पान्हा

Submitted by विद्या भुतकर on 16 March, 2017 - 23:03

सकाळी जाग आली तसे निशाने पलीकडे घड्याळाकडे पाहिले. अलार्म चुकलाच होता. नवरा आणि बाळ दोघेही गाढ झोपलेले होते. ती हळूच उठून बाथरूममध्ये गेली आणि बाहेर आली तर झोपलेल्या विनयच्या बाजूला विहान इकडे तिकडे गंमत पहात लोळत पडला होता. तिला पाहिल्यावर तो आपलं बोळकं दाखवून हसला. त्याच्या मोठाल्या डोळ्यांत चमक आली. त्याच्या केवळ हसण्यानेही दिवस छान वाटतो हे तिला पुन्हा एकदा जाणवलं.

तिनेही हसून,"ए ढमू उठलास होय? तरी किती हळू जायचं माणसानं? हां?" असं म्हणत त्याला हातात घेतलं. त्यानेही सकाळ सकाळी छान झोप झाल्याचं एक मोठठं हसू तिला दिलं. तिने त्याच्या वाढलेल्या कुरळ्या केसांच्या बटांमधून हात फिरवून त्याचे केस मागे घेतले आणि त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले.

तिच्याजवळ आल्यावर पुढे काय होणार हे त्याला माहीतच होतं. तिनेही मग गादीवर मांडी ठोकली आणि त्याला दूध पाजायला सुरुवात केली. त्यानेही घाईघाईने दूध प्यायला सुरुवात केली.

त्याचे केस कुरवाळत तिने विचारलं,"इतकी भूक लागली होती होय?".

भुकेचा भर कमी झाल्यावर दूध पिता पिता तो हाताने तिच्या गळ्यापाशी चाचपडू लागला. तिनेही मग सवयीने गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या हातात दिलं त्याच्याशी चाळा करत करत तो दूध पिऊ लागला. त्याचं चालू आहे तोवर निशाने विनयकडे पाहिलं. रात्री उशीरपर्यंत आवरा आवर करत बसला होता. तिने हलकेच आपला हात त्याच्या छातीवर ठेवला, तसा विनय एकदम दचकून उठला.

"अरे झोप झोप. तुम्ही बाप लेक दोघं सारखेच. कणभरही आवाज नको तुम्हाला की स्पर्श. असली कसली झोप ती?", निशा वैतागली.

विनय डोळे चोळत उठून बसला आणि म्हणाला,"अगं, कामं आहेत अजून बरीच. रात्री जरा कुठं आवरून झालं बाहेरचं. अजून थोड्या खुर्च्या हव्यात आणि ती भाड्याने सांगितलेली भांडीही घेऊन यायचीत."

"मला माहितेय, तरी मी अलार्म लावला होता. कधी बंद केला कळलं पण नाही. याचं पिऊन झालं की मी पण आवरते.",निशाने सांगितले.

१५-२० मिनिटांनी तिने विहानला पाजायचं बंद केलं. "चला महाराज, बास आता."

विनयकडे पाहून म्हणाली,"अरे याचं फीडिंग बंद केलं पाहिजे. वर्षाचा होत आला."

विनयने त्याला हातात घेत म्हटलं,"हो.... मोठठे झालो आता आम्ही. दूध भाता खाणार, भाजी पोळी खाणार...."

विहानने त्यालाही मोठठं बोळकं काढून दाखवलं.

निशा आपला गाऊन बंद करत उठली आणि बाथरुमकडे गेली, आज भरपूर कामं होती. जाताना वळून म्हणाली,"आता बाप लेक एकदम रात्रीच भेटाल म्हणजे मला?"

विनयने विचारलं,"म्हणजे?"

"म्हणजे, लोक असले की मला कोण ओळख देतंय? ना तू ना तुझा लेक."

तसा विनय हसला हातातल्या विहानकडे बघत म्हणाला,"मग काय? हसरं बाळ आहे आमचं ते..."

