टर्कीश कबाब आणि पिडे - खाऊगिरीचे अनुभव ४

Submitted by सुमुक्ता on 2 May, 2017 - 09:40

मागच्या कोणत्यातरी लेखात मी म्हटले होते की टर्कीश कबाब ही ऑस्ट्रेलियाची खासियत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या गेल्या पहिल्या एक-दोन दिवसांमध्येच कबाब आणि पिडे ह्या दोन्ही पदार्थांशी माझी ओळख झाली. ऑस्ट्रेलियात गल्लोगल्ली टर्कीश कबाब शॉप्स आहेत (म्हणजे तेव्हा होते) अगदी स्वस्तात मस्त पोटभरीचे जेवण म्हणजे कबाब किंवा पिडे. टर्कीश कबाब खाण्याआधी मला कबाबचे विविध प्रकार असतात हे माहित नव्हते. कबाबचा अर्थ भाजलेले मांस हेही माहीत नव्हते!!! मांस भाजायच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक देशामध्ये कबाबचे विविध प्रकार आहेत. सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे शिश कबाब आणि डोनर कबाब. हे दोन्ही प्रकार टर्कीश आहेत. शिश कबाब म्हणजे मांसाचे तुकडे काडीवर लावून भाजणे (Skewers). डोनर कबाबमध्ये एका मोठ्या काठीवर मांस ठेवून सर्व बाजूनी ज्वाळांवर भाजतात. वरच्या बाजूचे मांस शिजले की ते तासून काढले जाते. हे तासून काढलेले मांस म्हणजे डोनर कबाब.

शिश कबाब
Shish Kabab.jpg

डोनर कबाब
Doner Kabab.jpg

ऑस्ट्रेलियाच्या टर्कीश कबाब शॉप्समध्ये डोनर कबाबचे रॅप्स मिळायचे. टर्कीश लवाश ब्रेडचे हे रॅप्स फार मस्त लागायचे. त्यात चिकन, लॅम्ब आणि मिक्स्ड (चिकन आणि लॅम्ब एकत्र) कबाब असे प्रकार असायचे. शाकाहारी फलाफल कबाब पण मिळायचे. फलाफल म्हणजे चण्याच्या पिठाची (चिकपी) तळलेली भजी. कबाबला स्वत:ची चव तशी फार नसते. रॅप्समध्ये घातलेल्या सॅलड्स आणि सॉसेसनी कबाबला चव येते. मला आणि नवऱ्याला लवाश ब्रेड फार फार आवडायचे. पुष्कळ वेळा पोळीच्या ऐवजी आम्ही भाकरी सारखे हे लवाश ब्रेड खायचो. त्यामुळे हे रॅप्स आम्हाला अतिप्रिय होते हे सांगणे नकोच

फलाफल
Falafel.jpg

टर्कीश लवाश ब्रेडवर हमस (छोले मॅश करून केलेली एक प्रकारची चटणी), गार्लिक सॉस, आपले कबाब आणि वर सॅलड आणि तबुली. तबुली म्हणजे बारीक चिरलेले पार्सली, पुदिना, कांदा, टोमॅटो, बलगूर (गव्हाच्या एका जातीचे सिरीयल. दलियासारखे असते), ऑलिव्ह ऑइल वगैरे घालून केलेली कोशिंबीर!!

तबुली
Tabuli.jpg

आमच्या जवळच्या मॉलमध्ये एक कबाब शॉप होता. गुरुवारी रात्री आम्ही तेथे जायचो. तेव्हा मी उपवास वगैरे करत होते त्यामुळे फलाफल कबाब खाऊन माझा उपवास सुटायचा. आणि हे त्या कबाब शॉप मध्ये काम करणाऱ्या मुलीला पण माहीत झाले होते. त्यामुळे गुरुवारी मी दिसले की लगेच ती फलाफल कबाब आणि वीकएंडला दिसले तर चिकन कबाब बनवायला घ्यायची.

ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्या कबाब शॉप्समध्ये पिडे नावाचा अजून एक प्रकार मिळायचा. पिडे म्हणजे टर्किश पिझ्झा!! त्याचा आकार एखाद्या होडीसारखा असतो. टर्कीश फ्लॅटब्रेडवर आपल्या मनासारखे टॉपिंग्स घालून बेक केले की झाला पिडे. अर्थात त्याची चव पिझ्झाच्या जवळपासही जाणारी नसायची. त्याला खास टर्कीश चव असायची. एग अँड बेकन पिडे आमच्या सर्वात आवडीचा होता.

