भुकेले आणि माजलेले

Submitted by कुमार१ on 18 April, 2017 - 07:47

प्रसंग पहिला :

परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले.

पलीकडच्या रिकाम्या रुळांदरम्यान ढीगभर अन्न टाकून दिलेले होते अन ते अन्न एक माणूस खाली बसून अधाशीपणे खात होता. दोन-तीन रंगांचे भात त्यामध्ये दिसत होते. कदाचित ते रेल्वेच्या खानपान सेवेतील उरलेले वा लोकांनी टाकून दिलेले पदार्थ असू शकतील. त्या कंगाल माणसाकडे पाहताच त्याचा ‘भिकारी’ हा दर्जा लगेच लक्षात आला. त्याच्या चिवडून बकाबका खाण्याच्या पद्धतीवरून तो बराच काळ उपाशी असणार हेही जाणवले. आता तो माणूस जिथे बसला होता तिथेच आजूबाजूला जुन्या-नव्या मानवी व प्राण्यांच्या विष्ठा विखुरलेल्या असणार होत्या. परंतु, त्याची भूक एवढी तीव्र असणार की असले स्वच्छतेचे विचार करणे त्याला परवडणारे नव्हते. ते दृश्य बघून अगदी गलबलून आले.

तेवढ्यात आमच्या गाडीने मोठ्ठा हॉर्न दिला व ती पुढे सरकली. त्या दहा मिनिटांमध्ये मनात असंख्य विचारांचे काहूर माजले. ते केविलवाणे दृश्य मनातून जाता जात नव्हते. ‘‘का अशी वेळ येते एखाद्यावर’’ हा विचार माझ्या मनाला अक्षरशः कुरतडत होता.

तात्पर्य : तीव्र भुकेल्या जिवाला कुठलेही अन्न चालते – अगदी कुजलेले व घाणीत बरबटलेले देखील. भूक ही एकमेव भावना त्याला खाण्यायोग्य काहीही पोटात ढकलायला लाचार करते.

प्रसंग दुसरा :
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवारची रात्र होती. त्या शहरातील एक प्रथितयश डॉक्टर त्यांच्या पत्नी व दोन मुलींसह एका प्रतिष्ठीत रेस्तराँमध्ये जेवायला आले होते. त्यांच्या आठवडाभरातील कामाच्या व्यापानंतरचे हे विरंगुळ्याचे क्षण होते. रेस्तराँमध्ये मंद प्रकाश पसरला होता. चित्तवृत्ती फुलवणारे संगीत चालू होते आणि झकपक गणवेशातील कर्मचाऱ्यांची लगबग दिसत होती. डॉक्टर नुकतीच वयाची चाळीशी ओलांडलेले, तर त्यांच्या मुली या शालेय वयातील. आता हे कुटुंब एका टेबलावर स्थिरावले. तेथे वेटर येताच त्यांनी सूप व ‘स्टार्टर’ ची ऑर्डर दिली.

‘स्टार्टर’ हे मुख्य जेवणाआधीचे अल्पखाद्य असते याची जाणीव अद्याप त्या खादाड मुलींना नसावी. त्यामुळे, आई-वडिलांचा विरोध असतानाही त्या नावाखाली तब्बल चार प्लेट्सची ऑर्डर दिली जाते. ते पदार्थ येतात. खाणे सुरू झाल्यावर थोड्याच वेळांत त्यांच्या टेबलावर नजर टाकता हे स्पष्ट होते की त्या पदार्थांपैकी निम्मा भाग तरी खाऊन संपणार नाही. त्यावर मुलींचे आईवडील त्यांना रागावतात. पण, त्याचा फारसा परिणाम होत नाही. आता मुख्य जेवणाची ऑर्डर दिली जाते. पुन्हा एकदा मुलींचा हावरेपणा आवरणे आईवडिलांना जड जाते. वेटर जेवण आणून ठेवतो. थोड्या वेळातच अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा निम्मे पदार्थ पानात शिल्लक राहणार हे दिसू लागते.

डॉक्टर व त्यांच्या पत्नीने मागवलेल्या अन्नाला यथाशक्ती न्याय दिलेला असतो; पण केवळ मुलींच्या हट्टामुळे मागवलेले गरजेपेक्षाचे जास्त अन्न आता उरत होते. ते बघून हे दांपत्य खरोखर अस्वस्थ झाले. त्या दोघांना अन्न टाकणे ही कल्पनाही सहन होणारी नव्हती. मुली मात्र त्याबाबत बेफिकीर होत्या. एव्हाना ताटातले अन्न संपत नसतानाही त्या दोघी यानंतर ‘ज्यूस का आईसक्रिम’ मागवायचे याची चर्चा करू लागल्या. किंबहुना अशा उच्चभ्रू रेस्तराँमध्ये असेच वागायचे असते, ‘अन्न टाकले तर त्यात काय एवढे’ असे भाव त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

रेस्तराँमधील इतर टेबलांवरसुद्धा थोड्याफार फरकाने अशीच स्थिती होती. काहीतरी अन्न टाकल्याशिवाय ‘पार्टी’ साजरी झालेली नव्हती. अशा टाकलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे हा तेथील कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामातील अप्रिय पण अटळ भाग होता. तेव्हा आता हे कुटुंब उठेल व आपल्याला ते टेबल स्वच्छ करायचेय या प्रतिक्षेत तिथले नोकर होते. परंतु, आता त्या टेबलावर एक अनपेक्षित प्रकार घडला.

आपल्या मुलींवर क्रुद्ध झालेल्या डॉक्टरांनी ‘डेझर्ट’ ची ऑर्डर निक्षून थांबवली. एवढेच नाही, तर पानात उरलेले सर्व अन्न अजिबात टाकता येणार नाही असे मुलींना खडसावून सांगितले. मग डॉक्टरांनी वेटरला बोलावले व ते उरलेले सर्व अन्न ‘पार्सल’ करून देण्यास सांगितले. वेटर त्यांच्या या पवित्र्याने अवाक झाला. त्याने त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे ठरवले. खरे तर आतापर्यंत त्या रेस्तराँमध्ये असा प्रकार घडला नव्हता. त्याकाळी (म्हणजे सुमारे ३० वर्षांपूर्वी) अशा उरलेल्या अन्नाचे पार्सल करायची पद्धत रुळलेली नव्हती. अखेर कशाबशा प्लास्टिकच्या पिशव्या जमवून वेटरने ते पार्सल केले. आता डॉक्टरांचे कुटुंब ते पार्सल घेऊन निघाले. ते बाहेर पडत असताना तेथील सर्व कर्मचारी डॉक्टरांकडे कौतुकाने व आश्चर्याने बघत राहिले.

तात्पर्य : अन्न टाकण्याचा माज हा उतरवलाच पाहिजे आणि त्याची सुरवात ही आपल्या घरापासूनच हवी.

प्रसंग तिसरा
:

संध्याकाळची वेळ. छान वारे सुटलेले. एका शहरातील उपनगराचा भाग. छोट्या-मोठ्या दुकानांच्या गर्दीत रस्त्यावर एक वडापावची गाडी उभी आहे. या तळणीतल्या वड्यांचा खमंग वास दरवळतो आहे. तिथेच एक बसण्यासाठी कट्टा आहे. त्यावर बसून काही ज्येष्ठ नागरिक निवांत गप्पा मारताहेत. एवढ्यात आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते एका माणसाकडून. तो माणूस कळकट कपड्यांमध्ये आहे आणि चालता चालता काकुळतीने म्हणतोय, ‘’ओ दादा, ओ भाऊ, गावाकडून आलोय, दोन दिस उपाशी हाये, पोटात अन्नाचा कण नाही. लई भूक लागलीय हो. द्या कुणीतरी धा रुपये तरी.” त्याचे लक्ष तिथल्या वडापावच्या गाडीवर आहे आणि ‘’वडापाव दहा रुपये” ही त्या वडेवाल्याची आरोळी त्याने ऐकलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूप भुकेला वाटतोय. तो जीवाच्या आकांताने भीक मागतोय – फक्त दहा रुपयांची. एकीकडे त्या गाडीच्या बाजूने त्याच्या येरझाऱ्या चालू आहेत.