तिने मान हलवली आणि बाथरूमचा दरवाजा बंद केला.

अर्ध्या तासात सर्व आवरून निशा किचनमध्ये गेली. सासूबाईंना म्हणाली,"तुम्ही कधी उठला? मला उठवायचं ना? गजर कधी झाला कळलंच नाही. "

त्यावर त्या म्हणाल्या,"असू दे गं. मी रात्री लवकर झोपले होते. दिवसभर आहेच काम परत."

त्यांनी आंघोळ करून कुकर लावला होता. कणकेचे मोठे गोळे मळून ठेवले होते. तिने विचारलं,"मी काय करू?"

"बटाट्याच्या भाजीचा कांदा चिरतेस का?" तिने मान हलवली आणि ८-१० कांदे चिरायला घेतले. सासूबाईंनी मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर सर्व सामान गोळा करायला सुरुवात केली.

आज त्यांची नुकतंच लग्न करून गेलेली मुलगी विशाखा, तिच्या सासरचे ८-१० लोक, दुसरी मुलगी, तिचे कुटुंबीय घरी येणार होते. लग्नाला महिना पालटून गेला होता. लग्नाच्या घाईतून सर्व जरा रिकामे झाल्याने पुन्हा हा भेटीचा कार्यक्रम ठरला होता. घरातली साफ सफाई वगैरे निशा आणि विनयने रात्रीच केली होती. दोन्ही मुलींच्या सासरचे येणार म्हणून सासूबाई जरा जास्तच काळजीत होत्या. सून आणि मुलगा मात्र जमेल तितकं काम करत होतेच.

सासू सुना जोमाने स्वयंपाकाला लागल्या होत्या. विनय, सासरे बाहेरचं सामान आणायला गेले होते. स्वयंपाक चालू असताना विहानची लुडबुड चालू होतीच. तिनेही त्याला २-३ वाट्या, चमचे खेळायला दिले होते. पण त्यावर थोडेच त्याचं भागणार होतं. कपाटातल्या वस्तू, कांदे बटाटे सर्व बाहेर येत होतं. मध्ये दोन तीन वेळा पडलाही तो आणि थोडा रडलाही. तिने त्याला काम करता करताच काखेत धरून ठेवलं पण कामापुढे थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतंच. तोही वेडा लगेच रडू विसरून पुन्हा तेच खेळ खेळत होता. लवकरच सासरे घरी आले तसं तिने त्यांच्या हातात एका ताटलीत थोडे पोळीचे तुकडे त्याला भरवण्यासाठी दिले आणि पुन्हा ती कामाला लागली.

थोरली विश्पला लवकरच आली. सोबत नवरा, सासू सासरे आणि दीड वर्षाचा मुलगा होता. लेक आली तसे सासूबाईंनी हातचे काम सोडून नातवाला हातात घेतले. पण नातू लगेच रडायला लागला.

मुलीने समजावले,"अगं गाडीत झोपला होता ना? थोड्या वेळात येईल तुझ्याकडे."

थोडे नाराज होत सासूबाई पोळ्या लाटायला बसल्या. वर उभे राहून निशा एका बाजूला भाजी परतत होती तर एकीकडे पोळ्या भाजत होती. नणंदेने पुढे होऊन विहानला हातात घेतले. तोही गेला लगेच तिच्याकडे.

"काय करतो रे लबाडा....?" म्हणत तिने मोठी पापी घेतली. त्याने पुन्हा आपलं बोळकं दाखवलं. तशी नणंद म्हणाली,"वहिनी दात नाही आले याला अजून? ऋषीला तर ७व्या-८व्या महिन्यांतच यायला लागले होते."

"हां विचारलं होतं मी डॉक्टरांना तर म्हणाले, 'होतं असं. थोडे पुढे मागे झाले तरी चालते.'" निशाने तिला सांगितलं.

