एक वर्ष इंटरमिटंट फास्टिंगचे

Submitted by सई केसकर on 21 April, 2017 - 07:05

या महिन्यात मला इंटरमिटंट फास्टिंग सुरु करून एक वर्षं झाले. या एका वर्षात माझे वजन १४ किलो कमी झाले. पहिले दोन ते तीन महिने वजन झपाट्याने कमी झाले आणि नंतर मात्र व्यायाम आणि काटेकोर आहार यांच्या जोडीने कमी झाले. या आधी मी कित्येक वेळा ६ महिन्याच्या वेटलॉस प्रोग्रॅम मध्ये ५-८ किलो वजन कमी केलेले आहे. पण ते नेहमी एका वर्षाच्या आतच वाढायचे. एवढे जास्त वजन कमी करायची आणि सलग एक वर्ष तो ग्राफ टिकवून ठेवायची माझी पहिलीच वेळ आहे. आणि त्यात फक्त इंटरमिटंट फास्टिंगचा वाटा नसून काही लावून घेतलेल्या सवयी आहेत. त्याबद्दलही लिहिणार आहे.

इंटरमिटंट फास्टिंगमुळे झालेले फायदे:

१. भुकेची जाणीव बदलली आहे.

सतत १६/१८ तास न खायची सवय लागल्याने खाण्याच्या वेळेत अति खाल्ले जात नाही. आधी मला याची काळजी वाटायची. म्हणून मी माय फिटनेस पॅलमध्ये मी खाल्लेल्या पदार्थांची नोंद करू लागले. तसे केले असता लक्षात आले की इंटरमिटंट फास्टिंग करताना मी माझ्या पूर्वीच्या डाएटिंग करायच्या आहारापेक्षा २००-३०० उष्मांक जास्त घेते. फक्त त्यामध्ये पोळी आणि भात यांचे नियोजन वेगळे आहे. दिवसाला मी दोनच पोळ्या (किंवा १ पोळी आणि १/२ वाटी भात) खाते. पण त्या जोडीला २ अंडी, १-२ मोठे बाउल सॅलड, १ मोठा बाउल वरण (किंवा १०० ग्राम चिकन), ठराविक वेळेस चहा कॉफी असे घेते. या सगळ्याची बेरीज करता पोषण मूल्यांमध्ये माझा आहार कुठेही कमी नाही. पण मध्ये मध्ये चमचमीत काही बाही खाण्याची सवय पूर्ण गेली आहे.

२. खाण्याबद्दल असलेल्या अपराधी भावनेपासून सुटका

ठरलेल्या वेळात योग्य आहार घ्यायचा आणि उरलेल्या वेळात उपास करायचा अशा सवयीमुळे कधी खाणे थोडे जास्त झाले तरी त्याबद्दल अपराधी वाटत नाही. आणि "उद्यापासून नीट करणार" अशी सबब मिळत नाही. कधी कुठे कार्यक्रमाला जायचे असेल तर मी २ दिवस आधी थोडा व्यायाम वाढवून, थोडा आहार नीट तपासून किंवा उपासाचे काही तास वाढवून आधीच तयारी करून ठेवते आणि कार्यक्रमात व्यवस्थित जेवते.
या उन्हाळ्यात मी दर एक आड एक दिवशी ब्रेकफास्टला हापूस खाल्ला. पण त्या बरोबर मात्र पोळी/पुरी असे काहीही खाल्ले नाही. फक्त आंब्याचा मनसोक्त आस्वाद घेतला.

३. डाएट फूड साठी होणारी दगदग कमी झाली

या पद्धतीने वजन कमी करायचा एक महत्वाचा फायदा म्हणजे मला माझ्यासाठी कमी तेलाचे किंवा उकडलेले असे वेगळे काही पदार्थ करावे लागत नाहीत. जो स्वयंपाक घरात असतो त्यातूनच मी माझा आहार घेऊ शकते. संपूर्ण अंडे (विथ यलो), फॅट असलेल्या दुधाचे दही/पनीर खात असल्याने बराच काळ पोट भरल्याची भावना टिकून राहते. आणि एकाच वेळी भरपूर खाल्ल्याने थोडा मानसिक आधार मिळतो. ५-७ वेळा थोडे थोडे खात होते तेव्हा माझी खूप चिडचिड व्हायची.