एग अँड बेकन पिडे
Egg Becon Pide.jpg

युकेमध्ये आल्यापासून चांगला लवाश ब्रेड, चांगले कबाब रॅप्स मिळणे दुरापास्त झाले आहे. युकेमध्येसुद्धा कबाब शॉप्स आहेत पण येथील कबाबला ती मजाच नाही. हे नुसते मी नॉस्टॅल्जियामुळे म्हणत नाही पण येथे कबाब रॅप्स बनवायची पद्धत खूप वेगळी आहे. हमस, तबुली वगैरे येथे काही वापरत नाहीत. ऑस्ट्रेलिया सोडल्यापासून तर तबुली खाल्लीच नाही. युकेमधील कबाब रॅप्स मला विशेष कधी आवडलेच नाहीत. पिडे तर येथे पाहिल्याचेही आठवत नाही. काहीकाही गोष्टी आपण आयुष्यात इतक्या गृहीत धरतो की त्यांची किंमत जेव्हा कळते तेव्हा त्या गोष्टी फार लांब गेलेल्या असतात. असो.

त.टी. फोटो इंटरनेटवरून घेतले आहेत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळ देशापासून दूर गेले कि पदार्थांची चव ( खुपदा स्थानिक पर्याय वापरल्याने ) बदलते.
अरब देशात मात्र, हे सर्व प्रकार ठेचेठेचेला उपलब्ध असतात ! त्यामूळे एकदा ती चव
बघाच !!

श्वार्मा. Happy
ताहिनी सॉस राहिला फलाफल वरचा. ताबुली कधी ऐकली नाही. इथे पार्स्लीच मिळते, आणि टर्निप. आणखी अमेरिकन करायला पिकल पण घालतात. ते तेलात तळलेले बटाटे विथ गार्लिक सॉस. अहाहा.. आणि ती आंबट अळुवडी. Proud

श्वार्मा म्हणतात ना त्याला? >>> बरोबर. मुळ नाव श्वार्माच आहे. मी २ दिवसांपुर्वीच इस्तंबुलमधे मस्त भरपेट खाल्ल्ं त्यामुळे नावाबद्दल अगदी खात्रीने सांगु शकते.

अरे हा टर्किश पिडे एकदम जॉर्जियन खाचापुरीच्या जवळचा आहे. अर्थात दोन्ही देश शेजारी असल्याने भरपूर देवाणघेवाण झाली असणारच.
http://simplyhomecooked.com/khachapuri-georgian-cheese-bread/ इथे पहा खाचापुरी

तबुली इथे तरी बर्‍याच ठिकाणी मिळते आणि मेडीटेरीयन कबाब आणि श्वर्मा पण भरपूर प्रसिद्ध आहेत. बहुतेक टर्कीश, ग्रीक पॉप्युलेशन असेल तर मिळत असतील या डीश

मस्त. पिडे कधी खाल्याचे आठवत नाही. पण हे कबाब मलाही खूप आवडतात. या मेडिटेरेनियन (का आता टास्मेनियन म्हणावे? Happy ) कुझिन्स मधे त्या 'साइड्स' जनरली मस्त असतात, एखाद दोन अगदी आंबट असलेल्या सोडल्या तर. लवाश ब्रेड ही अत्यंत आवडता आहे. भारतीय भाज्यांबरोबर पोळीऐवजी सुद्धा चांगला लागतो.

फलाफल बाबत मात्र सुरूवातीचा उत्साह लगेच मावळला. कारण ते फार कोरडे लागतात. मग काहीतरी मिक्स करून खावे लागतात.

तो उच्चार श्वर्मा आहे का? मी इतके दिवस शावर्मा म्हणत होतो.

