पं कुमार गंधर्व - येत्या जयंती निमित्त लेख

Submitted by आशयगुणे on 3 April, 2017 - 05:03

गेली अनेक शतके मनुष्याला अखंड साथ लाभत आली, ती स्वर आणि सूररूपी संगीताची! मात्र या प्रवासात अनेकदा अशी वळणे येतात, जेव्हा या कलेची मीमांसा करणे गरजेचे होऊन जाते. काही टोकदार प्रश्न विचारावे लागतात, प्रसंगी कलेच्या काही अंगांवर अभ्यासक-समीक्षकांना कठोर शब्दांत टीकादेखील करावी लागते. कारण, या संगीतकलेचा तिच्या उगमस्थानाशी असलेला संपर्क तुटलेला असतो.

लोकांमधून, समूहातून तयार झालेले संगीत व्याकरण आणि व्यासपीठ या दोन गोष्टींमध्ये इतके गुंतून पडते की, सामान्य व्यक्तीला तिच्याशी ‘कनेक्ट’ ठेवणे कठीण होऊन बसते. याचा अर्थ व्याकरण आणि व्यासपीठ संगीतासाठी वर्ज्य असावे, असे मुळीच नाही. त्याचेदेखील एक वेगळे महत्त्व आहेच. पण हे दोन ‘व’ सांभाळण्याच्या नादात संगीत हा विषय काही विशिष्ट लोकांपुरता मर्यादित राहतोय की काय, अशी शंका निर्माण होऊ लागते. अशा वेळेस व्याकरण आणि व्यासपीठ हे सांभाळत संगीतात झालेले वर्गीकरण आणि काही विशिष्ट समूहांची मक्तेदारी मोडीत काढीत, जेव्हा संगीताच्या अनेक प्रकारांचा स्वतंत्र विचार करणारा आणि मांडणारा कुणी कलाकार जन्माला येतो, तेव्हा तो नायक म्हणून खऱ्या अर्थाने सिद्ध होतो! कुमार गंधर्व हे असेच श्रेष्ठ नायक होते! पंडित कुमार गंधर्व हे एक उच्च दर्जाचे गायक होते, यात काहीच वाद नाही. त्यामुळे त्यांच्या गायकीचे विश्लेषण करणे, हा या लेखाचा हेतू नाहीच! परंतु, ८ एप्रिल रोजी त्यांच्या ९३व्या जयंती दिनी आठवणी जागवताना संगीताची बहुअंगाने बाजू मांडणारे त्यांचे विचार समजून घेणे, हा या लेखाचा उद्देश मात्र नक्कीच आहे!

कुमार गंधर्वांनी गायला सुरुवात केली, तो काळ आपण पहिला तर, भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले होते आणि भारत हा एक ‘देश’ होण्याकडे वाटचाल करीत होता. याचा अर्थ असा की, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आपण एका शासनात येऊ पाहात होतो. अशा वेळेस वैचारिक देवाणघेवाण ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण आपण आपल्याच देशातील अनेक प्रवाहांशी नव्याने ओळख करून घेत असतो. आणि आजदेखील ही प्रक्रिया सुरूच आहे! याच कल्पनेचा आधार आपल्याला गंधर्वांच्या गायकीत दिसतो. त्यांचे शिक्षण हे जरी ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीत झाले असले, तरीही सर्व प्रवाहांतील संगीत आत्मसात करून ते श्रोत्यांपुढ्यात सादर करणे, हे नक्कीच एक क्रांतिकारक पाऊल होते. ही गोष्ट त्यांच्या केवळ विचारांत नव्हे, तर कृतीतदेखील बघायला मिळत होती. अगदी आजदेखील एका घराण्याचे कलाकार दुसऱ्या घराण्याचे राग, बंदिशी आत्मसात करून गाताना आपल्याला दिसत नाहीत.

