शाकाहार, मांसाहार आणि खाद्यसंस्कृती !

Submitted by अदित्य श्रीपद on 23 April, 2017 - 09:45

शाकाहार मांसाहार असे म्हटले कि लगेच माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian? हा प्रश्न लोक विचारू लागतात. आणि त्यावर आपापली मतही अभिनिवेशाने मांडू लागतात. आता Non Vegetarian चं भाषांतर अ-शाकाहारी असे काहीतरी होईल, मांसाहारी नाही म्हणून मुद्दाम वरच्या प्रश्नात तसे लिहिलेले आहे.आम्ही पूर्ण पणे Vegetarian आहोत असे म्हटले तर मग दुध, तूप, लोणी, मध असे प्राणीजन्य पदार्थ खाण टाळावे लागेल. आश्चर्य म्हणजे आपल्या धर्मात ह्या गोष्टी उपासाला देखील चालतात. (मला कधी कधी कळतच नाही आपल्या धर्माचं, म्हणजे एकादशी,चतुर्थीला भाज्या पण चालत नाहीत पण हे उपरोल्लेखित प्राणीजन्य पदार्थ चालतात. गणेश चतुर्थीला कांदा लसूण पण चालत नाही असे म्हणताना कोकणात अनेकांच्याकडे गणेशोत्सवात जेव्हा गौरी बसतात तेव्हा त्यांना मांसाहाराचा / मत्स्याहाराचा नैवेद्य असतो. इतर धर्मांच तसं नसावं. म्हणजे मुसलमानांना डुकराच मांस चालत नाही, तर कधीच चालत नाही काही विशिष्ट वेळी चालते आणि काही विशिष्ट वेळी चालत नाही असं त्यांच्यात नसतं.)बर प्युअर मांसाहारी म्हणावं तर तसे कोणीच नसते म्हणजे मांस शिजवायला लागणारे मसाले, तेल इ. पदार्थ काही मांसाहारामध्ये येत नाहीत. हिंसा, अहिंसा तत्व पाहायचे म्हणावे तर आपण काहीच खाऊ शकणार नाही. कारण वनस्पतींना जीव असतोच.धान्य, बिया फळ फळावळ हि त्यांची पिल्लं/गर्भं असतात कि नाही.आणि झाडांना फळ, फुलं, बिया तुमच्या पोटभरीसाठी येत नाहीत. आपल्या खाण्याचे प्रयोजन म्हणून तयार होणारे अन्न खायचे म्हणवे तर मग आपण फक्त काही फळच खाऊ शकतो उदा. आंबा चिकू फणस वगैरे(पवित्र नारळ नाही). यांचा स्वादिष्ट गर इतर प्राण्यांनी ती फळ खावीत आणि बिया कुठेतरी नेऊन टाकाव्यात ज्यामुळे त्या झाडांची प्रजा वाढेल असा हेतू त्यामागे असतो. पण आपण किती जण खाल्लेल्या फळांच्या १ टक्का तरी बिया कुठे तरी पेरतो. आणि खाणच का? ह्य न्यायाने मग रेशीम, चामडे, सौंदर्य प्रसाधने, औषधे, काही काही वापरता येणार नाही. मग काय करणार?
मुळात माणूस शेती करू लागला तेव्हाच माणसाला संस्कृती उभी करता आली म्हणून पुढे हे हिंसा-अहिंसा, शाकाहारी-मांसाहारी वगैरे चोचले पुरवायची सोय झाली. शेतीचा गंधही नसलेल्या आदिवासींना हि असली थेरं परवडत नाहीत. तसल्या कल्पनाही त्यांच्यात नसतात. जेव्हा शेतीचा शोध लागलेला नव्हतं तेव्हा आदिमानव जो अन्न जंगलात शोधून गोळा करून उपजीविका चालवायचा ( hunter- gatherer)त्याला मोठी लोकसंख्या पोसणे सभ्यता, संस्कृती विकसित करणे जमलेच नव्हते. तेव्हा शेतीचा शोध लागला म्हणून एवढी मोठी लोकसंख्या पोसणे आणि अन्न शोधण्यापेक्षा इतर उद्योग करणे आपल्याला शक्य झाले आहे. एवढी प्रगती होणे शक्य झाले आहे. आणि शेती म्हणजे फक्त पिकं किंवा फळ फळावळच नसते तर गायी म्हशी कोंबड्या शेळ्या हे पण त्यात येतात. नव्हे पशुपालन हा तर माणसाचा शेती पेक्षाही पुरातन उद्योग आहे. तोच शेतीचा Precursor आहे. ह्यामागची मूळ कल्पना/ गरज अशी कि अन्न आपल्याला सदा-सर्वकाळ आणि विनासायास उपलब्ध व्हावे. शिवाय त्याबरोबर आपल्याला चामडे, साल वस्त्र अशा इतर वस्तू सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.