखादं सार्वकालिक, शाश्वत मूल्य आहे की नाही असा प्रश्न खांडववनाच्या कथेने पडतो.

(समाप्त)

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.
मानवी इतिहासात एखादं सार्वकालिक, शाश्वत मूल्य आहे की नाही असा प्रश्न खांडववनाच्या कथेने पडतो. - हे अगदी पटले.
सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या न्यायानुसार लोक वागले. सत्ता, संपत्ती , (आणि हव्यास, लोलुपता...) ही मात्र सार्वकालीक मानवी मूल्यं (?) म्हणता येतील. यांचा प्रत्यय ठायीठायी येतोच. औरंगझेब असो वा तैमूर लंग....
आणी शेवटी श्रीकृष्णा ने केले ते सर्व अलौकीक, सर्व मान्य, नैतीक ........... ही धारणा तर आहेच!

खांडववन दाहाचे दुसऱ्या बाजूने विवेचन पण आपणांस करता येईल का? निरपराध जनांची राज्यविस्तार कारणाने झालेली हत्या ही एक बाजू झाली. Why it was for greater good or necessary evil? How and what strategy comes into play as a ruler. Just a thought.

लिहिलेत तर वाचायला दुसरी बाजू पण आवडेल.

एकूण महाभारताबद्दल लईच गोंधळ आहे. महाभारत खरं होतं मानायचं तर सगळ्याच चांगल्या वाईट गोष्टी खर्या मानायच्या का? कारण खूप गोष्टी आता सायन्स फिक्शन म्हणाव्या लागतील अशा आहेत.
मग हे सगळं कोणीतरी नन्तर जोडलं, figment of someones imagination असं म्हणावं लागतं. पण तसं असेल तर मग खांडववन घटना काल्पनिक आहे का? ती देखील तिसर्याच कोणीतरी मनाने रचली असेल का?
की फक्त खांडववन खरी, कृष्ण अर्जुन खलनायक आणि बाकीचं मात्र सायन्स फिक्शन. पण हे illogical होईल ना.
बाकी मग पुरावा काहीच नाही फक्त स्पेक्युलेट करायचं आहे तर जो तो आपापल्या आयडियोलॉजीचा चष्मा लावून हेट्रेड किंवा लव्ह बेस्ड स्पेक्युलेट करणार.

बरोबर सनव आणि राजसी,
वरदा ,या निमित्ताने कुठल्याही ग्रंथाची मूळ प्रत कशी जुळवतात, याबद्दल काही लिही शकाल का?
कुठल्याही ग्रंथात (रामायण महाभारत महाकाव्ये असल्याने त्यात प्रक्षिप्त भाग वेगवेगळा आणि जास्त असणार हे आलेच)कुठला भाग प्रक्षिप्त आहे हे कसे ठरवतात?

आपला समाज म्हणजे एक जबरदस्त रसायन आहे. सोयीस्कर तेव्हढे घ्यायचे, सोयीस्कर असेल तर रामायण महाभारत हा खराखुरा इतिहास, अडचणीचे असेल तेव्हा घुसडलेले आहे असे म्हणून मोकळे व्हायचे . खरंच, रामायण महा भारताबद्दल आपआपल्या आयाडोलोजी नुसार घेतल्या जाणाऱ्या सोयीस्करतेचा खराखुरा गोंधळ आहे.