"पण बरंय, त्यामुळेच याची तब्येत अशी छान आहे. नाहीतर ऋषी बघा, किती खायला दिलं तरी तसाच. लवकर दात यायला लागले आणि तब्येत उतरली.",नणंद म्हणाली. तिने सासऱ्यांच्या हातातली ताटली घेऊन विहानला भरवायला सुरुवात केली. बोलत बोलत त्याची एक पोळी सम्पलीही.

"चांगलं आहे हो, दात नसूनही त्याने पोळी संपवली?" ताटली ओट्यावर ठेवत नणंद म्हणाली.

'आपल्या पोराला उगाच ही बाई दृष्ट लावतेय' वाटून निशाने मान फिरवली.. क्षणभर तिला विहानचा रागच आला. त्याला काय सारखं दिसेल त्याला बघून दात काढायचे असतात? आणि त्यात आवर्जून खाऊही खायचा? काय गरज असते त्याला?

पण पाहिलं तर तो पुन्हा आपल्या उचापत्या करायला पळून गेला होता. ढुंगण मागे काढत स्वतःला सावरत दुडूदुडू धावणाऱ्या पाठमोऱ्या विहानला पाहून तिला त्याला एकदम हातात उचलून घ्यायचा मोह झाला. पण काय करणार? काम होतं. निशा त्याच्याकडे पहात पुन्हा पोळ्या भाजू लागली.

उरलेले सर्व पाहुणे आले. ताटं वाढली गेली. विनय आणि सासरेही आग्रहाने सर्वांना वाढत होते. निशा आत बाहेर करत हवे नको ते पहात होती. मधेच तिने विचारलं,'विहान कुठेय?' तर तो नव्या जावयाच्या मांडीवर बसून त्याच्याशी खेळत होता.

मधेच मोठी नणंद येऊन म्हणाली,"वहिनी जरा वरण भात देता का एका ताटात? ऋषीने काहीच खाल्लं नाहीये मघापासून."

निशाने तिला ताट आणून दिलं. नणंदेच्या पदराला लटकलेला ऋषी तिला दिसला. तिने घ्यायचा प्रयत्न केला पण तो काही कुणाकडे जात नव्हता. त्याची कुरकुर चालूच होती. किचनच्या एका कोपऱ्यात बसून तिने ऋषीला मागे लागून एकेक घास भरवायला सुरुवात केली आणि निशाला 'आपल्या पोराला अनेक वर्ष पाहिलं नाहीये' असं वाटलं. भाजी वाढायला म्हणून बाहेर गेली तर तो आता जावयाच्या मांडीवर बसून त्याच्या ताटातलं श्रीखंड खात होता. ती समोर आली तसा हसलाही.

तिने विचारलं,"घेऊ का?"

तसे जावईबापू म्हणाले,"मस्त खेळतोय तो माझ्यासोबत. असू दे."

आता तेच असे म्हटल्यावर काय करणार? ती मुकाट्याने निघून गेली. मनातल्या मनात हसणाऱ्या विहानला तिने एक चिमटा देखील काढला. निदान रडला म्हणून तरी माझ्याकडे येईल या विचाराने.

आत आली तर नणंद म्हणाली,"बरंय वहिनी तुम्हाला विहानकडे बघायला लागत नाही. नाहीतर हा.. सारखा मला चिकटलेला."

तिला वाटलं पटकन बोलून टाकावं,'उलट तुमचंच बरं आहे, तुमच्याजवळ तरी आहे, मला तर पोराला बघायलाही मिळालं नाहीये'.

पण ती गप्प बसली.

पाहुण्यांची जेवणं उरकली तेव्हांच ३ वाजून गेले होते. सासूबाई जेवायला बसू लागल्या. निशा 'येतेच' म्हणून बाहेर गेली. पुन्हा एकदा विहानला शोधलं आणि त्याला मांडीवर घेऊन जेवायला बसली. पण त्याचं आईकडे लक्ष कुठे होते? तो ताटातल्या वाटीत हात घालू लागला तसे विनय म्हणाला,"थांब मी बघतो त्याला. तुम्ही नीट जेवण करून घ्या."

