परतफेड!!! - भाग १

Submitted by विद्या चिकणे-मांढरे on 10 March, 2017 - 22:08

'ट्रिंग ट्रिंग', फोनची बेल वाजली अन आईने अधीरतेने फोन कानाला लावला. तिचा सगळा जीव जणू, कानातच जमा झाला होता. सकाळी पाहुणे येऊन गेले तेव्हाची नुसती या फोनचीच तर वाट पाहत होती. बाबा मात्र जणू काही झालेच नाही, अशा अविर्भावात पेपर वाचत बसले होते. एवढ्या अधीरतेने उचललेला फोन तिने फक्त, 'अहो पण! बरं….,मुलांच्या इच्छेपुढे आपण काय बोलणार, नाही का?' एवढं एकंच वाक्य बोलून ठेवून दिला. बाबांना कळायचं ते कळलं अन, आता पुन्हा हिचं रडगाणं चालू होणार त्याआधी आपण इथून सटकूया असा विचार करून बाबा उठले अन आतल्या खोलीत जाऊ लागले. पण ते आत जातील न जातील तोच आईची बडबड सुरु झाली.

"काय बोलते हि कार्टी पहायला आलेल्या मुलाशी काय माहीत, एवढी शिकलीये, कमावते, नाही म्हटलं तरी दिसायला ताईपेक्षा सरसच आहे. दरवेळी मुलाकडचे काही-बाही कारण सांगून नकार कसा देतात हे कोडं मला काही सुटत नाहीये. अहो! ऐकताय ना तुमच्याशी बोलतीये मी, भिंतीशी नाही!"

आता मात्र बाबांना काहीतरी बोलणं भागच होतं. उगाचंच काहीतरी बोलायचं म्हणून, 'आता काय झालं?' एवढंच बोलले अन परत सोफ्यावर बसले.

'अहो काय झालं काय? या मुलानेही नकार दिलाय', त्रासिक मुद्रेनं आई बोलली. आतल्या खोलीतून कान टवकारून हे सारं ऐकणारी सारिका आईच्या या वाक्यावर भलतीच चेकाळली, 'नकार दिलाय? अरेव्वा! तसाही मला नव्हताच आवडला मुलगा. बरं झालं, त्या लोकांनीच नकार कळवला ते. नाहीतर तू माझं डोकं खाल्लं असतंस अन तुझी समजूत घालता घालता माझ्या नाकी नऊ आले असते. व्हेवलेंथच मॅच नव्हती होतं आमची.'
खांदे उडवत सारिका बोलली तसा आईचा पारा अजूनच चढला.

'कसली डोंबलाची व्हेवलेंथ? काय झालं व्हेवलेंथ न जुळायला? दोघांचं शिक्षण सारखं, पगारही चांगला होता मुलाचा, स्वतःचा फ्लॅट आहे, लग्नानंतर दोघेच राहणार होतात, दिसायला चांगला होता, अजून काय मॅच व्हायचंय?' आईला काय उत्तर द्यावं हे न सुचून सारिका, 'माठ होता नुसता' एवढंच म्हणाली.
"माठ? अगं डॉक्टर आहे तो?", आई जवळजवळ किंचाळलीच.
'डॉक्टरही माठ असतात कि! काय हो बाबा?’, असे म्हणत सारिकाने बाबांना टाळी दिली अन दोघेही खळखळून हसले.
'हो! ते तुझ्या आणि तुझ्या बाबांच्या अनुभवाने कळलंय मला', आई वैतागून म्हणाली.
आईचा मूड चांगला व्हावा म्हणून इतका वेळ पेपरच्या मागे तोंड लपवून हसणारे बाबा मधेच म्हणाले, 'अगं ऐकलंस का? आज जेवायला माठाची भाजी कर, बरी असते पोटाला.’ बाबांच्या बोलण्यावर अजूनच खिदळत अन त्यांना परत एक टाळी देत, 'येते ग' म्हणत सारिका क्लीनिकला निघून गेली.

'समजावायचं सोडून तुम्ही अजून फूस लावा तिला. अहो अठ्ठाविसची झाली आता, ताई हिच्या वयाची होती तेव्हा एक पोर होतं तिच्या पदरात. लोक काय म्हणतील, केलाच ना दुजाभाव, परक्याची पोर म्हणून आपण दुर्लक्ष केलं असंच बोलतील ना', सारिका निघून गेल्यावर आईने बाबांकडे मोर्चा वळवला.

'अगं, लोकांचं काय ते बोलतंच असतात. आपली ताई सचिनला घेऊन आपल्यासमोर उभी राहिली आणि मला यांच्याशी लग्न करायचंय म्हणाली, तेव्हाही लेकीचं वेगळ्या जातीच्या मुलाशी लग्न लावून दिलं, तर लोक काय म्हणतील या विचाराने स्वतःच्या मुलीला घराबाहेर काढायला निघालो होतो आपण. तेव्हा सारिकानेच आपली मनधरणी केली होती होती ना. आणि काय वाईट झालंय ताईच? सुखात आहे चांगली’, बाबांनी आईची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

‘अहो ते सगळं ठीक आहे हो, पण लग्न करावंच लागणार ना कधीतरी? दरवेळी नकार देऊन कसं चालेल? का नाही करत हि मुलगी लग्न? काही म्हणता काही कळत नाहीये मला. होकारापेक्षा नकारानेच जास्त खुश होते हि. अहो कसं होणार या मुलीचं? जगरहाटी कधी कळणार या पोरीला?’, आईने एकामागे एक प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

मग जरा समजुतीच्या स्वरात बाबा म्हणाले, 'अगं कशाला काळजी करतेस एवढी? तिला आवडला एखादा मुलगा कि करेलच ती लग्न आणि जगरहाटीचं म्हणशील तर आपल्यापेक्षा जास्त जग पाहिलंय तिने, पुण्याच्या बाहेर फारफार तर लोणावळा किंवा महाबळेश्वर पाहिलंय आपण. जग फिरून आलीये ती, त्तू तिची अजिबात काळजी करू नकोस. आधी ती माठाची भाजी मिळते का बघ बरं बाजारात', असं म्हणत बाबांनी डोळे मिचकावले अन वातावरण जरा हलकं झालं.

क्रमशः

विद्या चिकणे (मांढरे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

vidya chhan suruvat ahe. lavkar yeude pudhcha bhag!!!!

Happy