निरागसतेची रंगीत स्वप्नपूर्ती - धनक (Movie Review - Dhanak)

Submitted by रसप on 30 March, 2017 - 03:50

कैसे आकाश में सूराख़ हो नहीं सकता
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो

ह्या दुष्यंत कुमारांच्या ओळींत एक अशक्य ग्लोरिफिकेशन आहे. 'आकाश में सूराख'. 'आकाश' जे स्वत:च एक आभास आहे, त्याला छेद देण्याची बात करतो आहे कवी. अशक्यच आहे. पण जे लिहिलंय तेच सांगायचं असेल, तर तो कवी कसला ? ह्या दोन ओळींतून दुष्यंत कुमार परिस्थितीला बेडरपणे भिडण्याचा जो संदेश देतात, हा तोच संदेश आहे जो गुरु गोविंदसिंग घारीशी भिडणाऱ्या चिमणीच्या कल्पनेतून देतात.
अशक्यप्राय दिसणाऱ्या एखाद्या ध्येयाचा माग सगळेच घेत नसतात. २००६ साली ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ४३४ धावा केल्या तेव्हा कुणाला वाटलं होतं की समोरचा दक्षिण आफ्रिकेचा संघ ते अशक्यप्राय वाटणारं आव्हान यशस्वीपणे पेलेल ? पण त्यांनी ते करून दाखवलं. अर्थात, ह्या पाठलागात काही पद्धत होती, त्याचं काही शास्त्र असू शकतं.
मात्र जेव्हा एक १०-११ वर्षांची मुलगी घरी कुणालाही न सांगता स्वत:च्या ८ वर्षाच्या अंध भावाला सोबत घेऊन एका अपरिचित असामीला केवळ त्याने केलेल्या एका सामाजिक अभियानाच्या जाहिरातीचा संदर्भ घेऊन भावाच्या उपचारासाठी मदत मागण्यासाठी निघते, तेव्हा त्यामागे केवळ वेडेपणाच असतो. वेडेपणा म्हणा, पोरकटपणा म्हणा, मूर्खपणाही म्हणा. पणे तेही एक वास्तव आहेच. असतात की, वेडे, पोरकट किंवा मूर्ख लोकही. लहान मुलं तर असतातच ! 'वास्तव' म्हणजे नेहमीच भडक किंवा भयानक नसतं. 'वास्तव' म्हणजे हिंसा किंवा विकृतीचं अतिरंजनच नसतं. 'वास्तव' संघर्षमय असतं, तरीही ते आनंददायी असू शकतं. कसं ? हे समजण्यासाठी 'धनक' पाहा.

राजस्थानमधल्या एका लहानश्या दुर्गम खेड्यात राहणारे 'परी' (हेतल गाडा) आणि 'छोटू '(क्रिश छाब्रिया). आई-वडील एका दुर्घटनेत मरण पावल्यावर चाचा-चाचीकडे (विपिन शर्मा-गुलफाम खान) राहत असतात. दोघे बहिण-भाऊ एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. इतके की, भावासोबत त्याच्या वर्गात राहता यावं म्हणून हुशार असूनही परी दोन इयत्ता मुद्दाम नापास होते ! एका आजारपणात अपुरा आहार मिळाल्यामुळे हळूहळू करत दृष्टिहीन झालेल्या छोटूच्या डोळ्यांच्या उपचाराचा खर्च करण्यासाठी निरुद्योगी चाचा असमर्थ असतो आणि कजाग चाची तयार नसते. नेत्रदान अभियानाच्या एका जाहिरातीचं पोस्टर पाहून परी ठरवते की तिच्या आवडत्या शाहरुख खानला मदतीसाठी साकडे घालायचं. जवळजवळ ३०० किमी.वर असलेल्या जैसलमेरजवळच्या एका गावात शाहरुख खान शूटिंग करतो आहे, हे तिला समजतं आणि असहाय्य चाचा व फारशी आपुलकी नसलेल्या चाचीला काहीही न सांगता ती छोटूला घेऊन घरून निघते.
रस्ता माहित नाही, नेमका पत्ता ठाऊक नाही, प्रवासाची कुठलीही थेट सुविधा नाही, जवळ फारसे पैसे नाहीत, काही सामान नाही, असा हा प्रवास. त्यांना ह्या प्रवासात वेगवेगळे लोक भेटतात, अनुभव मिळतात. इंद्रधनुष्याच्या विविध रंगछटांप्रमाणे हा प्रवास आहे. ज्यादरम्यान आपल्याला 'रंगीला राजस्थान' दिसून येतो. रंगीबेरंगी कपड्यांतले लोक, त्यांच्या वागण्या-बोलण्याची ढब आणि राजस्थानी संस्कृतीचं दर्शनही सिनेमा घडवतो.