ते दृश्य पाहून कट्ट्यावरच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जरा अस्वस्थता आली. त्यांच्या गप्पा जरा बाजूला ठेवून ते त्या माणसाबद्दल चर्चा करू लागले. त्यांच्यात थोडेफार संवाद झडले ते असे :
‘’जाऊ द्या हो, नका लक्ष देऊ त्याच्याकडे. जाईल निघून जरा वेळाने’’,
‘’आता भीक मागायची म्हटली की दोन दिवसांच्या उपाशीपणाची कथा सांगणारच की हो तो’’,
‘’अहो, कष्ट नाही केले की हे वेळ येते माणसावर. मग भीक मागणे हा सगळ्यात सोपा धंदा.’’

त्या माणसाच्या येरझाऱ्या आणि आर्त स्वरातले भीक मागणे सुरूच आहे. अखेर, त्या ज्येष्ठांपैकी एकांना राहवत नाही. भीक देणे हे त्यांना तत्वतः मान्य नाहीये. पण, आता ते जागेवरून उठतात. झपाटल्यासारखे त्या भिकाऱ्याजवळ जातात. थोड्याशा चढ्या आवाजात ते त्याला हाक मारतात आणि वडापावच्या गाडीजवळ बोलावतात. आता ते खिशातून दहाची नोट काढतात व ती त्या गाडीवाल्याला देउन त्याला त्या भिकाऱ्याला एक वडापाव द्यायला सांगतात. त्यानुसार कृती होते. मग तो भिकारी वडापाववर अक्षरशः तुटून पडतो व दोन मिनिटात तो फस्त करतो. त्या गृहस्थांना समाधान वाटते. ते भिकाऱ्याकडे अधिक लक्ष न देता शांतपणे चालू लागतात.

तात्पर्य
: भिकाऱ्याची भूक भागवणे ही प्राथमिकता. भिकारीपणावरील तात्विक चर्चा ही त्यानंतरची गोष्ट.

प्रसंग चौथा( व शेवटचा) :

शहरातील एका शानदार मंगल कार्यालयात लग्नसोहळा चालू होता. त्यात भोजनाची पंगत बसली होती. त्यामध्ये माझ्या शेजारी एक उच्चशिक्षित व्यावसायिक गृहस्थ बसलेले होते. आमच्याकडे येणारा प्रत्येक वाढपी हा ‘वाढू का’ असे विचारूनच वाढत होता. माझ्या शेजारचे ते गृहस्थ त्याला दरवेळी ‘वाढा’ असेच म्हणत होते. याउलट मी मात्र, मी जेवढे खाऊ शकणार होतो तेवढेच वाढायला लावले.

थोड्या वेळांत माझे जेवण संपत आले व माझे ताट स्वच्छ दिसू लागले. त्या गृहस्थांचे ताट मात्र अजून तुडुंब भरलेले दिसत होते. वाढलेले सर्व पदार्थ ते खाऊन संपवू शकणार नाहीत हे आता स्पष्ट होते. एकदम ते मंद स्मित करीत माझ्या ताटाकडे पाहत मला म्हणाले, ‘’तुम्ही ताट किती स्वच्छ केले आहे ते दाखविता आहात काय?’’ त्यावर मी जोरकसपणे ‘’हो’’ म्हणालो आणि नंतर माझ्या ताटातील सर्व अन्न संपवून उठलो. मी हात धुउन परत येताना पाहिले की ते गृहस्थ आता उठले होते व त्यांनी ताटात अनेक पदार्थ टाकून दिले होते. त्यामध्ये किमती गोड पदार्थही होते.

अन्न टाकणे हा प्रतिष्ठेचा एक निकष मानणारे ते महाशय बघून मला मनस्वी चीड आली. तसेच त्या क्षणी आपण याबाबत काहीही करू शकत नाही याचा विषाद वाटला. समाजातील अशा मस्तवाल लोकांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करत मी कार्यालयाबाहेर पडलो. जेवणाची पंगत असो वा बफे पद्धत, असे अन्न टाकणारे अनेक मुजोर आपल्याला सदैव दिसतात खरे.

तात्पर्य: एकजण अन्न टाकणारा आणि दुसरा ते लवून भजून खाणारा. पहिल्याच्या दृष्टीने दुसरा हा टिंगलीचा विषय, तर दुसऱ्याच्या दृष्टीने पहिला हा चीड आणणारा विषय.

... अन्न – माणसाची जगण्यासाठीची मूलभूत गरज. ते अन्न काहीही करून मिळवलेच पाहिजे याची जाणीव करून देणारी संवेदना म्हणजे भूक.
समाजातील बहुतेक लोक कष्ट करून अन्न मिळवतात आणि आपली भूक भागवतात. त्यामुळे त्यांना अन्नाची किंमत समजलेली असते. ते नेहेमी अन्न लवून भजूनच खातात.

काही लोकांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी असते. त्यांना अन्न मिळवण्यासाठी कष्ट नाही केले तरी चालणार असते. त्यांची भूक भागवण्याची सोय एकतर त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवलेली असते किंवा, दुसऱ्याचे शोषण करून स्वतःची पोटे भरण्यात हे लोक तरबेज असतात. सुबत्तेतून आलेला माज त्यांच्यामध्ये अगदी भिनलेला असतो. अशा लोकांमधूनच मग निर्माण होतात अन्न टाकणारे मुजोर. भुकेची वेदना कधीही न जाणवलेली ही माणसे. त्यांना अन्नाची किंमत ती काय कळणार?

या दोघांशिवाय तिसरा एक वर्ग समाजात असतो. हे लोक अन्न मिळवण्यासाठी कष्ट व धडपड करण्याऐवजी भिकारी होण्याचा सोपा पर्याय निवडतात. तेव्हा या लोकांना फुकट मिळेल तेवढेच व वाट्टेल तसले अन्न खाण्याची वेळ येते. त्यांच्या सततच्या भुकेल्या अवस्थेला ते स्वतःच जबाबदार असतात. ‘ज्याचे हात काम करतात तो कधीही उपाशी राहत नाही’ या वास्तवाचा त्यांना बहुधा विसर पडलेला असतो.

विष्ठेने बरबटलेले अन्न चिवडून खाणारा भिकारी, काबाडकष्ट करुनही अर्धपोटी असलेली माणसे, मुक्तहस्ते अन्नाची नासाडी करणारी आणि ते टाकण्यात प्रतिष्ठा मानणारी माणसे यांसारखी दृश्ये आपल्या अवतीभवती वारंवार दिसतात. ही सगळीच दृश्ये व्यथित करणारी. ही दृश्ये आपल्याला ‘समाजातील आर्थिक विषमता व वाढती दरी’ यांसारख्या जडभारी विधानांचा अर्थ अगदी स्पष्ट करून सांगतात. एवढेच नाही, तर या वास्तवाची प्रखर जाणीव करून देतात.

