भुकेले आणि माजलेले

Submitted by कुमार१ on 18 April, 2017 - 07:47

प्रसंग पहिला :

परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले.

पलीकडच्या रिकाम्या रुळांदरम्यान ढीगभर अन्न टाकून दिलेले होते अन ते अन्न एक माणूस खाली बसून अधाशीपणे खात होता. दोन-तीन रंगांचे भात त्यामध्ये दिसत होते. कदाचित ते रेल्वेच्या खानपान सेवेतील उरलेले वा लोकांनी टाकून दिलेले पदार्थ असू शकतील. त्या कंगाल माणसाकडे पाहताच त्याचा ‘भिकारी’ हा दर्जा लगेच लक्षात आला. त्याच्या चिवडून बकाबका खाण्याच्या पद्धतीवरून तो बराच काळ उपाशी असणार हेही जाणवले. आता तो माणूस जिथे बसला होता तिथेच आजूबाजूला जुन्या-नव्या मानवी व प्राण्यांच्या विष्ठा विखुरलेल्या असणार होत्या. परंतु, त्याची भूक एवढी तीव्र असणार की असले स्वच्छतेचे विचार करणे त्याला परवडणारे नव्हते. ते दृश्य बघून अगदी गलबलून आले.

तेवढ्यात आमच्या गाडीने मोठ्ठा हॉर्न दिला व ती पुढे सरकली. त्या दहा मिनिटांमध्ये मनात असंख्य विचारांचे काहूर माजले. ते केविलवाणे दृश्य मनातून जाता जात नव्हते. ‘‘का अशी वेळ येते एखाद्यावर’’ हा विचार माझ्या मनाला अक्षरशः कुरतडत होता.

तात्पर्य : तीव्र भुकेल्या जिवाला कुठलेही अन्न चालते – अगदी कुजलेले व घाणीत बरबटलेले देखील. भूक ही एकमेव भावना त्याला खाण्यायोग्य काहीही पोटात ढकलायला लाचार करते.

प्रसंग दुसरा :
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवारची रात्र होती. त्या शहरातील एक प्रथितयश डॉक्टर त्यांच्या पत्नी व दोन मुलींसह एका प्रतिष्ठीत रेस्तराँमध्ये जेवायला आले होते. त्यांच्या आठवडाभरातील कामाच्या व्यापानंतरचे हे विरंगुळ्याचे क्षण होते. रेस्तराँमध्ये मंद प्रकाश पसरला होता. चित्तवृत्ती फुलवणारे संगीत चालू होते आणि झकपक गणवेशातील कर्मचाऱ्यांची लगबग दिसत होती. डॉक्टर नुकतीच वयाची चाळीशी ओलांडलेले, तर त्यांच्या मुली या शालेय वयातील. आता हे कुटुंब एका टेबलावर स्थिरावले. तेथे वेटर येताच त्यांनी सूप व ‘स्टार्टर’ ची ऑर्डर दिली.

‘स्टार्टर’ हे मुख्य जेवणाआधीचे अल्पखाद्य असते याची जाणीव अद्याप त्या खादाड मुलींना नसावी. त्यामुळे, आई-वडिलांचा विरोध असतानाही त्या नावाखाली तब्बल चार प्लेट्सची ऑर्डर दिली जाते. ते पदार्थ येतात. खाणे सुरू झाल्यावर थोड्याच वेळांत त्यांच्या टेबलावर नजर टाकता हे स्पष्ट होते की त्या पदार्थांपैकी निम्मा भाग तरी खाऊन संपणार नाही. त्यावर मुलींचे आईवडील त्यांना रागावतात. पण, त्याचा फारसा परिणाम होत नाही. आता मुख्य जेवणाची ऑर्डर दिली जाते. पुन्हा एकदा मुलींचा हावरेपणा आवरणे आईवडिलांना जड जाते. वेटर जेवण आणून ठेवतो. थोड्या वेळातच अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा निम्मे पदार्थ पानात शिल्लक राहणार हे दिसू लागते.

डॉक्टर व त्यांच्या पत्नीने मागवलेल्या अन्नाला यथाशक्ती न्याय दिलेला असतो; पण केवळ मुलींच्या हट्टामुळे मागवलेले गरजेपेक्षाचे जास्त अन्न आता उरत होते. ते बघून हे दांपत्य खरोखर अस्वस्थ झाले. त्या दोघांना अन्न टाकणे ही कल्पनाही सहन होणारी नव्हती. मुली मात्र त्याबाबत बेफिकीर होत्या. एव्हाना ताटातले अन्न संपत नसतानाही त्या दोघी यानंतर ‘ज्यूस का आईसक्रिम’ मागवायचे याची चर्चा करू लागल्या. किंबहुना अशा उच्चभ्रू रेस्तराँमध्ये असेच वागायचे असते, ‘अन्न टाकले तर त्यात काय एवढे’ असे भाव त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

रेस्तराँमधील इतर टेबलांवरसुद्धा थोड्याफार फरकाने अशीच स्थिती होती. काहीतरी अन्न टाकल्याशिवाय ‘पार्टी’ साजरी झालेली नव्हती. अशा टाकलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे हा तेथील कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामातील अप्रिय पण अटळ भाग होता. तेव्हा आता हे कुटुंब उठेल व आपल्याला ते टेबल स्वच्छ करायचेय या प्रतिक्षेत तिथले नोकर होते. परंतु, आता त्या टेबलावर एक अनपेक्षित प्रकार घडला.