मुळात घराणे म्हणजे काय? तर, गाण्याची एक विशिष्ट शैली! ज्या गायकांच्या नावाने आपण एखादे ‘घराणे’ ओळखतो, त्या गायकांनी आपली शैली, अनेक प्रवाहांची भट्टी तयार करून विकसित केली असतो. आजच्या कलाकारांचे हे काम आहे की, त्या शैलीमध्ये नवीन प्रवाहांचा समावेश करून ती अधिक विकसित करावी. कारण, असे करण्यामुळेच संगीताचा विकास होतो, आणि ते अधिक समृद्ध होते! त्यामुळे सवाई गंधर्व महोत्सवात कुमारांनी किराणा घराण्याची ‘जमुना के तीर’ ही भैरवी पेश करणे किंवा विशिष्ट घराण्याशी जोडले गेलेले राग आणि बंदिशी आपल्या शैलीतून सादर करून (उदा. नट कामोद) त्यांना अधिक समृद्ध करणे, हा काळाच्या पुढचा विचार होता! असा विचार अर्थात त्यांचे गुरुजी प्रा. बी. आर. देवधर यांनी केला होताच! परंतु हा विचार अगदी प्रभावीपणे पुढे नेला आणि कृतीत उतरवला तो कुमार गंधर्वांनी!

परंतु या विचारात अजून एका क्रांतिकारी विचाराची भर पडली. ती म्हणजे, रागसंगीत आणि लोकसंगीतात बंध घडवून आणणे! पुरातन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, रागांची निर्मिती ही धुनांमधून झाली आहे. जशी साहित्याची किंवा प्रमाणभाषेची निर्मिती लोकभाषेतून वा बोलीभाषेतून होते, तसेच हे आहे. अर्थात, हे काही क्षणार्धात होत नाही. ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. पण ‘प्रमाण’भाषा बोलणारे जसे बोलीभाषेच्या गोडव्याकडे लक्ष न देता तिला तुच्छ समजण्यातच धन्यता मानतात, तसेच काहीसे काही शास्त्रीय संगीत कलाकारांचे किंवा रसिकांचे लोकसंगीताबद्दल होत असते. या पार्श्वभूमीवर, कुमार गंधर्व यांचे मध्य प्रदेशातील माळवा प्रांतातील लोकसंगीतावर केलेले कार्य लक्षणीय ठरते. या महागायकाने आपली व्यासपीठावरील प्रतिष्ठा, नावलौकिक वगैरेचा जराही विचार न करता तिथल्या लोकांमध्ये मिसळून संगीत ऐकले आणि त्या संगीताचा सखोल अभ्यास केला!

शास्त्रापासून त्याच्या उगमस्थानी, अर्थात लोकसमूहात जाण्याचा हा प्रवास म्हणजे obtaining knowledge from the grassroots असेच मानावे लागेल. परंतु एवढे करून ते थांबले नाहीत. उलट, या लोकसंगीतातून स्फूर्ती घेत गंधर्वांनी काही राग स्वतः निर्माण केले. नवनिर्मितीचे हे कार्य वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. मग, तो देवासच्या एका ‘पुंगी’ वादकाकडून ऐकलेल्या धुनेतून निर्माण झालेला राग ‘अहिमोहिनी’ असो, किंवा याच माळव्याच्या लोकधुनांमधून निर्माण झालेला ‘मालवती’ किंवा ‘संजारी’ असो. सारे काही विलक्षण!

लोकसंगीताबद्दल सांगताना कुमार गंधर्व आवर्जून नमूद करतात की, हे एक श्रेष्ठ दर्जाचे संगीत आहे! इथे कुणालाही खूश करायचे नसते, उलट स्वतःसाठी गायचे असते. लोकसंगीताचा आस्वाद घ्यायचा असेल, तर आपल्याला त्या दुनियेत जाऊन ते ऐकावे लागेल. आपल्या दुनियेत राहून, टाळ्या मिळविण्यासाठी गाण्याची सवय असेल, तर लोकसंगीत आपल्याला कळणारच नाही, कारण आपल्यात तशी दृष्टी निर्माण होणार नाही. त्यांचे हे विचार ऐकून एका गोष्टीची जाणीव होते, ती म्हणजे, गंधर्वांनी त्यांच्या आयुष्यात ‘संगीत’ हा कॅनव्हास ठेवला. त्यांनी अनेक प्रकार गायले, आणि त्या त्या प्रकाराला योग्य तो न्यायदेखील दिला!