एखाद्या माणसाच्या भिकारी होण्याला नक्की जबाबदार कोण?
फक्त तो स्वतः की आपण सगळेच? उत्तर देणे अवघड आहे. पण, काही मुद्दे अगदी स्पष्ट व स्वच्छ दिसतात :
१. माणसाने कोणतेही काम हलके न मानता वाटेल त्या कष्टांची तयारी दाखवली तर त्याची भूक भागण्याइतके अन्न त्याला जरूर मिळते.
२. ज्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा आणि कित्येक सुखसोयी या विनासायास मिळाल्या आहेत, त्यांनी निदान अन्न टाकण्याचा माज तरी करू नये ही अपेक्षा.
३. आपली भूक भागण्यामागे आपण सोडून इतर अनेकांचे कष्टही कारणीभूत असतात, ही जाणीव सर्वांना असणे हेही महत्वाचे.

ज्या दिवशी या पृथ्वीतलावरील उपलब्ध अन्न हे मानवासहित सर्वच प्राणिमात्रांची भूक भागवून सर्वांना तृप्त ठेवेल तो अर्थातच सुवर्णदिन असेल.

( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी ( 'भूक' या नावाने) : ‘अंतर्नाद’ मासिक. संबंधित संपादकांच्या परवानगीने येथे प्रकाशित.)
*************************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक मनापासून लिहलेला लेख ... धन्यवाद
आमच्या घरीपण आजिबात अन्न टाकलेला चालत नाही माझ्या वडिलांना, आणि तीच सवय माझ्या मुलांना पण लागली आहे ... एकतर आपल्या जेव्हढा जाईल तेव्हडाच घ्या आणि पाण्यातले संपले कि मगच पुन्हा घ्या असा अलिखित नियमच आहे ...
परंतु मी काही लोक इतरांना आग्रह करण्यात धन्यता मानतात ... दुसऱ्याला पार पोट फुटेस्तोवर वाढतात आणि मग अन्न पण वाया जाते किंवा मग खाणार्यांची पोटं बिघडतात ... मला अतिशय राग येतो या आघ्राही मंडळींचा

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
ऋन्मेष : जरी तुम्ही तुमच्या अन्न टाकण्याच्या सवयीची प्रामाणिक कबुली दिली असली तरी ते योग्य नव्हेच. बघा प्रयत्न करून चांगल्या दिशेने. त्यासाठी शुभेछा.

यात प्रामाणिकपणा वगैरे काही नाही. माझ्यासाठी नासाडी कुठलीही का असेना वाईटच! मग ती अन्नधान्याची असो वा कपडेलत्ते वीज पाणी कागद पुठ्ठा वा कसलीही वस्तू जिला पैसे पडतात.
अन्नधान्याची सर्वात त्रासदायक नासाडी म्हणजे काही लोकं त्यापासून दारू बनवतात. वर ती पिऊन ओकतात आणि त्यासोबत खाल्लेले अन्नही बाहेर काढतात.

असो, पण एकंदरीत अन्नाच्या नासाडीबद्दल लोकं जास्त तीव्रतेने व्यक्त होतात. यामागे केवळ भावनिक कारण आहे की आणखी काही.

हा जेन्युअन प्रश्न आहे.

वर कोणीतरी अन्नधान्य आपल्यापर्यंत पोहोचतानाच्या कष्टांचा उल्लेख केला. पण कष्ट तर जगातल्या प्रत्येक उत्पादनामागे असतेच. जे कष्ट करतात त्यांचा त्यांना मोबदलाही मिळतो. पुढे त्यांचे प्रॉडक्ट वापरकर्ता कसा वापरतो आहे याच्याशी त्याचा काही संबंध नसतो.

जर मी अन्न नासाडी टाळली तर वर्षाला जो किराणा माल मी भरतो तो कमी भरेन. अन्नधान्याची मागणी कमी होईल. परीणामी या क्षेत्रातील रोजगार कमी नाही का होणार.

आपण ईथे अन्नाची नासाडी करतोय पण आजूबाजूला लोकं दोन घास अन्नासाठी वणवण भटकताहेत. हा भावनिक विचार झाला. पण प्रॅक्टीकल विचार करता आपण वाचवलेले, नासाडी न करता कमीच खाल्लेले अन्न त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार. पोहोचलेच तर अर्थातच त्याची जी किंमत आहे ती देऊनच त्यांना ते विकत घ्यावे लागणार.
पाण्याला हा नासाडीचा मुद्दा लागू होतो कारण पिण्यायोग्य पाण्याचा साठा मर्यादीत आहे ते जपून वापरावे. पण अन्नधान्याबाबतही हे लागू होते का?
म्हणजे जगातला अन्नधान्याचा साठा मर्यादीत आहे का जे मी नासाडी केल्याने ईतरांना ते कमी मिळेल. या जगाची जी लोकसंख्या आहे तितके अन्न पिकवले जात नाही का? कदाचित आजच्या तारखेला लोकसंख्या पाहता हे असूही शकेल पण काही वर्षांपूर्वी नक्कीच असे नसावे.

मस्त लेख आहे. कालच प्रतिसाद देणार होते वाचल्या वाचल्या पण राहून गेलं. पण आज अजून प्रतिसाद वाचायला मिळाले.

आई या पदावर नवीन असल्याने मला या अशा अन्न वाया घालवण्याची खूप भीती वाटते. कारण माझ्या मुलाला अजून सगळे पदार्थ आवडत नाहीत आणि असे संस्कार करून घेण्यासाठी तो अजून लहान आहे (२ वर्षांचा)
पण मग आम्ही बाहेर जेवायला जाताना त्याला संपूर्ण घरचे जेवण करायला लावून निघतो. तिथे त्याच्या लहरी प्रमाणे तो आमच्यातले काही पदार्थ खाऊन बघतो. एकदोनदा हॉटेलमध्ये त्याच्यासाठी वरण भात मागवून तो सगळा घरी आणावा लागल्या पासून आम्ही ही युक्ती काढली आहे. शक्य असेल तिथे मी त्याच्यासाठी घरचा डबा नेते.

घरात जर त्यानी उगीचच हे नको ते नको केले तर वर दिलेल्या प्रतिसादाप्रमाणे मी त्याला दुसरे काही ऑप्शन देत नाही. १-२ तासांनी कडकडून भूक लागली की तो जे आधी दिले होते ते खातो. तसेच जेवणासाठी त्याच्या मागे मागे फिरून त्याला भरवणे, व्हिडियो दाखवून भरवणे, एकूणच जेवणापासून लक्ष दुसरीकडे वळवून भरवणे हे सुद्धा अगदी शक्य तितके टाळतो. मी शक्य तितके म्हणते कारण जेव्हा मूल जेवत नसते तेव्हा जसे अस्वस्थ वाटते तसे इतर बाबतीत इतक्या प्रकर्षाने वाटत नाही. त्यामुळे अशी शिस्त लावताना मलाच खूप त्रास होतो.

या निमित्ताने, असा मुलांना खाण्याची गोडी कशी लावावी. आणि खासकरून भाजी खायची सवय कशी लावावी हे डिस्कस करणारा एखादा अनुभवी आई बाबांचा धागा असेल तर त्याची लिंक द्यावी.

सई ताई, तुमचं मूल 2 वर्षांचं आहे, एवढा विचार त्याच्याबद्दल नका करू, त्याला 5 व्या वर्षापासून शिस्त लावा.

छान लेख आहे!!

भारतात माझ्या कंपनीच्या कँटीनमध्ये कशाचीही हाफ प्लेट मिळत नसे. फुल प्लेट पुष्कळ वेळा खूप जास्त असे. तेव्हा मी पूर्ण पैसे देऊन प्लेट कमी भरा असे सांगत असे. माझे कित्येक कलीग्ज ह्या सवयीवरून मला हसायचे. पण पैसे आणि अन्न दोन्ही वाया जाण्यापेक्षा अन्न वाचेल असे समाधान मला मिळायचे. पण हल्ली माझ्याकडूनसुद्धा बर्‍याच वेळा नासाडी होऊ लागली आहे. तुमचा लेख वाचला आणि स्वत:मध्ये सुधारणा आणावीशी वाटतेय.

