छानसे काही वाचलेले....

Submitted by वृन्दा१ on 12 April, 2017 - 13:05

प्रार्थना

विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही.
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा.
दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचं
तू सांत्वन करावंस अशी माझी अपेक्षा नाही.
दुःखावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा.
माझ्या मदतीला कोणी आलं नाही
तर माझं बळ मोडून पडू नये
एवढीच माझी इच्छा.
जगात माझं नुकसान झालं,
केवळ फसवणूकच वाट्याला आली
तर माझं मन खंबीर रहावं
एवढीच माझी इच्छा.
माझं तारण तू करावंस ,
मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही.
तरून जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं
एवढीच माझी इच्छा.
माझं ओझं हलकं करून
तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही,
ते ओझं वहायची शक्ती मात्र माझ्यांत असावी
एवढीच माझी इच्छा.
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखावा
दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हां माझी फसवणूक करील
तेव्हां तुझ्याविषयी माझ्या मनांत शंका निर्माण होऊ नये
एवढीच माझी इच्छा.
गुरूदेव रविंद्रनाथ टागोरांच्या कवितेचं भाषांतर. भाषांतरकाराचे नांव ठाऊक नाही.

Group content visibility: 
Use group defaults