आपल्या मुलींवर क्रुद्ध झालेल्या डॉक्टरांनी ‘डेझर्ट’ ची ऑर्डर निक्षून थांबवली. एवढेच नाही, तर पानात उरलेले सर्व अन्न अजिबात टाकता येणार नाही असे मुलींना खडसावून सांगितले. मग डॉक्टरांनी वेटरला बोलावले व ते उरलेले सर्व अन्न ‘पार्सल’ करून देण्यास सांगितले. वेटर त्यांच्या या पवित्र्याने अवाक झाला. त्याने त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे ठरवले. खरे तर आतापर्यंत त्या रेस्तराँमध्ये असा प्रकार घडला नव्हता. त्याकाळी (म्हणजे सुमारे ३० वर्षांपूर्वी) अशा उरलेल्या अन्नाचे पार्सल करायची पद्धत रुळलेली नव्हती. अखेर कशाबशा प्लास्टिकच्या पिशव्या जमवून वेटरने ते पार्सल केले. आता डॉक्टरांचे कुटुंब ते पार्सल घेऊन निघाले. ते बाहेर पडत असताना तेथील सर्व कर्मचारी डॉक्टरांकडे कौतुकाने व आश्चर्याने बघत राहिले.

तात्पर्य : अन्न टाकण्याचा माज हा उतरवलाच पाहिजे आणि त्याची सुरवात ही आपल्या घरापासूनच हवी.

प्रसंग तिसरा
:

संध्याकाळची वेळ. छान वारे सुटलेले. एका शहरातील उपनगराचा भाग. छोट्या-मोठ्या दुकानांच्या गर्दीत रस्त्यावर एक वडापावची गाडी उभी आहे. या तळणीतल्या वड्यांचा खमंग वास दरवळतो आहे. तिथेच एक बसण्यासाठी कट्टा आहे. त्यावर बसून काही ज्येष्ठ नागरिक निवांत गप्पा मारताहेत. एवढ्यात आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते एका माणसाकडून. तो माणूस कळकट कपड्यांमध्ये आहे आणि चालता चालता काकुळतीने म्हणतोय, ‘’ओ दादा, ओ भाऊ, गावाकडून आलोय, दोन दिस उपाशी हाये, पोटात अन्नाचा कण नाही. लई भूक लागलीय हो. द्या कुणीतरी धा रुपये तरी.” त्याचे लक्ष तिथल्या वडापावच्या गाडीवर आहे आणि ‘’वडापाव दहा रुपये” ही त्या वडेवाल्याची आरोळी त्याने ऐकलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूप भुकेला वाटतोय. तो जीवाच्या आकांताने भीक मागतोय – फक्त दहा रुपयांची. एकीकडे त्या गाडीच्या बाजूने त्याच्या येरझाऱ्या चालू आहेत.

ते दृश्य पाहून कट्ट्यावरच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जरा अस्वस्थता आली. त्यांच्या गप्पा जरा बाजूला ठेवून ते त्या माणसाबद्दल चर्चा करू लागले. त्यांच्यात थोडेफार संवाद झडले ते असे :
‘’जाऊ द्या हो, नका लक्ष देऊ त्याच्याकडे. जाईल निघून जरा वेळाने’’,
‘’आता भीक मागायची म्हटली की दोन दिवसांच्या उपाशीपणाची कथा सांगणारच की हो तो’’,
‘’अहो, कष्ट नाही केले की हे वेळ येते माणसावर. मग भीक मागणे हा सगळ्यात सोपा धंदा.’’

त्या माणसाच्या येरझाऱ्या आणि आर्त स्वरातले भीक मागणे सुरूच आहे. अखेर, त्या ज्येष्ठांपैकी एकांना राहवत नाही. भीक देणे हे त्यांना तत्वतः मान्य नाहीये. पण, आता ते जागेवरून उठतात. झपाटल्यासारखे त्या भिकाऱ्याजवळ जातात. थोड्याशा चढ्या आवाजात ते त्याला हाक मारतात आणि वडापावच्या गाडीजवळ बोलावतात. आता ते खिशातून दहाची नोट काढतात व ती त्या गाडीवाल्याला देउन त्याला त्या भिकाऱ्याला एक वडापाव द्यायला सांगतात. त्यानुसार कृती होते. मग तो भिकारी वडापाववर अक्षरशः तुटून पडतो व दोन मिनिटात तो फस्त करतो. त्या गृहस्थांना समाधान वाटते. ते भिकाऱ्याकडे अधिक लक्ष न देता शांतपणे चालू लागतात.

तात्पर्य
: भिकाऱ्याची भूक भागवणे ही प्राथमिकता. भिकारीपणावरील तात्विक चर्चा ही त्यानंतरची गोष्ट.

प्रसंग चौथा( व शेवटचा) :

शहरातील एका शानदार मंगल कार्यालयात लग्नसोहळा चालू होता. त्यात भोजनाची पंगत बसली होती. त्यामध्ये माझ्या शेजारी एक उच्चशिक्षित व्यावसायिक गृहस्थ बसलेले होते. आमच्याकडे येणारा प्रत्येक वाढपी हा ‘वाढू का’ असे विचारूनच वाढत होता. माझ्या शेजारचे ते गृहस्थ त्याला दरवेळी ‘वाढा’ असेच म्हणत होते. याउलट मी मात्र, मी जेवढे खाऊ शकणार होतो तेवढेच वाढायला लावले.

थोड्या वेळांत माझे जेवण संपत आले व माझे ताट स्वच्छ दिसू लागले. त्या गृहस्थांचे ताट मात्र अजून तुडुंब भरलेले दिसत होते. वाढलेले सर्व पदार्थ ते खाऊन संपवू शकणार नाहीत हे आता स्पष्ट होते. एकदम ते मंद स्मित करीत माझ्या ताटाकडे पाहत मला म्हणाले, ‘’तुम्ही ताट किती स्वच्छ केले आहे ते दाखविता आहात काय?’’ त्यावर मी जोरकसपणे ‘’हो’’ म्हणालो आणि नंतर माझ्या ताटातील सर्व अन्न संपवून उठलो. मी हात धुउन परत येताना पाहिले की ते गृहस्थ आता उठले होते व त्यांनी ताटात अनेक पदार्थ टाकून दिले होते. त्यामध्ये किमती गोड पदार्थही होते.

अन्न टाकणे हा प्रतिष्ठेचा एक निकष मानणारे ते महाशय बघून मला मनस्वी चीड आली. तसेच त्या क्षणी आपण याबाबत काहीही करू शकत नाही याचा विषाद वाटला. समाजातील अशा मस्तवाल लोकांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करत मी कार्यालयाबाहेर पडलो. जेवणाची पंगत असो वा बफे पद्धत, असे अन्न टाकणारे अनेक मुजोर आपल्याला सदैव दिसतात खरे.

तात्पर्य: एकजण अन्न टाकणारा आणि दुसरा ते लवून भजून खाणारा. पहिल्याच्या दृष्टीने दुसरा हा टिंगलीचा विषय, तर दुसऱ्याच्या दृष्टीने पहिला हा चीड आणणारा विषय.

... अन्न – माणसाची जगण्यासाठीची मूलभूत गरज. ते अन्न काहीही करून मिळवलेच पाहिजे याची जाणीव करून देणारी संवेदना म्हणजे भूक.
समाजातील बहुतेक लोक कष्ट करून अन्न मिळवतात आणि आपली भूक भागवतात. त्यामुळे त्यांना अन्नाची किंमत समजलेली असते. ते नेहेमी अन्न लवून भजूनच खातात.

काही लोकांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी असते. त्यांना अन्न मिळवण्यासाठी कष्ट नाही केले तरी चालणार असते. त्यांची भूक भागवण्याची सोय एकतर त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवलेली असते किंवा, दुसऱ्याचे शोषण करून स्वतःची पोटे भरण्यात हे लोक तरबेज असतात. सुबत्तेतून आलेला माज त्यांच्यामध्ये अगदी भिनलेला असतो. अशा लोकांमधूनच मग निर्माण होतात अन्न टाकणारे मुजोर. भुकेची वेदना कधीही न जाणवलेली ही माणसे. त्यांना अन्नाची किंमत ती काय कळणार?

या दोघांशिवाय तिसरा एक वर्ग समाजात असतो. हे लोक अन्न मिळवण्यासाठी कष्ट व धडपड करण्याऐवजी भिकारी होण्याचा सोपा पर्याय निवडतात. तेव्हा या लोकांना फुकट मिळेल तेवढेच व वाट्टेल तसले अन्न खाण्याची वेळ येते. त्यांच्या सततच्या भुकेल्या अवस्थेला ते स्वतःच जबाबदार असतात. ‘ज्याचे हात काम करतात तो कधीही उपाशी राहत नाही’ या वास्तवाचा त्यांना बहुधा विसर पडलेला असतो.

विष्ठेने बरबटलेले अन्न चिवडून खाणारा भिकारी, काबाडकष्ट करुनही अर्धपोटी असलेली माणसे, मुक्तहस्ते अन्नाची नासाडी करणारी आणि ते टाकण्यात प्रतिष्ठा मानणारी माणसे यांसारखी दृश्ये आपल्या अवतीभवती वारंवार दिसतात. ही सगळीच दृश्ये व्यथित करणारी. ही दृश्ये आपल्याला ‘समाजातील आर्थिक विषमता व वाढती दरी’ यांसारख्या जडभारी विधानांचा अर्थ अगदी स्पष्ट करून सांगतात. एवढेच नाही, तर या वास्तवाची प्रखर जाणीव करून देतात.

एखाद्या माणसाच्या भिकारी होण्याला नक्की जबाबदार कोण?
फक्त तो स्वतः की आपण सगळेच? उत्तर देणे अवघड आहे. पण, काही मुद्दे अगदी स्पष्ट व स्वच्छ दिसतात :
१. माणसाने कोणतेही काम हलके न मानता वाटेल त्या कष्टांची तयारी दाखवली तर त्याची भूक भागण्याइतके अन्न त्याला जरूर मिळते.
२. ज्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा आणि कित्येक सुखसोयी या विनासायास मिळाल्या आहेत, त्यांनी निदान अन्न टाकण्याचा माज तरी करू नये ही अपेक्षा.
३. आपली भूक भागण्यामागे आपण सोडून इतर अनेकांचे कष्टही कारणीभूत असतात, ही जाणीव सर्वांना असणे हेही महत्वाचे.

ज्या दिवशी या पृथ्वीतलावरील उपलब्ध अन्न हे मानवासहित सर्वच प्राणिमात्रांची भूक भागवून सर्वांना तृप्त ठेवेल तो अर्थातच सुवर्णदिन असेल.

( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी ( 'भूक' या नावाने) : ‘अंतर्नाद’ मासिक. संबंधित संपादकांच्या परवानगीने येथे प्रकाशित.)
*************************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेरफटका साडेसातच्या प्रतिसादाला अगदी अगदी.
एकदम मस्त पोस्ट.

पियु - तु डकवलेला व्हॉटसपचा मेसेज पण खासच आहे अगदी. सगळ्या लग्न कार्यात हे करायला हवे म्हणजे लोकांना अन्नाचे महत्व समजेल.

>>>>>>
पियू यांचा मुळ मेसेज>>>>
Totally असहमत,
बुफेची प्लेट कशी भरली जाते ते सगळ्यांना माहिती आहे,, प्लेट आणि पदार्थ याचे गुणोत्तर न जमल्याने, पापड चटणीत पाय बुडवून बसलाय,
भात कोशिंबिरीशी गळमिठी मारतोय, पुरी भातावर बसलीये असा , वाट्या कमी असल्याने उसळ अजून कशात तरी मिक्स झालीये असला सगळा प्रकार असतो,
तो कोणीही कितीही निगुतीने बांधून दिला तरी मला खावंसा वाटणार नाही,
हॉटेल मध्ये भांड्यात उरलेला पदार्थ पॅक करून घेणे वेगळे, आणि जेवत्या ताटातील काला झालेला उरलेला पदार्थ पॅक करणे वेगळे.
तो मेसेज इन जनरल भावनिक आवाहन करणारा जास्त वाटतो.

सिम्बा बुफेचा मेसेज काल्पनिक आहे, त्यातला फक्त संदेश ध्यानात घेण्याचा आहे.
त्या मेसेज खाली शेतकर्‍यांच्या आत्महत्येबद्दल लिहिले आहे, प्रत्यक्षात अन्ननासाडी आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या यांचा आपसात काही संबंध आहे का?

@ वेज नॉनवेज, याचा या धाग्याशी सम्बंध नाही हे माहीत आहे. ते फक्त एखाद्याला एखादा पदार्थ आवडत नाही तर आवडत नाही, जबरदस्ती टेस्ट बड्स डेव्हलप करायला जाऊ नयेत हा मुद्दा समजण्यासाठी उदाहरण दिले आहे.
अगदी शिशू वयात ठिक आहे, पण दहाबारा वर्षांच्या पोरांवरही त्यांच्या नावडीचा पदार्थ लादणे हे चूकच. यातही पाहुण्यांकडे गेले की मुलाला दम दिला जातो की कश्यालाही नाही म्हणून नकोस आणि ताटातले नावडते का असेना संपव. कधीतरी आई शेजारी बसून आपली नावडती भाजी गपचूप घेते म्हणून वाचतो, अन्यथा मुकाट गिळावे लागते. आमचा पोरगा ताटात असेल ते खातो हे कौतुक मिरवण्यातही काही जणांना धन्यता वाटते हे चूकच. नशीबाने माझ्यावर अशी जोरजबरदस्ती झाली नाही पण माझ्या भावंडांचे हाल पाहिलेत.

ते व्हॉट्सॅप फॉर्वर्ड काही दिवसांपूर्वीच वाचले. हजार लोकांची ऑर्डर बाराशे लोकांचे जेवण बनवले, आता ते संपवाच. पार्सल घेउन जा की दाबून खाउन संपवा. अन्नाच्या नासाडीचा ठपका आमच्यावर नको.

हजार लोकांची ऑर्डर बाराशे लोकांचे जेवण बनवले >>> आणि हजारला हजारचे जेवण बनवून बाराशे लोकं आले तर काय करायचे? त्यातही कोण कुठला पदार्थ किती खाईल हे सांगता येत नाही. व्यक्ती तितक्या आवडीनिवडी. म्हणजे प्रत्येक पदार्थ जास्तीचा बनवा. प्रत्येकाची सेपरेट नासाडी. कसे टाळता येईल हे?

तो केटरर च प्रश्न नसतो. त्यांना ऑर्डर दिली तेवढीच त्यांनी बनवायची असते आणि ते बनवतात. लोकांनी किती आणि काय खावे आणि हजारचा आकडा देऊन बाराशे लोकांना निमंत्रण दिले ते वर वधु च्या लोकांची चूक आहे. केटरर सरळ हात वर करतात.

चांगला प्रश्न ऋन्मेष.
हजारचे बाराशे होअु शकतात किंवा आठशे सुद्धा.
हे टाळण्यास समारंभाला कोण येणार आहेत आणि नाहीत हे निमंत्रीतातंनी किमान बारा तास आधी कळवावे. आजकाल इमेल, फोन, व्हाट्सॅप, फेसबूक अगदी सहज शक्य आहे ते.

त्यामुळे आपण हजार लोकांना आमंत्रण दिलं त्यातिल कितीजण किती येणार ( प्रत्येक कुटुंबाने येणाऱ्या सदस्यांची संख्या द्यावी) हे कळेल.

त्यानुसार सोय करता येइल.
नासाडीचे प्रमाण शून्य नसले तरी बरेच कमी करता येइल.

लग्नं म्हणजे गावजेवण, पंगती ऊठवणे, आण्पाल्या सामाजिक दर्जा आणि ओळखीपाळखीचे प्रदर्शन करायचे आणि कमी पडले तर समाजात आपली छीथू होईल असे फालतू विचार डोक्यात ठेवून आयोजक मंडळी वावरत असतात.
१०० ते १५० मंडळींसमवेत लग्न स्ट्रिक्टली आरएसवीपी असावे, येणार्‍या प्रत्येकाची नावासहित यादी प्रवेशद्वारा आवभगत करणार्‍याला एखाद्याला मुखोदगत असावी फार फार तर १०% एरर ऑफ मार्जिन असावा.

"आरएसवीपी असावे" - हे आरएसव्हीपी भारतात असावं असं मला फार वाटतं. पण अजून ते तिथे तितकसं रुजलेलं नाहीये. कदाचित यंग जनरेशन मधे असेल ही, पण आपल्या घरातली कार्य अजून जोहर-चोप्रा-बडजात्या स्टाईल नसल्यामुळे तिथे फक्त तरूण (दिसायला छान, फिगर बिगर एकदम मापात) लोकं येत नाहीत आणी आधीच्या पिढीतल्या लोकांना ही कल्पना समजावणं आणी ती त्यांच्या पचनी पडणं फार अवघड जातं असा अनुभव आहे. त्यात परत मानापमान असतातच. तसच गिफ्ट रजिस्ट्री ची कल्पना पण मला आवडते.

दुसरा भाग असा ही आहे की किमान काही संख्येचा चार्ज केटारर्स करतातच. त्यांना ते अन्न पॅक करून द्या आम्ही ते बाहेर कुठेतरी दान करतो (ह्या शब्दावरून वाद नको. दुसरा सेक्युलर शब्द असेल तर वापरायला मी विनाशर्त तयार आहे) ह्याला सुद्धा विरोध आहे. ह्या विषयाला खूप कंगोरे आहेत. ईतकं सिंपलिस्टीक सोल्युशन नाहीये. आपल्यापुरता जमेल तितकं अन्न वाया घालवू नये हे वैय्यक्तिक पातळीवर पाळावं ह्या मताचा मी आहे.

फेफ, यु आर राईट! हा विषय किचकट आहे. त्यापेक्षा वैयक्तिक पाळलेलं बरं आणि 'जमेल तितकं' प्रबोधन केलेलं बरं.

फेफ, यु आर राईट! हा विषय किचकट आहे. त्यापेक्षा वैयक्तिक पाळलेलं बरं आणि 'जमेल तितकं' प्रबोधन केलेलं बरं. >> पुण्याची ट्राफिक अशीच वैयक्तिक पातळीवर सोडल्याने मातेरं झाली. मेंढरं हाकल्याशिवाय लाईनीत जात नाही.

आपल्यापुरता जमेल तितकं अन्न वाया घालवू नये हे वैय्यक्तिक पातळीवर पाळावं ह्या मताचा मी आहे. >> +१ आधी तेच ध्येय आहे असल्यागत वागायचो मी. आता 'आपल्यापुरतं जमेल तितकं' वर आलोय.

शुभ प्र भात ! सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.

पियु यांनी डकवलेला संदेश खूप छान आहे. ज्यांनी तो वाचायला हवाय त्यांनी वाचला व स्वतात काही सुधारणा केली तर किती बरे होईल !

RSVP आपल्याकडे रुजायची खरोखर गरज आहे. आपण प्रयत्न करुयात.
नानाकळा यांनी धाग्याला लायनीत आणण्याचे जे प्रयत्न केले आहेत ते स्तुत्य आहेत.

हा विषय किचकट आहे. त्यापेक्षा वैयक्तिक पाळलेलं बरं आणि 'जमेल तितकं' प्रबोधन केलेलं बरं. >>> अगदी खरयं. या निमित्ताने पूर्वी वाचलेली २ वचने आठवली :
१. 'समाजप्रबोधन ही सदासर्वदा न कंटाळता करायची गोष्ट आहे.
२. 'The best way to educate people is to be an example' ( By Einstein)

दोन वर्षांपूर्वी एका इंग्रजी संस्थळावर मी हा लेख लिहिला होता ह्या लेखाच्या विषयाशी संबंधित आहे म्हणून तो इथे प्रकाशित करतेय
in Indian culture
food is called Purnabramha
Purnabramha means God

but in the world today there is a large amount of food wastage
there is a plenty of food wastage in weddings ,parties & restaurants.
there are too many children in the country ,
they work hard but still they don't get good & enough food
about 7 million children died in 2012 because of hunger...Cry.Cry
on the other hand we do wastage of food

Image result for child labour

there are so many things we can do in our daily routine
make it habit not to waste any food
don't cook food in large quantities ,eat fruit if needed
buy & cook food as much you require
if you host a family get together either at home ,a marriage hall or throw a party at a hotel " make sure you plan for the food to be transported to a place like an Orphanage / Old age shelter
There is no better thing than sharing your happiness with these people as well
Your mother may have said a lot of times not to waste food ,Please do follow this now

i request you all that don't waste food
make as much food as necessary

throwing food means disrespect of God
Please don't do this
Image result for hunger quotesImage result for hunger quotes and sayings

आपण ईथे अन्नाची नासाडी करतोय पण आजूबाजूला लोकं दोन घास अन्नासाठी वणवण भटकताहेत. हा भावनिक विचार झाला. पण प्रॅक्टीकल विचार करता आपण वाचवलेले, नासाडी न करता कमीच खाल्लेले अन्न त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार. पोहोचलेच तर अर्थातच त्याची जी किंमत आहे ती देऊनच त्यांना ते विकत घ्यावे लागणार.>>>> हा प्रॅक्टीकल विचार नाहि
माझ्या परिचयातले काहि मित्र आहेत ते दर शनिवारि आमच्या शहरातिल मारुति मंदिराबाहेर भिक मागनार्या लोकांना खान्याच्या वस्तु देतात. वाढदिवसादिवशि अनाथाश्रमांना, व्रुद्धाश्रमांना भेटि देउन गहु, तांदुळ दान देतात. अन्नदानाचि भावना मनात न ठेवता खरेतर हा प्रॅक्टीकल विचार आहे. आपल्याला दोन घास अन्नासाठी वणवण करणारि लोक कुठं बरं भेटतिल असा विचार ते करत बसत नाहित.

समारंभांमध्ये अन्न शिजवताना अंदाज येणं कठीण असत त्यामुळे कमी पडू नये म्हणून थोडं जास्त बनवलं जात पण घरी रोजचा स्वयंपाक करताना सुद्धा बऱ्याच घरांमध्ये जरूरीपेक्षा जास्त स्वयंपाक केला जातो आणि बऱ्याचदा अन्न वाया जात
बऱ्याच घरांमध्ये आमच्याकडे चारीठाव लागत म्हणून गरजेपेक्षा खूप जास्त स्वयंपाक करतात
रोजचा स्वयंपाक करताना आमच्याकडे आवश्यक तेवढाच स्वयंपाक केला जातो ,एखाद्या दिवशी कुणाला जास्त भूक असेल आणि जेवण कमी पडेल असं वाटलं तर पटकन एखादी भाकरी टाकायची किंवा वाटीभर भात टाकायचा दहा मिनिटात होत आणि फारच भूक लागली असेल तर दूध पोहे खाल्ले जातात
कमी पडायला नको च्या नावाखाली वारेमाप स्वयंपाक करणाऱ्या बायांचा भयंकर राग येतो मला

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार. आपल्याला हा लेख आवडला, तसेच आपण त्यावरील चर्चेत भाग घेतलात आणि विचार मांडलेत याचा मला आनंद वाटतो. माझ्याकडून आता समारोप करताना थोडे मनोगत व्यक्त करतो. त्यामध्ये थोडीशी आत्मस्तुती होऊ शकेल. त्याबद्दल आधीच आपली क्षमा मागतो.

माझा हा लेख पावणेदोन वर्षांपूर्वी छापील मासिकात ‘भूक’ नावाने प्रकाशित झाला होता. तो माझ्या आजपर्यंतच्या छापील लेखनातील सर्वाधिक प्रतिसाद मिळालेला लेख आहे. तेव्हाच्या प्रतिसादकांमध्ये सामान्य वाचकांबरोबरच ज्येष्ठ लेखक, अन्य काही मासिकांचे संपादक व प्रकाशक यांचाही समावेश होता. एका संपादकांनी तर हा लेख वाचून मला त्यांच्या मासिकात नियमित लिहिण्याची गळ घातली. तेव्हाचे प्रतिसाद हे मला पत्र, फोन व इ-मेल या तिन्ही माध्यमांतून मिळाले होते व ते लेखानंतर चार महिन्यांपर्यंत चालू होते. एकंदरीत तो सुखद अनुभव होता.

गेले वर्षभर मी विचार करत होतो की हा लेख माबोवर प्रकाशित करावा की नाही. कुठलेही लेखन आपण स्वतःच पुनर्प्रकाशित करणे ही लेखकासाठी अभिमानाची गोष्ट नसते. तसा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा आपलेच दुसरे मन आपल्याला जणू विचारते, ’’अरे, तुझी लेखनक्षमता आटली आहे का? तेच लेखन पुनर्प्रकाशित करण्यात कसले आहे भूषण?’’ झाले, मग हा विचार बराच काळ छळत राहिला.

पण, मग एक वास्तववादी विचार मनात आला. सध्याच्या वाचनसंस्कृती उतरणीला लागल्याच्या काळात छापील मासिकाचा प्रसार हा खूप मर्यादित झाला आहे. पुण्याहून प्रकाशित होणारे एखादे छापील मासिक हे महाराष्ट्रातील जेमतेम १० मोठ्या जिल्ह्यांपर्यंत पोचते आणि अल्प प्रमाणात शेजारील राज्यांमध्ये. त्याचे परदेशी मराठी वाचक तर अगदी अपवादात्मक राहिले आहेत. त्या तुलनेत इ-माध्यमाचा आवाका फार मोठा, अगदी वैश्विक आहे हे नक्की. कुठलाही लेखक जेव्हा सार्वजनिक माध्यमात लिहितो तेव्हा त्याला वाचकांच्या प्रतिसादाची भूक असतेच.

२००८ सालचे नोबेल विजेते फ्रेंच लेखक Jean Le Clezio ह्यांनी तर म्हटलेच आहे, ‘’वाचले जावे म्हणून आम्ही लिहितो, प्रतिसाद मिळावा म्हणून आम्ही लिहितो’’. तेव्हा लेखकाने ताकास जाऊन भांडे लपवण्यात काय हशील?

त्याच विचारास अनुसरून मला वाटले की एक प्रयोग म्हणून आपला हा लेख माबोवर पुनर्प्रकाशित करायला काय हरकत आहे? त्यानिमित्ताने आपला प्रतिसादांचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. मग पहिल्या संपादकांची रीतसर अनुमती घेतली व हा लेख इथे लिहीला. सुरवातीस त्याचे शीर्षक ‘भूक’ हेच ठेवले होते ( दक्षिणा, हर्पेन व मंजूताई यांना कदाचित आठवेल).

पहिला प्रतिसाद हा एक तासाच्या आतच आला. हुरूप वाढला. वेगवान प्रतिसाद हे तर इ-माध्यमाचे एक बलस्थान आहे.
आता ‘गुलमोहर’ मधील लेखनाचा माझा अनुभव सांगतो. साधारणपणे तिथे लेख लिहिल्यानंतर पहिले तीन दिवस हे त्या लेखकाचे असतात. त्या काळात लेखाचे भवितव्य स्पष्ट होते. कमाल प्रतिसाद हे त्याकाळात येतात. नंतर त्यांची गती मंदावते आणि फार तर त्या आठवड्याअखेर ते चालू राहतात. त्यापुढे तो लेख बहुतेकदा इतिहासजमा होतो आणि ‘इ-अडगळीत’ पडून राहतो !

हा लेख लिहील्याला जेव्हा २४ तास पूर्ण झाले होते तेव्हा प्रतिसादांची गाडी ही ६ या आकड्यापाशी रखडली होती. त्याचे दुखः नव्हते पण, मनात खोल कुठेतरी वाटत होते, “की नाही, नक्की अधिक प्रतिसाद येऊ शकतील पण, त्यासाठी काय करावे? लेखशीर्षकाचा पुनर्विचार करावा का?’’.

आता इथे वाचकांनी छापील व इ-माध्यमांमधील थोडा फरक ध्यानात घ्यावा. छापील मासिकात पूर्ण लेख हा वाचकाच्या दृष्टीक्षेपात असतो. तसेच संपादकाने लेखातील काही भाग वेगळ्या चौकटीत अधोरेखीत देखील केलेला असतो. त्यामुळे शीर्षकाचा वाचकाच्या वाचन –निर्णयावर फारसा परिणाम होत नाही. नेहेमीचे मासिक व परिचित लेखक या गोष्टी वाचकाला तो लेख वाचण्यास पुरेशा असतात.

इ-माध्यमात मात्र तसे नसते. हे माध्यम हा एक महासागर आहे ! त्यात प्रत्येक क्षणी अनेक जण आपापल्या घागरी रित्या करीत असतात. तेव्हा, जर लेखाचे शीर्षक वाचकाला आकर्षक वाटले तरच तो त्यावर टिचकी मारून आत शिरेल. म्हणून मी त्या बदलाचा निर्णय घेतला. आता बघा, ‘भूक’ हे शीर्षक तसे ‘गरीब बिचारे’ च आहे. तसेच भूक ही अनेक प्रकारची असू शकते. त्यामुळे फक्त या साध्या शीर्षकावरून वाचकाने काय समजायचे व लेख उघडायचा?

म्हणूनच मग मी ते बदलून ‘भुकेले आणि माजलेले’ असे केले. हे काहीसे भडक आहे हे मला मान्य आहे. पण, त्याचा परिणाम अगदी अर्ध्या तासातच दिसला आणि मग प्रतिसादांचा पाउस पडला ! बघता बघता शतकही साजरे झाले. तेव्हा वाचकहो, या छोट्याशा युक्तीबद्दल आपण मला माफ कराल अशी आशा आहे ! अर्थात, लेखावरील प्रतिसाद हे तुम्ही पूर्ण लेख वाचूनच दिले आहेत याची खात्री आहे. दोन्ही माध्यमांमध्ये लिहिणाऱ्या माझ्यासाठी हा मुद्दा एक अनुभव ठरला, हे नक्की.

कदाचित, शीर्षक बदलल्याने प्रतिसादांमध्ये लक्षणीय वाढ झाली, हा माझा समज खोटाही असू शकेल. प्रतिसादांच्या संख्येवरून असे म्हणता येईल की वाचकांना हा विषय महत्वाचा वाटला. बस! हेच खरे महत्वाचे.