या एका वर्षात काही सवयी मी लावून घेतल्या आहेत ज्यांचा मला वजन कमी करण्यासाठी आणि ते वाढू न देण्यासाठी खूप फायदा झाला

१. वर्क वीक आणि चीट मील

मी स्वतःसाठी एक साधा नियम केला आहे. वर्कींग वीक मध्ये बाहेर खायचे नाही. आणि विकेंडला एक चीट मील घ्यायचे. जशी जशी सवय होत गेली तसे या चीट मीलचे अप्रूप कमी होत गेले. आता आम्ही महिन्यातून एकदा बाहेर जेवायला जातो. पण तेव्हा मात्र छान रिसर्च करून पुण्यातल्या नवीन नवीन रेस्तराँची माहिती करून जातो.

२. रोज वजन करणे

आधी मी वजन काट्याला खूप घाबरायचे. आणि ३-४ दिवस आहार सारखा चुकला तर मग वजन काट्याला ४-६ महिने टाटा व्हायचा. आता मी रोज वजन करते. आणि रोज त्याची नोंद करून ठेवते. त्यामुळे वजन वाढले तरी १ किलोच्या वर कधी जात नाही. लगेच हातपाय हलायला लागतात आणि तोंड बंद होते.

३. वजनाचा दिसण्याशी संबंध लावणे कमी केले

आपण चांगले दिसायला वजन कमी करतोय या भावनेतून डाएट किंवा व्यायाम काहीही करताना खूप नकारात्मक भावना यायची. आपण आहे असे चांगले आहोत पण आपल्या आरोग्यासाठी वजन कमी करतोय ही भावना जास्त सकारात्मक वाटली. त्यामुळे आता जरी भरपूर वजन कमी झाले असले तरी अजून चांगल्या आरोग्यासाठी प्रयत्न चालूच राहिलेत. यामुळे अमक्या अमक्या तारखेच्या आधी मला अमुक अमुक किलो व्हायचे आहे असे भयंकर टार्गेट पण ठेवले जात नाहीत. आणि संथ गतीने, पण योग्य रीतीने वजन कमी होते.

४. चढ उतार गृहीत धरून पुढे जाणे

काटा कधी खाली कधी वर जाणार हे गृहीत धरून पुढे जायचं. थोड्याश्या अपयशाने लगेच स्वतः बद्दल करुणा वाटून घ्यायची नाही. किंवा थोड्याश्या यशाने लगेच आपण किती महान आहोत असे वाटून घ्यायचे नाही.

५. खाली खेचणाऱ्या लोकांना बाय बाय!

अशी कुठलीही मोहीम हाती घेतली की नकार घंटा वाजवणारे कित्येक लोक आजूबाजूला भेटतात. त्यांना लिटरली बाय करायला जमले नाही तरी त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायला तरी शिकले पाहिजे. आणि आपल्याला आगे बढो म्हणाऱ्या लोकांशी संपर्क वाढवावा. या बाबतीत मायबोलीचा माझ्या आधीच्या लेखावरचा प्रतिसाद हा माझ्यासाठीच फार प्रोत्साहन देणारा होता.

या वर्षात मला अजून ५ किलो वजन कमी करायचे आहे. आणि आता पुन्हा पाळायला सुरुवात करून एखादी रेस पळायची आहे. पुढच्या एप्रिलपर्यंत यातील काहीही एक जमले तरी खूप झाले!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओव्हरइटिंग कमी करण्याचे किन्वा टाळण्यासाठी काहि चांगले उपाय सांगा प्लीज. मला पुर्ण उपाशी रहाणे एकवेळ जमते पण खाताना ठराविक मर्यादेत खाणे खूप अवघड जाते. जसे की काहीच खायचे नाही असे ठरवले असेल तर अजीबात काही न खाता रहाता येते. पण एखादा पदार्थ १/२ वाटीच खाऊ असे म्हटले , आणि पदार्थाची चव एकदा घेतली की पोट पुर्ण भरेपर्यंत थांबवतच नाही. आवडीचा पदार्थ असेल तर हमखास भरपूर ओव्हरइटिंग होते. तिथे संयम कमी पडतो पेक्षा संयम ठेवायचाय हे आठवतच नाही. काय करावे बरे ?