हे सर्व प्राणी आणि पिकं आपण आपल्या सोई प्रमाणे संकरीत, विकसित केली आहेत.(जंगलात हि पिकं, ह्या कोंबड्या २ महिनेही टिकू शकणार नाहीत.) ती आपल्या विविधतेने नटलेल्या समृद्ध संस्कृतीचा भाग आहेत.खाद्यसंस्कृती म्हटल्यावर त्यातफक्त उदरभरण हा भाग न येता इतर अनेक गोष्टी येतात. अन्न हे फक्त पोषक द्रव्याची सरमिसळ न राहता ते माणसाच्या जीभ, नाक, डोळे, त्वचा अशा सर्व संवेदनांना उद्दीपित करणारा उच्च प्रतीचा शृंगार बनून जातो.इतर कोणत्या प्राणीमात्रात हे आढळते. संस्कृती हि गोष्ट आपल्या जगण्याला इतर प्राणी मात्राच्या जगण्यापेक्षा भिन्न करते. ‘जीवो जीवस्य जीवनम’ वगैरे सुभाषितं खरी पण खाद्य संस्कृती त्याहून भिन्न, उच्च अभिरुचीपूर्ण अशी आहे.मानवी इतिहासात अनेक मोठ मोठ्या संस्कृत्या आल्या भरभराट पावल्या आणि काळाच्या उदरात गडप ही झाल्या. त्यांच्यात आपसात रक्तरंजित संघर्षही झाले पण खाद्य संस्कृती अजूनही टिकून आहे आणि ती उत्तरोत्तर अधिक समृद्ध होते आहे.मानवी जीवन समृद्ध, संपन्न आणि अभिरुची पूर्ण बनवण्याचे अत्यंत महत्वाचे काम तिने केले आहे.कुठल्याही संस्कृतीचे तेच मूळ उद्दिष्ट असते नाहीका? मानवी संस्कृतीमध्ये खाद्य-संस्कृती हि म्हणूनच महत्वाची आणि मोठी विलोभनीय गोष्ट आहे तिचं संगोपन, संवर्धन आपण आपल्या मगदुराप्रमाणे करत राहणं हे आपलं सांस्कृतिक कर्तव्य आहे.
वस्त्र संस्कृती हि अशीच पशुपालन(लोकर) आणि कापसाच्या शेतीमुळे शक्य झालेली गोष्ट आहे. माणूस कापसाची शेती काय अन्न मिळवण्यासाठी करतो कि काय? सगळ्या देवांना चालणारे रेशीम कोणत्या वनस्पतींपासून बनते? त्या करता कोशात गेलेल्या आळीला उकळत्या पाण्यात घालून क्रूर पणे मारले जाते.ते बरे चालते आपल्याला. व्याघ्राजीनावर किंवा मृगाजिनावर बसणारे बाबा, स्वामी लोक ती कातडी कोणत्या अहिंसक मार्गाने गोळा करतात? आणि चामडी कशाला हवी बसायला? बुडाला कापूस लागला तर मुळव्याध होते काय त्यांना? मधासाठी मधमाशाना मारून किंवा हाकलून देऊन किंवा त्यांना फसवून मध काढून घेतला जातो.आतातर त्या बिचाऱ्या कीटकांना शेळ्या मेंढ्यासारखे सारखे पाळून, त्यांनी कष्ट करून मिळवलेला मध आपण हिसकावून घेतो. जंगलात त्या बिचाऱ्या उंच झाडावर, लपवून पोळी बांधायच्या, ते शोधून वणवण करून आपण मध गोळा करायचो. आता तेवढाही त्रास नाही.
तेव्हा अन्न ग्रहण करताना हिंसा-अहिंसा, धर्म-अधर्म, पाप-पुण्य, भक्ष्य-अभक्ष्य, पेय-अपेय काय असेल? असले फालतू विचार सोडा आणि आणि आपल्या शरीराला काय झेपतंय, आणि जिभेला काय रुचतय, आपल्याला कशाची अलर्जी आहे असल्या निव्वळ भौतिक गोष्टी पाहून त्याप्रमाणे वागा. उगाच उपास मोडला तर पाप लागेल अन श्रावण नाही पाळला तर नरकात जावे लागेल. अमका प्राणी मारून खाल्ला तर धर्म नियमाचे उल्लंघन होईल अशा तद्दन भिकार गोष्टी बोलून स्वतःच्या आणि समोरच्याच्या डोक्याची मंडई करू नका.
‘जगा आणि जगू द्या’ नाही तर मनसोक्त खा आणि खाऊ द्या –सुखाने.
---आदित्य

