जय सुरमई!

Submitted by उदे on 15 April, 2017 - 06:57

आपण गुड मॉर्निंग कसं म्हणतो किंवा शुभप्रभात कसं म्हणतो? त्याप्रमाणे त्या सुरात सूर मिसळून आम्ही समोरासमोर भेटणाऱ्या व्यक्तीला आमच्या कफपरेड शाखेतल्या सहकार्याला जय सुरमई असं म्हणायचो!

अतिशयोक्तपूर्ण कुणी बोलला तर प्रतिक्रिया यायची,'जय सुरमई '.
कुणाची फार वाहवा करायची असली तर प्रतिक्रिया जायची 'जय सुरमई'.

तुम्ही म्हणाल हे जय सुरमई प्रकरण तरी काय आहे?

तर मंडळी असं आहे. कालौघात मी नेव्हीनगरवरून कफपरेड शाखेत बदली होऊन आलो,तेंव्हा विखुरलेले वेगवेगळे मित्र नव्याने एकत्र भेटल्यासारखे झाले!
आता विचार करा,की जुने मित्र एकत्र भेटल्यावर किती आनंद झाला असेल? आता आनंद झाला तर तो प्रगट व्हायला पाहिजे ना? सुरुवातीला काहीच सुचत नव्हतं! एक दिवस सुचलं!

सर्वांना एकत्रित बोलावून विचारलं,'तुमच्या आवडीचा मासा कोणता? कोणता मासा तुम्हाला खायला आवडेल?' या प्रश्नावर उत्तरं अर्थातच वेगवेगळी आली! परंतु कामाच्या गडबडीत पटकन खाता येणारा,चटकदार लागणारा आणि पुन्हा पुन्हा खावासा वाटणारा मासा कोणता? या प्रश्नावर मात्र 'सुरमई' हे एकमात्र नाव सर्वानुमते पुकारण्यात आलं! मग सर्वांच्या उपवासाचे आणि ईतर महत्वाचे वार(!)लक्षात घेऊन ' बुधवार हा सुरमई खाण्याचा वार ठरविण्यात आला. आणि त्यानंतर जवळपास ४-५ वर्षं आम्ही दार बुधवारी न चुकता सुरमई 'चापू' लागलो.
IMG_5295.JPG
हे सुरमई प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही! कफपरेडशाखेची जव्हारला एक पिकनिक काढायची ठरली. २ क्वालीस बुक झाल्या. सगळ्यांनी सकाळी ६ वाजता दादरला भेटायचं ठरलं. आणि मुख्य सांगायची गोष्ट म्हंजे आमच्या लाडक्या किसनने एवढ्या पहाटे सर्वांसाठी सुरमई फ्राय करून,गरम राहील या बेताने,चांदीच्या वर्खाच्या कागदात व्यवस्थित गुंडाळून आणली होती!

बरोब्बर ८.३० ला, आम्ही चारोटी नाक्याजवळ वाहणाऱ्या नदीच्या काठावर,हिरव्याकंच कुरणावर,सुरमई खायला बसलो! ज्यांनी ज्यांनी त्यावेळी मुंबईला फोन्स लावले,त्यांची त्यांची मित्रमंडळी कोवळ्या प्रातःकाळी आश्चर्यचकित झालेली सगळ्यांनी सांगितली होती! साहजिकच आहे त्यांचंही म्हणा!
अशा एकेक मजा आल्या सुरमाईच्या सान्निध्यात.

म्हणजे आम्ही फक्त सुरमईच खात होतो असं नाही बरं का!
भरलेलं पापलेट,चविष्ट काटेरी मासे (जे मी खाल्ले नाहीत!),काप्री पापलेट (जे दर्जेदार खऱ्या मासे खाणाऱ्यांनी खाल्ले नाहीत!),कोळंबीचे प्रकार,आणि शेवटी अप्रतिम प्रॉन्स बिर्याणी खास तांडेलांच्या घरी झालेली!अशी कितीतरी खाबुगिरी झाली कफपरेड शाखेत.