सई, अभिनंदन! तुमची चिकाटी आणि सातत्य कौतुकास्पद आहे. तुम्ही स्वतःवर घातलेली आणि पाळलेली इतकी बंधनं, वेगवेगळ्या अन्नपदार्थांची वेगवेगळी प्रमाणं सतत डोक्यात ठेवून ती पाळणं ही कल्पना करूनच मला दडपण आले. तुमचा इंटरमिटंट फास्टींगचा बाफ आणि त्या अनुषंगाने आलेले प्रतिसादही मी सगळे एका दमात वाचू शकलो नव्हतो.

अभिनंदन.... Happy तुमची चिकाटी आणि सातत्य कौतुकास्पद आहे. कीप इट अप... Happy

<<<< लिंबुजीनी फोटू टाकला आहे. Submitted by taimur on 22 April, 2017 - 07:46 <<<<
त्याचे काय? प्रोफाईलला लावलाय फोटु..... ! १९९२ वर्सेस २०१५ Proud
सूत्र एकच, कडकडुन भूक लागल्याशिवाय खायचे नाही, भुकेपेक्षा चार घास कमी खाणे, व खाताना मन लावुन खाणे Happy
भरपुर अंगमेहनतीचे काम करणे...... अर्थातच कोणत्याही कामाला न लाजणे व प्रत्येक कामातुन "पैसाच" मिळाला पाहिजे अशी स्वतःवर सक्ति न करणे ! असो.

>>>> एक वर्ष इंटरमिटंट फास्टिंगचे <<<
हे शीर्षक मी "एक वर्ष इंटरनेट फास्टिंगचे" असे वाचित असल्याने Proud इकडे फिरकलो नव्हतो, म्हणले, कोण ते सांगतय, इंटरनेटपासून दूर जायला? इंटरनेटचा उपास घडवायला? Wink

बायदिवे, इंटरमिटंट म्हणजे काय? <<<<< ओके, गॉट इट्स मिनिंग ऑन गुगल

>>>> आवडीचा पदार्थ असेल तर हमखास भरपूर ओव्हरइटिंग होते. तिथे संयम कमी पडतो पेक्षा संयम ठेवायचाय हे आठवतच नाही. काय करावे बरे ? <<<<< हा जेन्युईन व सार्वत्रिक प्रश्न आहे
अगदी लहानपणीच आईने जे शिकवले होते, तेच पुन्हा सांगु पहातो....
आईने सांगितलेले की, हावरटपणा करू नकोस, अमुक तमुक पदार्थ परत कधीच आयुष्यात बघायलाही मिळणार नाही असे धरुन चालू नकोस, मानसिक तृप्तिपेक्षाही शारिरीक गरजेची तृप्ति होणे यास प्राधान्य दे !
शारिरीक तृप्ति (जीभेची चव्/गिळणे/पोटात काही गेल्याची जाणिव वगैरे) पहिल्या दोन तिन घासातच होते, व नंतर दर घासाला या तृप्तिचे प्रमाण कमी होत जाते पण मानसिक तृप्ति अमर्याद असू शकते, तिच्यावर ताबा मिळवावाच लागतो. जितकी शारिरीक भूक आहे त्यापेक्षा चार घास कमी खात जा, म्हणजे अपचन/बद्धकोष्ठता व पोटाचे अन्य विकार होणार नाहीत. बुद्धि सतेज राहील, म्लांद्य येणार नाही.
तिचे अतिशय काटेकोर बारीक लक्ष असायचे खाण्यापिण्यावर. पण म्हणजे दरवेळेस छडीचा धाक वगैरे नाहि, पण टोकायचि जरुर की हे जरा जास्त होतय... !
सगळ्यात महत्वाचे म्हणजे "गरीबी" खरोखरच बरेच काही शिकवुन जाते... पण त्याबद्दल नंतर कधीतरी. Happy

@डेलिया

या साठी काही सोपे नियम आहेत. जे तुला अप्लाय होतील ते करून बघ. शेवटी हे सगळं आपल्याला काय मानवतं त्यावर आहे.