ह्या सगळ्यामुळे सिनेमा धीमा झाला आहे. खरं पाहता कथानक खूप मर्यादित आहे. त्याला अजून रंजक करता आलं असतं. थरारकही करता आलं असतं. पण मग त्यातला साधेपणा आणि मुख्य म्हणजे निरागसपणा हरवला असता. आणि सिनेमा नागेश कुकुनूरचा असल्याने इथे थरार आणि रंजकतेपेक्षा साधेपणा आणि निरागसतेला इतर लोकांच्या सिनेमांतल्यापेक्षा जास्त महत्व मिळतं. बहिण-भावातलं घट्ट प्रेम, त्यांच्यातला निष्पापपणा पुन्हा पुन्हा जाणवत राहतो. त्यांना ह्या प्रवासात काही अडचणीही येतात. पण त्यांचा निरागसपणा आणि निष्पापपणा त्यांना त्यातून बाहेर काढतो.
प्रवासावर जरी अनिश्चिततेचं सावट असलं, तरी सतत एक सकारात्मकता जाणवत राहते. रखरखीत वाळवंट, रणरणती उन्हं, निर्जन रस्ते असं सगळं डोळ्यांना दिसत असलं, तरी त्यातून कुठलीही भयाणता अंगावर येत नाही. छायाचित्रणातली ही सकारात्मकता जपल्याबद्दल चिरंतन दास ह्यांचं विशेष अभिनंदन करायला हवं.
तसाच विशेष उल्लेख आवश्यक आहे संगीतकार तपस रेलीयाचा. राजस्थानी लोकसंगीताचा अप्रतिम उपयोग त्यांनी संपूर्ण सिनेमात केला आहे. 'चल चले..' हे ओरिजिनल गाणं तर खूपच सुंदर आणि मनात रुंजी घालणारं आहे. 'दमादम मस्त कलंदर' चं रिक्रियेटेड वर्जनही जबरदस्त जमलंय !

हेतल गाडा आणि क्रिश छाब्रिया, ह्या बालकलाकारांनी तर केवळ अप्रतिम काम केलं आहे. गाण्यांना लिपसिंक देतानाही इतकं समजून-उमजून दिलं आहे की २५-२५ वर्षं काम करून सुपरस्टार बनलेल्यांनीही शिकायला हवं ! दोघांचे चेहरे अतिशय बोलके आहेत आणि 'अभिनय करतो आहोत' असं अजिबात जाणवू देत नाहीत.
विपिन शर्मा, गुलफाम खान, राजीव कृष्णन, विभा छिबर, सुरेश मेनन, निनाद कामत सगळेच लहान लहान सहाय्यक भूमिकांत आहेत. ते येतात आणि आपापलं काम चोख करून जातात.

13391309_1186140944782417_2037151305_n.jpg

आधीच म्हटल्याप्रमाणे 'धनक' जरा लांबलेला आहे. पण 'वास्तव असंही असतं' अशी एक वेगळी वाट पकडणारा नक्कीच असल्याने deserves an applause, for sure. कारण आयुष्य खरोखरच प्रेम करण्यासारखं असतं. इथे ठायी ठायी नकारात्मकता भरलेली नक्कीच नाही. तसं वाटत असेल, तर दृष्टीकोन बदलायला हवा.

तुम तो कहते थे, ख़ुदा तुमसे ख़फ़ा है 'क़ैसर'
डूबते वक़्त तुझे इक हाथ मिला था, क्या था?

- क़ैसर उल जाफ़री

जळजळीत, हादरवून सोडणाऱ्या वास्तवदर्शनाने निराश वाटत असेल तर, वास्तवदर्शनाचाच एक गुळमाट किंवा गोडगट्ट नव्हे, तर चमचमीत व चविष्ट डोस 'धनक' देईल.

धनक - अंधाराकडून इंद्रधनुष्याकडे !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/03/movie-review-dhanak.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिचय.,परिक्षण
बघायला मिळेल का ते माहित नाही
पण नागेश कुकनुर म्हणजे क्या बात है!

तुनळीवर बघेन.
हे असे बहिण - भाउ पिच्चर किंवा सीन न रडता बघताच येत नाहीत. डोळे पाणावतातच. सीन गंभीर असो की बहिण भावाच्य प्रेमाचा

@विदिपा,

'गँग्ज ऑफ वासेपूर' आवडले नव्हते. लिंक 'विपु'त देतो, पण जर तुम्ही फॅन असाल तर नका वाचू.

छान लिहिले आहे.. नक्की बघेन !

उगीच एक डोक्यात किडा..

समजा हा चित्रपट बघून खरेच कुणी असे प्रवासाला निघाले तर !