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिर्षक वाचून 'आला का परत तोच विषय' असं वाटलं आणि वॉट्सॅप फॉरवर्ड योग्यही वाटलं.
आपली सो कॉल्ड संस्कृती एकदम ढोंग आहे हे पुन्हा एकदा.

देवाला रेशीम वस्त्र वाला मुद्दा नवा होता
मृगजिन आणि मध वाला पण
आता जेव्हा कुणी शाकाहार वाला मला काही सांगू जाईल तेव्हा माझ्या भात्यात जास्तीचे बाण असतील

द्राविडी प्राणायामाचा प्रकार वाटला लेख.
अन्यथा वनस्पतींनाही जीव असतो अेवढा मुद्दा पुरेसा आहे.

पण जर "ते शाकाहारी आम्हाला का टोकतात / डिवचतात / (किंवा जो काही साजेसा शब्द)? जरा सुनवायलाच हवे यांना" हा मोड असेल तर त्यात नविन असे काही नाही. अजून अेक भर अशा धाग्यांत.

यातले बरेचसे मुद्दे याआधीच माबोवर चघळले गेले आहेत, त्यामुळे लेखात फारसे नाविन्य काही वाटले नाही.

आपल्या खाण्याचे प्रयोजन म्हणून तयार होणारे अन्न खायचे म्हणवे तर मग आपण फक्त काही फळच खाऊ शकतो उदा. आंबा चिकू फणस वगैरे(पवित्र नारळ नाही). यांचा स्वादिष्ट गर इतर प्राण्यांनी ती फळ खावीत आणि बिया कुठेतरी नेऊन टाकाव्यात ज्यामुळे त्या झाडांची प्रजा वाढेल असा हेतू त्यामागे असतो. पण आपण किती जण खाल्लेल्या फळांच्या १ टक्का तरी बिया कुठे तरी पेरतो.

या अनुषंगाने बरीच वर्षे डोक्यात असलेला मुद्दा परत एकदा - निसर्गात प्रत्येक सजीवाचा काहीतरी उपयोग आहे. झाडे, किटक-पक्षी यांचा उपयोग करुन आपली प्रजा वाढवतात; पक्षी, किटक झाडांची फळे, मध खाऊन उपजीविका करतात, त्यांच्या आधाराने राहतात. ह्या सगळ्या सजीवांचे परस्पर अवलंबित्व आणि सहजीवन यावर कित्येक लिखाण झालेय, निसर्गचक्र असेच आहे हे सिद्ध झालेय. मग या सगळ्यात माणसाचे स्थान काय? माणुस झाडाची फुले, फळे खातो; पशु, पक्ष्यांचे मांस, अंडी खातो, किटकांनी गोळा केलेले मध खातो. पण या बदल्यात त्याच्या हातुन ही परस्पर अवलंबित्वाची साखळी पुढे जावी म्हणुन निसर्गाने काय योजना केलीय? आजच्या विकसित मानवाने निसर्गाला दुर सारुन स्वत:ला सोयीची धान्ये, पक्षी, प्राणी विकसित केलेयत पण जेव्हा मानव विकसित नव्हता, इतर प्राण्यांप्रमाणे गुहेत, रानावनात राहात होता तेव्हा तरी त्याला निसर्गाच्या अन्नसाखळीत स्थान होते का? आजच्या विकसित मानवी द्रुष्टीकोनात तो स्वतः अन्नसाखळीत सर्वोच्च स्थानी आहे, पण निसर्गाच्या नजरेत मानव कुठे आहे? यावर काही संशोधन झालेय का?

खरतर शीर्षक पाहून इग्नोरास्त्र मारायच्या विचारात होती पण आशुचँप म्हणतो तसे काही वेगळे आणि वेगळ्या तर्‍हेने मांडलेले मुद्दे वाटले..

बाकी साधना तू म्हणते तेच खरं... आपण एलियनच आहो या पृथ्वीतलावर...

आधीच हा व्यापक विषय आहे, त्यात आपण आणखी धर्माला आणि दोन धर्मांमध्ये असलेल्या चालीरीतींतील तुलनांना आणायला नको होते असे प्रामाणिकपणे वाटते.

मुळात धर्म हा आपल्याला जन्माने मिळतो. त्यातील चालीरीतींसह तो आपल्याला अक्कल येण्यापूर्वीच चिकटतो. जर मी शाकाहार मांसाहाराबाबत कुठले नियम मानतो त्यानुसार मला कुठला धर्म स्विकारावा याचे स्वातंत्र्य असते तरच या मुद्द्याला अर्थ होता. त्यातही प्रत्येक धर्मात किमान चार चालीरीती तरी आचरट असल्याने मी कुठलाच धर्म न स्विकारता जसे केजरीवाल यांनी स्वत:ची आम आदमी पार्टी काढली तसेच माणुसकी नावाचा नवीन धर्म काढला असता. त्या माणुसकी धर्मात वर्षाचे ३६५ दिवस ८७६० तास ५२५६०० मिनिटे आणि ३१५३६००० सेकंद म्हणजे अगदी कधीही कोणीही केव्हाही शाकाहार करू शकतो अशी परवानगी दिली असती. कोणावरही मांसाहार कराच अशी जबरदस्ती केली नसती. अगदी आज आपला सण आहे, किंवा आज आपला धर्म स्थापना दिन आहे, तर आज सर्वांनी हाड चघळून तो साजरा केला पाहिजे वगैरे प्रथा बनवल्या नसत्या. फक्त एकच तत्व पाळा आणि ते म्हणजे माणूस खाऊ नका, माणुसकी जपा असेच सर्वांना सांगितले असते. आणखी एक म्हणजे त्या माणुसकी धर्मात सतरापगड जाती बनवल्या नसत्या. हा फक्त कोंबड्याच खातो तर हा खालच्या जातीतील. हा बोकड, ससा, रानडुक्कर मिळेल ते खातो म्हणून हा उच्चवर्णीय, केवळ मत्स्याहार करणारे ओबीसी वगैरे थेरं नसती. अगदी पालापाचोळा आणि वनस्पती खाऊनच पोट भरणार्‍यांनाही तुम्ही एका सजीवालाच पोटात ढकलत आहात म्हणत सर्वांमध्ये सामावून घेतले असते Happy

माणुस झाडाची फुले, फळे खातो; पशु, पक्ष्यांचे मांस, अंडी खातो, किटकांनी गोळा केलेले मध खातो. पण या बदल्यात त्याच्या हातुन ही परस्पर अवलंबित्वाची साखळी पुढे जावी म्हणुन निसर्गाने काय योजना केलीय?
>>>>>>>>>>>>>>>

साधना, आपला मुद्दा विचार करण्यासारखा आहे. पण माणसाने निसर्गचक्रात योगदान दिलेच पाहिजे असे आवश्यक नाही. मुळात निसर्ग म्हणजे काय कोणी एक व्यक्ती नाही जिने हा सारा सेटअप उभारलाय. तर जसे ही सृष्टी घडत गेली तसे एकमेकाला पूरक गोष्टी यात टिकल्या आणि बाकीच्या लोप पावल्या. काही अश्या गोष्टी असतील ज्या फक्त माणसांच्या सवयींमुळे तग धरून असतील त्या माणसांनी आपल्या सवयी बदलताच लोप पावल्या असतील. म्हणून माणूस निसर्गाच्या दृष्टीने निरुपयोगी झाला असे म्हणू शकत नाही. आपल्या स्वार्थासाठी का होईना माणसाला ज्यांना जगवायचेय त्यांना तो जगवणार. ऊदाहरणार्थ जसे झाडांचे महत्व आणि गरज आपल्याला समजली आहे, म्हणून आपण झाडे लावतो. किती ईतर प्राण्यांना खड्डा खणून, त्यात बिया टाकून झाडे लावता येतात आणि त्यांना खतपाणी देत वाढवता येते. माझ्या माहितीत तरी नाही. आणि निसर्गातील ईतर जीव तरी कुठे या चक्रात निस्वार्थीपणाने योगदान देत असतात, ते देखील त्यांच्या स्वार्थानुसार वा नकळतच्या सवयीनुसार वागत असतात आणि त्यानुसार त्यांच्याकडून हे घडत असते.

हा धागा ऋ हायजॅक करणार असं मला आतून वाटतंय.
>>>>
काही लोकांना आपल्या आवडीचे पदार्थ खायला आवडतात, तर काही लोकांना बनवायला आवडतात. मला त्यांच्यावर बोलायलाही आवडते. मी ३६५ दिवस मांसाहार करणारा वा करायची धमक ठेवणारा जीव आहे. माझ्यासाठी ते माझे अन्न आहे. एखाद्याला अन्नाचा नासाडी बघून जितके वाईट वाटते त्याच्या कैक सहस्त्र पट वाईट मला कोणी माझ्या अन्नाला नावं ठेवल्यावर वाटते. आज अमुकतमुक सण आहे, आज कसला मांसाहार करतोस रे असे बोलून कोणी मला हिणवले तर माझ्या भरल्या आतड्यांना एक घट्ट पीळ बसतो. आणि म्हणूनच मी शाकाहार मांसाहार वादात नेहमीच पोटतिडकीने लिहीतो.

आज अमुकतमुक सण आहे, आज कसला मांसाहार करतोस रे असे बोलून कोणी मला हिणवले तर माझ्या भरल्या आतड्यांना एक घट्ट पीळ बसतो. आणि म्हणूनच मी शाकाहार मांसाहार वादात नेहमीच पोटतिडकीने लिहीतो.