१. कर्बोदकांची सांगड फायबरशी घालायची: तुला जर पोहे आवडत असतील तर १ वाटी संपूर्ण कांदेपोहे खाण्यापेक्षा भाज्या घालून पोहे करायचे. आणि ते १ वाटी खायचे. म्हणजे पोहे कमी खाल्ले जातात पण चव तीच असते. भात खायला आवडत असेल तर पांढरा भात खाण्यापेक्षा त्यात सालीची डाळ घालून खिचडी करायची. डाळीचे आणि तांदुळाचे प्रमाण १.५:०.५ ठेवायचे. मग अशी खिचडी दुप्पट जरी खाल्ली तरी प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.

२. संपूर्ण ताट वाढून मगच जेवायला सुरुवात करायची. ताटाचा ५० % भाग आधी फायबरनी भरून घ्यायचा. यासाठी भरमसाठ सॅलड खायची गरज नाही. सगळ्या भाज्या (बटाटा सोडल्यास) फायबर चा उत्तम सोर्स असतात. भाजीचे प्रमाण वाढवायचे, कोशिंबिरीचे प्रमाण वाढवायचे, वरणात भाज्या घालता आल्या तर तेही खूप चांगले. उरलेल्या ५० % मधील २५ % भाग प्रथिनांसाठी ठेवायचा. त्यात उसळी, डाळ, चिकन, अंडी, असे पदार्थ घ्यायचे. आणि उरलेल्या २५ % मध्ये पोळी किंवा भात बसवायचा.

३. स्नॅकिंग करायचे नाही. हे खूप अवघड आहे. पण तू वरील प्रमाणे २ वेळा जेवलीस तर स्नॅकिंगला भूकच राहत नाही.

४. ६-८ ग्लास पाणी प्यायचे.

कर्बोदकांना डिमनाईझ करायचे नाही. पण आपण आजकाल ज्या प्रकारचे आयुष्य जगतो त्यात कर्बोदकांचा मारा होत असतो. भूक लागल्यावर भरपूर खाणे चुकीचे नाही. आणि भूक मारून जगणे बरोबर नाही. पण भूक लागल्यावर सगळ्या घटकांचा समतोल असलेले जिन्नस खायचे एवढेच लक्षात ठेवले तरी फायदा होतो.

शक्यतो घरी स्वयंपाक करायचा/करून घ्यायचा. ऑफिस असेल तर घरचा डबा घेऊन जायचे. आणि जेवढा डबा आणलाय तेवढेच खायचे!

१ वाटी संपूर्ण कांदेपोहे खाण्यापेक्षा भाज्या घालून पोहे करायचे. >>>
कोणत्या भाज्या घालता पोह्यात सांगाल का? प्रयोग करुन पाहीन.

>>कोणत्या भाज्या घालता पोह्यात सांगाल का? प्रयोग करुन पाहीन.>> कांदा तर लागतोच. मी कोबी, टोमॅटोही घालते. बरोबर मटार, गाजर, फरसबीही घालू शकता.
सॉरी, सईला विचारलंत आणि मी उत्तर दिलंय.

खूपसारे क्लूज मिळताहेत. मस्त चालला आहे धागा! आणि फास्टिंगही.
मी सध्यातरी खच्चून भूक लागल्याशिवाय काहीही खात नाही. त्यानंतर जेवतांना/ खाताना ४ घास कमी आणि भात/पोळी कमी असं करतोय. भात/पोळी च्या ऐवजी कोशिंबीर, भाजी, डाळ थोडी जास्त हे चालू केलंय. सकाळचा चहा मात्र आहेच. ते जमायंचय अजून.
ऑफिसातही जेव्हढा डबा आणला तेवढाच खातो; कॉफी मशीन च्या तिथे जागा आहे त्याठिकाणी. मुद्दामहून कॅन्टीनला जात नाही. तिथे वेफर्स, केक्स, अनावश्यक मुखवास इ इ उगाचच घेऊन खाल्ले जातात.