मला पण एक पडलेला प्रश्न.
देवत्व आणि योद्ध्यांचं अतीमानवी सामर्थ्य बाजुला ठेवून या कथेकडे बघितलं तरः
खांडववनाचे क्षेत्रफळ किती असावे? पंधरा दिवस जळत होते म्हणजे एखाद्या एकराएवढे छोटे नसावे.
तिथे राजधानी वसवली म्हणजे त्याकाळच्या मानाने साधारण ४ चौरस किमी असेल?
एवढ्या मोठ्या जागेला आग लावून त्यातून पळून जाणारा जवळपास प्रत्येक जीव नष्ट करणे हे दोघांना कसे शक्य होईल?
म्हणजे सोबत बर्‍यापैकी फौजफाटा असायला हवा. सर्व बाजूंनी कोंडी करायला हवी, आणि एकाच वेळेस अनेक बाजूंनी आग लावायला हवी.
राजधानी म्हणा की मुख्यनगर /मुख्यवस्ती म्हणा वसवण्यासाठी एखादे वन त्यात रहाणार्‍या टोळ्या प्राण्यांसकट जाळायचे असेल तर, असेच व्ह्यायला हवे.
असा फौजफाटा सोबत असेल तर ही कथा, मूळ कथानकात कशा रितीने बसते? तसा वाव आहे का?

त्याकाळातील सामाजिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन रचलेले महाकाव्य असे वर्णन करावे लागेल.
उदा. आजच्या जमान्यातील चित्रपट. आजचे रजनिकांतचे चित्रपट पुढच्या ५०००-७००० वर्षानंतर कोणी पाहिले तर इ.स. २०१७ मधे असे चमत्कार करणारा मानव पृथ्वीतलावर होता? असा प्रश्न तत्कालिन समाजाला नक्कीच पडेल. परंतू सत्य परिस्थिती काय आहे? की रजनिकांतचे सगळे अ‍ॅक्शन हे दिग्दर्शकाच्या डोकॅलिटीमधून आले आहे. हे आपल्याला आता माहीती आहे. पण ५०००-७००० वर्षानंतर हे सांगायला आपल्यातले कोणी असेल का ? आपल्यातले सोडा आपल्या वर्तमानाचे रेकॉर्ड वगैरे सांभाळून ठेवणारे तरी असतील का? नाही
साहजिकच त्यावेळेचा समाज यातील बर्‍याच गोष्टींना त्यावेळेच्या विज्ञानाच्या ज्ञानाच्या आधारावर तपासून बघेल मग ते खरे मानेल अथवा खोटे मानेल.

तसेच महाभारत , रामायण यांचे आहे

राज्यविस्ताराचा उल्लेख आला आहे, तर कुरुंचं (कौरव आणि पांडवांचं मिळून) राज्य साधारणपणे कुठल्या भागात विस्तारलेलं होतं, याची माहिती घ्यायला हवी.
https://www.wdl.org/en/item/144/ ह्या वेबसाईटवर महाभारतकालीन राज्यांचा नकाशा दिलेला आहे. तो नवीन पानावर उघडून व्यवस्थित मोठा करून पाहता येतो.

त्या नकाशाची आजच्या ठिकाणांशी तुलना करण्यासाठी गुगल मॅपवर उत्तराखंड राज्य, मनाली, कुरुक्षेत्र, करनाल, पानिपत, सोनिपत, रोहतक, इंद्रप्रस्थ (दिल्ली), तिलपत, गुरुग्राम, मीरत / मेरठ, बागपत, बर्नावा, हस्तिनापूर इत्यादी ठिकाणं कुठे आहेत ते पाहिलं की महाभारतकालीन कुरु राज्याचा विस्तार साधारण किती होता ते लक्षात येतं.
कुरु राज्य साधारणपणे आजचा हिमाचल प्रदेशचा काही भाग, हरियाणाचा काही भाग, दिल्ली, उत्तर प्रदेशचा काही भाग आणि उत्तराखंड राज्य यात पसरलेले होते.

प्राचीन कुरु राज्य तीन विभागात विस्तारलेलं होतं - कुरु, कुरुजांगल आणि कुरुक्षेत्र. (यात कर्णाला दिलेल्या अंग देशाचा विचार केलेला नाही.)

१. कुरु प्रदेश - हा निवासी वस्ती असलेला प्रदेश होता. हा बहुतांशी गंगा नदीच्या आसपास वसलेला होता. यात हिडिंबेचं राज्य असलेला मनालीचा आणि मनालीच्या आसपासचा प्रदेश, प्राचीन काळच्या शतद्रू म्हणजेच आजच्या सतलज नदीच्या दक्षिणेला असलेला उतराखंड राज्याचा प्रदेश, तसंच उत्तर प्रदेशमधले बागपत, बर्नावा (वारणावत), हस्तिनापूर, आणि त्याच्या आसपासचा गंगाकिनारी असलेला इतर प्रदेश यांचा समावेश होता.

