शोध अनंताचा

Submitted by सत्यजित on 11 March, 2017 - 02:41

निरभ्र आकाश, डोळ्यांना दिसणाऱ्या अन न दिसणाऱ्या अनेक आकाशगंगा
कधीतरी पोहचू आपण तिथेही जीवनाचा शोध घेत आणि सापडेन मीच स्वतःला
मीच जगत असेन वेगळं आयुष्य कदाचीत
आहे त्या पेक्षा खूप चांगलं किंवा आहे त्याहून खूप वाईट
आहे तेच आयुष्य इतकं बहुआयामी असताना
त्याचेही इतके वेगवेगळे स्थर असावेत?
अरशांच्या भुलभुलैयात अडकलेलो आपण
आपल्याच प्रतिमा आणि त्यांच्या अनेक प्रतिमा...अनंत
साधी डोळ्यांचीही हालचाल बदलते प्रत्येक प्रतिमा
मग त्यात मीही आणि तुम्हीही आलात
सगळेच कसे काचेचे...
कॅलिडोस्कोपच्या तावदानात अडकलेलो आपण...
नियती फिरवत रहाते कॅलिडोस्कोप गरागरा
बनत रहातात नव्या नव्या आकृती, नवे नवे रंग
आपण भेटतो, विलगतो, आदळतो, आपटतो
अरशांच्या चार भिंतीत घेत रहातो शोध, अनंताचा...

- सत्यजित.

Group content visibility: 
Use group defaults