>> आपला तुला फुल्ल सपोर्ट आहे,

जाती-पाती कमी पडल्यात भेदाभेद करायला म्हणून आता हा शाका-मांसा भेद उकरुन काढून मोठा खड्डा पाडणे चाललंय... शाकाहारीच भारी आणि मांसाहारी कसे कमअस्सल (चक्क राक्षस बरं का) हे एक आणि मांसाहारींचे ताणून ताणून 'हवेतही कसे जीव असतात' वगैरे पर्यंत आपला मुद्दा पटवून शाकाहारीचे घमंड तोडायची शर्थ करणे ह्या दोन्ही गोष्टी मजसारख्या मिश्राहारी आणि 'जो जे वांछिल तो ते लाहो' असा विचार ठेवणार्‍याला सारख्याच पकाव वाटतात.

आहारामध्ये तामसी, राजसी आणि सात्विक हे भाव असतात, अन्न हे तामसी-राजसी-सात्त्विक नसते.

कोणाच्या डब्यात जवला आणलाय हे बघून जवलाsssss करत तोंडाला पाणी सुटण्याची ओवरअ‍ॅक्टींग करणारे, जणू कधी खाल्लेच नाही (तरी रोज खात असतील) अशा तर्‍हेने आपले त्या अन्नपदार्थावर प्रेम दाखवणारे तामसीच. ह्यात जवला च्या ठिकाणी कोणताही शाकाहारी-मांसाहारी पदार्थ ठेवा आणि खाणार्‍याची रिअ‍ॅक्शन बघा. त्या रिअ‍ॅक्शननुसार ते भाव कोणते ओळखता येतात.

मांसाहार/शाकाहार म्हणजे स्वर्गीय खाद्यच आहे, आम्ही(चिकन, मटण, ससा, पक्षी, प्राणी, इ.इ.) खातो म्हणजे आहा, काय बोलायचंच नाही, निव्वळ सुख...! आज बेत केलाय, ढमकं केलंय, तमकं केलंय.. अमुक तमुक वगैरे तमाशा करत मांसाहाराला काहीतरी दिव्यप्रकार समजणारे तामसी. समोर आलेल्या पदार्थाच्या निर्मात्याशी असलेल्या बर्‍या-वाईट संबंधानुसार यांचे समिक्षण गोड ते अतितिखट होत असते. "गुलाबजामुनात पाक जरा घट्टच झाला, जरा काळपट भाजले गेलेत, आमच्या पमीने उकडीचे मोदक काय छान केले होते नै!" आता खात असलेल्या पदार्थाची चव, रंग, आस्वाद घ्यायचे सोडून मागे कुठे काय कसे खाल्ले होते त्याच्या आठवणी आताच्या ताटावर रंगवत बसणारे, खाणे-खिलवणे म्हणजे आपण किती रसिक आहोत ह्याची जाहिरात करायची संधी समजणारे तामसी. यांचे जेवणात कमी, बडेजावात जास्त लक्ष असते, खात-पीत असतांना आजवर जणू हे कधीही खायला-प्यायला मिळाले नाही, पुढे मिळेल की नाही असे अधाशाप्रमाणे खातात. बेट लावून गळ्यापर्यंट बासुंदीच्या वाट्या रिचवणारे आणि "आज आम्ही गावरान मेंढीचे मटण चोपले" सांगणारे एकजातभाईबंदच!

वेगवेगळे खाद्यप्रकार-पेयप्रकार आवडीने खाणारे, माहित नसेल तरी चव घेऊन त्या अन्नपदार्थाला एक चान्स देणारे, आवडलेला पदार्थ खातांना ध्यानस्थ मग्नतेने संपूर्ण चित्त त्यातच ठेवून आस्वाद घेणारे, थोडक्यात काय तर आहाराचा समरसून, जीवंतपणे आनंद घेणारे, पक्वान्नाला, बनवणार्‍याला भरभरुन दाद देणारे ते राजसी. यांचा एकूण उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ह्यावर भर असतो. सर्व वातावरणाचा आनंद घेऊन इतरांनाही आनंद घेण्यास उद्युक्त करणारे, जेवण यांच्यासाठी समारंभ जणू... जीवनाचा समरसून उपभोग घेणारे राजसी. यांच्या आवडीनिवडी उंची-अभिजात असतात, काय खावे, काय खाऊ नये याबद्दल आग्रही, चवींबद्दल जाणकार असतात. कोणती गोष्ट कुठे चांगली मिळते तेही यांना ठावूक असते. व्यंजन बनवणार्‍याला अचूक लाभदायक टिप्सही हे देऊ शकतात. यांच्यात रसिकता ओतप्रोत भरलेली असते, वेगवेगळ्या अन्नपदार्थांवर विशेष प्रेम असते.