सई तुमचा प्रतिसाद चांगला आहे.
या निमित्ताने, असा मुलांना खाण्याची गोडी कशी लावावी. आणि खासकरून भाजी खायची सवय कशी लावावी हे डिस्कस करणारा एखादा अनुभवी आई बाबांचा धागा असेल तर त्याची लिंक द्यावी. >>> +१

छान लेख.आमच्याकडे काही उरलं तर प्राण्यांना खाऊ घालतो.गाई,कुत्रे,मांजर हे नेहमीच भुकेले असतात.भात उरला तर पक्ष्यांना खायला देतो.

हिंदू धर्मात लग्नात तांदुळ उधळणे ,देवाला डाळ,गहू ,तांदुळ वाहणे अश्या अन्नाची नासाडी करण्याच्या प्रथा आहेत.मला वाटतं त्या बंद व्हायला हव्यात.

सई, सुमुक्ता व सिंजी : आभार !
लग्नात तांदुळ उधळणे ,देवाला डाळ,गहू ,तांदुळ वाहणे अश्या अन्नाची नासाडी करण्याच्या प्रथा आहेत.मला वाटतं त्या बंद व्हायला हव्यात. >>> अगदी सहमत. आपण स्वत्।पासून सुरवात करायची.

पण हल्ली माझ्याकडूनसुद्धा बर्‍याच वेळा नासाडी होऊ लागली आहे. तुमचा लेख वाचला आणि स्वत:मध्ये सुधारणा आणावीशी वाटतेय. >>>> जरूर सुधारणा करा. या लेखनातून काही प्रबोधन झाले तर आनंदच होईल.

आणखी हवं असेल तर घे. पण त्यांना कळत नाही आपलं ताट स्वच्छ होते तोच क्षण असतो आपलं पोट भरण्याचा, जो आणखी ताटात घेऊन पुरा होत नाही. Happy
बरोबर ना?>>>>+१११

ऋन्मेष तु महान आहेस
साष्टांग घालायला कुठे येऊ तेव्हढं सांग फक्त.
______/\_______

यात प्रामाणिकपणा वगैरे काही नाही. माझ्यासाठी नासाडी कुठलीही का असेना वाईटच! मग ती अन्नधान्याची असो वा कपडेलत्ते वीज पाणी कागद पुठ्ठा वा कसलीही वस्तू जिला पैसे पडतात.
अन्नधान्याची सर्वात त्रासदायक नासाडी म्हणजे काही लोकं त्यापासून दारू बनवतात. वर ती पिऊन ओकतात आणि त्यासोबत खाल्लेले अन्नही बाहेर काढतात. >> काही लोकांना फक्त तोंडाच्या वाफा दवडता येतात, तु पण त्यापैकी एक वाटतोस, फक्त चर्चा करायची तोंडाची वाफ दवडायची पण सुयोग्य मुददा मांडायचा नाही. आपण अन्नाची नासाडी करतोय हे तुला कळतंय पण तु त्यात बदल करशील या अर्थाचं एक ही वाक्य लिहिलं नाहियेस.

असो, पण एकंदरीत अन्नाच्या नासाडीबद्दल लोकं जास्त तीव्रतेने व्यक्त होतात. यामागे केवळ भावनिक कारण आहे की आणखी काही. >> ते कसलं आहे ते तुच शोध. नोर्मली आई बहिणीवरून शिव्या दिल्यावर लोकांना जे वाटते तेच काही सुज्ञ लोकांना अन्नाची, पाण्याची आणि विजेची नासाडी झाल्या वर वाटते. त्यामुळे तु शोध....

जर मी अन्न नासाडी टाळली तर वर्षाला जो किराणा माल मी भरतो तो कमी भरेन. अन्नधान्याची मागणी कमी होईल. परीणामी या क्षेत्रातील रोजगार कमी नाही का होणार. >> फक्त आणि फक्त साष्टांग स्विकारावा ___/\___

पण प्रॅक्टीकल विचार करता आपण वाचवलेले, नासाडी न करता कमीच खाल्लेले अन्न त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार. पोहोचलेच तर अर्थातच त्याची जी किंमत आहे ती देऊनच त्यांना ते विकत घ्यावे लागणार. >> म्हणून अन्नाची नासाडी जस्टिफाय होते? Uhoh

पाण्याला हा नासाडीचा मुद्दा लागू होतो कारण पिण्यायोग्य पाण्याचा साठा मर्यादीत आहे ते जपून वापरावे. पण अन्नधान्याबाबतही हे लागू होते का?
म्हणजे जगातला अन्नधान्याचा साठा मर्यादीत आहे का जे मी नासाडी केल्याने ईतरांना ते कमी मिळेल. या जगाची जी लोकसंख्या आहे तितके अन्न पिकवले जात नाही का? कदाचित आजच्या तारखेला लोकसंख्या पाहता हे असूही शकेल पण काही वर्षांपूर्वी नक्कीच असे नसावे. >> Uhoh लोकसंख्या वाढते तशी जमिन वाढते का? जमिनिचा कस वाढतो का? पाण्याचा साठा वाढतो का?

तुझ्या तोंडी लागायचं नाही असं नेहमी ठरवते पण तुझी वरची पोस्ट वाचून अगदीच राहवलं नाही.

पाण्याला हा नासाडीचा मुद्दा लागू होतो कारण पिण्यायोग्य पाण्याचा साठा मर्यादीत आहे ते जपून वापरावे. पण अन्नधान्याबाबतही हे लागू होते का?
म्हणजे जगातला अन्नधान्याचा साठा मर्यादीत आहे का जे मी नासाडी केल्याने ईतरांना ते कमी मिळेल. या जगाची जी लोकसंख्या आहे तितके अन्न पिकवले जात नाही का? कदाचित आजच्या तारखेला लोकसंख्या पाहता हे असूही शकेल पण काही वर्षांपूर्वी नक्कीच असे नसावे.
>>
अत्यंत चुकीचा प्रतिवाद. हे अन्नधान्य पाण्याशिवाय पिकतं काय? शेती साठी लागणारी जागा अनेकदा जंगल साफ करून आलेली असतेच शिवाय अन्नधान्य पिकवण्यासाठी लागणार पाणी ज्या धरणातून येतं त्या खालीही कित्येक शेती - कित्येक जंगल - सबंध परिसंस्था - आणि अनेक संसार - प्राणी पक्षी किटक वगैरे जीव गेलेले असतात.

दक्षिणा व नानबा : जाउद्यात. सरळ दुर्लक्ष करा त्या प्रतिसादाकडे. मी तेच केले आहे.
आपली शक्ती आपण विधायक चर्चेसाठी राखून ठेवू.

ऋन्मेष, उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, गोड मानून घ्या देवा!

यात प्रामाणिकपणा वगैरे काही नाही. माझ्यासाठी नासाडी कुठलीही का असेना वाईटच! मग ती अन्नधान्याची असो वा कपडेलत्ते वीज पाणी कागद पुठ्ठा वा कसलीही वस्तू जिला पैसे पडतात.

नासाडी म्हणजे कोणताही उपयोग न करता वाया घालवणे. ही एक व्याख्या स्पष्ट असलेली बरी.