२. कुरुजांगल - कुरुजांगल हा कुरु राज्याचा प्रामुख्याने जंगलांनी भरलेला प्रदेश होता. प्राचीन काळी कौरव पांडवांचा पूर्वज असलेल्या कुरु राजाने तिथल्या जंगलाचा भाग तोडून तिथे स्वतः नांगर चालवून तिथली जमीन शेतीयोग्य बनवली होती, म्हणून त्या प्रदेशाला कुरुजांगल असे नाव पडल्याचा उल्लेख आहे. कुरुजांगल प्रदेशाचेही दोन मुख्य भाग होते.
पहिला भाग हा रोहितक - वनाने व्यापलेला रोहितक प्रदेश म्हणजे आजचे हरियाणातले रोहतक.
दुसरा भाग हा खांडवप्रस्थाचा - ह्यात खांडववन होते (मयराष्ट्र - आजचे मीरत/ मेरठ ते दिल्लीच्या आसपासचा भाग ह्या भागात खांडववन साधारणपणे पसरलेले होते), तसेच खांडवप्रस्थ (नंतरचे इंद्रप्रस्थ - आताचे दिल्ली), पणप्रस्थ (विणकरांचे गाव किंवा अविस्थल - मेंढ्यांचा प्रदेश, किंवा कुशस्थल - गवताळ प्रदेश या नावांनी ओळखले जाणारे - आताचे पानिपत), स्वर्णप्रस्थ (आताचे सोनिपत) इत्यादी गावं पांडवांच्या राज्यकालाच्याही आधीपासून वसलेली होती.
याशिवाय काही जणांच्या मते हरियाणातल्या हंसी आणि हिसार गावांचाही पूर्वीच्या कुरुजांगल भागात समावेश होता.
कुरुजांगल प्रदेशाच्या पश्चिम सीमेवर काम्यक वन होते.

३. कुरुक्षेत्र - कुरुक्षेत्र हा सपाट मैदानी प्रदेश होता. ह्यात स्थानेश्वर - आजचे थानेसर, कपिस्थल - आजचे कैथल आणि करनाल यांचा समावेश होता. कुरुक्षेत्रात सरस्वती, ओघवती, अपगा, हिरण्वती आणि दृषद्वती या नद्या वाहत असल्याने तिथे प्राचीन काळीही अनेक पुण्यतीर्थे होती. ह्या प्रदेशात मोठमोठी सरोवरे आहेत. मात्र तेव्हा कुरुक्षेत्रात निवासी वस्ती फारशी नव्हती.

प्राचीन काळी इतका मोठा विस्तार असलेल्या कुरु राज्याचे धृतराष्ट्राने दोन भाग केले. त्यातला खांडवप्रस्थाचा भाग त्याने युधिष्ठीराला दिला असा जरी उल्लेख असला, तरी प्रत्यक्षात पूर्ण कुरुजांगल प्रदेश पांडवांना दिला गेला होता. (महाभारतातल्या काही स्थानांच्या उल्लेखांवरून हा निष्कर्ष काढलेला दिसतो.) तसंच कुरुजांगल प्रदेशाला लागूनच असलेला वृकस्थल /वृकप्रस्थ / व्याघ्रप्रस्थ ह्या नावाने ओळखला जाणारा आजच्या बागपतचा प्रदेश आणि वारणावत म्हणजे आजचे बर्नावा हे दोन प्रदेशही पांडवांना दिले गेले असावेत, कारण नंतर युद्धापूर्वी समेटाच्या प्रयत्नात पांडवांनी जी पाच गावे मागितली होती त्यात या प्रदेशाचा समावेश होता.
(अवांतर - पांडवांनी मागितलेली गावे - अविस्थल(पानिपत), वृकस्थल(बागपत), माकंदी, वारणावत(बर्नावा) आणि पाचवं कोणतंही एक गाव. दुसर्‍या एका उल्लेखानुसार ही पाच गावे - इंद्रप्रस्थ (दिल्ली), पणप्रस्थ (पानिपत), सोनप्रस्थ - सोनिपत, तिलप्रस्थ (तिलपत), व्याघ्रप्रस्थ(बागपत) अशी आहेत.)

