हुतशेष !

Submitted by चैतन्य दीक्षित on 27 April, 2017 - 07:13

आंच वाढते सृष्टीची
उकळते माझे मन |
त्याला आवरण्यासाठी
वर ठेवतो झाकण |

माझ्या हिरवेपणाचा
रंग देऊन टाकला |
देऊनिया साही रस
झालो सर्वस्वी मोकळा |

उतरती रंग-रस
सारे मनाच्या पक्वान्नी |
आंच वाढता पुनश्च
झाले कोरडे बाजूंनी |

डोळे सृष्टीचे पाहती
वाहतीही धारा काही |
मना मिळे हाबकारा
ओलावते पुन्हा तेही |

झाली पाकसिद्धी अशी
येई दरवळ पक्वान्नी |
माझा नैवेद्य भोगिला
मीच सहस्रमुखांनी |

यज्ञ जाई पूर्णत्वाला
धुपे सृष्टीचा प्रासाद |
हुतशेष काही मन
त्याचा जगाला प्रसाद |

~ चैतन्य दीक्षित

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर!!!

वाह..