मानव, पोह्यात बरंच काय काय ढकलता येऊ शकतं - गाजर, मटार, फ्लॉवर, बेबी कॉर्न, कॉर्न चे दाणे, ओल्या पापडीचे दाणे, तुरीचे दाणे, शेंगदाणे, कांदा, बटाटा, ओले हरबर्‍याचे दाणे, वांगी,

धन्यवाद सायो, योकु.
कांदा अाणि शेंगदाणे टाकतोच.
मटार, तूर, हरभरे, टोमॅटो छान लागतील असे वाटतेय.
पापडीचे दाणे म्हणचे?

पोपटीचे दाणे. वालपापडीचे दाणे. थोड्याफार फरकाने वालाच्या शेंगेसारख्या शेंगा असतात...
शेंगांच्या त्या गोंधळात न पडलेलं बर... बाकी इथे वाचा.

धागा हायजॅक व्हायला नको... Wink

केदार जाधवांच्या धागा फॉलो केल्यामुळे २.५-३ किलो वजन कमी झाले होते.नंतर सोडून दिले.परत तेवढेच किलो अंगावर चढले.आता सईचा धागा वाचून ६ एप्रिल ते २२ एप्रिलमधे १ किलो वजन कमी झालंय.
फक्त मी या दोघांनी सांगितलेल्याची मला जमेल अशी सांगड घालून हे पाळते.किती दिवस हे आरंभशूरत्व टिकेल हे माहित नाही.

@ सायो

धन्यवाद. पोह्यात याच सगळ्या भाज्या घालायच्या. Happy
एक कुठलेतरी जेवण मी कार्बोहायड्रेट फ्री करते. हे नॉन व्हेज वाल्यांना जास्त सोपे आहे.
ब्रेकफास्टला २ अंढ्यांचे भरपूर भाज्या घातलेले ऑम्लेट + ब्लॅक कॉफी.
कधी कधी लंचला ग्रिल्ड चिकन आणि भरपूर सॅलड

याला व्हेज ऑप्शन म्हणजे ब्रेकफास्टला मोड आलेल्या कडधान्यांची मिसळ (पाव नाही)
मिश्र डाळींचे धिरडे आणि सांबार

पण नेहमीच असे कार्ब्सना हद्दपार करता येत नाही. म्हणून फक्त प्रोटीन आणि फायबर वाढवण्याकडे भर द्यायचा.
सांबार आणि पोहे पण खूप छान लागतात! छोटे कांदे घालून केलेले भाज्यांचे सांबार आणि पोहे ही माझी फेव्हरेट डिश आहे.

माझं आपोआप इंटरमिटंट फास्टिंग व्हायला लागलय. बारीक असताना जंक खाऊन कधी वजन वाढत नव्हतं. जीम नी डाएट व्यवस्थीत केल्यावर वजन ४५ च्या वर जायला लागलं नी नंतर काही वर्षांनी जीम सुटल्यावर खाणं तसंच राहिलं म्हणून वजन ५० च्या वर पण गेलं. हल्ली ५३ च्या आसपास राहू लागलं होतं. महिनाभर खा खा सुटली होती, ते ही फक्त नी फक्त जंक फूड. मग पोटाचा घेर ३० झाला जो माझ्यासाठी टू मच होता. किमान २८ तरी होऊदे म्हणून एक आठवड्याचे जीएम डाएट केले नी घेर चक्क २६ झाला लगेच. पण हे तात्पुरतं असतं माहीत होतं. म्हणून जंक फूड जमेल तेवढं कमी केलं.
सकाळी १० नंतर भरपेट न्याहारी, १-२ च्या दरम्याने जेवण नी संध्याकाळी ५-६ च्या दरम्याने थोडेसे खाणे. मग रात्री भूक लागतच नाही. वाटलच काही खावसं तर फळ खाते काहीतरी. तर असे संध्याकाळी ६ ते सकाळी १० असे १६ तास आपोआप इंटरमिटंट फास्टिंग होतय गेले महिना- दोन महिने. रात्री जेवायचे असेल तर संध्याकाळी काही खात नाही. बर्गर, वडापाव वगैरे पण प्रकार असतात खाण्यामधे पण आधी आठवड्यात ५-६ असायचे ते आता १-२ असतात.
अजूनही घेर २६ च आहे नी वजन ५०-५१ च्या मधे खेळतय. नेहमीच अ‍ॅक्टीव असते ( नीट झोप मिळाली तर Happy ). भूक लागली तर मात्र काळवेळ नाही बघत. दे दना दन पोटभर खाते. पण कमी वजनाचा प्रॉब्लेम असताना कधीच भूक लागत नसायची ती आता फक्त रात्रीच भूक लागत नाही असं झालय जे चांगलच आहे असं वाटतय.