खांडवप्रस्थात आधीपासून असलेल्या गावांच्या नजीकचं जंगल हळूहळू तोडून तिथल्या गावकर्‍यांना शेतीयोग्य जमीन उपलब्ध करून देत युधिष्ठीराने त्या गावांचा विकास केला होता आणि त्यामुळे खांडवप्रस्थ पूर्वीपेक्षा अधिक संपन्न झाले होते असा उल्लेख महाभारतात आहे.

अशा पद्धतीने हरियाणामधल्या गावांजवळच्या कमी दाटी असलेल्या जंगलांची हळूहळू तोड करून युधिष्ठीर तिथे मोकळी जमीन उपलब्ध करून देत असतांना आणि ते जास्त सोपं असतांना, एकाएकी घनदाट असलेले खांडववन जाळण्याचा निर्णय अर्जुन घेतो आणि तेही जंगल जाळण्याची कोणतीही नीट पूर्वनियोजित योजना नसतांना (म्हणजे जंगल टप्प्याटप्प्याने जाळणे, तिथल्या रहिवाशांची राहण्याची पर्यायी व्यवस्था करून त्यांना तिथे पाठवणे, तिथल्या हत्तींना पकडून माणसाळवणे इत्यादी काही विचार न करता) तो जंगल जाळतो आणि तेही तुमच्या मतानुसार अग्नी किंवा ब्रह्मदेवाने असं काहीही मागणं मागितलेलं नसतांना, फक्त राज्यविस्तारासाठी हे पटत नाही. पानिपत ते दिल्ली हा गावं असलेला भाग दिल्ली ते मीरत या खांडववनाच्या भागापेक्षा जास्त विस्तारित आहे आणि सुपीकही आहे. आज या भागात लांबलचक शेतं पसरलेली दिसतात.

खांडववन जाळण्याच्या प्रक्रियेत युधिष्ठिर किंवा अन्य पांडवांचा सहभाग नसणं, त्यांना याबद्दल आधी काही माहिती नसणं हेच दर्शवतं, की ही घटना अचानक घडलेली आहे आणि कुणाच्यातरी म्हणजे अग्नीच्या मागणीवरून घडवून आणली गेली आहे. तसं नसतं आणि अचानक अर्जुनाने खांडववन कोणत्याही कारणाशिवाय जाळलं असतं, तर त्याची गत निश्चित दुष्ट राजा वेनाला ऋषींनी मारलं तशी किंवा सोन्याच्या अति हव्यासापायी पुरुरवा राजाची ब्राह्मणांनी हत्या केली तशी किंवा हैहय - भृगुवंशीय वादात परशुरामाकडून मारल्या गेलेल्या हैहय राजांसारखी झाली असती आणि फक्त नागच नव्हे तर अर्जुनाचे शत्रू असणार्‍या इतरांनीही याच कारणासाठी अर्जुनाचा वध करण्याची संधी सोडली नसती. पण असं काहीही झालं नाही कारण अग्नीने मागणं मागितलं म्हणूनच केवळ अर्जुनाला, कृष्णाला आणि पर्यायाने पांडवांना कोणीही दोष दिलेला नाही.