अन्नधान्याची सर्वात त्रासदायक नासाडी म्हणजे काही लोकं त्यापासून दारू बनवतात. वर ती पिऊन ओकतात आणि त्यासोबत खाल्लेले अन्नही बाहेर काढतात.
नॉट एक्झॅक्टली! असं ताणलं तर. काही लोक जे नुसतं खात असतात, जगाच्या दॄष्टीने किंवा त्यांच्या स्वतःच्या दृष्टीनेही काही उपयोगाचं करत नाहीत. 'खायला काळ आणि भूइला भार' टाईप, त्यांनीही खाल्लेलं नासाडीच समजावी लागेल. युजलेस इटर्स! Wink

असो, पण एकंदरीत अन्नाच्या नासाडीबद्दल लोकं जास्त तीव्रतेने व्यक्त होतात. यामागे केवळ भावनिक कारण आहे की आणखी काही.
हा जेन्युअन प्रश्न आहे.

भावनिक आणि प्रॅक्टीकलही. भावनिक यासाठी की अन्न ही मूलभूत गरज आहे, कितीही श्रीमंत, पावरबाज असो की भिखारी अन्न ही त्याची गरज असते, अन्नपदार्थाला ऑप्शन नाही. ज्यांना सहज उपलब्ध होते, भूक म्हणजे काय हे ज्यांना माहित नसते अशांच्या लेखी अन्नाचे महत्त्व त्यां लोकांच्या दृष्टीने वेगळे असते ज्यांना दिवसभर कष्ट करुनच पावकिलो पिठ आणून संध्याकाळी खाता येते. सो भावनिक तर आहेच कारण. दुसरे असे की जगाची गरज समजा १ लाख टन अन्नधान्याची आहे, पण वाया घालवण्याच्या सवयीमुळे १.५ लाख टन पिकवावे लागले तर वरच्या ०.५ लाख टनाचा पर्यावरणावर भार येतो, ट्रान्सपोर्टेशनपासून प्रत्येक गोष्टीवर ताण वाढतो, त्यातून प्रॉडक्शनपासून डिस्ट्रीब्युशन चॅनेलवर ताण वाढतो, जास्त धान्य उत्पादनासाठी जास्त केमिकल्स वापरल्या जाणे, जास्त जंगले तोडल्या जाणे, नंतर उपभोक्त्यांपर्यंत पोचण्यास उशीर-नासाडी वगैरे चक्र वाढत जाते. हे अजून एलाबोरेट करता येईल.

वर कोणीतरी अन्नधान्य आपल्यापर्यंत पोहोचतानाच्या कष्टांचा उल्लेख केला. पण कष्ट तर जगातल्या प्रत्येक उत्पादनामागे असतेच. जे कष्ट करतात त्यांचा त्यांना मोबदलाही मिळतो. पुढे त्यांचे प्रॉडक्ट वापरकर्ता कसा वापरतो आहे याच्याशी त्याचा काही संबंध नसतो.
परत एकदा नॉट एग्झॅक्टली! याचे कारण वरिलप्रमाणेच. अन्न ही लग्जरी नाही, गरज आहे. अन्नपदार्थ हे मनुष्यसमुदाय म्हणून आपल्या सर्वांची कलेक्टीव जबाबदारी आहे असे मला वाटते. अन्न जास्त झाले म्हणून कोणीही ते इतरांशी शेअर करु शकतो, हे इतर कोणत्या उत्पादनांबद्दल शक्य होऊ शकते? शेवटच्या क्षणापर्यंत अन्नपदार्थांबद्दल झालेल्या कष्टांची जाणीव ठेवणे, कृतज्ञ राहणे अतिशय आवश्यक आहे. कारण कोणी कितीही कष्ट केले तरी पिक येईलच याची खात्री नसते, त्यामुळे जे कष्ट करुन पिक घेतात, आपल्यापर्यंत पोचवतात त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणे चांगलेच. त्यात पैसा दिला म्हणून किंमत चुकवली अशी भावना खाद्यान्नाबद्दल तरी नको.

जर मी अन्न नासाडी टाळली तर वर्षाला जो किराणा माल मी भरतो तो कमी भरेन. अन्नधान्याची मागणी कमी होईल. परीणामी या क्षेत्रातील रोजगार कमी नाही का होणार.
नाही होणार! झाला तर बरेच आहे. कारण तसेही अन्नधान्य क्षेत्र फार उत्तम मेहनताना देणारे क्षेत्र नव्हे. जेवढे लोक शेतीतून दूर होतील तितके चांगले. पर्यावरणावर ताण कमी होईल हे वर सांगितले आहेच. आताच या घडीला जगातील एकूण अन्नधान्यापैकी सुमारे २०-30 टक्के आपल्या डिशमध्ये पोचण्याआधीच नाश पावते आहे. हे नाश पावणे थांबवले तर इतर भुकेल्यांकडे वळवता येईल असे जगातल्या मोठ्या संस्थांचे अहवाल सांगतात.

आपण ईथे अन्नाची नासाडी करतोय पण आजूबाजूला लोकं दोन घास अन्नासाठी वणवण भटकताहेत. हा भावनिक विचार झाला. पण प्रॅक्टीकल विचार करता आपण वाचवलेले, नासाडी न करता कमीच खाल्लेले अन्न त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार. पोहोचलेच तर अर्थातच त्याची जी किंमत आहे ती देऊनच त्यांना ते विकत घ्यावे लागणार.
आज लोक उपाशी असण्याचे कारण अन्नधान्याचे योग्य वितरण न होणे हे आहे. त्याचा तुम्ही आम्ही करत असलेल्या अन्नाच्या नासाडीशी संबंध नाही. पण नासाडी न केल्याने खप कमी होईल, खप कमी झाला तर किंमतीही कमी होतील. न विकल्या जाणारे अन्न एनजीओ-सरकार यामार्फत उपाशी लोकांपर्यंत पोचवता येईल.

पाण्याला हा नासाडीचा मुद्दा लागू होतो कारण पिण्यायोग्य पाण्याचा साठा मर्यादीत आहे ते जपून वापरावे. पण अन्नधान्याबाबतही हे लागू होते का?
म्हणजे जगातला अन्नधान्याचा साठा मर्यादीत आहे का जे मी नासाडी केल्याने ईतरांना ते कमी मिळेल. या जगाची जी लोकसंख्या आहे तितके अन्न पिकवले जात नाही का? कदाचित आजच्या तारखेला लोकसंख्या पाहता हे असूही शकेल पण काही वर्षांपूर्वी नक्कीच असे नसावे.

जगात जेवढी लोकसंख्या आहे त्यांना पुरेल एवढे अन्न पिकवले जातेच. वितरणव्यवस्थेत घोळ आहे म्हणून लोक उपाशी आहेत. आज फार्म टू प्लेट या मार्गातली नासाडी वाचवू शकत नाही म्हणून अन्नधान्य बेसुमार पिकवले जाते आहे. त्यावर सर्वच बाजूने विचार करुन ज्याला शक्य त्याला नासाडी कमी करणे आवश्यक आहे.

----------- हे खालचे विधान ऋन्मेष चा प्रतिसाद वाचून अन्ननासाडी करणार्‍यांना समर्थन मिळाल्यासारखे वाटेल म्हणून --------------
कुणाला अन्न टाकून दिल्याचा गिल्ट वाटत नसेल तर त्याने जरा चार दिवस उपाशी राहावे, भूक कशी असते हे कळल्याशिवाय अन्न का टाकू नये याचे महत्त्व कळणार नाही. आणि ते महत्त्व पर्सनल आहे, 'करतो चिंता विश्वाची' वगैरे टाईप नाही हेही कळेल.

