मुशकुव्हॅली, द्रास. (मूळ लेख )

Submitted by उदे on 19 April, 2017 - 01:05

'नारळीपौर्णिमेला आपण पॅंगॉन्ग लेक ला रात्र काढायची' या एका गोष्टीभोवती आमचा लेह-लडाखचा दौरा आखला गेला.'
पारंपरिक टूर्सप्रमाणे नुसतं स्थलदर्शन न करता,जमलं तर एखादा ट्रेकही करावा अशी योजना ठरली. द्रास ला जाईपर्यंत परिस्थितीनुसार सोयीने हलण्याचं देखील नक्की झालं. आणि आम्ही साधारण १३ जण लेह-लडाख च्या दौऱ्यावर जायला तयार झालो.

काश्मीरच्या सीमेवर नेहेमीसारखी अशांतता होतीच. म्हणून १० दिवस अगोदर सर्वांना अखेरचं विचारलं कि आपण जायचं कि नाही? पण 'नाही' हा शब्दच कानी आला नाही. त्यामुळे निघायच्या दिवशी दुपारी १२ वाजता जे मुंबईवरून निघालो, ते संध्याकाळी ५ वाजता दाल लेकमध्ये बोटिंगचा आनंद लुटायला मोकळे असण्याच्या स्थितीत पोहोचलो.

संध्याकाळी हॉटेलला पोहोचेपर्यंत काश्मीर मधली परिस्थिती चिघळत गेली आणि आम्ही भल्या पहाटे श्रीनगर सोडून सोनमर्गला पोहोचलो. आणि दुसऱ्या दिवशी द्रास मध्ये येऊन थडकलो. सरकारी गेस्ट हाऊस मध्ये आमची राहायची सोया अशा ठिकाणी झाली कि जिथे समोरच्या कड्यावरून पाकिस्तानी सैन्याने केलेल्या आक्रमणाच्या निशाण्या होत्या. साहजिकच दिवसभर जवानांच्या वीरकथा ऐकण्यात वेळ कसा निघून गेला काही कळलंच नाही.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात आम्हा फोटोग्राफर्सना फोटो घेण्याची एक सुवर्णसंधी देऊन गेली. आमच्या राहत्या गेस्टहाऊसपाठच्या डोंगरावर सूर्याच्या सोनेरी किरणांनी अशी काय जादू केली कि तो अवघा डोंगर सुंदर सुंदर आकृत्यांनी नटून गेला. त्या आकृत्या टिपण्यात सर्वजण गढून गेले. परंतु रेंगाळून चालणार नव्हतं! ट्रेक करायला निघायचं होतं. निघालो.

गावातील हसतमुख चेहेऱ्याची गोरीपान मंडळी पाहताना, त्यांच्याशी बोलताना आमचे चेहेरेसुद्धा एव्हाना हसरे होऊ लागले होते. दूरवर असणारी घरं साजरी दिसत होती. कापणीची कामं चालली होती आणि थोड्याश्या भागापुरतीच हिरवाई लेवून नटलेली शेतजमीन आणि टिपिकल लडाखी वाटणाऱ्या घरांच्या भोवती लावलेली फुलझाडं त्यांना लगडलेली सुंदर सुंदर फुलं, अशा चित्रमय गावातून आम्ही जात होतो. एवढ्यात दोन युवा तरुण आम्हाला समोरून येताना दिसले. एकाने आपलं नाव मुख्तार असं सांगितलं. त्याने आम्हाला त्याच्या घरी चालण्यासही सांगितलं. परतताना यायचं आश्वासन देऊन आम्ही गाव सोडून टायगर हिल परिसराकडे वळलो.

एव्हाना गाव पाठी पडलं होतं. हलके चढ लागू लागले होते. आणि गोळ्यांच्या फैर्यांचे प्रतिध्वनी वाढू लागले होते. गावकऱ्यांकडून कळलं कि जवान सराव करताहेत. सरावादरम्यानच्या फैऱ्यांचे हे आवाज आहेत. नेहेमीपेक्षा फारच वेगळ्या वातावरणात हा ट्रेक झाला.टायगर हिल च्या टोकावरून पुढे जाण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे तेथूनच परतलो. वाटेत मुख्तार च्या घरी आग्रहाने चहा पाणी झालं. हो. हो. खरोखरच आग्रहाने. कारण त्याने पाणीच मुळी इतक्या नक्षीदार पेल्यातून दिलं, आणि ते सुद्धा नाजूक नक्षीदार सुरईतून दिलं,कि खरं सांगायचं तर नुसतं पाणी पिऊनच आम्ही तृप्त झालो. त्याच्याकडचा आग्रहाचा चहा हे तर मेहमाननवाजींचं उत्कृष्ट उदाहरण ठरावं त्याप्रमाणे होतं.एव्हाना उन्हं चढू लागली होती. सकाळचा उत्साहमावळत चालला होता. सर्वांना गेस्टहाऊस ला परतायचे वेध लागले होते.

सकाळी ११ पर्यंत १० किमी ट्रेक करून १०००० फुटांवरच्या उंचीवरील वातावरणात छान मिळून मिसळून गेलो होतो. त्यामुळे आमचा पुढचा दौरा सुंदर होणारच याची खूणगाठच जणू सर्वांनी मनाशी बांधली!

-------उदय ठाकूरदेसाई.
uthadesai.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults