चटनी वाले आलू

Submitted by दिनेश. on 20 March, 2017 - 04:56
लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

उत्तर प्रदेश मधला हा खास पदार्थ. चटकदार आणि नेहमीपेक्षा जरा वेगळा कारण यात कांदा, टोमॅटोची ग्रेव्ही नाही.
एरवी कांदा वापरतातही पण मी वापरलेला नाही.
याचे दोन प्रकार मी चाखलेत. हा मी देतोय तो चेंबूरला गोल्डन व्हील या हॉटेलमधे ( त्याला बरीच वर्षे झाली ) खाल्ला होता. आणि दुसरा प्रकार, सिंगापूरला खाल्ला होता. तो टिपांमधे लिहितो.

CVA Dish.JPG

मी घेतलेले जिन्नस असे
१) ६ मध्यम आकाराचे बटाटे, साले काढून मोठे तूकडे करून.
२) तेल
३) १ टेबलस्पून जिरे
४) १ टिस्पून हळद
५) अर्धा टिस्पून हिंग
६) एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर
७) अर्धा कप बारीक चिरलेला पुदीना
८) एक इंच आले
९) ६ लसूण पाकळ्या
१०) ५/६ हिरव्या मिरच्या
११) लिंबू किंवा आमचूर पावडर चवीप्रमाणे
१२) चाट मसाला
१३) मीठ
१४) थोडा ताजा गरम मसाला ( वेलची, मिरी, दालचिनी यांची भरड पूड, १ टिस्पून )
१५) १ टिस्पून लाल तिखट किंवा अर्धा टिस्पून मिरी पावडर ( ऐच्छिक )

क्रमवार पाककृती: 

१) कोथिंबीर, पुदीना, आले, लसूण आणि मिरच्या यांची बारीक चटणी वाटून घ्या.
२) पॅनमधे तेल तापवून त्यात जिरे, हिंग व हळद घाला.
३) मग त्यावर बटाट्याच्या फोडी घाला आणि परतून घ्या.
४) त्या सोनेरी रंगावर आल्या कि त्यावर मीठ आणि वाटलेली चटणी घाला.
५) हलक्या हाताने परतून चटणी सर्व फोडींना नीट लागेल असे पहा.
६) मंद आचेवर बटाटे शिजवून घ्या.
७) ते शिजले कि वरून गरम मसाला पावडर घाला आणि नीट मिसळून घ्या ( आमचूर वापरत असाल
तर यावेळी घाला.)
८) मग आच बंद करून लिंबूरस, चाट मसाला व वापरत असाल तर लाल तिखट / मिरी पावडर घाला.

हा प्रकार नुसताच किंवा रोटीसोबत छान लागतो.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

CVA Close up.JPG

याचे दुसरे कच्चे व्हर्जन मी सिंगापूरला खाल्ले होते. त्यात छोटे बटाटे उकडून अश्या कच्च्या चटणीत मिसळले होते.
बटाटे पिठूळ होते त्यामूळे चटणीचा स्वाद आत छान मुरला होता. चटणीत लसूण नव्हती. हिंग, जिरे आणि तीळ यांची फोडणी वरून ओतली होती. हा प्रकार थंडच दिला होता. तोही खुप छान

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी 'हरे धनियाके आलु ' असा माझ्या लखनऊवाल्या शेजारणीने केलेला प्रकार खाल्ला आहे स्नॅक्य आयटम म्हणून तोही कच्चाच असतो तेल/फोडणी विरहीत. ह्या सिझनमध्ये नवीन बाळ बटाटे येतात त्याचे करतात. बटाटे उकडून टोचून हिरव्या चटणीत तास दोन तास मुरु द्यायचे आणि मग खायचे.... छान लागतात.

मस्त मला आवडली ही रेसीपी. सर्व सामान घरात असतेच. आणि दमून घरी आल्यावर पाच मिनिटात होईल अशी आहे. पाव बरोबर किम्वा कुलचे बरोबर मस्त लागेल. नाहीतर नुसतीच वाटीभर. Happy सोमवारी रात्रीला मी असे काय काय स्ट्रेस बस्टर अन्न बनवते.

आदिती, या चटणीला जे पाणी सुटते, त्याच पाण्यात बटाटे शिजतात. त्यामूळे आतपर्यंत चव मुरते. अर्थात फोडी बारीक केल्या तरी चालतीलच !