मलाही अन्न, पाणी वाया घालवलेलं नाही आवडत.
एक किस्सा आठवला. ववि पायलट च्या वेळेला एका हॉटेलमध्ये जेवून झाल्यावर मी हात धुवत होतो. नेहेमीच्या सवयीनुसार हाताला साबण लावतांना नळ तसाच चालू... दक्षिनं तिथेच शाळा घेतली. तेव्हापासून ही सवय जाणीवपूर्वक मोडली. आता सवय झाली.
बरेच लोक बुफेमध्ये परत परत रांगेत जावं लागू नये म्हणूनही एकावेळेस प्लेट भरून आणतात. दोन उपाय, मुळात अगदी सुरुवातीला जाऊच नये. नाहीतरी लग्नालाच आला आहात न, मग इतकी कसली घाई? आरामात जावं. जरा गर्दीही कमी होते आणि आपल्यालाही शांतपणे घेता येतं.
दुसरं म्हणजे, पदार्थाच्या रंगरूपावरून थोडंफार तरी कळतेच की आवडेल की नाही ते, त्याप्रमाणात घ्यावा. आवडला तर पुन्हा घेता येतोच. नाही आवडला तरी कमी घेतल्या गेल्या असल्यानी अन्नाचा अपमान नको म्हणून संपवून टाकायचा. ते काही टाकावू नसतं. हा, खराब झालाय, जळालाय इ असेल तर गोष्ट वेगळी.
मुळात वर म्हटलं आहे तसं ही जाणीव हवी त्याशिवाय काही खरं नाही.

एक मुद्दा मात्र आहे. जो मी माझ्या पहिल्या प्रतिसादात लिहिला आहे.
उरतय म्हणुन म्हणा किंवा ताटात जास्त वाढल्या गेलंय म्हणुन आता तू संपवच हा अट्टाहास चुकीचा आहे. एकदा भूक भागली की उरलेले अन्न जबरदस्तीने पोटात ढकलणे हे ते अन्न टाकुन देण्यापेक्षा वाईट. टाकलेले अन्न निदान पॅक करुन नंतर खाता येते किंवा गरजुंना देता येते, प्राण्यांना देता येते. जबरजस्तीने पोटात ढकलून आपण गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय लावून घेतो. म्हणजे आपण नेहमीच गरजेपेक्षा जास्त खाउन अन्नाची नकळत नासाडी करु लागतो. आणि त्याचे आपल्या शरिरावर होणारे दुष्परिणाम वगैरे हा वेगळा मुद्दा.
तेव्हा वाढलंय ते संपवणे पेक्षा गरजे पुरतंच वाढुन घेणे आणि उरलेच तर ते अन्न इतरांना कसे पोचवता येइल अथवा आपणच नंतर कसे ते वापरु अशी सोय करणे हे योग्य.

नानाकळा अतिशय संयुक्तिक प्रतिसाद. खूपच धीराने उत्तर दिलंत... मनःपूर्वक __/\__
माझ्याकडे इतका पेशन्स नाही आहे.

वरील एका प्रतिसादावरुन हे आठवले. मुंबईत जॉब करत होते तेव्हा आई रोज घरचा डबा द्यायची आणी मला कँटीनमधले चटकदार खायचे असायचे. आमच्या कँटीनमध्ये मस्त पावभाजी, थाली, छोले भटुरे, चायनीज असं काय काय असायचं कँटीनचा पोर्‍या ऑर्डर घ्यायला यायचा तेव्हा मी लांब तोंड करुन डबा आणलाय असं त्याला सांगायची. एक दिवस तो मला म्हणाला, मला द्या डबा, मला इथले जेवण बिलकुल आवडत नाही. तो घरच्या जेवणाला भुकेला होता. आणि आमचा दोघांचा प्रश्न सुटला. त्याला मी डबा देवु लागले आणि हवे ते चापु लागले (अर्थात पैसे भरुन). तात्पर्यः डब्याची नासाडी करु नये. ऑफिसातील कामगार वर्ग घरच्या जेवणाला भुकेला असतो. आईचे कष्टही वाया जात नाहीत. आता डबा द्यायला इथे कोणी नाही तर आईचा डबा हवा वाटतो. बाकी, हॉटेलात, घरी कधीच अन्न वाया घालवत नाही. भुकेपेक्शा चार घास कमी चालतात पण वाया घालवत नाही. मुलगा लहान असल्यामुळे तो नासाडी करतो, त्याला मध्येमध्ये उपदेशाचे डोस पाजावे लागतात.

भावनिक न होता तार्किक कसोटीवर ऋन्मेष यांचा प्रतिसाद सर्वोत्तम आहे. तो पचण्याइतके परिपक्व सदस्य मायबोलीवरच काय पण बाहेरच्या जगातदेखील नाहीत. (हे तिरकसपणे लिहिलेले नाही.)

{{{ एक किस्सा आठवला. ववि पायलट च्या वेळेला एका हॉटेलमध्ये जेवून झाल्यावर मी हात धुवत होतो. नेहेमीच्या सवयीनुसार हाताला साबण लावतांना नळ तसाच चालू... दक्षिनं तिथेच शाळा घेतली. तेव्हापासून ही सवय जाणीवपूर्वक मोडली. आता सवय झाली. }}}

प्रॅक्टीकली तुम्ही जे आधी केलंत तेच योग्य होतं आणि आहे. जर एखाद्या तारांकित हॉटेलात आणि आता अनेकांच्या घरीदेखील पावडर कोटेड तोटी बसविलेली असेल तर तुम्ही आधी तोटी उघडायची आणि पाणी सोडायचे. मग त्या पाण्यात हात ओले करुन त्यास साबण लावायचा. त्यानंतर वाहत्या पाण्यात हात व्यवस्थित धुवून हाताचा साबण पूर्णपणे घालविल्यावर मगच तोटी बंद करणे ही योग्य प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेत थोडे पाणी वाया गेली तरीही तोटीला साबणाचा स्पर्श न झाल्याने त्याचे पावडर कोटींग दीर्घ काळ टिकते.

आता काही अंशी पाणी वाया घालविणे योग्य की महागडे पावडर कोटींग खराब होणे हा ज्याच्या त्याच्या दृष्टीचा भाग आहे. त्यावर मी भाष्य करत नाही.

टीपः- पावडर कोटींग ऐवजी क्रोम प्लेटेड (जे साबणाने नष्ट होत नाही फक्त थोडेसे अस्वच्छ होते जे आठवड्यातून एकदा स्वच्छ करता येऊ शकते) तोटी वापरणे हा एक उपाय आहे पण त्या वास्तूच्या मालकाच्या हातात आहे. तिथे येणार्‍या आणि तोटीचा वापर करणार्‍या अतिथी / ग्राहकाच्या हातात नाही.

योकु Happy मी तर विसरून सुद्धा गेले होते, पण तु लक्षात ठेवून बदल केलास त्याचं कौतुक वाटतंय मला. Happy

एकदा भूक भागली की उरलेले अन्न जबरदस्तीने पोटात ढकलणे हे ते अन्न टाकुन देण्यापेक्षा वाईट. >> हे ही खरंच आहे.
तुमचा अख्खा प्रतिसादच सुंदर आहे. अतिशय चपखल आणि मुद्देसुद.

{{{ उरतय म्हणुन म्हणा किंवा ताटात जास्त वाढल्या गेलंय म्हणुन आता तू संपवच हा अट्टाहास चुकीचा आहे. एकदा भूक भागली की उरलेले अन्न जबरदस्तीने पोटात ढकलणे हे ते अन्न टाकुन देण्यापेक्षा वाईट. टाकलेले अन्न निदान पॅक करुन नंतर खाता येते किंवा गरजुंना देता येते, प्राण्यांना देता येते. जबरजस्तीने पोटात ढकलून आपण गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय लावून घेतो. म्हणजे आपण नेहमीच गरजेपेक्षा जास्त खाउन अन्नाची नकळत नासाडी करु लागतो. आणि त्याचे आपल्या शरिरावर होणारे दुष्परिणाम वगैरे हा वेगळा मुद्दा.
तेव्हा वाढलंय ते संपवणे पेक्षा गरजे पुरतंच वाढुन घेणे आणि उरलेच तर ते अन्न इतरांना कसे पोचवता येइल अथवा आपणच नंतर कसे ते वापरु अशी सोय करणे हे योग्य. }}}

हे देखील योग्यच. अधिकचे अन्न ताटात उष्टे टाकले तरीही कचरा आणि पोटात बळेच ढकलले तरीही अतिशय घातक कचराच.