याच लोकसंगीताच्या दुनियेत स्वतःला सामील करून घेतल्यामुळे त्यांच्या गाण्यात अजून एक पैलू समोर येतो, आणि तो म्हणजे निसर्ग! त्यांच्या गायनात आणि काही बंदिशींमध्येदेखील निसर्गाचे अपूर्व असे वर्णन आढळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, बागेश्री रागातील ‘टेसूल बन फुले रंग छाये’ आणि ‘फेर आयी मौरा अंबुवापे’ या बंदिशी. पहिली बंदिश ही पळसाचं बन फुलल्याचे वर्णन करते, तर दुसरी आंब्याला मोहोर आल्याचे. शास्त्रीय रागांना अशा निसर्गाच्या कॅनव्हासवर न्याहाळणे हे अलौकिक सांगीतिक दृष्टी असल्याचेच लक्षण आहे! हीच दृष्टी त्यांना कैलासलेणी पाहिल्यावर बिहाग रागात ‘ये मोरा मन हरो रे’ या बंदिशीची निर्मिती करण्याची स्फूर्ती देते, आणि हीच दृष्टी कालिमातेला बळी देण्यासाठी आणलेल्या बकऱ्याची विनवणी दर्शवणाऱ्या ‘बचाले मोरी मां’ या राग ‘मधसूरजा’(ज्याची निर्मिती त्यांचीच आहे)मधील बंदिशीतून प्रकट होते! याच दृष्टीची अभिव्यक्ती पुढे कबीर, मीरा, सूरदास, तुकाराम या संतांच्या रचनांना त्यांनी दिलेल्या संगीतात दिसून येते. इथेदेखील त्यांच्याभोवती असलेल्या लोकसंगीताचा प्रभाव डोकावताना दिसतो.

लोकसंगीत गाताना गायकाच्या आवाजात एक लांबवर ‘फेक’ असतो, तो कुमारजींच्या बऱ्याच रचनांमध्ये जाणवतो. या संतांच्या बऱ्याच रचना कुमारजींनी विशिष्ट शास्त्रीय रागांचा आधार घेऊन बांधल्या आहेत. परंतु गाताना आपण शास्त्रीय गायनाची बैठक ऐकत आहोत, असे मुळीच न जाणवता या रागांच्या भोवती, लोकसंगीताची एक विलक्षण गुंफण अनुभवायला मिळते. थोडक्यात, रागसंगीत आणि लोकसंगीत याचा अनोखा संगम या संतांच्या रचना ऐकताना आपल्याला आढळतो. मार्च महिन्यात कामानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात गेलो होतो. तिथे आठवडाभर वास्तव्य असल्यामुळे दोन दिवस तिथल्या अगदी दुर्गम भागात, आदिवासी पाड्यांमध्ये जाण्याची संधी मिळाली. तिथे आदिवासींची वाद्ये, गाणी आणि नृत्येदेखील मी अनुभवली. त्या प्रसंगी आदिवासींनी ऐकवलेल्या लोकरचनांमधली एक रचना भूप रागाच्या अगदी जवळ जाणारी असल्याचे मला जाणवले आणि पाठोपाठ कुमार गंधर्वांचे विचार मनात रुंजी घालू लागले.

सुरुवातीला थोडा संकोच बाळगणारे हे लोक एकदा गायला लागले की, स्वत:च्या विश्वात रममाण होतात, समोरच्या ‘श्रोत्यांची’ वगैरे पर्वा करीत नाहीत. त्यांचे ते तादात्म्य पाहून असाही विचार आला, की या लोकरचनांचे पुढे काय होईल? काही रचना या परंपरेमुळे पुढच्या पिढीकडे सुपूर्द केल्या जातील. कदाचित काळानुरूप घडून येणाऱ्या स्थित्यंतरामुळे या रचना देशाच्या दुसऱ्या भागात जातील. पुढे बऱ्याच वर्षांनी त्यांना एखादे व्यासपीठ प्राप्त होईल. या व्यासपीठाला श्रोत्यांची जोड मिळेल. आणि कदाचित ते त्या वेळचे ‘प्रतिष्ठित’ संगीत म्हणून ओळखलेसुद्धा जाईल! पण त्याचा उगम हा नंदुरबारमधील काही लोकधुनांमध्ये होता, हे ते ऐकणाऱ्या लोकांना कदाचित माहीत नसेल! मग तेव्हा कुणीतरी कुमार गंधर्वांसारखा नायक जन्माला येईल, आणि उगमाचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल! कदाचित त्याला/तिला यात यश येईल, कदाचित येणारही नाही; पण संगीताचा हा सामाजिक प्रवास मात्र पुढील अनेक शतके सुरूच राहील!

