महिला दिन, जरा उशिरानेच!

Submitted by सई केसकर on 9 March, 2017 - 12:46

नवीन लग्न झाले होते तेव्हा एकदा सकाळी मी माझ्या पांघरुणाची घडी घालायला विसरले. अंघोळीनंतर बेडरूममध्ये परत आले तेव्हा नवऱ्याच्या बाजूचा पलंग टापटीप झाला होता. माझे पांघरूण मात्र तसेच होते. मी मनातून खूप चिडले पण त्याला काही बोलले नाही.

निघताना मी त्याला त्याचा डबा दिला आणि सांगितलं की हा तुझा शेवटचा डबा. यापुढे तू जशी स्वतःच्या पांघरुणाची घडी घालून माझं तसंच ठेवतोस, तसंच मी पण माझ्या एकटीची पोळी भाजी करून डबा घेऊन जाणार. तुझं तू बघ.

यावर तो काही लगेच सॉरी वगैरे म्हणाला नाही. त्याला कसा स्वयंपाक येतो आणि तो कसा कुणावर अवलंबून नाही याचा त्यानी मला दाखला दिला. त्यानी चार वर्षं, स्वतःच्या घरात एकट्याने राहून कसं कुठलीही बाई किंवा डबा न लावता सगळं केलं याचं वर्णन सांगितलं. मला ते सगळं माहिती होतं. कारण त्यासाठीच मी त्याच्याशी लग्न केलं होतं. त्याच्याशी लग्न करायच्या काही कारणांपैकी एक म्हणजे त्याला एकट्यानं राहायची आणि घर सांभाळायची सवय होती, हे होते. पण तिथेही, सवय फक्त आपली आपली कामे करायची होती. लग्न झाल्यावर आणि मुलं झाल्यावर ही आपली आपली कामे करायची सवय सुद्धा अपुरी पडते. तेव्हा लागते ती दुसऱ्यांसाठी आणि दुसऱ्यांची कामे करायची सवय. अर्थात आम्ही इथपर्यंत अशी भांडणं करत करतच पोचलो. पण ते करताना वेगवेगळ्या वेळी आम्हाला दोघांनाही आत्मपरीक्षण करावे लागले.

घरातल्या बायकोला, आईला, सगळ्यात जास्त जर काही हवं असेल तर ती म्हणजे घरातल्या छोट्या छोट्या कामात मदत. आणि अशी कामे पुरुषांनी केली तर आपल्या मुलांवर स्त्रियांना आदर देण्याचे वेगळे असे संस्कारच करावे लागणार नाहीत. मुलं लहान असतात तेव्हा तर त्यांच्यासाठी केलेल्या कामांमधूनच आपण त्यांच्या जवळ जात असतो. जसे की अंघोळीच्या वेळी एखादे ठराविक गाणे मिळून गाणे, जेवण करताना एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकणे. यात जेव्हा बाबाचा सहभाग येतो, तेव्हा मुलाचे आणि बाबाचे नातेदेखील घट्ट होत असते.

'हॅविंग इट ऑल' हे वाक्य महिला दिनाच्या आसपास आवर्जून कानावर पडतं. काल माझ्या वाचनात असाच एक लेख आला. त्यात नोकरी-व्यवसाय करणाऱ्या आणि आपली करियर "जपणाऱ्या" बायकांना दिलेला सल्ला होता. अनेक यशस्वी महिलांच्या मुलाखाती घेऊन लेखिकेने एकच महत्वाचा मुद्दा मांडला होता. जर (लग्न करून आणि मुलंहोऊ देऊन) यशस्वी व्हायचे आणि राहायचे असेल, तर बायकांनी लग्न योग्य पुरुषाशी केले पाहिजे. आधी मला हे खटकले. की परत पुरुषच का?

पण थोडा विचार केल्यावर लक्षात येतं की 'हॅविंग इट ऑल' या वाक्यात त्या बाईकडे जे जे "आहे", ज्याला आपण सगळं म्हणतो आहोत, ते स्वतःजवळ ठेवण्यासाठी बऱ्याचवेळा तिची एकटीचीच धावपळ चाललेली असते. पण तसे असायची काहीच गरज नाही. जसे कुठलेही मोठे काम हे टीमवर्क असते तसेच घर चालवणे आणि मुलांचे संगोपनदेखील मिळून करायचे टीमवर्क आहे. आणि इथे बाई काम करत असली काय किंवा नसली काय, घरातील व्यक्तींशी प्रेमाचे नाते घरात वावरल्याशिवाय कसे होईल? आपण स्त्री पुरुष समानतेची उदाहरणे देताना नेहमी पायलट, ऍस्ट्रोनॉट स्त्रियांची उदाहरणे देतो. पण आपल्या घरात जर आनंदानी भांडी घासणारा, आपल्याला जिमला जायला सांगून मुलांना ब्रेकफास्ट करून देणारा, आपल्या कामात उत्सुकतेने रस घेणारा असा आपला जोडीदार पुरुष असेल, तर तो आपल्या आयुष्यातला पहिल्या नंबरचा फेमिनिस्ट आहे.

स्त्रियांची आणि पुरुषांची यशाची परिमाणेदेखील काळाबरोबर आणि वयानुसार बदलली पाहिजेत. खरंतर "यशाचे परिमाण" हा प्रयोगच चुकीचा आहे. महिला दिनानिमित्त नेहमी "यशस्वी महिलांच्या" मुलाखाती घेतल्या जातात. पण आज कालच्या जगात साधे, सामान्य आयुष्य आनंदानी जगणे हेदेखील प्रचंड यशस्वी असल्याचे लक्षण आहे. आजच्या दिवशी खरं तर सन्मान झाला पाहिजे तो अशाच आनंदानी घरच्यांचे सगळे लाड पुरवणाऱ्या, कुठलाही आर्थिक मोबदला न घेता सतत घरात काम करणाऱ्या महिलांचा. त्यातील काही जणींचे तेच स्वप्न असेल, आणि काही जणींनी आपलं असं काहीतरी बाजूला ठेवून ते आनंदानी पत्करले असेल. अशा सगळ्या महिलांसाठीदेखील महिला दिन साजरा व्हायला हवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल आमच्या ऑफिसमधील काही बायका त्यांच्या नवर्‍यांनी वूमन्स डे निमित्त कसे कधी नव्हे तो स्वतः स्वयंपाक केला किंवा घरचे काही काम केले किंवा काही गिफ्ट चॉकलेट दिले याचे कौतुक सांगत होत्या. त्याच बायका ईतर दिवशी त्रागा रडारड करत असतात. मला त्यांच्या आनंदावर विरजन घालायचे नव्हते. म्हणून मी ईतकेच म्हणालो, नवरा स्मार्ट आहे तुमचा!

आपण स्त्री पुरुष समानतेची उदाहरणे देताना नेहमी पायलट, ऍस्ट्रोनॉट स्त्रियांची उदाहरणे देतो. पण आपल्या घरात जर आनंदानी भांडी घासणारा, आपल्याला जिमला जायला सांगून मुलांना ब्रेकफास्ट करून देणारा, आपल्या कामात उत्सुकतेने रस घेणारा असा आपला जोडीदार पुरुष असेल, तर तो आपल्या आयुष्यातला पहिल्या नंबरचा फेमिनिस्ट आहे. >> एक्दम पटले. Happy त्यादिवशी मी म्हणणार होते की मला 'विश' नाही केलेस महिलादिनाचे. Happy पण वाटले काय गरज आहे? दोघेही दिवसभर तित्केच काम करतो, घरासाठी झटतो, मग मला वेगळेपण का त्या एक्च दिवशी?
बाकी लेख सुरु करताना अजुन पुढे काहितरी असेल असे वाटले होते. मधेच संपला असे वाटले.
खरेतर इथे अमेरिकेत लोकांना माहीतही नव्हते किंवा आठवण नव्हती. कुणिच कुणाला 'शुभेच्छा' दिल्या नाहीत त्या दिवशी आणि फेबु वर मात्र भारतातून भरम्साठ बातम्या येत होत्या, अनेक लोकांच्या उपक्रमाच्या, शुभेच्छांच्या.

घरातल्या बायकोला, आईला, सगळ्यात जास्त जर काही हवं असेल तर ती म्हणजे घरातल्या छोट्या छोट्या कामात मदत. आणि अशी कामे पुरुषांनी केली तर आपल्या मुलांवर स्त्रियांना आदर देण्याचे वेगळे असे संस्कारच करावे लागणार नाहीत>>>>>>>+१

ंमी ऐकले इथे अमेरिकेत बर्‍याच बायकांनी कामावर नाही, दुकानात जायचे नाही असे ठरवले होते. बायका दुकानात गेल्या नाहीत म्हणून दोन दिवस वर जाणारे स्टॉक मार्केट एकदम थोडे खाली आले!

खरं तर हा लेख टाकल्यावर मला काढून टाकायचा होता. नंतर वाचल्यावर तो मला आवडला नाही.
म्हणून मी तो डिलीट करायचा खूप प्रयत्न केला. कसा करतात मायबोलीवर लेख डिलीट?
पण आता प्रतिसाद येऊ लागलेत. Sad
असो.

घरकामाची आवद प्रत्येकालाच अस्ते/असावी असे नाह . स्त्री पुरुष भेद त्यात नसतो.
अस्श्शा वेळी मोलाने मानसे लावुन काम करुन घेतले तर बरे पडते.
मला भरतीय बायका साड्यांवर / लग्न समारंभावर पैसे खर्च करतान दिसतात. तेच पैसे काम्वल्यान दिले तर त्यांचे आयुश्य सुखावह होइल असे वातते.

घरकामाची आवद प्रत्येकालाच अस्ते/असावी असे नाह . स्त्री पुरुष भेद त्यात नसतो.
अस्श्शा वेळी मोलाने मानसे लावुन काम करुन घेतले तर बरे पडते.
मला भरतीय बायका साड्यांवर / लग्न समारंभावर पैसे खर्च करतान दिसतात. तेच पैसे काम्वल्यान दिले तर त्यांचे आयुश्य सुखावह होइल असे वातते.

धागा नाही डिलिट करता येणार स्वत:ला, ॲडमिनला सांगावे लागेल, कारण योग्य वाटल्यास ते डिलिट करतील.

तुम्ही तुमची लेखाची पोस्ट मात्र संपादित करुन डिलिट करुन तिथे " संपादित" अथवा अजुन काही लिहु शकता, शिर्षक बदलु शकता. तसे करायचे का ते ठरवा.

जर स्वत:ला आवडला नाही अेवढेच कारण असेल तर राहू द्यावा, असे मी सुचवेन. मुद्दे योग्य आहेत. वाटल्यास तुम्हाला काही बदल करायचा असल्यास करु शकता की.