तार्किक कसोटीवर ऋन्मेष यांचा प्रतिसाद सर्वोत्तम आहे.
>>> तर्क सापडला तर नक्की कळवा.... वाट पाहत आहे.

तो पचण्याइतके परिपक्व सदस्य मायबोलीवरच काय पण बाहेरच्या जगातदेखील नाहीत.
>> उचकवण्यासाठी आहे काय हे?

नानाकळा, यांनी ऋन्मेषच्या प्रश्नांवर उत्कृष्ट उत्तर दिले आहे. ऋन्मेष, पटले ना ?

लेखातल्या भावना अगदी मान्य. महत्वाचा विषय आहे.

माझ्या प्रतिसादावर आलेल्या प्रतिसादांतील मुद्द्यांवर उत्तरे देतो, ते कर्तव्यच आहे Happy

पण त्या आधी एक सांगू इच्छितो, मी कुठेही अन्नधान्याच्या नासाडीचे समर्थन केले नाही. किंबहुना एकजात सर्वच प्रकारच्या नासाडींचा निषेधच केलाय. फक्त ईतर वस्तूंची मुक्तहस्ताने उधळपट्टी करणारेही अन्नधान्याच्या नासाडीबाबत का दक्ष असतात याचे कारण भावनिक, व्यावहारीक, तार्किक कारण नक्की काय आहे हे जाणून घ्यायचे आहे ईतकेच.

आपण अन्नाची नासाडी करतोय हे तुला कळतंय पण तु त्यात बदल करशील या अर्थाचं एक ही वाक्य लिहिलं नाहियेस.
>>>>>
हे लिहिले तर मला शाबासकी मिळणार आहे की हे केले तर मला शाबासकी मिळणार आहे. लिहिल्याने मिळणार असेल तर दहावेळा कॉपीपेस्ट करत लिहितो Happy
किंबहुना तसे म्हणायचे झाल्यास ईथे कित्येकांनी बुफे पद्धतीवर आक्षेप दर्शवताना आपण आपल्या घरातील लग्नकार्यात वा पार्टीमध्ये बुफे पद्धतीने जेवण ठेवणार नाही असे म्हटलेले नाहीच. कारण बुफे जेवणपद्धतीत प्रत्येक जण आपली सोय बघूनच ते ठेवतो, तसेच ते एक स्टेटसचा भाग आहे. हल्ली शहरांमध्ये पंगत पद्धत फक्त साईबाबांच्या भंडार्‍यालाच असते. असो, हा काही कोणावर आरोप नाही, मुद्दा आला म्हणून लिहिले.

नोर्मली आई बहिणीवरून शिव्या दिल्यावर लोकांना जे वाटते तेच काही सुज्ञ लोकांना अन्नाची, पाण्याची आणि विजेची नासाडी झाल्या वर वाटते.
>>>>>>
म्हणजे हा अन्ननासाडीचा मुद्दा आपल्यामते भावनिक आहे तर ..
कारण कोणी मला आईबहिणीवरून शिव्या दिल्या आणि मी मनाला लाऊन नाही घेतल्या तर प्रॅक्टीकली माझे काहीच जात नाही. हो, देणार्‍याचे तोंड आणि मूड खराब होऊ शकते Happy

लोकसंख्या वाढते तशी जमिन वाढते का? जमिनिचा कस वाढतो का? पाण्याचा साठा वाढतो का?
>>>>
नाहीच वाढत. हे मी माझ्या पोस्टमध्येही म्हटले आहेच. आता लोकसंख्या वाढलीय. पण जेव्हा कमी होती तेव्हाही अन्न नासाडीचे महत्व तितकेच होते ना. त्यामुळे जगात अन्नाचा साठा अमुकतमुक आहे, मी माझ्या वाटणीचे खातो म्हणजे ईतरांना त्यांच्या वाटणीचे मिळेल असा विचार यामागे होत नसावा.

हे अन्नधान्य पाण्याशिवाय पिकतं काय? शेती साठी लागणारी जागा अनेकदा जंगल साफ करून आलेली असतेच शिवाय अन्नधान्य पिकवण्यासाठी लागणार पाणी ज्या धरणातून येतं त्या खालीही कित्येक शेती - कित्येक जंगल - सबंध परिसंस्था - आणि अनेक संसार - प्राणी पक्षी किटक वगैरे जीव गेलेले असतात.
>>>>>>>
पर्यावरणाचा र्हास हे मुद्दे ईतर नासाडीलाही लागू होतातच ना. औद्यिगिक क्रांती म्हणा किंवा आपली राहते घरे, वसाहती म्हणा. हे देखील पर्यावरणाचा र्हास करूनच उभे राहतात. मग ईतर वस्तूंची नासाडी देखील हा मुद्दा लक्षात घेऊन थांबवायला हवी. एकीकडे आठ आठ लोकं दहा बाय बाराच्या खोलीत राहतात तर एकीकडे राजाराणीचा दोन बीचकेचा फ्लॅट असतो. त्या घराने व्यापलेली जागा तर आलीच, पण एवढे मोठे घर मेनटेन करायला वीज, पाणी हे त्यानुसारच दरडोई वाढत जाते. एक बादली पाण्याने आंघोळ होत असताना लोकं शॉवरखाली आंघोळ करत चार बादल्या पाणी घालवतात. एक ती शेअर रिक्षा असते ज्यात चार चार लोकं बसली असतात, तर एक मीटर रिक्षा असते ज्यात कोणीतरी एकटाच जात असतो. खरे तर जिथे पायी जाता येते तिथेही पेट्रोलची नासाडी करत गाडीने जाणारे असतात.

दक्षिणा - नको चिडू, त्याला धागा हायजॅक करायचा दांडगा अनुभव आहे.
>>>>>
हो, ते मी करतोच. पण त्यासाठी वेगळे पत्ते वापरतो. ईथे माझे मत वेगळे नसून ते मी वेगळ्या पद्धतीने मांडले आहे ईतकेच.

दक्षिणा व नानबा : जाउद्यात. सरळ दुर्लक्ष करा त्या प्रतिसादाकडे. मी तेच केले आहे.
>>>>
प्रॅक्टीकली विचार करता धाग्याकर्त्याने आपल्या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करणे सोपे नसते Happy
पण जर माझी पोस्ट धाग्याच्या विषयाशी अवांतर नसेल तर आपले दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.

नासाडी म्हणजे कोणताही उपयोग न करता वाया घालवणे. ही एक व्याख्या स्पष्ट असलेली बरी.
>>>>>
ही सोयीने बनवलेली व्याख्या आहे. केवळ आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडते, ईजिली अवैलेबल आहे म्हणून गरजेपेक्षा जास्त वापरलेली गोष्टही मी उपलब्ध साधनसंपत्तीची नासाडीच समजतो.
काही लोकं लग्नात वा ईतर ठिकाणी अन्नपद्दार्थापासून शोभेच्या वस्तू बनवतात आणि त्या शोभेसाठीच वापरत न खाता फेकून देतात. माझ्यामते ही देखील अन्नपदार्थांची नासाडीच झाली.