नकाशात दिल्ली ते मेरठ / मीरत (मयाचे राष्ट्र) हे अंतर साधारणपणे ७० कि.मी. दिसतं. त्याशिवाय दिल्लीच्या दक्षिणेलाही खांडववनाचा थोडासा भाग होता, जिथे तक्षकाचा निवास होता असं म्हंटलं जातं. इतकं प्रचंड अंतर असलेलं हे वन फक्त अर्जुनाने आणि कृष्णाने जाळलं, तेही कोणाची मदत न घेता आणि हे करतांना त्यांनी वनातला एकही प्राणीपक्षी (काही तुरळक अपवाद वगळता) जिवंत सोडला नाही, हे मला तरी पटत नाही. वेगवान रथातून वनाभोवती फेर्‍या घालत, असंख्य बाण सोडत त्यांनी वनातून बाहेर पडणार्‍या पक्ष्यांना आणि प्राण्यांना पुन्हा आगीत ढकललं, तरी नजरेच्या टप्प्यापलिकडे असलेल्या प्राणी आणि पक्षांचं काय? की त्यांना मारण्यासाठी अर्जुन आणि कृष्णाकडे मोशन सेंसॉर लावलेले बाण होते? समजा त्यांच्याकडे इतकी अत्याधुनिक शस्त्रं होती, तर तुमच्या मतानुसार जर अग्नी आला नव्हता, तर त्यांनी ती शस्त्रं / अस्त्रं कोणाकडून मिळवली? कोणत्याही देवाची मदत जर त्यांनी घेतली नव्हती, तर एकट्या अर्जुनाचा कृष्णाच्या सोबतीने केलेला हा पराक्रम ऐकून दुर्योधन चिंतित कसा झाला नाही? कपटाने पांडवांचा नाश करण्याची एखादी योजना त्याने का आखली नाही? कारण उघड आहे, देवांमुळेच खांडववन जाळले गेले, म्हणून दुर्योधन स्वस्थ बसला.

खांडववन जाळले गेले तेव्हा देवांच्या शत्रूंबरोबर वनातले प्राणीपक्षीही मोठ्या प्रमाणावर मारले गेले, हे निश्चित! पण त्यातून एकही प्राणी सुटला नाही ही वर्णन करणार्‍यांनी केलेली अतिशयोक्ति वाटते. बर्‍याचदा आग लागल्यावर त्या आगीने माणसे मरण्यापेक्षा आगीच्या धुरातल्या कार्बन मोनॉक्साईडमुळे जीव गुदमरून माणसे मरण्याचे प्रमाण जास्त असते, असे मी ऐकले आहे. खांडववनातही तसे काही झाले असणे अशक्य नाही. तसेच जंगलात लागलेल्या आगीमुळे छोटे पक्षी जेव्हा उडून जायचा प्रयत्न करतात, तेव्हा आगीची धग जास्त असेल, तर त्या धगीमुळे ते उडता उडताच परत आगीत कोसळतात. असे जरी असले, तरी अर्जुनाने अजिबात प्राणी मारले नाहीत, असे नाही. अश्वसेनाच्या आईला त्याचा बाण लागून ती मरण पावली. तसंच इतर काही नागांना आणि राक्षसांनाही त्याने मारलं असणार. त्याशिवाय आगीमुळे बेभान झालेले हत्तींचे कळप जंगलाच्या बाहेर पडून त्यांनी जंगलाबाहेरची गावं उध्वस्त करू नये, म्हणून अशा हत्तींनाही त्याने वेचून वेचून मारलं असेल. तीच गत लांडगे, कोल्हे, तरसं, वाघ, सिंह ह्या हिंस्त्र प्राण्यांची झाली असणार. ब्रह्मदेवाने आणि अग्नीने खांडववनातले देवांचे शत्रु नष्ट करण्याबरोबरच अर्जुनाकडे वनातल्या प्राण्यांची आहुती मागितली कारण वनातले हिंस्त्र प्राणी किंवा हत्तीसारखे प्राणी वनाबाहेर पडले, तर ते गावंच्या गावं उध्वस्त करू शकतील, ह्याची त्यांना कल्पना असणार.

पण तरीही आगीत सर्वजण मरण पावले, ही अतिशयोक्ति वाटते. कारण नंतर पुढे जनमेजयाच्या काळात उत्तंकाची कथा घडते, तेव्हा उत्तर गंगातीरावरील नागलोकात (उलूपीचा पिता) कौरव्य नागाबरोबर तक्षक नाग आणि अश्वसेन राहत असल्याचा उल्लेख येतो, तसेच तक्षकाचा धाकटा भाऊ श्रुतसेन हा नागांचा अधिपती बनण्यासाठी सूर्याची आराधना करत असल्याचा उल्लेख येतो. याचा अर्थ खांडववनात तक्षकाचा पूर्ण परिवार मारला गेला नसावा.

मयासुराचे (रावणाचा सासरा) खांडववनात राज्य होते आणि ते मयराष्ट्र म्हणून ओळखले जात होते. खांडववन जाळले गेले, तेव्हा मयासुर शरण आला, पण जर एकटा मयासुर वाचला असता, तर एकेकाळचे त्याचे राज्य, राज्यातली प्रजा मारली गेल्यानंतर मयराष्ट्र म्हणून ओळखले जाणे, त्याला आवडले असते का? जर ते पूर्ण राष्ट्रच नष्ट झाले असते, तर त्याची मयराष्ट्र म्हणून पांडवांच्या प्रजेने ओळख राहू दिली असती का? पण त्याची ओळख पुसली गेली नाही, आजही मेरठ, मीरत ह्या अपभ्रंश रूपात ती ओळख शिल्लक राहिली आहे, कारण मयासोबत मयाची प्रजाही वाचली असावी, म्हणूनच तो भाग मयराष्ट्र म्हणूनच ओळखला गेल्याची शक्यता आहे. शिवाय मयसभा बांधतांना मयाला त्याच्या प्रजेची निश्चित मदत झाली असणार.

ज्याच्या नावावरून तो खांडवप्रस्थाचा पूर्ण विभाग ओळखला जात होता, ते खांडवप्रस्थ गाव खांडववनाच्या नजीक असलं, तरी ते खांडववनाच्या सीमेबाहेर होतं. खांडववन जाळण्याच्या आधीपासून पांडव खांडवप्रस्थात राहत होते. खांडववन जाळल्यानंतर मयासुराने स्वतः मयसभेसाठी जमीन शोधली होती आणि ती पांडव जिथे आधीपासून राहत होते, त्या खांडवप्रस्थ गावातच होती. पण मयसभा बांधण्याच्या काळात खांडववनाच्या संरक्षक देवतेच्या - इंद्राच्या नावावरून खांडवप्रस्थ गावाचे आणि विभागाचेही नाव बदलून ते इंद्रप्रस्थ असे करण्यात आले. हे खांडवप्रस्थ किंवा इंद्रप्रस्थ गाव म्हणजे आजची दिल्ली. कर्णाच्या वंशातील एका राजावरून तिचे नाव दिल्ली ठेवण्यात आले, असे म्हंटले जाते, पण दिल्लीच्या नावाच्या अनेक व्युत्पत्तींपैकी एक व्युत्पत्ती म्हणजे देहली या संस्कृत नावावरून दिल्ली हे नाव पडले. देहली या संस्कृत नावाचा अर्थ आहे उंबरा. जिथे खांडववनाची सीमा संपते आणि गावांची निवासी जागा सुरू होते, तो हा देहलीचा उंबरठ्यासारखा सीमा निश्चित करणारा भाग म्हणून दिल्ली असेही मानले जाते.

त्यामुळे मला तरी खांडववन दहन हे राज्यविस्तारासाठी झाले होते, हे पटत नाही. तर अग्नीच्या मागणीमुळेच हे घोर कृत्य झाले आहे, असे माझे मत आहे.