श्वर्मा विथ 'श्र' वगैरे लिहिलं की हिंदुत्ववादी अप्रुव्ह होत असावं. कालच हिंदुत्त्ववादी अप्रुव्ह प्लगिन टाकलय क्रोमवर त्यामुळे ब्राउझर श्र सिलेक्ट करतोय बहुतेक. Proud

मी शावारामा म्हणतो. तसेच मागतो. आजवर कुठल्या दुकानदाराने हटकले नाही. ते आणि फलाफल वगैरे ईथेही बरेच मिळते. मला आवडतेही. चिकन सलाडही छान लागते. सोबत तो भाकरीसारखा ब्रेड चवीला. एकटेच कधी असलो जेवायला तर हे सगळे चांगले पर्याय आहेत. गर्लफ्रेंड मोजकेच वार मांसाहार करत असल्याने कधी तिचे ती शाकाहार आणि मी हे मांसाहारात खातो.

पिडे इथे पाहिलेले नाहीत.
फलाफलबद्दल अगदी सहमत फा. प्रचंड ड्राय होतात आणि खाण्याची अजिबातच मजा येत नाही.
त्यामुळे मेडिटेरिनियन रेस्टॉ.ला जायला मी फार उत्सुक नसते.

फलाफल बद्दल माझी पण फा शी सहमती. नॉट अ बिग फॅन. पण शॉवर्मा मस्त! आणखी आवडते पदार्थ म्हणजे यीरो (गायरो), तझिकी, हमस आणी ग्रेशियन डिप.

>>मी इतके दिवस शावर्मा म्हणत होतो.<<

तो गुजराती प्रकार आहे - वर्णन इथे लिहिण्याजोगं नाहि...

फलाफलचे लाडु कुस्करुन त्यात त्यांच्याकडे मिळतो तो व्हाइट सॉस टाकायचा असतो...

सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!!

मूळ देशापासून दूर गेले कि पदार्थांची चव ( खुपदा स्थानिक पर्याय वापरल्याने ) बदलते. >> पदार्थ खरेतर त्या-त्या ठिकाणी जाऊन खाल्ले पाहिजेत. तरच त्याची मजा येते आणि खरी चव कळते.

ताहिनी सॉस राहिला फलाफल वरचा. >>> अरे खरेच की!!

फलाफलबद्दल अगदी सहमत फा. प्रचंड ड्राय होतात आणि खाण्याची अजिबातच मजा येत नाही. >>> नुसते फलाफल खायची मजा येत नाही खरेच पण रॅप्समध्ये छान लागतात.

फोटो अगदी तोंपासुयेत.. Happy मेरा भी फेव फूड..
मागे एकदा मी घरी केलेल्या लेबनीज सॅलड्स च्या रेस्पी इथे दिल्या हो त्या, तबुले ,हमस आणी Baba ghanoush
पनामाला लेबनीज लोकांची संख्या भरपूर असल्याने इथे अस्सल पदार्थच मिळतात..

मस्त लिहिलंय. तबुली मस्त टेम्पटिंग वाटतंय. कशाहीबरोबर साईड म्हणून छान लागेल.

युकेमध्ये आल्यापासून चांगला लवाश ब्रेड, चांगले कबाब रॅप्स मिळणे दुरापास्त झाले आहे. युकेमध्येसुद्धा कबाब शॉप्स आहेत पण येथील कबाबला ती मजाच नाही >>>>>> अगदी. मला शीग कबाब खायला आवडायचे. इथे युकेमध्ये सगळे कच्चे लागतात.

मला पण पिडे पहिल्यांदा खाल्ला होता तेव्हा आवडला होता प्रकार... पण नंतर नंतर तो खूप हेवी व्हायचा संपवायला Proud
मग कधीतरी आठवण आली तरच खातो आता Happy या लेखाच्या निमित्ताने आलीचे Lol

लेबनीज कुझीन मुद्दामून कधी खाल्ल नाही आहे .
एक दोन वेळा श्वार्मा (चुभुद्यघ्या) खाल्लाय , आवडला .
प्रयत्न करता येईल . तबुली मस्त वाटतयं . आवडेल असं वाटतेय .

नविन प्रतिक्रियांकरिता धन्यवाद. स्कॉटलंडमध्ये चांगली मेडिटरेनियन रेस्टॉरंट्स मोजकीच आहेत बहुधा. कबाब टेकअवेज भरपूर आहेत पण ऑस्ट्रेलियन कबाब शॉप्सची मजा नाही.