वर कोणीतरी लग्नात उधळल्या जाणार्‍या अक्षतांचा मुद्दा काढला आहे. त्यात हिंदू धर्म वगैरे स्पेसिफिक लिहायची गरज नव्हती, हेतू बद्दल शंका निर्माण होते, वा चर्चा भरकटते. पण ती देखील अन्नाधान्याची नासाडीच झाली. फक्त ईथे भावना बदलतात. धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांना ती नासाडी वाटणे जरा अवघड आहे. तिथे झालीच थोडी नासाडी तर त्यात काय एवढे असा प्रतिवाद होऊ शकतो.

दारूबद्दल ........ नॉट एक्झॅक्टली!
>>>>
अन्नपदार्थांपासून दारू बनवणे आणि ती पिऊन ओकारय़ा काढणे हे तुम्हाला नासाडी वाटत नाही? मद्यपानाचे समर्थन करत आहात काय Happy

असो, पण हेच ते! सोयीने नासाडीची व्याख्या ठरवणे Happy

तसेही अन्नधान्य क्षेत्र फार उत्तम मेहनताना देणारे क्षेत्र नव्हे. जेवढे लोक शेतीतून दूर होतील तितके चांगले.
>>>
हे जरा ईंटरेस्टींग वाटले. अन्नधान्य हे क्षेत्र ऊत्तम मेहनताना देणारे क्षेत्र का नाही? जी गोष्ट जगण्यास आवश्यक आहे तिचेच मार्केट का डाऊन? हा कुठल्या मुद्द्याचा प्रतिवाद नाही. माझ्या ज्ञानात भर टाकायला विचारत आहे.

आज लोक उपाशी असण्याचे कारण अन्नधान्याचे योग्य वितरण न होणे हे आहे. त्याचा तुम्ही आम्ही करत असलेल्या अन्नाच्या नासाडीशी संबंध नाही. पण नासाडी न केल्याने खप कमी होईल, खप कमी झाला तर किंमतीही कमी होतील. न विकल्या जाणारे अन्न एनजीओ-सरकार यामार्फत उपाशी लोकांपर्यंत पोचवता येईल.
>>>>>>
पण न विकले जाणारे अन्न उपाशी लोकांपर्यंत कसे पोहोचेल हे समजले नाही. जर नासाडीने मागणे कमी झाली तर उत्पादनही कमी होईल ना. उपाशी लोकांना मोफत वाटायला का जास्तीचे उत्पादन केले जाईल? हे देखील माझ्या माहितीत भर टाकायला विचारत आहे.

@ सुनिधी, काही पटले, काही समजून घेतोय, काही समजवण्याचा प्रयत्न करतोय.

जाता जाता - ताटात जास्त घेतलेय तर कचरापेटीत टाकण्यापेक्षा पोटात ढकला याने दुसरे काही नाही तर पोटाची कचरापेटी होते. तसेच पोट थोडे कमी भरले तरी चालेल पण नासाडी होता कामा नये हे देखील चूकच. त्याने अ‍ॅसिडीटी होते.... अ‍ॅसिडीटीवरून आठवले, आज मस्त थंडगार दूध पिऊन झोपतो. या गरमीत तसेही ते संपवले नाही तर खराब होण्याची शक्यता जास्त आहे.. शुभरात्री Happy

अरे हो, एक आठवले. याबाबत मतभिन्नता असू शकते, पण आपल्या मुलांनी ताटात आलेला प्रत्येक पदार्थ हा आवडनिवड न जपता खाल्लाच पाहिजे असा एक सूर आढळतो. मुख्यत्वे जुन्या मंडळींमध्ये जास्त असायचा. मला तो सुद्धा जरा खटकतो. जर चॉकलेट आईसक्रीम वगैरे मुलांसाठी चांगले नाही तर तुम्ही त्यांच्या जीभेचे चोचले पुरवू नका, पण भेंड्याची भाजी मुलांना बुळबुळीत लागत असेल तर जबरदस्ती त्याच्या ताटात वाढून अन्न टाकायचे नाही असा दम देऊन खायला लाऊ नका. मुलांना सक्तीने आपल्या मर्जीने करीअर निवडायला लावणे किंवा त्यांचे लग्न लावणे, यासारखेच झाले हे देखील .. आता फायनल शुभरात्री Happy

आता तर मलाच राहवत नाही Happy
सक्तीने आपल्या मर्जीने करीअर निवडायला लावणे किंवा त्यांचे लग्न लावणे>>मुद्दा पटवण्यासाठी काहीही हां Happy

चॉकलेट आईसक्रीम वगैरे मुलांसाठी चांगले नाही तर तुम्ही त्यांच्या जीभेचे चोचले पुरवू नका, पण भेंड्याची भाजी मुलांना बुळबुळीत लागत असेल तर जबरदस्ती त्याच्या ताटात वाढून अन्न टाकायचे नाही असा दम देऊन खायला लाऊ नका>>> चोचले तर पुरवावेत पण दातांची काळजी घ्यायला ही शिकविले जाते. शिवाय इथे ते खाऊ नये असे नाही तर 'योग्य प्रमाणात घ्यावे आणि खावे' हा मुद्दा आहे. मोठे झाल्यावर बरेच लोक जे नाही आवडत ते बनवत नाहीत कि खात नाहीत. पण लहानपणीची गोष्ट वेगळी असते, मुलांना आपल्याला आवडत नाही म्हणून टाकून दिले तर चालते असे शिकवायचे नसते.

आवडते म्हणून रोज रोज चॉकलेट आईस्क्रीम असे नाही जेवत कोणी. घरातले सर्वजण पानात वाढलेले संपवतात, आवडती भाजी नसेल तर ती सुद्धा बाकिच्या तोंडीलावण्याबरोबर खाता येते. आपले आई/वडिल/बाई जो कोणी स्वयंपाक बनवतो त्यांच्या कष्टाची जाणिव ठेवणे. हे लहान वयातच शिकवायला हवे ना.
हवे तेव्हढेच घेणे आणि त्यातले काहीही टाकून न देणे. हा आज किंवा कधीतरी करायचा प्रकार नाही. त्याची सवयच करुन घ्यावी लागते आणि ती लहानपणीच लावलेली उत्तम.

बाकि कितीही कारणे दिली तरी जरुरीपेक्षा जास्त अन्न घेऊन ते टाकून देणे हे चुकिचेच आहे Happy

अन्ना वाया घालवू नये हा मुद्दा मला मान्य आहे. पण मुळातच कुठल्याही एक्स्ट्रीमिटी कडे मला झुकता येत नाही. त्यामुळे, 'आई-बहिणीवरून शिव्या दिल्यावर वाटतं तसच अन्न वाया घालवल्यावर वाटतं' वगैरे गोष्टी मला टोकाच्या वाटल्या.

पृथ्वीकरांच्या 'केवळ ताटात वाढलेलं वाया जाऊ नये म्हणून खाऊ नये' ह्या मुद्द्याशी सहमत. घेताना कमी घेता आलं तर छानच पण नाही, तर ठेवून देऊन नंतर खाता येतं.

मुलांना उगाच दम देऊन न आवडणार्या गोष्टी संपवायला लावण्याच्या ऋन्मेष च्या मुद्द्याशी सहमत आहे. मुलांनी वाढलेला पदार्थ चाखून पाहिला आणी आवडला नाही असं प्रामाणिकपणे सांगितलं तरी त्याला बळजबरीनं खायला लावणं जुलमी आहे असं माझं मत आहे.

काही प्रतिसाद फारच समाजवादाकडे झुकणारे आहेत, त्यामुळे त्यावर माझा पास.

Pages