एव्हाना हा लेख पुरेशा वाचकांपर्यंत पोचला आहे. आता तो ‘अडगळीत’ जाण्यापूर्वी माझी एक इच्छा आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा त्याचे शीर्षक बदलून ते पहिले ‘भूक’ असेच ठेवावे ! ते गरीब बिचारे शीर्षकच मला अधिक प्रिय आहे. पण आता हा निर्णय मात्र मी घेत नाही, तर तो तुमच्यासारख्या सुजाण वाचकांवरच सोपवतो. आपण सवडीने येथे त्यावर लिहीलेत तर मी आपला आभारी होईन. तसेच छापील माध्यमातील लेखन इथे पुनर्प्रकाशित करण्याबाबत आपली काय मते आहेत हेही जाणून घ्यायला मला आवडेल.

असो, बरेच लांबले पण, मन मोकळे केल्याचे समाधान आहे. आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्च्छा !

ती म्हणजे पुन्हा एकदा त्याचे शीर्षक बदलून ते पहिले ‘भूक’ असेच ठेवावे >>>> आहे तेच योग्य आहे असे मला वाटते
छापील माध्यमातील लेखन इथे पुनर्प्रकाशित करण्याबाबत आपली काय मते आहेत>>> खुप चांगला विचार

ती म्हणजे पुन्हा एकदा त्याचे शीर्षक बदलून ते पहिले ‘भूक’ असेच ठेवावे >>>> आहे तेच योग्य आहे असे मला वाटते
छापील माध्यमातील लेखन इथे पुनर्प्रकाशित करण्याबाबत आपली काय मते आहेत>>> खुप चांगला विचार + १११११

म्हणूनच मग मी ते बदलून ‘भुकेले आणि माजलेले’ असे केले. हे काहीसे भडक आहे हे मला मान्य आहे. पण, त्याचा परिणाम अगदी अर्ध्या तासातच दिसला आणि मग प्रतिसादांचा पाउस पडला !
>>>>>

हा गैरसमज आहे Happy
शीर्षकावरून केवळ विषय कळतो. टिचकी मारावी की नाही हे शीर्षक नाही तर लेखकाचे / धागाकर्त्याचे नाव बघून ठरते.
प्रतिसाद खेचायचे काम लेखातील विषय किंवा त्याखाली आलेले प्रतिसाद करतात.
हे नाव अचानक का बदलले हे मलाही समजले नव्हते. त्या चिंतेत दोन रात्री जागलो. आता समजले त्याबद्दल धन्यवाद. आता सॅटरडे नाईटला फुल टाईट झोप येईल Happy

बाकी लेख दुसर्‍या एका संकेतस्थळावर पुन्हा प्रकाशित करणे हे आपल्याला चूक का वाटले हे समजले नाही. जर आपला लेख काही संदेश पोहोचवायच्या, प्रबोधन करायच्या हेतूने लिहिला असेल तर असा विचार मनात आलाच नाही पाहिजे. आपले अजूनही काही लेखन या संभ्रमात अडकले असेल तर त्याला मोकळे करा. शुभेच्छा Happy

ऋन्मेषा - तेरी नींद चुरानेवाली अजून इण्टरेस्टिंग कारणे असतील असे वाटले होते. अर्र्र Proud

कुमार१ - नवीन वाचकवर्ग लेखाला मिळण्याकरता असे पुन्हा प्रकाशित करणे यात काहीच गैर नाही. आपला लेख जास्तीत जास्त लोकांनी वाचावा असे कोणालाही वाटते.

टिचकी मारावी की नाही हे शीर्षक नाही तर लेखकाचे / धागाकर्त्याचे नाव बघून ठरते. >>> हे खरे आहे, आणि यात काही चुकीचेही नाही. आपण पुस्तके विकत सोडा, लायब्ररीतून सुद्धा घेताना लेखक बघून घेतोच ना? ओळखीचा लेखक असला तर इथे वाचला जाण्याची शक्यता जास्त असते.

यावरून एक जोक आठवला
एकदा जोगळेकर काका अँटेना दुरुस्त करायला गच्चीच्या कट्ट्यावर चढतात. ते करता करता त्यांचा तोल जातो आणि ते ५व्या मजल्यावरून खाली पडतात.
पडता पडता ते त्यांच्याच स्वयंपाकघराच्या खिडकीवरून जाताना,
"सुलभा दोन पोळ्या कमी" असे सांगून पुढे जातात.
>>

आता घ्या या विनोदाचा पुढचा भाग :
सुलभाही त्यावर तत्परतेने उत्तरतात, '' बरं, बरं, माझ्याही दोन पोळ्या करीत नाही कारण, तुम्ही 'गेल्यावर' आपले शेजारी डबा पाठवतीलच की ! Bw

भुकेले आणि माजलेले ह्याच्य्या मधली काही कॅटेगरी नाहीच का? >>>>> अहो, आहे की. लेखातील हे वाक्य बघा :

समाजातील बहुतेक लोक कष्ट करून अन्न मिळवतात आणि आपली भूक भागवतात. त्यामुळे त्यांना अन्नाची किंमत समजलेली असते. ते नेहेमी अन्न लवून भजूनच खातात.

हल्ली माजाची एक नविनच किळसवाणी पद्धत अंमलात आणली जाते
ती म्हणजे, वाढदिवसाच्या दिवशी केक कापल्यावर तो तोंडाला फासणे

Pages