राहता राहिला प्रश्न श्रीकृष्णाचा! खांडववन दहनात मला श्रीकृष्णाची एकूण भूमिका अर्जुनापेक्षा दुय्यम वाटते. त्याची अर्जुनाला झालेली मदत, त्याचा युद्धातला सहभाग आणि नंतर मयासुराला मयसभा बनवण्याचा दिलेला आदेश हे सर्व सहाय्यकाच्या भूमिकेतून झालेले आहे. खांडववन दहनाच्या या प्रसंगाबद्दल शिशुपाल, दुर्योधन, कर्ण आदी कोणीही कृष्ण किंवा पांडवांना दोष दिलेला नाही हे लक्षणीय आहे. महाभारत कथेत खांडववन दहनाचा हा प्रसंग गौरवाने सांगितला गेला आहे, याचे अजून एक कारण असावे. प्राचीन कालचे राक्षस, दानव, दैत्य हे समुदाय आणि त्यांच्यापैकी असुर म्हणवले जाणारे काहीजण हे बहुतांशी नरमांसभक्षक असल्याचे उल्लेख आहेत. जंगलात त्यांच्या हद्दीत शिरलेल्या माणसांना ते ठार करून खात असत. फक्त पराक्रमी माणसे त्यांच्या तावडीतून सुटका करून घेऊ शकत असत, बाकी सर्वसामान्यांचा त्यांच्या तावडीत सापडल्यावर मृत्यु निश्चित असे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये या राक्षस, दैत्य, दानवांबद्दल काहीशी दहशत असे. तीच गोष्ट नागांच्या बाबतीत होती, नाग हे विषांचे तज्ञ होते. एखाद्याचा नुसता संशय जरी आला तरी त्यावर ते विषप्रयोग करत असत. दुर्योधनाने विषप्रयोग करून नदीत फेकून दिलेल्या भीमावर नागांनी संशयाने स्वतःकडच्या विषांचा प्रयोग केला होता आणि त्या विषाने भीमाचं विष उतरलं होतं. नंतर भीम हा आर्यक नागाचा खापरपणतू आहे हे कळल्यावर तिथे भीमाचा उत्तम पाहुणचार झाला होता. पण नागांकडे असलेल्या विषांमुळे सहसा सामान्य माणसं त्यांच्या वाटेला जात नसत. त्यामुळेही खांडववन दहनाचा प्रसंग अर्जुन आणि श्रीकृष्णाचं कौतुक करत, जास्त रंगवून सांगितला गेला असावा, असा माझा कयास आहे.

बाकी इतर देवांबद्दल बोलायचं झालं, प्राचीन कथांमध्ये तरी देवांबदद्ल लपवाछपवी न करता लिहिलेलं आहे, नंतरच्या काळातल्या लोकांनी उगीच त्या मूळ कथांवर वेगवेगळी आवरणं घालायचा प्रयत्न केला आहे. चंद्राने बृहस्पतीची पत्नी असलेल्या तारेला पळवले होते आणि तिला त्याच्यापासून बुध हा मुलगा झाला होता. इंद्राने आपल्या सावत्र मातेच्या गर्भात असलेल्या जीवांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, त्यातून मरुद्गणांचा जन्म झाला इत्यादी गोष्टी संगितलेल्या आहेतच. कृष्णाच्या बाबतीत कृष्ण जरासंधाविरुद्ध न लढता मथुरा सोडून गेला म्हणून त्याला कौतुकाने रणछोडदास म्हंटलं गेलं आहे. पूर्वीच्या काळी विविध कारणांमुळे दुसर्‍या व्यक्तीची हत्या करणे ही कृती अतिशय सर्वसामान्य होती, त्यामुळे खांडववनात मारल्या गेलेल्या जीवांमुळे कृष्णाच्या नावाला बट्टा लागतो, वगैरे विचार तेव्हाच्या लोकांनी केला असेल का, याचीच मला शंका वाटते.

असो. मानवी जीवनात कोणतंही सार्वकालिक मूल्य असो किंवा नसो, पण हजारो वर्षांच्या कालावधीत मानवाची जीवनपद्धती पूर्वीपेक्षा अतिशय बदललेली असूनही मानवाच्या मनात असलेल्या आदीम प्रेरणा मात्र आजही तशाच आहेत, हे निश्चित.

धन्यवाद!