'नाते' म्हणून आहे!

Submitted by सत्यजित... on 27 March, 2017 - 21:15

तुटली सतार पण मी गाते म्हणून आहे
या मैफलीत मीही,'नाते' म्हणून आहे!

निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या
नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे!

जेवण,चुडा नि साड्या,देतोच ना मला तो
खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे!

गजरा गुलाब अत्तर,निर्गंध होत गेले
शृंगारही अताशा,'न्हाते' म्हणून आहे!

स्मरते नि छिन्न करते,त्याचे सुरेल गाणे
या काळजात फिरते पाते म्हणून आहे!

या लेखणीस कितिदा,तोडून पाहते पण
माझ्यासवेच तीही,'जाते' म्हणून आहे!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या
नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे!.....

वाचलं आणि आपसूकच पापण्यांच्या कडा ओलावल्या... सुंदर अभिव्यक्ती ....