सई,
आज ब्लड रिपोर्ट आले. मागच्या वर्षी जे माझा ए १ सी म्हणून रिडिंग असतं, ते ५.६ आलं होतं. डॉ म्हणाले की त्याकडे लक्ष दिलं पाहिजे नाहीतर पुढे डायाबिटिस संभावतो. मी तुझ्या आय एफ च्या बाफंवर लिहिलं होतच की हा मार्ग मला खुपच सूट होतोय आणि कदाचित तू मला लवकर डायबिटिस होण्यापासून वाचवलं आहेस. ते खरं झालं. Happy
रिडिंग ५.४ आहे ह्यावेळी. तुझा आय एफ बद्दलचा लेख आणि तू दिलेल्या यु ट्युब विडियोज मध्ये इन्सुलिन स्पाईक्स बद्दल ची थियरी होती, ती बघून मी कार्ब कन्जंपशन एकदम कमी केलं. आता वजन जवळ जवळ १७ पाऊंड कमी झालय, ते आजिबात वाढत नाही आणि रिपोर्ट्स पण नीट आले.
अगदी मनापासून आणि कळकळीनी हे माहितीपर लेख लिहिण्याकरता अनेकानेक धन्यवाद!
मी ह्या करता तुझा सदैव ऋणी आहे. Happy

>>>रिडिंग ५.४ आहे ह्यावेळी.
वा! अभिनंदन बुवा!

>>अगदी मनापासून आणि कळकळीनी हे माहितीपर लेख लिहिण्याकरता अनेकानेक धन्यवाद!
मी ह्या करता तुझा सदैव ऋणी आहे.

ऋणी वगैरे नको बाबा! उद्देश फक्त शास्त्रीय माहिती विनामूल्य लोकांना मिळावी एवढाच होता. कारण भरमसाठ पैसे भरून दीर्घकाळ न चालणारी डाएट विकणारे खूप आहेत. मला आता आयएफवर २ वर्षं होतील. साधारणतः "वेट लॉस" प्रोग्रॅम संपला की एक वर्षाच्या आत बहुतांश लोकांचे वजन परत वाढलेले असते. पण आयएफ किंवा लो कार्ब्स या स्ट्रॅटेजीने तसे होत नाही असे अनेकांनी सिद्ध केले आहे. त्यात आता आपणही आहोत!

मी आय-एफ पूर्नपणे करत नाहीये पण सकाळची चहातली साखर बन्द केली आणि रात्री जेवण झाल्यावर खाणे पुर्णपणे बन्द केले.
साधारण रात्री ८ ते सकाली १० पर्यन्त उपवास होतो. म्हणजे १४ तास फास्टिंग होत आहे. स्काळीच व्यायाम होत आहे त्यामुळे उपाशी पोटी वर्काऊत होत आहे.
एकून भारतवारी नंतरही केवळ १ किलो वजन वाढले. Happy आणि नियमित श्तिर राहात आहे.

गेल्या वर्षी गणपतीच्या आधी एक आठवडा IF सुरू केले होते.
म्हणजेच या आठवड्यात 1 वर्ष पूर्ण होईल.

Sept ते फेब्रुवारी काळात माझे वजन 14-15 kg कमी झाले. या सगळ्या काळात माझी खाण्याची क्वांतीती जवळपास सारखीच होती.फेब नंतर वजन कमी होणे थांबले
मार्च पर्यंत फास्टिंग विंडो अगदी पतिव्रतेच्या शीला सारखी सांभाळली होती
मार्च नंतर थोडा थोडा पाय घसरू लागला, म्हणजे ऑफिस मधून घरी आल्यावर एखादी राजगिरा वडी, एखादी चकली वगैरे. कॅलरी इनपुट जास्त नसायचा पण डायरेक्ट शुगर असलेल्या गोष्टी खाल्ल्यावर फास्टिंग तुटायचे.