भारतीय संगीतात एकंदर विचारांची आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणारी उदाहरणे खूप समाधानकारक नाहीत. कुमार गंधर्व आणि त्यांच्या पिढीतील गायक-वादक ज्या काळात संगीत सादर करू लागले, तेव्हा तर ही संगीतज्ञान स्वत:पुरते ठेवण्याची प्रवृत्ती अधिक बळकट होती. परंतु गंधर्वांचा हा मोठेपणा की, त्यांनी संगीत क्षेत्रात केलेले हे महत्त्वाचे आणि क्रांतिकारक कार्य स्वतःपुरते मर्यादित नाही ठेवले. त्यांनी त्याची जाणीवपूर्वक नोंद केली. मुलाखती दिल्या आणि व्यासपीठावरून आपली मते मांडत राहिले. संगीत हे सर्वांपर्यंत पोहोचावे, अशी त्यांची ‘मिशनरी’ वृत्ती होती! हाच त्यांच्या ठायी असलेला दातृत्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळा ठरवतो. रागसंगीतातील व्याकरणाबरोबरीने लोकसंगीतातील श्रेष्ठत्वसुद्धा तितक्याच प्रभावीपणे सादर करणारे कुमार गंधर्व त्यामुळे केवळ एक श्रेष्ठ गायक ठरत नाहीत; तर भारतीय शास्त्रीय संगीतात सूरमयी क्रांती घडवून आणणारे एक महानायक ठरतात!

तानपुरा हाच कॅनव्हास
पंडित कुमार गंधर्व यांच्या साथीला असलेले तानपुरे ऐकणे, हा एक स्वतंत्र अनुभव असतो. ते नेहमी म्हणत की, तानपुरे हा माझा कॅनव्हास आहे. या तानपुऱ्यावर मी सुरांचे रंग भरतो. त्यामुळे सूर जुळणे याला गंधर्वांच्या लेखी अनन्यसाधारण महत्त्व असायचे.
आजदेखील त्यांची कोणतीही रेकॉर्डिंग ऐकली तरीही तानपुऱ्यांची आस आपल्याला जाणवते आणि आपसूक दाद दिली जाते...

ज्ञानस्थ गंधर्व
पंडित कुमार गंधर्वांनी संगीत क्षेत्रात संशोधनाच्या अंगाने प्रचंड काम केले. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट ही, की त्यांनी त्याचे दस्तऐवजीकरण केले - पुस्तकांच्या रूपात आणि रेकॉर्ड‌्सच्या रूपातदेखील! त्यामुळे त्यांनी रचलेले ज्ञान बंिदस्त न राहता सर्वांसाठी खुले झाले. घराण्यांची मर्यादा पाळणाऱ्या संगीत क्षेत्रात हे नि:संशय एक महत्त्वाचे पाऊल होते. कोणतेही क्षेत्र विकसित होत राहण्यासाठी स्वतः ज्ञान रचणारा गुरू मनाने उदार असावा लागतो, हेच त्यातून दिसून आले.

» लोकसंगीतातून स्फूर्ती घेत कुमारजींनी काही राग स्वतः निर्माण केले. नवनिर्मितीचे हे कार्य वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. मग तो देवासच्या एका ‘पुंगी’ वादकाकडून ऐकलेल्या धुनेतून निर्माण झालेला राग ‘अहिमोहिनी’ असो, किंवा याच माळव्याच्या लोकधुनांमधून निर्माण झालेला ‘मालवती’ किंवा ‘संजारी’ असो. सारे काही विलक्षण!

- आशय गुणे

हा लेख दै.दिव्य मराठीच्या 'रसिक' पुरवणीत दिनांक २ एप्रिल ह्या दिवशी प्रकाशित झाला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users