तिने नाईलाजाने त्याला विनयकडे दिले आणि म्हणाली,"तो प्याला नाहीये अजून. मी घेते त्याला जेवले की.. झोपवू नको त्याला."

तो,"अगं, आता तूच म्हणतेस ना बंद करायचे आहे? मग कशाला? मी झोपवतो त्याला. त्याने खाल्ले आहे आमच्यासोबत. तू जेव."

ती मग नणंदा, त्यांच्या सासूबाई, संपली सासू या सर्वांशी गप्पा मारत जेवली.

नंदेने विचारलेच,"वहिनी अजून बंद नाही झालं फीडिंग?".

ती नाईलाजाने बोलली,"नाही अजून, जमतंच नाहीये. रात्री रडतोच."

नंणद म्हणाली,"ते होणारच. पण करायला लागेलच ना?"

ती गप्प बसली. करायला तर लागणारंच होतं. भांडी, किचन आवरून निशा बेडरूममध्ये आली तर बेडवर दोन्ही बाजूनी उशा लावून विहान गाढ झोपला होता. आपल्याशिवायच तो झोपला म्हणून तिला कसंसं झालं. दोन क्षण त्याला पाहून ती पुनः पाहुण्यांशी बोलायला निघून गेली. नाही म्हणता म्हणता चहा पाणी करून सर्वाना निघायला संध्याकाळ होऊन गेली. जाता जाता प्रत्येक पाहुण्यांनी विहानला हातात उचलून घेतलं, त्याची पापी घेऊन त्याच्या हातात ऐपतीप्रमाणे एकेक नोटही टिकवली. पाहुणे गेल्यावर घर एकदम रिकामं झालं आणि मागे राहिली ती विहानची गडबड आणि बडबड. गप्पा मारत सगळेच त्याच्याकडे पहात बसले.

"किती धडपड याची? सगळ्यांकडे राहिला, नाही?" सासूबाईं कौतुकाने म्हणाल्या.

"हो ना, मी घ्यायला गेलो तर भाऊजींकडून यायलाच तयार नाही?", विनय पुढे बोलला.

"कसा त्यांच्या मांडीवर बसून त्यांच्याच ताटातून त्यांच्या हातून जेवला.", सासूबाई बोलल्या. ती सर्वांचे बोलणे ऐकत चालत फिरत राहणाऱ्या विहानकडे कौतुकाने बघत राहिली. सासूबाईंनी पटकन जाऊन मीठ आणलं आणि नातवाची दृष्ट काढली अगदी सगळी सगळी बोटं मोडली.

रात्र झाली तसे निशाला मात्र तिला राहवेना. जरा घाईनेच विहानला घेऊन बेडरूम मध्ये आली. सकाळपासून त्याला दूध न दिल्याने तिची छाती भरून आली होती. तिला आता दुखायला लागलं होतं. त्याला दूध देणे हा तिच्यासाठी आता नाईलाज होता. त्यात हा असा खेळकर पोरगा अजूनही गोड गोड हसून खेळत होता. गादीवर ती बसल्यावर मात्र विहानला आईची आठवण झाली. तिच्याकडे येऊन आपले इतकुसे हात घेऊन तो तिच्या गळ्यात पडला.

"इतका वेळ आईची आठवण नाही का आली?", ती रागानेच त्याला बोलली. त्यावरही त्याने आईला खळखळून हसून दाखवलं. मग भरल्या डोळ्यांनीच तिने त्याला दूध पाजायला घेतलं.

त्यानेही इतक्या वेळाने मिळालेला तो पान्हा घाईघाईने प्यायला सुरुवात केली. तिला राहून राहून रडू येत होतं. त्याच्या केसांत हात घालून ती त्याला गोंजारत होती आणि तोही तिच्या मंगळसूत्राशी चाळा करत दूध पीत होता.

विनय आत आला तर त्याला कळेना ही रडतेय का?

