मैफिलीत त्या रंग न भरला

Submitted by निशिकांत on 3 April, 2017 - 01:49

तुझ्याविना मल्हार कोरडा
आठवणींच्या धुक्यात विरला
सुरेल होती तान परंतू
मैफिलीत त्या रंग न भरला

एक जमाना होउन गेला
एक एकटा चालत आहे
व्यक्त व्हायचे कोणा जवळी?
मी माझ्याशी बोलत आहे
असावीस तू येत मागुनी
भास मनीचा भ्रामक ठरला
सुरेल होती तान परंतू
मैफिलीत त्या रंग न भरला

रंग घेउनी तूच ये सखे
उजाड आयुष्यात भराया
कुंचल्यातुनी हिरवळ थोडी
चितारून दे मला बघाया
वसंत रेंगाळेल भोवती
जरी तयाचा मोसम सरला
सुरेल होती तान परंतू
मैफिलीत त्या रंग न भरला

शहारणारी स्वप्ने येती
तुला घेउनी भेटायाला
स्वप्न खरे होईल कदाचित
असे लागले वाटायाला
ओढ जिवाला अशी लागली!
ध्यास मनी बस ! तुझाच उरला
सुरेल होती तान परंतू
मैफिलीत त्या रंग न भरला

कडाडल्यावर वीज, दिसावे
अंधारीही लखलख सारे
तसेच मी बाहूत पाहिले
तू आल्यावर झिलमिल तारे
क्षणात एका नको नकोचा
अधीर पडदा गळून पडला
सुरेल होती तान परंतू
मैफिलीत त्या रंग न भरला

पुनवेचे तू आण चांदणे
घेउन येतो मीही दरवळ
रोमांचांना पांघरल्याविन
कशी मिटावी विरही तळमळ?
श्वासांमध्ये श्वास मिसळुनी
स्वर्ग भूवरी म्हणू उतरला
सुरेल होती तान परंतू
मैफिलीत त्या रंग न भरला

निशिकांत देशपांड. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users