एप्रिल मे मध्ये उकड्यामुळे धावल्यानंतर हायड्रेशन म्हणून जे इलेक्ट्रल प्यायले जायचे त्यात साखर असायची त्यामुळे फास्टिंग विंडो अजून कमी व्हायची.
जून नंतर तर फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढल्याने सकाळी शिस्तीत एक लाडू/एखादे फळ + एक चमचा साखर घातलेली नेस कॅफे पिऊन बाहेर पडतोय
त्यामुळे टेक्निकली IF विंडो 14+ तास होत नाहीये.

सध्या खाण्याचा पॅटर्न दीक्षित-IF मिक्स म्हणावा असा आहे, कमीत कमी वेळा खाणे या गोष्टीवर जास्त लक्ष देतो. 2 जेवण+ सकाळची कॉफी वगळता खाण्याची क्वचितच एखादी वेळच येऊ देतो.
नेहमीचे जेवण जास्त म्हणावे असे आहे
2 अंडी+एक बोल सलाड+एक ते दीड वाटी घट्ट डाळ फोडणी घालून+ एक वाटी भाजी + एक पोळी+ 4 5 खजूर बिया.(या आधी मी जेव्हा कधी डबा आणला होता तेव्हा तो 2 पोळ्या+एक वाटी भाजी+ एक डब्यात कोशिंबिरी ची तयारी ज्यात मी रेडिमेड दही घालत असे इतक्यात संपायचा)

दोन्ही वेळी अलमोस्ट सारखी quantity असते. काही गोष्टी इकडे तिकडे, म्हणजे पालेभाजी असेल तर सलाड ला सुट्टी किंवा ऱ्या ऐवजी दही घातलेली कोशिंबीर, उसळ असेल तर उसळ जास्त आणि एक अंडे किंवा खजूर ऐवजी एखादे फळ वगैरे
(आजच लंच टेबल वर पाहिले तर सगळ्या कालिग्स मध्ये माझा डबा सगळ्यात मोठा होता, आणि मी सगळ्यात बारीक/फिट होतो Happy ) कामानिमित्त बाहेर जावे लागले, खावे लागले तर मनमुराद खाऊन घेतो. अगदी सलग 2 आठवडे आठवड्यातील 1 -2 दिवस राजधानी च्या थाळ्या चापल्या आहेत.
गेला एखादा महिना तर मूड आला तर एखादी पेस्त्री खाण्याची चैन सुद्धा करतोय

इतके करूनही माझे वजन फेब पासून 80 वर स्थिर आहे.
खरे तर ते अजून खाली जायला सुरवात झाली होती पण करेकटीव्ह ऍक्शन म्हणून फास्टिंग विंडो किंचित लहान केली होती. पण पुढे ती आपसूकच लहान होत गेली Sad

अर्थात जास्त इनपुट असताना वजन कॉन्स्टंट राहण्यात मोठा हात वाढलेल्या व्यायामाचा सुद्धा आहे.
व्यायाम + कॅलरी डेफिसिट खाणे + कमी वेळा खाणे या सगळ्याची जी गोळाबेरीज येते आहे ती मला फायदेशीर ठरली आहे.

वर सई ने म्हंटले आहे तसे हे डाएट सस्टेन करायला सोपे जाते आहे. घरात न चुकता सलाड किंवा अंडे बनवले जात असल्याने घरातील इतरांची सुद्धा खाण्याची प्रत सुधारली आहे.

अजून बराच टप्पा गाठायचा आहे, इकडे परत परत येऊन गेलेल्या वर्षाचा हिशेब लिहायला आवडेल Happy

अभिनंदन सिम्बा! way to go.
इतके करूनही माझे वजन फेब पासून 80 वर स्थिर आहे. >> अशा वेळी वजनापेक्षा waist line बॉडी फॅट कमी झाल्याचा जास्त हेल्दी संकेत आहे. Happy ईस्पेशली लाईफ स्टाईल चेंजेस केले असल्यास. पण वेस्ट साईझ सांगण्यापेक्षा वजनाचा आकडा सांगणे प्रशस्त Proud वाटते हे हे खरे Wink

Pages