तो म्हणाला," अगं वेडाबाई रडतेस काय? तो हट्ट करत होता का प्यायला?"

तिने नाकारत मान हलवली.

"मग?", विनय, "मग रडतेस का?"

"सकाळपासून याला आईची आठवण आहे का बघ की?", ती रडत बोलली.

"अगं पण त्यात इतकं रडण्यासारखं काय आहे?", त्याने विचारलं.

"तुला नाही कळणार ते?", ती.

"मग समजावून सांग ना?" तो हट्टाने म्हणाला.

"अरे, विहान मोठा होतोय तसा तो आपल्या पायावर उभा राहील, स्वतः सर्व करेल."

"अगं पण त्याला अनेक वर्ष आहेत." विनय बोलला.

"हो ना. पण आज हे असं त्याला दूध पाजण्यात जे आईपण आहे ती जवळीक कशी मिळणार परत? मी किती विचार करतेय बंद करायचं आहे. पण रात्र होत आली की जीव राहात नाही. आज त्याला लोकांशी खेळताना पाहिलं, जेवताना अगदी झोपताना पाहिलं तेंव्हा वाटलं तो मला सोडून किती सहज राहू शकतो. त्यात तो इतका हसरा मग काय? असाही सगळ्यांकडे राहतो. हे चार क्षणच काय ते फक्त माझे. आम्हाला दोघांना ही अशी जवळीक परत कधी मिळणार आहे? पण तरीही हे मला बंद करावंच लागणार आहे ना? आज ना उद्या? तो पुढे निघून जाईल आणि मी मात्र आई म्हणून इथेच असेन त्याला उराशी धरून. जन्माला तेंव्हा नाळ तोडताना इतका त्रास नाही झाला रे जितका यावेळी होईल." तिला रडू अनावर झालं होतं. दूध पिऊन समाधानाने झोपलेल्या आपल्या बाळाला तिने पुन्हा एकदा पाहिलं मनभरून आणि त्याला बराच वेळ तशीच धरून बसली.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Use group defaults

विद्याताई,कमाल केलीत. टचकन पाणी आलं डोळ्यांत. माझा मुलगा one and half years चा आहे. मी याच phase मधून जाते आहे. breast feeding सोडवतानाची भावनिक घालमेल अगदी perfect शब्दबध्द केलीत. इतक्या नाजूक विषयावर कथा फुलवण्याच्या तुमच्या talent ला सलाम. God Bless you.

धन्यवाद Taimur. Happy
मनाली, तुझी प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं. मी म्हटलं तसं, या फेज्मधून पार पडशीलच. ऑल द बेस्ट.

विद्या.

खुप सुन्दर लिहिलय...
मला माझीच आठ्वण झाली...
माझी मुलगी १८ महिन्याची आहे...जेव्हा मी आई म्हणुन नव्याने अनुभवत होते सगळ, तेव्हा मलाहि हे अस वाटायच...
feeding बन्द करताना, ६-७ महीन्याच अस्ताना कामावर जाताना, सुट्टीच्या दिवशि पाहुने अस्ताना...वेळ देता नाहि आला.. अशा कितितरि गोश्टी असतात.. ज्याने खुप खुप त्रास होतो जीवाला...ज्या फक्त आईच समजु शकते... काहीना हे सगळ उगिच कौतुक वाटत..
असतात काहि मुली ईतक्या हळव्या...

Thank you पाजु, अमा. Happy
अमा माझी खूप इच्छा आहे, सर्व लघुकथांची एक सिरियल बनवावी, एकेक कथा एक भाग अशी. अशा भरपूर इच्छा आहेत. Happy

:O=

छान लिहिलेय.
रिलेट न होता ही आवडले.
बरेच विचार आलेत डोक्यात. यावरूनच आले तरी थोडे वेगळे. जर डोक्यातच रेंगाळले तर पुढेमागे स्वतण्त्र धायात नक्की मांडेन.

Pages