सात्विक लोक सुखे-दुखे-समे-र्‍कृत्वा असतात. त्यांच्यासमोर शाकाहार-मांसाहार-चविष्ट-बेचव, पहिल्यांदाच बनवलेले, रोजच खाल्ले जाणारे, विशिष्ट भोजन-नेहमीचे भोजन ह्यातले काही ठेवले तरी निष्काम भावनेने अन्नग्रहण करतात. हे अन्नपदार्थावर टिकाही करत नाहीत, कौतुकही करत नाहीत, जेवण यांच्यासाठी यंत्रवत असते. अन्नाबद्दल कृतज्ञता असते पण फार ओढ वगैरे नसते. यांच्या खास आवडीचे असे कोणतेही पदार्थ नसतात. खाणारच नाही असे काही नसते. सात्विक लोक जे समोर येईल ते देवाचा प्रसाद समजून, कृपा समजून, कर्ज समजुन, उपकार समजून, कर्मफल समजून सेवन करतात. त्यांच्यासाठी "आज घरची गावरान कोंबडी कापलीये तुमच्यासाठी खास" किंवा "चुलीवर कढवलेले घरच्या गायीचे साजूक तूप आहे हं" हे उद्गार मूल्यहीन असतात. याचा अर्थ हे बोअरिंग, घुमे, पकावू वगैरे नसतात. दे जस्ट डोन्ट गिव अ डॅम वॉट्स इन दिअर प्लेट!

आता माझ्यामते तरी हा खरा सगळा झगडा असा असायला हवा.... पण लोक भांडतायत शाका-मांसा-अंडीहारी बद्दल. कामधंदे नाहीयेत! Wink

पण माणसाने निसर्गचक्रात योगदान दिलेच पाहिजे असे आवश्यक नाही. मुळात निसर्ग म्हणजे काय कोणी एक व्यक्ती नाही जिने हा सारा सेटअप उभारलाय. तर जसे ही सृष्टी घडत गेली तसे एकमेकाला पूरक गोष्टी यात टिकल्या आणि बाकीच्या लोप पावल्या>>>>>>>>>

एकमेकाला पूरक गोष्टी आहेत म्हणून आपण ज्याला निसर्ग म्हणतोय तो सेटअप टिकलाय. उलट नाहीये.

ज्या गोष्टी नष्ट झाल्या त्यांची उपयुक्तता संपली, ते काम वेगळ्या प्रकारे होऊ लागले म्हणून नष्ट झाल्या. काही बाबतीत काही गोष्टी इतर कारणांनी नष्ट झाल्यावर त्यावर आधारित असलेला साखळीचा दुवाही नष्ट झाला. आपल्या डोळ्यांना दिसणारही नाहीत अशा गोष्टीही निसर्गात आहेत ज्यांच्या अस्तित्वामुळे साखळी पुढे जाते. अज्ञात अशा निसर्गापुढे ज्ञात निसर्ग खूप छोटा आहे, नवनवीन संशोधन आजही होत आहे.

माणसाचे या बाबतीत काय साहाय्य आहे, आजचेच नाही तर माणूस निर्माण झाला तेव्हापासूनचे. मला हे जाणून घ्यायचेय. केवळ शब्दबंबाळ तर्क नकोयत तर यावर काही संशोधन झाले असल्यास माहीत करून घ्यायचेय.

नानाकळा, छान निरीक्षण. मला राजसी गटात राहायला आवडेल. तामसी स्वभावात फारसे नाहीये आणि सात्विक होण्याची पायरी अजून गाठली नाहीय Happy Happy

ज्या गोष्टी नष्ट झाल्या त्यांची उपयुक्तता संपली, ते काम वेगळ्या प्रकारे होऊ लागले म्हणून नष्ट झाल्या.
>>>>>>>

हाच तर्क चुकीचा आहे. मोबाईल आला तर पेजर गेले हा तंत्रज्ञानाचा निकष ईथे लागू नाही. एखाद्याची उपयुक्तता संपली म्हणून तो नष्ट होत नाही तर तो ज्या परीस्थितीत टिकून आहे ती परीस्थिती बदलल्यास तो नष्ट होतो. म्हणून मानवाने किंवा कोणत्याही जीवाने निसर्ग साखळीत उपयुक्त योगदान दिले पाहिजेच असे गरजेचे नाही. ज्यांच्या जीवावर माणूस टिकलाय ते टिकले तर माणूस टिकणारच.

वा ऋन्मेष साहेब.. आता धाग्यात जान आली. आपला पण तुम्हाला फुल्ल सपोर्ट आहे. Happy आता इथे रोज वाचायला यायला हवं.