पाहिलाय हा चित्रपट . सर्वात आवडलं ती दोन छोटी मुलं . मस्त काम केलंय. त्यांना दिलेले संवाद ही जबरी आहेत. शेवट काहीसा फिल्मी असला तरी पूर्ण चित्रपट खरा असं जाणवून देण्यात दिग्दर्शकाला यश आलेल आहे त्यामुळे तितकंसं ते खटकत नाही . एकंदरीत एकदा बघायला हवा कॅटेगरी चित्रपट आहे Happy

(उदास करणारा असेल असे वाटल्याने)>> तसा बिलकुल नाहिये, छोटी कथा आहे, रसप म्हणतात तशि थोडी रेन्गाळली पण आहे तरीही शेवटपर्यत बघावासा वाटतो.

नेटफ्लिक्सवर आहे पण पहावासा वाटला नाही (उदास करणारा असेल असे वाटल्याने). परिक्षण छान.>>+१

शाळेत असताना अश्याप्रकारचा एक धडा होता. आता नीट आठवत नाही पण त्यात सुद्धा एक बहीण घरी न कळविता तिच्या लहान भावाला त्याच्या डोळ्यांच्या उपचारासाठी शहरात घेऊन जाते.

>>>शाळेत असताना अश्याप्रकारचा एक धडा होता. आता नीट आठवत नाही पण त्यात सुद्धा एक बहीण घरी न कळविता तिच्या लहान भावाला त्याच्या डोळ्यांच्या उपचारासाठी शहरात घेऊन जाते.
ह.ना.आपटे ह्यांची कथा होती. ९ वा धडा बघा Happy
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ChBalBooks.aspx?ItemId=2601000001

>>>शाळेत असताना अश्याप्रकारचा एक धडा होता. आता नीट आठवत नाही पण त्यात सुद्धा एक बहीण घरी न कळविता तिच्या लहान भावाला त्याच्या डोळ्यांच्या उपचारासाठी शहरात घेऊन जाते.
ह.ना.आपटे ह्यांची कथा होती. ९ वा धडा बघा Happy
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ChBalBooks.aspx?ItemId=2601000001
>>>++++++++१११

>>>शाळेत असताना अश्याप्रकारचा एक धडा होता. आता नीट आठवत नाही पण त्यात सुद्धा एक बहीण घरी न कळविता तिच्या लहान भावाला त्याच्या डोळ्यांच्या उपचारासाठी शहरात घेऊन जाते.
ह.ना.आपटे ह्यांची कथा होती. ९ वा धडा बघा Happy
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ChBalBooks.aspx?ItemId=2601000001
>> मला अकरावीला असताना मराठी विषयाच्या पुस्तकात एक धडा होता 'झडीचे दिवस' आणि एक राम नगरकरांचा होता. ते पुस्तक online मिळेल काय?

शाळेत असताना अश्याप्रकारचा एक धडा होता. आता नीट आठवत नाही पण त्यात सुद्धा एक बहीण घरी न कळविता तिच्या लहान भावाला त्याच्या डोळ्यांच्या उपचारासाठी शहरात घेऊन जाते.
ह.ना.आपटे ह्यांची कथा होती. ९ वा धडा बघा Happy
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ChBalBooks.aspx?ItemId=2601000001 >>>_+१ हयाच धडयावर सहयाद्रिवर एक टेलिफिल्म पण आली होती.

मस्त असेल हा चित्रपट..
रणजित, वर म्हण्ट्ल्याप्रमाणे, कुठे बघितला तुम्ही हा चित्रपट ? थेटरात आलाय ?? नागेश कुकनूर हा एक अवलिया आहे. मला त्याचे रॉकफोर्ड, हायद्राबाद ब्ल्युज सकट सगळेच चित्रपट आवडले आहेत. ह. नां. चा धडा...करेक्ट....मला रणजित चे परिक्षण वाचताना तो धडा च आठवत होता. त्यात त्या ताई चे नाव गोदू असते बहुदा...

-प्रसन्न

छान चित्रपट. परदेशी पर्यटकाने दिलेले चॉकलेट खाण्याचे दृश्य अतिशय मजेदार आहे.

परिक्षण छान लिहिलंयस रणजीत.
हेतल गाडा बर्‍याचदा क्राईम पॅट्रोल च्या भागांमध्ये दिसते, सुंदर काम करते वयाने लहान असूनही.

साधारण अशाच आशयाचा ( म्हणजे अतिशय गरीब छोट्या भावाने बहिणीला बाहुली पाहिजे म्हणून केलेला प्रवास ) एक सिनेमा गेल्या वर्षी मराठीत येऊन गेला पण अजिबातच चालला नाही. त्यात भाऊ मोठा दाखवलाय आणि बहीण छोटी . सिनेमा अतिशय सुरेख होता . मी पहिला होता पण सिनेमाचं नशीब नव्हतं असच म्हटलं पाहिजे . माणसाप्रमाणेच सिनेमाचहि नशीब असतंच . नुसतं सगळं चांगलं असून चालत नाही. नशिबाची जोड लागतेच लागते .असो Happy