सांजमळवट

Submitted by भुईकमळ on 16 March, 2017 - 10:55

बोलावतो घंटारव
धुकाळल्या घाटावर
बेडी काचते श्वासांची
नादहाका देहभर ...

पूर येई कहाणीला
अश्रू सांडता नदीत .
घट चालला वाहून
माझा स्पर्श सांभाळीत ...

तहानेच्या वादळात
आर्त वृक्षाचे आर्जव ,
'येग येग मेघावली
विडा वीजेचा भरव ".

जाओ नभापार झोका
रुपु देत चंद्रकाचा
तुटणाऱया तारकांचा
उरी प्राणांतिक ठेका ...

आता रानोमाळ गाते
सावलीला झुगारून .
रक्तशिंपण करते
पांगाऱ्याच्या फांद्यातुन

घेरलेल्या वणव्यात
सजे ठिणग्यांनी शेज
लाल पेटत्या फुलांनो
भरा सांजमळवट .

Group content visibility: 
Use group defaults

कांंदापोहे, धन्यवाद ! तुमचा या कवितेबद्दलचा अभिप्राय खूप आवडला .

rmd, तुम्हा सर्वांनी दिलेल्या प्रतिसादामुळे शब्दांशी सलगी करण्याचं धाडस वाढु लागलयं .
आभार !

पेशवा ,कवितेस तुमचा प्रतिसाद मिळालाय ,ही गोष्ट बाहेर असल्याने उशीरा लक्षात आली. आवडत्या कवीची
प्रतिक्रिया ...खूप आनंद झाला.
धन्यवाद !!!

संतोषजी , दाद आवडलीच ... मनापासून आभार ! ...

क्या बात है! खूप दिवसांनी माबोवर यावं ; आणि असं काहीसं सुरेख वाचायला मिळावं! सुंदर रचना! सुरेख रुपके!
ठिणग्यांची शेज..!! सुरेखच!!

तहानेच्या वादळात
आर्त वृक्षाचे आर्जव ,
'येग येग मेघावली
विडा वीजेचा भरव ".+++ क्या बात है! बोहत खुब...:)

एकदम अप्रतिम... शब्दच नाहित....
रुपु देत चंद्रकाचा (खुपु देत चंद्रकाचा) असे हवे होते का? रुपु देत चा अर्थ मला नाहि समजला...

राजेंद्र देवी

के अंजली , मनापासून धन्यवाद !इतक्या दिलेर, मनाला उभारी देणाऱया प्रतिक्रियेसाठी ..
.
रांगोळीप्रिय सायु,तुझेही आभार !

धनुडी ,धन्यवाद!!!

राजेंद्र ,तिथे रुपणे ,म्हणजेच रुतणे हा बोलीभाषेतला शब्द मला अभिप्रेत आहे. प्रतिसादासाठी आभार ...

Pages