मा. आदित्यजी श्रीपादजी साहेब,
आपण सर्व धर्मांचा खोलात अभ्यास केला आहे असे वाटते. तरी कृपया खालील प्रश्नांवर आपले अभ्यासु मत वाचायला आवडेलः
१) धर्म म्हणजे काय?
२) "हिंदु" हा धर्म आहे का?
३) संस्कृती म्हणजे काय?
४) संस्कृती व धर्म यात फरक काय?
५) हिंदु जीवनशैली व इतर सर्व अब्राहामीक धर्म हे एकच होत काय?
६) हिंदु "धर्मा"च्या कोणत्या ग्रंथात कोकणी माणसाने मांसाहारी नैव्यद्यच दाखवावा असे लिहिलेले आहे?
७) हिंदु "धर्म" च्या कोणत्या अधिकृत ग्रंधात मांसाहारी नैवेद्य अजिबादच दाखवुच नये असे लिहिलेले आहे? कोणत्या देवाला?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मा. सायोजी ताईसाहेब ,
१) आपल्या कडे एखादी डिक्शनरी आहे का?
२) आपल्या माहितीनुसार ढोंग, फ्लेसिबिलिटी ( लवचिकता) व विविधता या सगळ्यांत काही फरक आहे की हे सर्व एकच आहेत? असल्यास कोणता फरक आहे? नसल्यास आपल्या डिक्शनरीचा उपयोग आपण करणार का?

तरी आपणा सर्व उच्चविद्याविभुषितांनी माझे शंकानिरसण करुन मला शहाणे करावे हि विनंती.
धन्य(च)वाद.

ऋ बाळा, शब्द राखलास हो माझा...

शाब्बास अशीच प्रगती कर, तुझे विचार आणि तुझी प्रतिभा पाहून डोळे पाणावले....

अभि.नव यांनी जोरदार तोफा डागल्या आहेत, आता यावर इग्नोरस्त्राचा वापर होणार का अजून तोफा धडाडणार हे कळेल लवकरच.

हा धागा लवकरच शतक पार करणार असे वाटत आहे, होउन जाऊ द्या धूमधडाका

माणसाचे या बाबतीत काय साहाय्य आहे, आजचेच नाही तर माणूस निर्माण झाला तेव्हापासूनचे. मला हे जाणून घ्यायचेय. केवळ शब्दबंबाळ तर्क नकोयत तर यावर काही संशोधन झाले असल्यास माहीत करून घ्यायचेय.
>>
साधना - पहिली अनेक वर्षे (लाखो), आपण रानावनात भटकत होतो. काही साधने हाताशी होती पण फार फरक नव्हता. ह्या काळाला मानव जातीचा सर्वात सुखाचा काळ म्हणतात. hunter gathere -> nomads -> शेती हा प्रवास होतानाही आपण कित्येक इतर सस्तन प्राण्यासारखेच योगदान देत होतो. अन्नचक्राचा तसाच एक भाग होतो.
शेती सुरु झाली आणि परिमाणं काही अंशी बदलली. पण अजूनही आपण निसर्गाच्या फ्रेम मधे बसत होतो. ओरबाडायला त्या प्रमाणात सुरुवात नव्हती. आपल्याला extra energy मिळाली आहे. बऱ्याच प्रमाणात खात्री आहे की दुष्काळ पडला तरी आधीच्या तुलनेत बऱ्याच अंशी टिकू शकतो. वणवण फिरायची गरज नाही.
आपण जी स्थिरस्थावरता मिळवली ती आपल्याला मिळालेल्या surplus मुळे. ही खरी surplus आहे का? तर नाही. निसर्गाच्या subsidy वर उभी असे हे surplus आहे.

इंडस्ट्रियल रिवोल्युशन नंतर मात्र चित्र फार पटकन बदलले. आपण जास्तीत जास्त ओरबाडा ओरबाडी करू लागलो.
पण आपण पहिल्यापासून ओरबाडा ओरबाडी नाही करत आलो. आपण निसर्गाचा एक भाग होतो आधी.

विज्ञान प्रगट आणि प्रगत (!) होवून आज इतकी वर्षे झाली तरी अजून आपण (मानव) ह्या निसर्गाला पूर्णत: ओळखूच शकलो नाहीये तिथे जाणून घेणे तर लांबच राहिले. म्हणून तर आजच्या दिवसातसुद्धा अजून अजून नवीन प्रजाती आपल्याला ज्ञात होतात आणि विशेष म्हणजे त्या अनेक वर्षांपासून निसर्गात अस्तित्वात आहेतच हेसुद्धा समजते फक्त आपणास त्या आता जाणवल्या. हि झाली एक गोष्ट. आता महत्वाची म्हणजे आपली सध्याची कुवत - जी पृथ्वीच्या अंतरिक्षात आणि भूगर्भात फारच कमी अंतरावर जीवसृष्टीचा अभ्यास करण्या इतपत विकसित झालेली आहे.
http://www.crystalinks.com/hollowearth.html

वसुंधरेच्या आतील गोष्टी म्हणजे विविध पाताळ लोक आणि तेथील सजीव सृष्टी आपले आजचे विज्ञान जणू शकत नाही म्हणून त्या गोष्टी सध्या फक्त myths बनून राहिले आहेत. हीच गोष्ट समुद्राच्या तळाशी असलेल्या सजीव सृष्टीबद्दल सुद्धा तेवढ्याच प्रमाणात लागू होते. आपले प्रयास चालू आहेत अधिकाधिक खाली जावून संशोधन करायचे पण संसाधने सध्यातरी अपुरी पडत आहेत.