शेजारी 'कॅमे' होतं म्हणून सामोसे, 'सेलेजोर' होतं म्हणून केक्स, कैलास पर्बत होतं म्हणून 'चाट पदार्थ', आणि ताज मधला ओळखीचा दोस्त होता म्हणून प्रत्येकाच्या वाढदिवसाला 'ताज'मधील केक असं काय काय खाल्लं त्या सोनेरी दिवसात!

परंतु लक्षात राहिली ती सुरमई!
कारण दार बुधवारी तीच सेवन व्हायचं ना!

जय सुरमई!

-------------------------उदय ठाकूरदेसाई

टीप: मसालेदार सुरमईच छायाचित्र आहे 'फर्न रिसॉर्ट (गणपतीपुळे)' मधलं !
तंदूर सुरमईच छायाचित्र आहे ' तृष्णा ' मधलं
IMG_5296.JPGIMG_5295.JPG

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लेखन आवडले,
सुरमई अगदि आवडता मासा आहे आपला.

आम्ही पण जय सुरमई ! वाले आहोत. मी फिश खाणं फार उशीरा चालु केलं. फक्त सुरमई आणि प्रॉन्सच खाते. मस्त वर्णन आणि फोटो एकदम यम्मी आहेत.

धन्यवाद प्रसाद, दिनेश,मनीमाऊ.
मायबोली वर तर भेटत राहूच. उठादेसाई.कॉम हि माझी वेबसाईट तुम्ही पाहिलीत तर आनंद होईल.
धन्यवाद.

मस्त! सुरमई माझाही फेवरिट! फाउण्टन जवळ 'महेश' मधे अनेकदा खाल्लेले आहेत, व मुंबई आणि जवळच्या उपनगरात इतर ठिकाणीही. सुरमई, भात आणि सोलकढी. त्याबरोबर अनेक ठिकाणी ती एक तांदळाची भाकरी देतात तीही सुंदर लागते. तिचे नाव जाम आठवत नाही.

'सरफरोश' पाहताना तो पाठलागाचा सीन मोकॅम्बो कॅफे जवळ आहे. तेथेही हे लोक महेश वरून जातात का मी शोधत होतो Happy

मस्त ! सुरमई फेवरीट.फोटो छान आलेत. आता उद्याचा मुहूर्त साधून खाल्लेच पाहिजे .

त्याबरोबर अनेक ठिकाणी ती एक तांदळाची भाकरी देतात तीही सुंदर लागते. तिचे नाव जाम आठवत नाही.>>>>फारएन्ड, तुम्हाला घावन म्हणायचं आहे का ?

आणि ते महेशची क्वालिटी जामच बिघडलीये. कैच्याकै पैसे मात्र घेतात Happy

धन्यवाद फारएंड आणि जाई .
खरे आहे. महेश मध्ये कमसर मिळायला लागल्यापासून सहज म्हणून तृष्णा त गेलो.
तुम्ही जाऊन बघा. तुम्हालाही आवडेल. चांगलंच महाग आहे एवढंच. पण चव.. अहाहा .. हे मी माझं सांगितलं बरं!
धन्यवाद.

लेखन आवडले अगदी रसभरीत आहे Happy
मी होतकरू मासे खाऊ असल्याने सुरूवात सुरमई पासून केली त्यामुळे तो मासा माझ्या जिव्हाळ्याचा आहे. Happy
बाकी पापलेट बांगडा आणि प्रॉवन्स पण ट्राय केले, तरिही सुरमई तो सुरमईच, त्याला तोड् नाही.

खरं आहे दक्षिणा. परंतु तुम्ही प्रॉन्स बटर पेपर गार्लिक हि डिश खाऊन बघा. मी काही मासे खाण्यात पटाईत नाही. तुमच्यासारखाच आहे. पण हाणतो चांगले. पूर्वी फिश न खाणाऱ्यामाझ्या पत्नीने प्रॉन्स खाऊन सुरुवात केली. आता ती पटाईत आहे मासे खाण्यात. म्हणून म्हटलं. असो.

अजय,
इथे मिळणारा किंग फिश (King Fish) हा सुरमईच्या जवळ जाणारा मासा आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Kingfish त्याला काही ठिकाणी किंग मॅकरेल (King Mackerel) पण म्हणतात.