f1f42346624d6ef84674dc789ac3fd8d.jpg
अगर्था नगरी अर्थात पाताळ प्रदेशातील नरक

अचानक असे विचित्र फोटो पाहून विषयाशी असंबधित प्रतिसाद वाटू शकतो पण खूप वेळ ते निसर्ग आणि मानव कोरेलेशन चर्चा सुरु आहे म्हणून राहवले नाही सांगायचे कि आपण मानव अजून ते पूर्ण समजून घेण्यासाठी पात्र नाही आहोत. Happy

आणि शाकाहार मांसाहार ह्याला धर्माच्या पातळीवर आणून ठेवलेले पटले नाही. त्याबाबतच्या ऋन्मेष ह्यांच्या पहिल्याच प्रतिसादास अनुमोदन. नानाकळा ह्यांनी छान विवेचन केले सत्व रज तम बद्दल तेसुद्धा मूळ संकल्पना प्रतिसादापेक्षा थोडी वेगळी, अधिक व्यापक आणि क्लिष्ट असून सोप्या समजेल अश्या भाषेत लिहिलेले आवडले... आणि ते सर्वात शेवटी लिहिलेले तर जास्त आवडले Wink

नानबा धन्यवाद! अजून माहिती असेल तर वाचायला आवडेल.

जसे प्रत्येकाच्या कानाला सुखावणारे गाणे वेगवेगळे असू शकते तसे प्रत्येकाच्या जिव्हेला सुखावणारे खाणे पण वेगळे असू शकते. पट्टीच्या खाणाऱ्याला ह्या असल्या वादात भाग घेण्यापेक्षा कुठे दुसरी काही चव सापडते का ह्यामध्ये जास्त "रस" असतो. जसे कोणाला शास्त्रीय संगीत आवडते तर कोणाला हार्ड रॉक तर कोणाला गझल तसे खाण्या मध्ये लोकांचा कल वेगवेगळ्या दिशेने असू शकतो.

लहानपणापासून झालेल्या संस्कारातून प्रत्येक माणसाच्या जिव्हेचे एक वळण पडलेले असते. जेंव्हा जेंव्हा माणसाचा नवीन चवीशी सामना होतो त्याला तो बदल स्वीकारणे अवघड जाऊ शकते. हळू हळू नवीन चव माणसाच्या अंगवळणी पडते. आणि काही चवी अंगवळणी नाही पडल्या तर त्यात काही चुकीचे नाही.

आपल्या पेक्षा या जगात वेगळ्या पद्धतीने जगणारे लोक आहेत हे स्वीकारल्यास आयुष्यात बऱ्याच लढाया कमी होतात. लिलिपुट मधल्या प्रजे प्रमाणे अंडे छोट्या बाजूने कि मोठ्या बाजूने फोडायचे यावरून युद्धावर जाणाऱ्या लोकांपासून आपण काहीच शिकत नाही.

अश्या वादांपेक्षा नवीन देशातल्या नवीन चवीची माहिती देणारा एखादा लेख मला तरी जास्त उपयोगी वाटतो. जर काही असेल नवीन तर ते सांगा. लोक ठरवतील त्यांना काय खायचे आहे आणि काय नाही. त्यांना काय पचते आहे आणि काय नाही.

आपल्या पेक्षा या जगात वेगळ्या पद्धतीने जगणारे लोक आहेत हे स्वीकारल्यास आयुष्यात बऱ्याच लढाया कमी होतात

>> क्या बोल्या बाप चिडकू... एकलंबर!

सगळ्या जगात वेगळ्या पद्धतीने जगणार्‍या लोकांचा जाच होऊ लागल्यानेच तर समस्या उद्भवल्या आहेत. तरी आपण शिकत नाही हे दुर्दैव....

आपल्या पेक्षा या जगात वेगळ्या पद्धतीने जगणारे लोक आहेत हे स्वीकारल्यास आयुष्यात बऱ्याच लढाया कमी होतात>>> खरंय, सहमत.

लोक ठरवतील त्यांना काय खायचे आहे आणि काय नाही. त्यांना काय पचते आहे आणि काय नाही.>>>
हे "व्हेज खावे की नॉनव्हेज "ते ठरवतील इथपर्यंत मान्य आहे. ते त्यांचे त्यांनी ठरवावे.

पण जे काय ठरवले त्यातिल काय खावे काय नाही हे तेच ठरवतील , काय पचतं काय नाही हे तेच ठरवतील
हे म्हणजे " हे डॉक्टर! माझी तब्येत ठीक करण्यास मला औषधे द्या. बाकी मी काय खावे / खाउ नये, मला सांगू नका प्लीजच!" असे म्हटल्या सारखे वाटते. म्हणजे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून मुद्दा योग्य आहे.
पण शहाणपणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा तो तोलला आहे का?

Pages